माणसाने पन्नाशी गाठली की हळूहळू तो जीवनाच्या उत्तरार्धाकडे वळू लागतो. जे सरकारी नोकरीत आहेत किंवा ज्यांची नोकरी ही दहा ते पाच, अशा निश्चित वेळेत आहे किंवा ज्यांना ठराविक आठ तासांची ड्युटी केल्यानंतर घर गाठण्याची सवय आहे, अशा टिपिकल, बाळबोधी चाकरमान्यांना पन्नाशीनंतर तर प्रत्येक वर्ष मोजण्यातच धन्यता वाटते. आता चार वर्षे राहिली आहेत, आता दोन वर्षं बाकी आहेत, हे शेवटचं वर्ष आहे, असं करत करत ते वयाची 58 वर्षे पूर्ण करतात आणि नंतरचा काळ हा शुद्ध निवृत्तीकाळ म्हणून जगतात. किंबहुना या काळात या व्यक्ती आपल्या मुलाबाळांत, नातवंडात रमतात. त्यांच्याबरोबर त्यांचा दिवस कसा जातो, हेच त्यांना समजत नाही. उरलेल्या वेळात आपल्या जुन्या आठवणी कुरवाळत बसण्यात त्यांना मजा येते. आपल्या शाळेतल्या मित्र-मैत्रिणींशी गप्पा मारणे, कॉलेजमधल्या मित्र-मैत्रिणींना भेटणं, बरेवाईट क्षण शेअर करणं, यातच ही मंडळी रमलेली असतात. मर्मबंधाची ठेवच असते ती… त्यात रमणं चचाकोरीबद्ध जीवनशैली नसलेल्या प्रौढांनाही आवडतंच.
मुंबईतल्या गिरणगावातल्या परळमधली एक नामांकित शाळा म्हणून ओळखली जाणारी शाळा आहे आर एम भट. या शाळेतल्या काही विद्यार्थ्यांचेही जवळपास असेच झाले. पण या विद्यार्थ्यांपैकी अनेकजण आजही विविध क्षेत्रात आपले पाय रोवून उभे आहेत. चांगली पदे भूषवत ते कार्यरत आहेत. अशाच 1983च्या एसएससी बॅचमधल्या विद्यार्थ्यांपैकी संजय घागरे, या विद्यार्थ्याला आपल्या बालपणीच्या सवंगड्यांची आठवण झाली. तसे हे सवंगडी आपापसात परस्परांशी संपर्कात तर होतेच, परंतु त्यांच्या त्या काळातल्या आठवणी व्यक्तिगतरीत्या एकमेकांसमोर मांडण्यापेक्षा ते कुठेतरी शब्दबद्ध व्हावेत, अशी कल्पना संजयच्या मनात आली. त्याने ही कल्पना आपल्या काही शालेय मित्र-मैत्रिणींपुढे मांडली. त्या सर्वांनी संजयची कल्पना उचलून धरली आणि मग साकारले ते ‘न सुटलेली शाळा’ हे कॉफी टेबल बुक. या पुस्तकात आर एम भट शाळेतल्या 1983च्या एसएससी बॅचमधल्या अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनातल्या आठवणी शब्दबद्ध केल्या आहेत. त्यावेळेला शाळेत असलेले काही शिक्षकही व्यक्त झाले आहेत. नंतरच्या काळात शाळेत कार्यरत असलेले प्राचार्य गुणवंती कांबळे, प्राचार्य शिवाजी कांबळे तसेच काही शिक्षकांनीही आपले मनोगत व्यक्त केले आहे. ज्येष्ठ छायाचित्रकार पद्मश्री सुधारक ओलवे यांनी काही विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून त्यांची छायाचित्रे काढून ती या पुस्तकासाठी दिली आहेत. अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या शालेय जीवनात काढलेल्या काढलेली छायाचित्रेही या टेबल बुकसाठी दिली आहेत. अनेक ग्रुप फोटो या पुस्तकात ठळकपणे दिसतात. शाळेचा शेवटचा दिवस गॅदरिंग काही सणासुदीच्या निमित्ताने काढण्यात आलेले ग्रुप फोटो स्पोर्ट्स डे स्काऊट गाईड पेटी पिटी अशा अनेक प्रसंगाच्या वेळी काढलेले फोटोही या पुस्तकात दिसत आहेत संजय घागरे यांनी स्वतः या पुस्तकाला प्रस्तावना लिहिलेली आहे.
शिक्षा करणाऱ्या शिक्षकांना आम्ही सिनेमातल्या खलनायकांची नावे द्यायचो तर काही शिक्षकांना विनोदी कलाकारांची नावे दिल्याचेही मला आठवते, असे संतोष अपराज याने या पुस्तकात म्हटले आहे. अंजली आपटेने शाळेतल्या संभाजी नावाच्या शिपायाची गोष्ट सांगितली आहे. एकदा तिला बरं नसताना, ती तापाने फणफणत असताना बेंचवर झोपली होती. तिच्या मैत्रिणींपैकी कोणीतरी जाऊन ही माहिती वर्गशिक्षिकेला दिली. त्यांनी तिला बरं नसल्याची खात्री केली आणि संभाजीकडे तिला सुपूर्द केले. संभाजीनेही तिला आपल्या कडेवर घेऊन टॅक्सी केली आणि घरी नेऊन सोडले, असे अंजलीने म्हटले आहे. जसजसे आम्ही मोठे होत गेलो तसतशा आमच्यातल्या काहींच्या खोड्याही वाढत गेल्या. लेक्चर बंक कर, बाजूच्या रिकाम्या वर्गात लपून बस, कोणाची पॅन्ट शाईने किंवा खडूने रंगव तर कोणाच्या चपला लपव, हे चाळे सुरू असायचे, अशा अशी आठवण सांगितली आहे देवेंद्र बांदिवडेकर याने…

दहा वर्षांपूर्वी माझ्या आईच्या पायावर मुलुंडच्या एका खाजगी रुग्णालयात शस्त्रक्रिया होणार होती. तीही काळजीत होती आणि मीसुद्धा.. अशात डॉ. नीळकंठ धामणस्कर यतिथे आले. ते त्यांच्या कामासाठी आले होते. पण मला ते आल्याचे कळताच मी बालपणीतल्या सवयीनुसार नील, म्हणून त्याला एकेरी हाक मारली. आमच्या सरांना एकेरीत बोलवणारा हा कोण, असे बघून त्याचे सहकारी अचंबित झाले. मात्र नीलनेही शाळेत असल्याप्रमाणेच प्रतिसाद दिला आणि आम्ही दोघेही काही क्षणासाठी शालेय जीवनात गेलो, अशी आठवण उमेश देसाई याने सांगितली आहे. चंद्रकांत भोजनेने आपली आठवण सांगताना म्हटले की, आर एम भट शाळेतली शिस्त अत्यंत कडक होती. या शिस्तीचा, संस्काराचा प्रभाव माझ्यावर झाला आणि आज मी शैक्षणिक क्षेत्रात इतर विद्यार्थ्यांना शैक्षणिक धडे देत आहे. माझं कार्यक्षेत्र आज महाराष्ट्रपुरता मर्यादित न राहता गुजरात, चेन्नईपर्यंत विस्तारले आहे. अनिता धुरी हिने शाळेतली आठवण सांगताना सांगितले की, शालेय जीवनात सैनिकी शिक्षणाचे महत्त्व आणि प्रात्यक्षिकं एनसीसीमुळे अनुभवायला मिळाली. यावेळी आपटे मॅडमचं मार्गदर्शन खूप मोलाचं ठरलं. माझी देवळाली इथल्या एनसीसी कॅम्पसाठी निवड झाली. पण, बाबांचा त्याला विरोध होता. मॅडमनी ठरवलं होतं की, काही झालं तरी मला या कॅम्पला न्यायचं.. त्यांनी बाबांना बोलवलं आणि कॅम्पचं महत्त्व पटवून दिलं. त्यानंतर मी कॅम्पसाठी गेले आणि परेड, नेमबाजी, सांस्कृतिक कार्यक्रमाने मंतरलेले ते दहा दिवस जे काही अनुभवले, त्याची आठवण आजही कायम आहे. अनघा गडकरी म्हणते की, कब आणि बुलबुल याच्या माध्यमातून आलेला शिबिराचा अनुभव काही निराळाच होता. कर्जतमध्ये दोन दिवसांचे निवासी शिबिर होते. त्यावेळी व्हिटी ते कर्जत असा ट्रेनचा प्रवास, तेथून वननिवासापर्यंतची तासाभराची पदयात्रा, हे काही औरच होतं. डोंगरवाटातून पटकन रानमेव्यावर मारलेला ताव, चुलीवर शिजवलेल्या भोजनाचा आनंद आणि स्वावलंबन याची सवय मला या शिबिरात लागली. घरी जेवणाच्या ताटावर होणारे नखरे इथेच कायमचे बंद झाले.
राऊळ मॅडमची आठवण सांगताना प्रवीण गणवीर म्हणतो की, त्यांच्या विचारांनी एका अबोल, लाजाळू विद्यार्थ्याचे बलदंड शरीरसौष्टवपटूमध्ये परिवर्तन झाले आणि याच परिवर्तनामुळे मी आंतरराष्ट्रीय शरीरसौष्टव स्पर्धेत भाग घेणारा, भारताच्या ज्युनिअर गटातला पहिला खेळाडू म्हणून ओळखला जाऊ लागलो. त्यानंतर यशाची अनेक शिखरे मी गाठली. सलग चार वर्षे मुंबई श्री, महाराष्ट्र श्री आणि भारत श्री किताब पटकावले. हे सारे पुरस्कार स्वीकारताना मी, माझी शाळा आणि राऊळ मॅडम यांच्या चरणी नेहमीच नतमस्तक होत राहिलो. मोहन गिरकर आपली आठवण सांगताना म्हणतो की, माझी इंटरमिजिएट चित्रकला परीक्षा होती. माझी वर्गमैत्रीण स्वाती गोडे शेजारीच बसली होती. स्वतःचे रंग संपू नये म्हणून मी तिचे रंग वापरले आणि घरी जाताना मला माझ्या लोभीपणाची शिक्षा मिळाली. माझ्या हातून रंगाच्या सर्व बाटल्या रस्त्यावर पडल्या आणि फुटल्या. स्वाती गोडे, ही चित्रकलेची शिक्षक म्हणून मुलांच्या आयुष्यात रंग भरण्याचे काम करत आहे. या कलाशिक्षिकेला शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन दिलं परब सरांनी. एक कलाशिक्षक या नात्याने ती परब सरांसमोर जेव्हा उभी राहिली, तेव्हा सरांच्या डोळ्यात आनंदाश्रू तराळले. हे आनंदाश्रू जणू त्यांना मिळालेल्या गुरुदक्षिणेची अनुभूती करून देत होते…
मंजुषा जोशी म्हणते- 2013मध्ये तिच्या सासऱ्यांचे निधन झाले. पाठोपाठ आठ दिवसांत नवऱ्याला हृदयविकाराचा झटका आला. परळच्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. घरी वयस्कर सासूबाई होत्या. अल्लड वयातली मुलं होती. काय करायचं कळत नव्हतं. अशावेळी रात्री अकरा वाजता तिला संगीता नावाच्या शाळेच्या मैत्रिणीची आठवण झाली. तिने संगीताला फोनवर सारं काही सांगितलं. दहाव्या मिनिटाला संजय खानविलकरचा फोन आला. दुसऱ्या दिवशी संजय, डॉ. नीळकंठ धामणस्करला घेऊन आला. संध्याकाळी चारू, सीमा, संगीता, शेखर, विश्राम, गिरीश, सगळेच वर्गमित्र-मैत्रिणी आल्या. पूर्ण कुटूंब माझ्याभोवती जमा झाल्यासारखं तिला वाटलं. अर्धी लढाई तिने तिथेच जिंकली. काही दिवसांत तिझे पती बरे झाले आणि शालेय मित्र-मैत्रिणींचं महत्त्व नव्यानं तिला पटलं. संजय खानविलकर आपली आठवण सांगताना सांगतो की, खो-खो हा खेळ माझी जान आहे. आंतरशालेय स्पर्धांमध्ये मी जेव्हा मैदानावर उतरायचो तेव्हा मला प्रोत्साहन देण्यासाठी सहकाऱ्यांच्या टाळ्या आणि घोषणांचा आवाज माझ्यात जोश भरायचे. चपळता, वेग या साध्या गोष्टी आजही अगदी न थकता 24 तास काम करण्याचे बळ देऊन जातात. मांजरेकर मॅडममुळे मिळालेली शिकवण माझ्या नसानसात भिनली आहे.
अशा जवळजवळ 50 मुला-मुलींनी आपल्या शालेय जीवनाशी संबंधित आठवणी या पुस्तकात मांडल्या आहेत. हे पुस्तक अनेक वर्षांनंतर अचानक भेटलेल्या संजय घागरेने मला दिले. मी ते पाहिले आणि मलाही माझ्या शालेय जीवनाची आठवण झाली. माझी शाळा म्हणजे मुंबईतल्या गोरेगावमधले आदर्श विद्यालय. या शाळेतल्या 1975च्या एसएससी बॅचमधले जवळजवळ 35 विद्यार्थी आजही व्हॉट्स एपच्या माध्यमातून परस्परांशी संपर्कात आहोत. आमच्यातही काही संजय आहेत. कदाचित संजय असं नाव ठेवण्याची त्या काळात क्रेझ असावी. असा एक संजय धारवाडकर, अंजली समेळ (आताची आरती शिंगरे), छोटू शेख, कमलेश गरूड (आताची सुनीता अहिरे) अशा तीन-चार वर्गमित्र-मैत्रिणींनी इतर वर्गमित्र-मैत्रिणींना शोधून काढून त्यांना संपर्कात आणून हा व्हॉट्स एप ग्रुप तयार केला आहे. आर एम भट शाळेच्या संजय घागरेच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या या कॉफी टेबलबुकची सविस्तर कल्पना मी या वर्ग मित्र-मैत्रिणींसमोरही मांडणार आहे. बघूया असे एखादे कॉफी टेबलबुक आम्हीही तयार करू शकतो का?

