Homeब्लॅक अँड व्हाईटआचार्य अत्रे यांनी...

आचार्य अत्रे यांनी जखम होऊ न देता केलेली गुळगुळीत दाढी!

आचार्य उपाख्य प्रल्हाद केशव अत्रे हे मराठी सारस्वताला मिळालेले मोठे देणे आहे. साहित्यिक, पत्रकार, राजकारणी नेता, शिक्षणतज्ज्ञ, अशा बहुविध भूमिका ते लीलया जगले, हे सारा महाराष्ट्र जाणतो. अशा या महान साहित्यकाराच्या लेखणीतून जन्मलेल्या ‘झेंडूची फुले’ या विडंबनात्मक काव्याला 100 वर्षे पूर्ण होत आहेत. या शंभरीनिमित्त ‘झेंडूची फुले’ या कवितासंग्रहाची कविवर्य महेश केळुस्कर यांनी संपादित केलेली आवृत्ती उद्या प्रकाशित होणार आहे. अशोक मुळे यांच्या डिम्पल प्रकाशनातर्फे ही आवृत्ती प्रकाशित केली जात आहे.

‘रला र, टला ट’ जन म्हणे काव्य करणारी या वृत्तीची यथेच्छ टर उडवणारी, टोपी उडवणारी, परंतु त्याचवेळी कुणालाही तुच्छ न लेखणारी ही निर्विश अशी निखळ विनोदी कविता आहे. या कवितामधील विनोदाबाबत खुद्द साहित्याचार्य तात्यासाहेब केळकर म्हणतात- “… प्रस्तुत पुस्तकातील विनोदाचा आस्वाद उत्तमप्रकारे घेऊ शकलो याचे कारण या विनोदाचा अस्सलपणा होय. वृत्तपत्रातून प्रथम या काव्यातील पंक्ती माझ्या अवलोकनातं आल्या तेव्हाच या काव्याचा कर्ता अत्यन्त बुद्धिमान असला पाहिजे असे मी अनुमान काढले होते.”

भरकटलेल्या कल्पनेवर प्रहार

साधारणतः 1925च्या दशकात मराठी काव्य प्रांतात रविकिरण मंडळातील कवीमंडळींचा प्रभाव होता. माधव ज्यूलीयन, यशवंत, कवी गिरीश आदी कवींचा काव्यप्रांतात दबदबा होता. मराठी कवितेत त्यांनी वेगवेगळे प्रकार हाताळले. परंतु पुढेपुढे शब्दांचे खेळ वाढू लागले व कवितेचा आत्मा गुदमरू लागला. तेव्हा केशव कुमारांनी (म्हणजे आचार्य अत्रे यांनी हो..)

‘जवळ जाऊंनी चोरपाऊली

नजर चोरटी आत टाकली!

आणि तेथले दृश्य पाहुनी

थक्क जाहला क्षणभरी मनी’

असा पॉवरफुल डोस देऊन या कवींचे चौर्यकर्म उघडकीस आणले.

“समीप होते त्यांचीया ग्रन्थ जाडे,

कागदाची आणखी तशी बाडे

त्यात बघुनी सारखा झपाट्याने

लिहीत होता कायसे मुकाट्याने!”

याहीपुढे जाऊन केशवकुमारांनी

“धन्य ते चौर्य जाणावे अब्रू जे जगी वाढवी,

धिक धिक चौर्य मित्रा, जे नाव लौकिक घालवी”

अशा शब्दांत कविमित्र चोराची निर्भत्सना करतोय.

चोराची आळंदी

मी विडंबनकार कसा झालो याबाबत खुद्द आचार्य सांगतात- ‘खरंतर त्यावेळच्या बालकवी, केशवसूत आदी कवीमंडळींप्रमाणे आपणही कविता कराव्यात असे मनात होते. पण हे मनासारखे होत नव्हते तोच “माझ्यासारखा लाजरा माणूस आपली चालचलणूक आणि चर्या बदलून खुशाल विडंबन काव्याच्या खुंटावर येऊन बसलेला होता.. गोविंदाग्रज, बालकवी सोडून देवाच्या आळंदीला पोहोचायच्या ऐवजी मी चोराच्या आळंदीला जाऊन पोहोचलो. खरंतर 1922मध्येच झेंडूची काही फुले तयार झालेली हॊती. परंतु समाजभयाने किमान अडीच-तीन वर्षे ते हस्तलिखित बंदिस्त होते. त्यानंतर इतिहासाचार्य राजवाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शारदोपासक संमेलनात झेंडूच्या फुलाचे वाचन झाले. पहिल्या कवितेच्या वाचनानंतर हलकेसे स्मित आले. मात्र नंतरच्या कवितांनी हास्यधबधबा सुरु झाला.” रविकिरण मंडळातले कवी जर फाटकेतुटके असते आणि त्यांच्या काव्यात गुणांचा लवलेश नसता तर झेंडूच्या फुलांना महाराष्ट्रात जी अपरंपार लोकप्रियता लाभली ती मुळी लाभलीच नसती, असे खुद्द आचार्य यांनीच म्हटलेले आहे.

संयुक्त महाराष्ट्रातही लोकप्रिय

“मना नीटपंथे कधीही न जावे

निशापाणी केल्याप्रमाणे चलावे

जरी वाहने मागूनी कैक येती

कधी ना तरी सोडीजे शांतवृत्ती!”

असे कितीही मासले दिले तरी झेंडूच्या फुलांनी संयुक्त महाराष्ट्र आंदोलन गाजवले यात शंकाच नाही. महाराष्ट्रविरोधी नेहरू, स. का. पाटील, मोरारजी देसाई, काकासाहेब गाडगीळ, शंकरराव देव, भाऊसाहेब हिरे, यशवंतराव चव्हाण आदी काँग्रेस नेत्यांना केशवकुमारांनी सळो की पळो करून सोडले होते.

“आता मराठ्यांनो उठा

हातात घ्या काळे निशाण

ते दोन मंत्री बेईमान

आले हिरे! आले चव्हाण!!”

तसेच

“मंत्री हा जुल्मी गडे,

यास पुन्हा निवडू नका।

छळीतो हा फार तुम्हा,

यास मत देऊ नका।।”

“उपवासी देव माझा,

सांगा कुणी पाहिला।

जीर्ण मलीन पंचा ज्याचा,

बघुनी जीव घाला।।

आरती हिरे भाऊ, नका राजीनामा देऊ”

अशा अनेक झेंडूच्या फुलांनी महाराट्र आंदोलन नटलेले आहे. या झेंडूच्या फुलांना सुगंध नसेल तरीही हे चुकीचं चाललं आहे, केवळ शब्दांचा अट्टाहास आहे, यात जिवन्तपणा नाही आणि तो जिवंतपणा येण्यासाठी थोडीशी छुरी चालवली पाहिजे. पण कुणालाही जखम तर व्हायला नको, या काळजीने शब्द चालवलेले आहेत. त्याने निश्चितच मनाला आनंद मिळतो व चेहऱ्यावर स्मित झळकते. कुणाला ही फुले आवडली नाहीत तर केशवकुमार सांगतात..

“रागाने चुरगळलीस जरी ही पुशपे कधी त्वा बरे…।

केव्हाही विसरू नकोस तळीचे खाण्या परी खोबरे।।”

आम्ही तरी दुसरे काय सांगणार??

छायाचित्र मांडणीः प्रवीण वराडकर

Continue reading

न्यायमूर्तींचे निरीक्षण मोदी सरकारच्या अंगाशी!

अखेर अडीच-तीन महिन्यांच्या घोळानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलाच! त्यासाठी विद्यार्थ्यांना जंतरमंतरवर चार दिवस आंदोलन करावे लागले, लाठीमर खावा लागला. अनेक विद्यार्थ्यांना तर दिल्ली पोलिसांनी बदडून काढलेले जनतेने पाहिले. (विद्यार्थ्यांनीही पोलिसांना मारले...

‘य. दि.’ स्मरणाच्या निमित्ताने दिसली मुणगेकरांची वैचारिक दिवाळखोरी!

यशवंत दिनकर फडके उर्फ य. दि. यांचा पहिला एन्काऊंटर सुमारे 50 वर्षांपूर्वी चर्चगेटजवळील केसी महाविद्यालयात 'बॉम्बे कॉलेज ऑफ जर्नालीझम'च्या वर्गात झाला. त्यांचा विषय अर्थातच राजकारण, खास करून महाराष्ट्रातील राजकारण असा होता. काही काळानेच पत्रकारितेत रीतसर प्रवेश झाल्यावर मात्र विविध...

घाटकोपर पूर्व चकचकित तर, पश्चिम ओंगळवाणे!

मुंबई महापालिका असो, मध्य रेल्वे असो, मेट्रो असो वा अगदी मुंबई प्राधिकरण असो. या सर्व सरकारी यंत्रणानी घाटकोपर स्थानकाच्या पश्चिम परिसरावर धडधडीत अन्याय केल्याचे दोन दिवसांच्या पाहणीत आढळून आले. पूर्वी पूर्व भाग अगदी चिंचोळा होता. तेव्हापासून त्या भागात जाणे...
Skip to content