Homeमाय व्हॉईसविधानपरिषदेच्या निवडणुकीत कोणाची...

विधानपरिषदेच्या निवडणुकीत कोणाची सरशी?

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधानपरिषदेवर जाणाऱ्या 16 जागांची निवडणूक जाहीर झाली आहे. 18 जूनला ही निवडणूक होत असून या निवडणुकांचा निकाल 22 जूनला लागेल. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबल्यामुळे या निवडणुकाही लांबल्या आहेत. यापैकी नऊ आमदारांची मुदत 2022 साली संपली तर सहा आमदारांची मुदत 2024 साली संपली. फक्त औरंगाबाद जालना स्थानिक स्वराज्य संस्थामधून निवडून गेलेले अंबादास दानवे यांची मुदत 2025 साली संपली. राज्यभर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीचेच वर्चस्व असल्याने फक्त वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या मतदारसंघात महायुतीला काँग्रेसशी सामना करावा लागेल. इतर अनेक ठिकाणी फक्त शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्येच जागांसाठी चढाओढ सुरू आहे.

एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय रवींद्र फाटक ठाणे स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून गेले होते. या जागेवर भाजपने दावा सांगितला आहे. परंतु ही जागा शिंदे यांच्या शिवसेनेला मिळेल. सोलापूरची जागा भाजपच्या पुन्हा ताब्यात जाईल. नगरची जागा पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात होती. नगरचे आमदार संग्राम जगताप यांचे वडील अरुण जगताप येथून निवडून गेले होते. नगरमध्येही भाजपचेच वर्चस्व असल्याने अजितदादांच्या राष्ट्रवादीला ही जागा मिळवण्यासाठी भाजपशी उभा दावा मांडावा लागेल. जळगावची जागा पुन्हा भाजपच्या पारड्यात जाईल. सांगली, सातारा मतदारसंघात पूर्वी काँग्रेसचे वर्चस्व होते. मात्र आता येथे भाजप आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. येथे शिवसेनेला बाजूला सारून भाजप आणि राष्ट्रवादीत समझोता होण्याची शक्यता आहे.

विधानपरिषद

नांदेडमध्ये माजी मुख्यमंत्री आणि सध्या भाजपचे राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय अमर राजूरकर निवडून गेले होते. त्यावेळी ते काँग्रेसमध्ये होते. आता येथे भाजपविरुद्ध काँग्रेस अशी लढत असेल. यवतमाळची जागा माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांचे पुत्र दुष्यंत यांच्याकडे होती. त्यावेळी ते एकसंघ शिवसेनेतून विधान परिषदेवर गेले होते. भंडारा-गोंदिया या मतदारसंघात पूर्वी परिणय फुके निवडून गेले होते. येथेही आता भाजपचेच वर्चस्व आहे. अमरावतीमधून माजी मंत्री प्रवीण पोटे निवडून गेले होते. येथेही भाजपच्या सदस्यांची संख्या जास्त असल्याने भाजपला फारशी मेहनत करावी लागणार नाही. फक्त वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात काँग्रेसचे बऱ्यापैकी सदस्य आहेत. हे सदस्य एकसंघ राहिल्यास काँग्रेसला ही जागा मिळू शकते. परंतु ही जागा मिळवण्यासाठी भाजपने घोडेबाजार सुरू केला आहे असा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. खासदार प्रतिभा धानोरकर आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील संघर्ष मिटल्यास येथे काँग्रेसला संधी आहे. परंतु हा संघर्ष मिटण्यासारखा नाही अशी येथील राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

कोकणातील रायगड रत्नागिरीची जागा पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसकडे होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे येथून निवडून गेले होते. या जागेवर शिवसेना आपला हक्क सांगण्याची शक्यता आहे. रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार ही जागा तटकरे यांचे पुत्र उमेदवार असल्यास पाडण्याची शक्यता मोठी आहे. मराठवाड्यात उस्मानाबाद लातूर बीड मतदारसंघात सुरेश धस आमदार होते. आता पुन्हा येथे महायुतीच्याच सदस्यांची संख्या जास्त असल्याने ही जागा नेहमीप्रमाणे भाजपकडे जाईल. लातूरमध्ये काँग्रेसची सत्ता असली तरी त्यांना विजयासाठी आवश्यक असलेली मते नाहीत. परभणी हिंगोलीतून गोपीकिशन बजोरिया यांचे पुत्र विप्लव निवडून गेले होते. त्यामुळे या जागेवर आता महायुतीचाच उमेदवार असेल. औरंगाबाद जालना मतदारसंघात महायुतीचे वर्चस्व आहे. या जागेवर आता शिवसेनेने दावा केला आहे. येथेही शिवसेना आणि भाजपमध्ये मोठा संघर्ष आहे. परंतु वाटाघाटीत ही जागा सेनेला मिळण्याची शक्यता आहे.

विधानपरिषद

नाशिकमधून एकसंघ शिवसेनेचे नरेंद्र दराडे निवडून गेले होते. त्यामुळे या जागेवरही शिंदेंची शिवसेना दावा करण्याची शक्यता आहे. भाजप आणि शिवसेना यांच्यात जागांवरून रस्सीखेच सुरू असली तरी ठाणे, कोकण आणि औरंगाबाद या तीन जागा शिवसेनेला मिळण्याची शक्यता आहे. ठाणे स्थानिक स्वराज्य मतदारसंघात पालघरमध्ये हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचे वर्चस्व आहे. एकनाथ शिंदे आणि हितेंद्र ठाकूर यांचे संबंध अतिशय मैत्रीचे असल्याने ही सर्व मते शिवसेना उमेदवाराच्या पारड्यात जाण्याची दाट शक्यता आहे. ठाकूर यांची बहुजन विकास आघाडी शिवसेनेत विलीन होणार, अशी चर्चाही सुरू झाली होती. परंतु एवढ्या मेहनतीने उभा केलेला पक्ष सत्तेसाठी हितेंद्र ठाकूर शिवसेनेच्या दावणीला बांधणार नाहीत.

थोडक्यात सांगायचे तर महायुतीतही जागांवरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. विरोधक म्हणजेच महाविकास आघाडीही सर्व जागांवर निवडणूक लढणार आहेत. सत्ताधाऱ्यांमध्ये चाललेल्या रस्सीखेचीचा ते कितपत फायदा उठवतात हे लवकरच दिसेल.

विधानपरिषद

(लेखक नितीन सावंत ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आहेत. संपर्कः 9892514124)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

पक्षाचा अजेंडा राबविला गेला विधान परिषद निवडणुकीतून!

विधान परिषद निवडणूक अपेक्षेप्रमाणे बिनविरोध झाली. आमदारांच्या संख्याबळानुसार भाजपला सर्वाधिक जागा या निवडणुकीत मिळाल्या. भाजपचे प्रदेश संघटन सचिव सुनील कर्जतकर, ठाण्याच्या पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख माधवी नाईक, संजय भेंडे आणि माजी सहकार मंत्री शंकरराव कोल्हे यांचे नातू विवेक कोल्हे...

मुंबईतला ‘अल्पसंख्य’ मराठी माणसाला साथ तरी देणार कोण?

राज्यात पुन्हा एकदा मराठी सक्तीवरून राजकारण सुरू झाले आहे. रिक्षा-टॅक्सी वाहनचालकांना एक मेपासून मराठी सक्ती करण्याचा निर्णय राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी जाहीर केल्यानंतर यावरून पुन्हा एकदा महायुतीतील पक्षांमध्येच संघर्ष होण्याची शक्यता आहे. मुळात परिवहनमंत्र्यांचा हा निर्णय महायुतीतील पक्षांनाच...

पोटनिवडणुका ठरवतील भवितव्य सहानुभूतीच्या लाटेचे

राज्यात एप्रिलअखेर बारामती आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघात निवडणुका होत आहेत. या पोटनिवडणुका जाहीर झाल्यापासून राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे बारामतीची पोटनिवडणूक होत आहे तर शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे राहुरीची निवडणूक होत...
Skip to content