Homeमाय व्हॉईसमहापौर, 'हभप' आमदारांच्या...

महापौर, ‘हभप’ आमदारांच्या नाकावर टिच्चून घाटकोपरची दैना!

दोन दिवसांपूर्वी एका प्रकरणाच्या शोधासाठी घाटकोपरला जाऊन आलो. वेळ संध्यकाळची असल्याने रेल्वेनेच जायचे पक्के केले. कधी नव्हे ती गाडी वेळेवर होती. सुमारे अर्ध्या तासाच्या आत घाटकोपरला पोहोचलो. स्थानकात काही गैरसोयी आहेतच. स्थनाक दुरुस्तीचे काम नको इतके रेंगाळलेले दिसले. त्याविषयी वेगळे लिहिणारच आहे. स्थानकाच्या पश्चिमेला ऊतरलो आणि समोर गर्दी. बसेस, रिक्षा, गाड्या, बाईक्स आणि माणसांची प्रचंड गर्दी पाहून मला दरदरून घामच सुटला! इतकी कोंडी होती की विचारता सोय नाही. बाईक्सचे हॉर्न, गाड्या-बसेसचे हॉर्न, मध्येच ‘अरे गाडी बाजू में ले रे..’ असे ओरडणारे अनेक रिक्षावाले, तसेच आजूबाजूच्या पदपथावरील विक्रेत्यांकडे घासाघीस करणारे सामान्य जीव, अशा कोलाहलात डोकं सुन्न होऊन गेलेलं!

न्यायालय निर्णय येथे नाही

काही महिन्यांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने शहरातील अनेक पदपथांनी ‘मोकळा श्वास’ घेतल्याचे वाचनात आले होते. पण घाटकोपर रेल्वेस्थानकाचा (प) परिसर पाहता उच्च न्यायालयाचा तो आदेश घाटकोरच्या पालिका विभाग कार्यालयात अजून पोहोचलाच नसल्याचे दिसून आले. त्या गर्दीला किंवा वाहतूककोंडीला दिशा देताना एकही पोलीस हवालदार वा अधिकारी दिसला नाही. मी स्वतः त्या भागात सुमारे दीड तास होतो. एकही पोलीस दिसला नाही. नाही म्हणायला पोलिसांची गाडी उभी असलेली मात्र दिसली. पोलिसांची हालचाल मात्र कुठेच दिसली नाही. जनतेचे हाल मात्र उघड्या डोळ्यांना दिसत होते.

घाटकोपर

15/20 बसथांबे, तोबा गर्दी

या परिसरात बेस्ट बसेसचे वेगवेगळे असे 15/20 तरी थांबे असावेत. (कमीजास्त असू शकतात.) परंतु, बेस्टचा एकही अधिकारी वा वाहतूक व्यवस्थापक प्रवाशांना मदत करण्यासाठी वा रांगा नियंत्रण करण्यासाठी दिसत नव्हता. रिक्षाचा तर आनंदी आनंदच! स्थानक परिसर जणू फेरीवाल्यांना आंदण दिल्यासारखीच जणू परिस्थिती होती. आंदण हा शब्द अगदीच मवाळ वाटतो. खरंतर स्थानक परिसराच्या उरावरच फेरीवाले बसल्यासारखे वाटतं होते. इतका त्यांचा उच्छाद होता. पश्चिमेला पाय ठेवल्यापासून जिकडे पाहवे तिकडे फेरीवाले माझे… असं चित्र आहे. रेल्वे पुलाच्या शेवटच्या पायरीवरून पाय खाली ठेवला की पानीपुरीचा ठेला. दोन पावले पुढे गेलात की चहाची टपरी. त्याच्या पुढे टोस्ट, बटर (पाव), खारी बिस्कुटवाले, मधूनच रेल तिकीट, लोकल तिकीट असे ओरडणारे स्टॉल, चपलांचे तर अगणित स्टॉल, दुसऱ्या बाजूला खाऊंगल्लीसारख्या छोट्या टपऱ्या, पदपथ नाहीतच आणि आहेत तेथे फळवाले-भाजीवाले, मध्येच चपलाच्या स्टॉलवाल्यांची दोन स्टुले पदपथावरच. म्हणजे पुन्हा जनता रस्त्यावरच आणि मागे ‘काका वरून चाला ना बाबा..’ असा उगाचच ओरडून सांगणारा रिक्षावाला…

प्रवाशांसाठी जागाच नाही!

काही अंतरावर घाटकोपर स्थानक लिहिलेला बसथांबा. पण ते प्रवाशांना उभे राहण्यासाठी जागाच नाही. ती जागा भाजी व फळांच्या क्रेटने घेतलेली! अनेक ठिकाणी तर पदपथाची टोके नीट जमलेलीच नाहीत. तेथे अजूनही खड्डे दिसून येतील. एकदोन ठिकाणी तर एका वितीचा पदपथ आहे. एकूणच परिसराची अवस्था दयनीय आहे. गेल्या अनेक वर्षांत शहर अभियंता व रस्ते अभियंत्यांनी या परिसराची पाहणीच केलेली नसावी, असे मी शपथपत्रावर लिहून सांगण्यास तयार आहे. हा परिसर काहीसा महापौर महोदयांचाही आहे. त्याहीपेक्षा भाजपचे बाहुबली आमदार, जे स्वतःला हभपही म्हणवून घेतात, अशा आसामीचाही आहे. असे असताना ही बजबजपुरी जनतेने का म्हणून सहन करावी?

“मोक्षाच्या अन अत्याचाराच्या मार्गानं सरकारनं चालू नये

नाहीतर घरचेच होतात घरभेदी

मिटली जाते आबादी

जनसंपर्कातली, झाडाझूडुपातली, जनावरातली

ज्यांना मुलकी अधिकार व पितळी बिल्ले

जनतेने दिलेले आहेत

त्यांनीच जर टांगा वर केल्या लोकांवर तर…

त्यांना दुधाने न्हाऊ घालणार आहात काय?? (नामदेव ढसाळ)

असा संतप्त सवाल कुणी उपस्थित केला तर त्यात काही चुकीचे आहे काय? मुंबई महापालिकेच्या मुख्यालयाने ही बाब गांभीर्याने घेणे जरुरीचे आहे. पोलीस प्रशासन आणि सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींशी चर्चा करून विनाविलंब यावर चर्चा होणे निकडीचे आहे.

छायाचित्र मांडणीः प्रवीण वराडकर

(लेखक विजयकुमार काळे ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

Continue reading

नामचीन गुंडाला ‘पिंजरा’ दाखवताच पोलीस अधिकारी यमसदनी!

ठाण्यात पाच दिवसांपूर्वी, 24 तारखेच्या रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास एका अट्टल गुन्हेगाराने सिमेंटची वीट डोक्यात घालून ड्युटीवरील पोलीस उपनिरीक्षकास जीवे मारले. कारण काय तर म्हणे राऊंडवर असताना मला 'पिंजऱ्यात' का टाकले? (पिंजरा म्हणजे पोलिसांची जाळीदार गाडी). स्थळ- पोखरण रस्ता...

पोलीस आयुक्त देवेन भारती.. एक नजर इधर भी…

मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेऊन यंदाच्या जानेवारी ते ऑगस्टमधील शहरातील गुन्हेगारीचा आलेख व पोलिसांची कामगिरी विषद केली. खरंतर अशा पत्रकार परिषदा घेऊन पोलीस, जनता व पत्रकारांध्ये माहितीचे आदानप्रदान होणे महत्त्वाचे असते. पूर्वी अनेक...

गणरायही गुदमरले रेल्वेस्थानक परिसरातल्या या प्रचंड गर्दीने!

सरकारी व रेल्वे खात्याच्या आकडेवारीच्या आधारे विचार केला तर ठाणे रेल्वेस्थानकातून दररोज सुमारे पाच ते सहा लाख प्रवासी ये-जा करीत असतात. प्रवासी नागरिकांबरोबरच स्थानक परिसरात असलेल्या लाखो फेरीवाल्यांमुळे आधीच हैराण झालेल्या प्रवाशांच्या हालात परिसरातच मोठा मंडप घालून सार्वजनिक गणपती...
Skip to content