Homeबॅक पेजएक-एक बोट छाटून...

एक-एक बोट छाटून काढणाऱ्या सर गॅरी सोबर्सना सलाम!

वेस्टइंडीज क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सर गारफिल्ड सोबर्स यांच्या निधनामुळे क्रिकेटविश्वाने २०व्या शतकातील एक सर्वोतम अष्टपैलू खेळाडू गमवला आहे. एक आर्कषक, शैलीदार फलंदाज, प्रभावी गोलंदाज आणि चपळ, दक्ष क्षेत्ररक्षक या खेळाच्या तीनही प्रमुख अंगात सोबर्स यांनी स्वतःचा एक वेगळा ठसा उमटवून साऱ्या क्रिकेटविश्वाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. त्या काळात कुठलेही खास प्रशिक्षण कोणाकडूनही न घेता केवळ अथक मेहनत, खडतर सराव, जबरदस्त जिद्द, चिकाटी या सर्वाच्या जोरावर त्यांनी या खेळात घेतलेल्या प्रचंड झेपेला तोड नाही.

१९३६ साली ब्रिजटाऊन, बार्बाडोस येथे या महान खेळाडूचा जन्म झाला. जन्मताच त्याच्या दोन्ही हाताला एक, एक बोट जास्त होते. पुढे काही काळानंतर त्यांनी स्वतः ही बोट चक्क कापून टाकली. ते ५ वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे एका अपघातात निधन झाले. मग आईनेच त्यांचे पालनपोषण केले. त्यांच्या घराजवळच प्रख्यात बार्बाडोसचे मैदान होते. तेथे वयाच्या ८व्या वर्षांपासून छोटा गॅरी जाऊ लागला. तेथे धावफलक लावण्याचे काम गॅरीला मिळाले. घराजवळ या खेळाचा माहौल असल्यामुळे गॅरी क्रिकेटच्या प्रेमात जास्त पडले. धावफलक लावण्याचे काम मिळाल्यामुळे त्यावेळच्या वेस्टइंडीजच्या अनेक दिग्गज खेळाडूंचा खेळ जवळून पाहण्याची संधी मिळाली. ज्याचा खूप मोठा फायदा गॅरीला पुढील कारकिर्दीत झाला. पुढे याच बार्बाडोस संघातून त्याने प्रथम दर्जाच्या सामन्यात पर्दापर्ण केले. १९५३ साली त्याला पहिली संधी मिळाली. तिथे स्थानिक स्पर्धांत सातत्याने शानदार कामगिरी केल्यामुळे अवघ्या वर्षभरात गॅरीची वेस्टइंडीज क्रिकेट संघात निवड झाली. सुरूवातीला त्याची निवड एक गोलंदाज म्हणून झाली. त्यावेळी वयाच्या अवघ्या १६व्या वर्षी कसोटी क्रिकेट सामन्यात पदार्पण करणारा तो‌ सर्वात लहान खेळाडू होता. मग मिळालेल्या संधीच गॅरीने सोनं केले. वेस्टइंडीज क्रिकेट संघाचा तो आधारस्तंभ होऊन बसला.

वयाच्या २१व्या वर्षी गॅरीने पाकिस्तानविरूद्धच्या कसोटी सामन्यात नाबाद ३६५ धावांची जबरदस्त त्रिशतकी खेळी करुन साऱ्या क्रिकेटविश्वाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. गॅरीचे हे पहिलेच कसोटी शतक होते हे विशेष. त्याने त्यावेळी इंग्लंडचे महान फलंदाज सर लेन हटन यांचा सर्वाधिक कसोटी धावांचा विक्रम मोडीत काढला. त्यानंतर गॅरी यांनी पुढील ५ कसोटीत सलग ५ शतके ठोकून आणखी एका नव्या विक्रमाला गवसणी घातली. त्यात एका कसोटीत त्यांनी दोन्ही डावात शतके फटकावली. त्यांच्या या जबरदस्त फलंदाजीमुळे क्रिकेटविश्वाला त्याच्यांतील महती पटली. त्यांचा नाबाद ३६५ धावांचा विक्रम पुढे तब्बल ३६ वर्षं कायम राहिला. पुढे वेस्टइंडीजचा आणखी एक महान फलंदाज ब्रायन लाराने तो मोडला. ९३ कसोटीत त्यांनी ८०३२ धावा केल्या. त्यामध्ये २६ शतके आणि ३० अर्धशतकांचा समावेश होता. तेज आणि फिरकी मारा करुन त्यांनी २३५ बळी घेतले, तर अचूक, दक्ष क्षेत्ररक्षणाची सुरेख चुणूक दाखवताना‌ गॅरी यांनी १०९ झेल टिपले. १९६५ ते ७२दरम्यान त्यांनी ३९ कसोटीत वेस्टइंडीज संघाचे नेतृत्त्व केले. त्यामध्ये विडिंजने ९ सामने जिंकले. २० अनिर्णित राखले, तर १० कसोटीत मात्र‌ त्यांना पराभव पत्करावा लागला. प्रथम दर्जाच्या सामन्यात सोबर्स यांच्या नावावर ३८३ सामने, २८३१४ धावा, ८६ शतके, १२१ अर्धशतके १०४३ बळी आणि ४०७ झेल अशी खूप मोठी आकडेवारी आहे. त्यांची आकडेवारीही त्यांची महानता सिद्ध करु शकत नाही. ते गेल्या दशकातील सर्वोतम अष्टपैलू खेळाडूंच्यादेखील‌ पलीकडचे होते.

२०व्या शतकाच्या उत्तरार्धात ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका या तीन देशांची मक्तेदारी होती. ती मोडून काढण्यात वेस्टइंडीज संघाने सुरूवात केली. त्यात सोबर्स यांचा मोठा वाटा होता. क्रिकेट जगतात वेस्टइंडीज क्रिकेट संघाला मानाचे स्थान मिळवून देण्यात त्यांचे योगदान खूप मोठे आहे. त्यांच्या नावाशिवाय वेस्टइंडीज क्रिकेटचे वर्तुळ पूर्णच होऊ शकत‌ नाही. जे काही करायचे ते सर्वोतम याकडे त्यांचा नेहमीच कटाक्ष‌ राहिला. त्यांनी या खेळाला एक वेगळा आयाम दिला. “वन ‌मॅन आर्मी” असेच त्यांचे व्यक्तिमत्व होते. क्रिकेट कसे खेळायचे याचा परिपाठच त्यांनी घालून दिला. १९५४ ते १९७४ अशी दोन दशके सोबर्स यांनी आपले आधिराज्य निर्माण केले. त्यांची खिलाडू वृत्ती, नम्रता, रुबाबदार व्यक्तिमत्व क्रिकेटप्रेमींच्या मनात आदराचे स्थान कायम करुन गेले. १९७४ साली विश्वसंघ विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात एक प्रदर्शनीय सामना झाला होता. त्यावेळी सोबर्स यांनी २५४ धावांची तुफानी‌ नाबाद खेळी केली होती. त्यावेळी ऑस्ट्रेलियन‌ संघात डेनिस लिली, जेफ थॉमसन, गॅरी गिल्मोर हे तुफानी‌ गोलंदाज होते. त्या सर्वांचा सोबर्स यांनी चांगलाच समाचार घेतला होता. हा सामना बघायला ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार आणि धावांचे यंत्र म्हणून ज्यांची ख्याती होती ते सर डॉन ब्रॅडमन उपस्थित होते. त्यांनी सोबर्स यांची खेळी आपण बघितलेली एक सर्वोतम खेळी असल्याचे सांगितले होते. हे सर डॉन ब्रॅडमन यांचे प्रशस्तीपत्र सोबर्स यांची फलंदाजी, काय चीज होती याची प्रचिती देते.

पहिल्या दर्जाच्या सामन्यात एकाच षटकात सलग सहा चेंडूंवर सहा षटकार ठोकणारे ते क्रिकेटविश्वातील पहिले फलंदाज होते. कसोटीत नाबाद ३६५ धावांची खेळी करणारे, कसोटीत ८००० धावा व २०० बळी घेणारे, एकाच इंग्लंड संघाविरुद्ध ३०००पेक्षा जास्त धावा आणि १०० बळी घेणारे सोबर्स पहिले खेळाडू होते. १९६६ साली इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत ७२२ धावा आणि २१ बळी घेणारेदेखील ते पहिले कसोटीपटू होते. १९७५ साली त्यांना नाईटहुड, सर या पदव्या देण्यात आल्या. क्रिकेटचे बायबल समजल्या जाणाऱ्या प्रख्यात विस्डेन मासिकाने २०व्या शतकातील सर्वोतम पाच खेळांडूमध्ये सोबर्स यांची निवड केली होती. त्यामधे सर जॅक हॉब्स, सर डाॅन ब्रॅडमन, शेर्न वाॅर्न, सर व्हिव्हियन रिचर्ड्स या आणखी इतर चार खेळाडूंचा समावेश केला होता. आयसीसीने २०००मध्ये त्यांचा “हाॅल‌ ऑफ फेम”मध्ये समावेश केला. १९७८ साली बार्बाडोसने त्यांच्या ११ सर्वोतम व्यक्तींमध्ये सोबर्स यांचा समावेश केला होता. जोपर्यंत क्रिकेट हा खेळ पृथ्वीतलावर खेळला जाईल तोपर्यंत सर गॅरी सोबर्स यांचे नाव कायमस्वरुपी अजरामर राहिल. एक मात्र‌ नक्की “झाले बहु, होतील बहु, पण दुसरे गॅरी सोबर्स पुन्हा होणे नाही”.

(लेखक सुहास जोशी ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आणि समीक्षक आहेत.)

Continue reading

मॅटमुळे रया गेली कबड्डीची! कांदळगावकरांची खंत!!

महाराष्ट राज्य कबड्डी असोसिएशनने नुकताच सन‌ २०२५-२६चा श्रमजीवी स्व. रमेश देवाडीकर कबड्डी कार्यकर्ता हा मानाचा पुरस्कार ६७ वर्षीय दीपक कांदळगावकर यांना देऊन कबड्डी खेळातील एका सच्च्या सेवकाचा उचित गौरव केला आहे. जवळजवळ ‌५ दशके दीपक सरांनी या खेळाची निस्पृहपणे...

यंदाच्या विश्व बॅडमिंटन स्पर्धेतही भारताची मदार सिंधुवरच!

येत्या १७ ऑगस्टपासून नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये सुरु होत असलेल्या ३०व्या विश्व बॅडमिंटन स्पर्धेत यजमान भारताची मोठी मदार पदकाच्यादृष्टीने माजी जग्गजेती पी. व्ही. सिंधु, माजी कांस्यपदक विजेता लक्ष्य सेन आणि पुरुष दुहेरीत माजी कांस्यपदक विजेती जोडी...

क्रिकेट, कुस्तीसारखे खेळ वगळल्यानंतरही राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताची बाजी!

ग्लासगो येथे संपन्न झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला खेळाडूंनी केलेल्या चमकदार कामगिरी‌च्या जोरावर भारताने पदकतालिकेत ऑस्टेलिया, इंग्लंड, कॅनडापाठोपाठ चौथ्या क्रमांकावर झेप घेतली. भारताने या स्पर्धेत १३ सुवर्ण, १७ रौप्य,९ कांस्य, अशी एकूण ३९ पदकांची कमाई केली. १३पैकी ८...
Skip to content