Homeडेली पल्सआरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या...

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. व्यंकट गिते

नाशिकच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता (डीन) डॉ. वेंकट गिते यांची नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती ज‍िष्णु देव वर्मा यांनी आज, बुधवारी डॉ. गिते यांची कुलगुरुपदावर नियुक्ती जाहीर केली. त्यांची नियुक्ती पाच वर्षांसाठी करण्यात आली आहे. ले. ज. डॉ. माधुरी कानिटकर यांचा कुलगुरूपदाचा कार्यकाळ १४ ऑक्टोबर २०२५ रोजी संपल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. त्यानंतर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. संजीव सोनवणे यांच्याकडे या विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता. आता डॉ. गिते यांच्या नियुक्तीनंतर हा पेच संपुष्टात आला आहे.

डॉ. गिते यांनी सन २००१ साली एम.एस. (शल्यचिकित्सा) आणि २०१०मध्ये डीएनबी (युरोलॉजी) पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सुपरस्पेशालिटी ब्लॉक, येथे युरोलॉजी विभागाचे प्राध्यापक व विभागप्रमुख म्हणून काम केले आहे. त्याशिवाय ते नाशिकच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अधिष्ठाता म्हणून कार्यरत आहेत. शासकीय व्यवस्थेत कॅडव्हर किडनी प्रत्यारोपण (Cadaver Renal Transplant) कार्यक्रम सुरू करण्यामध्ये त्यांचे मोलाचे योगदान आहे. राज्यशासनाच्या आरोग्य विभागाच्या अवयव प्रत्यारोपण कार्यक्रमाचे ते सल्लागार सदस्य आहेत. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन क्षेत्रातही डॉ. गिते यांनी उल्लेखनीय कार्य केले असून, त्यांच्या नावावर ५३ संशोधन निबंध आणि ६ पुस्तके प्रकाशित आहेत.

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी योग्य उमेदवाराची शिफारस करण्यासाठी राज्यपालांनी प्रा. डॉ. सी. ई. ईपन यांच्या अध्यक्षतेखाली शोध समितीची स्थापना केली होती. या समितीमध्ये वैद्यकीय शिक्षण व औषध विभागाचे सचिव धीरज कुमार आणि राष्ट्रीय मलेरिया संशोधन संस्थेचे संचालक डॉ. अनुपकुमार आर. अन्वीकर यांचा समावेश होता. समितीने शिफारस केलेल्या सर्व उमेदवारांच्या वैयक्तिक मुलाखती घेतल्यानंतर राज्यपालांनी डॉ. वेंकट गिते यांची कुलगुरूपदी नियुक्ती जाहीर केली.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content