Homeमाय व्हॉईसघाटकोपर पूर्व चकचकित...

घाटकोपर पूर्व चकचकित तर, पश्चिम ओंगळवाणे!

मुंबई महापालिका असो, मध्य रेल्वे असो, मेट्रो असो वा अगदी मुंबई प्राधिकरण असो. या सर्व सरकारी यंत्रणानी घाटकोपर स्थानकाच्या पश्चिम परिसरावर धडधडीत अन्याय केल्याचे दोन दिवसांच्या पाहणीत आढळून आले. पूर्वी पूर्व भाग अगदी चिंचोळा होता. तेव्हापासून त्या भागात जाणे आहे. आता पूर्व भागातील दोन फोटो दिलेले आहेत. त्यात तेथे किती प्रशस्त भाग आहे, सरकते जिने व प्रवेशद्वार किती आखीव केले आहेत ते दिसून येते. यंत्रणा त्याच आहेत. आराखडेही तेच बनवतात. मग हीच बुद्धी यंत्रणांनी पश्चिम भागासाठी का वापरली नाही? की त्यादिवशी त्यांची बुद्धी ‘रजे’वर गेली होती काय? पूर्व परिसरातील रस्ते बऱ्यापैकी रुंद आहेत. गर्दी तेथेही असते. परंतु पदपथ तसे बरे आहेत (चांगले नाहीत).

पश्चिमेच्या लालबहाद्दूर रस्त्यावर सिग्नलच्या डावीकडच्या पदपथावर गणपतीसाठी मोठे मंडप घातल्याचे दिसून आले. पदपथ बऱ्यापैकी मोठे आहेत. परंतु जनतेला जाण्या-येण्यासाठी केवळ एका वितीपेक्षाही कमी जागा ठेवलेली आहे. हे गणरायाला तरी मान्य होईल काय? या दोन मंडपांपैकी एकात मूर्तिकारांचा कारखाना आहे. दुसऱ्या मंडपात बहुदा सार्वजनिक गणपती बसवणार असतील. धर्माच्या विरोधी असण्याचे कारण नाही, कारण बाजूला रस्त्यावरील जोरात येणारी जाणारी वाहने.. जनता रस्त्यावरून जाणार म्हणजे जीव मुठीत घेऊन चालणार! एका वितीत कितीजण जाणार? याचे उत्तर भक्तांनीच दिलेले बरे!

पुन्हा पूर्व भाग… सरकत्या जिन्यावरून त्या प्रशस्त जिन्यावर आल्यावर एक सुखद धक्का बसला! चक्क पोलिसांनी उभारलेल्या छोट्याशा चौकीत चक्क एक महिला पोलीस बसलेली दिसली, तीही अलर्ट मोडवर! ती बिडचीच निघाली. काका, आम्ही किनान रात्री दोन वाजेपर्यंत तरी असतोच! मला खरोखरचं अभिमान वाटला पोलिसांचा! पूर्व भागात जरी रस्ते बऱ्यापैकी मोठे असलेतरी तेथील दोनतीन रस्त्यांवर रांगेने कित्येक खासगी गाड्या पार्क केलेल्या दिसल्या. रस्त्याच्या कडेला असलेल्या पॉश निवासी संकुलातही अनेक गाड्या पार्क केलेल्या दिसल्या. मग रस्त्यावर उभ्या केलेल्या गाड्या कुणाच्या? सरकार वा महापालिकेने गाड्या उभ्या करण्यासाठी का रस्ते रुंद केले? मुंबई पोलिसांनी या पार्क केलेल्या गाड्यांची गंभीर दखल घेणं गरजेचे वाटते.

चेंबूरकडे जाणाऱ्या या दोन्ही रस्त्यावर छोटीछोटी पण आतमध्ये वाढवलेली अनेक ‘बाटली’ हॉटेल्स आहेत. येथे दारू पिण्याची सोय होते. (बारच आहेत.) पण, रेग्युलर जेवण मिळत नाही. चकण्यासाठी शेवपुरी, भेळपुरी, भजीया वगैरे मिळतात. जेवण सांगितले तर बाहेरून मागवून देतात. मात्र, दर बराच लावतात. या रस्त्याच्या टोकाला ज्यूस विक्रेते आहेत. त्यांनीही आपले हातपाय नको इतके पसरलेले आहेत. आणखी एक विशेष बाब लक्षात आली. ती म्हणजे या परिसरात जितके बार व छोटी हॉटेल्स आहेत त्यांच्याकडून वसुली करण्यासाठी चेंबूरच्या शेल कॉलनीतून ‘नाडर अण्णा’ची माणसे येतात, असं समजले. ही सर्व माणसे दिवंगत साधूअण्णांची माणसे असल्याचे माहितगारांनी सांगितले!

जाता जाता…

“अरेरे अरेरे, झाले काय बघे मुंबचे मातेरे!!

खंडणीच्या घशात, कचऱ्याच्या थडग्यात, गर्दीच्या ढिगाऱ्यात

मुंबैचे सारे मराठी आकाश

अरेरे, बापे

इकडून तिकडून, बिळातून, बोगद्यातून रोज नवा रावण

चिलटासारखा वाढतो

रस्त्यारस्त्यावर झोपडपट्टीचे रुखवत मांडतो

शहराला शेणामुताचे अत्तर फसतो.. बिनधास्त जगतो” (शांताराम)

(लेखक विजयकुमार काळे ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

Continue reading

नामचीन गुंडाला ‘पिंजरा’ दाखवताच पोलीस अधिकारी यमसदनी!

ठाण्यात पाच दिवसांपूर्वी, 24 तारखेच्या रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास एका अट्टल गुन्हेगाराने सिमेंटची वीट डोक्यात घालून ड्युटीवरील पोलीस उपनिरीक्षकास जीवे मारले. कारण काय तर म्हणे राऊंडवर असताना मला 'पिंजऱ्यात' का टाकले? (पिंजरा म्हणजे पोलिसांची जाळीदार गाडी). स्थळ- पोखरण रस्ता...

पोलीस आयुक्त देवेन भारती.. एक नजर इधर भी…

मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेऊन यंदाच्या जानेवारी ते ऑगस्टमधील शहरातील गुन्हेगारीचा आलेख व पोलिसांची कामगिरी विषद केली. खरंतर अशा पत्रकार परिषदा घेऊन पोलीस, जनता व पत्रकारांध्ये माहितीचे आदानप्रदान होणे महत्त्वाचे असते. पूर्वी अनेक...

गणरायही गुदमरले रेल्वेस्थानक परिसरातल्या या प्रचंड गर्दीने!

सरकारी व रेल्वे खात्याच्या आकडेवारीच्या आधारे विचार केला तर ठाणे रेल्वेस्थानकातून दररोज सुमारे पाच ते सहा लाख प्रवासी ये-जा करीत असतात. प्रवासी नागरिकांबरोबरच स्थानक परिसरात असलेल्या लाखो फेरीवाल्यांमुळे आधीच हैराण झालेल्या प्रवाशांच्या हालात परिसरातच मोठा मंडप घालून सार्वजनिक गणपती...
Skip to content