Homeमाय व्हॉईसआग्रीपाड्यातली 'यास्मिन' आणि...

आग्रीपाड्यातली ‘यास्मिन’ आणि पोलिसांचे ‘डोला रे डोला…’!

बुधवारच्या जवळजवळ सर्वच वर्तमानपत्रात ‘आग्रीपाडा येथील ड्रग फॅक्टरी उद्ध्वस्त’, अशी बातमी वाचली व मन एकदम भूतकाळात गेले. लगेचच मनाशी ठरवले, आज आग्रीपाड्यात जायचेच आणि गेलोही! आग्रीपाडा पोलीसठाण्याच्या दारातच उतरलो. आजूबाजूला नजर टाकली. प्रशस्त रस्ता, गगनचुंबी इमारती.. काही इमारती तर इतक्या श्रीमंत की टॅक्सीसाठी वेगळे गेट, अभ्यागतांच्या गाडीसाठी वेगळे गेट, ब्लॉकधारकांच्या गाड्यांसाठी वेगळे गेट… पोलीसठाण्यातही चक्क ‘स्वागत कक्ष’ (आता, त्यात कुणी नव्हते ही वेगळी गोष्ट!) म्हणजे एकंदरीत आग्रीपाड्याचा माहोल बदललाच होता.

“अब ना मै वो हूँ, ना बाकी है जमाने मेरे।

फिर भी मशहूर है शहरोंमे फसाने मेरे।। (राहत)

अशीच माझी अवस्था झाली.

आग्रीपाडा पोलीसठाणे एकेकाळी परिसरातील गँगवारमुळे नको इतके प्रसिद्ध झालेले! पोलीसठाण्यासमोरच असलेली छोटीशीच पोलीस अधिकाऱ्यांची वसाहत. मला वाटले होते की, ती वसाहत जाऊन तेथे टोलेजंग इमारत आली असेल. पण, अजून कुठल्या बिल्डरच लक्ष गेले नसावे किंवा मनाजोगे ‘डील’ होत नसावे. असो. पोलीसठाण्याजवळ येणाऱ्या गल्लीच्या शेवटी दगडी चाळ परिसर… पोलीसठाण्याच्या समोरच्या बाजूने काही पावले चालल्यास महापालिकेचे नायर रुग्णालय. रुग्णालयापासून हाकेच्या अंतरावर भुयारी रेल्वेचे मेट्रो स्थानक. स्थानकाच्या मागच्या बाजूला आग्रीपाडा पोलीसठाण्याची कोठडी. त्यात गुंड टर्न कामगार नेता बाबू रेशीम याची झालेली हत्त्या. जवळच महालक्ष्मीचा धोबीघाट आणि इतके सगळे वर्णन ऐकल्यानंतर पुन्हा जाऊया आग्रीपाडा पोलीसठाण्यासमोरील ‘घास’ गल्लीत!! वाचकहो, आतापर्यंत तुमच्या लक्षात आलेच असेल की हा जवळजवळ सर्वच विभाग एकेकाळी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या विळख्यात होता आणि आजही तो तसाच आहे. तर याच घास गल्लीतील ‘यस्मिन टॉवर’मधील १०व्या मजल्यावर अंमली पदार्थ बनवणाऱ्या एका फॅक्टरीवर अंमली पदार्थविरोधी पथकाने धाड टाकून ड्रगविक्रेत्या मंडळीच्या पोटात धडकी भरवणारी कारवाई करून तब्बल ५१ कोटी रुपये किंमतीच्या एमडी गोळ्या व काही रसायने जप्त केली आहेत! अलीकडच्या काळातील ड्रगविरोधातील ही मोठी कारवाई मानली जाते.

पूर्वी येथे घास बाजार होता

बुधवारच्या सर्व पेपरात या कारवाईचे वृत्त आल्यावरतरी पोलीसठाण्यात त्या इमारतीचे नाव माहित असेल म्हणून विचारायला तेथे गेलो. तेथे कर्तव्यावरील अंमलदारास ओळख देऊन विचारणा केली असता त्याला आधी काही कळेच ना! (बहुतेक नाईटला आला असावा.) मात्र, बाजूलाच असलेल्या ज्येष्ठ हवालदारदादांनी हातांनी काहीतरी दाखवले व पेट्रोलपम्प असे ऐकू आले आणि आमची स्वारी बाहेर पडली! आणि अहो आश्चर्यच… मुंबईतील सर्वात लहान पेट्रोलपम्प पाहत आहोत की काय असा समज झाला. जेमतेम पाच फूट आकाराच्या या पेट्रोलपम्पाला वळसा घालून मी ज्या गल्लीत शिरलो त्या गल्लीला ‘घास’ गल्ली म्हणतात, असे समजले. पूर्वी या परिसरात घास बाजार भरत असल्याने तेच नाव अद्यापी रूढ आहे. गल्लीत प्रवेश करताच एक निर्जीव गल्ली अशीच भावना निर्माण झाली. दोन्ही बाजूला टॅक्सीथांब्यासारख्या टॅक्सीज उभ्या करून ठेवलेल्या होत्या. काही टॅक्सीजनंतर एक-दोन गॅरेजेस आणि भंगाराची दुकानेही दिसली. या गॅरेज व भंगारविक्रीच्या दुकानात काम करणाऱ्यांना चायबिस्कूट देण्यासाठी उघडण्यात असलेल्या दोनतीन चहाच्या टपऱ्या तसेच एक सँडविचवाला. या सर्वांच्या गिचमिडीत ‘ल गौरा’ नावाची मशीद! ही मशीद आहे की मदरसा, असा संभ्रम नक्कीच निर्माण होईल अशी स्थिती. मशिदीचे नावही इटुकल्या पाटीवर… आणि या मशिदीला लागूनच आलिशान ‘यास्मिन’ टॉवरची इमारत.

इमारत पाहताच डोळ्यात भरते. शॉपिंग लाईनही छान आहे. नागोरीचा गडद घट्ट चहा आपले स्वागत करेल. इमारतीत प्रवेश करताना आलिशान परंतु छोटीशीच लेन, त्याला छानसे रेलिंग. आतल्या बाजूस उंची मार्ब्लस लावून सजवलेली लिफ्ट. त्या लिफ्टपाशी आल्यानंतर पोलीस कारवाईचा पट डोळ्यासमोर आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत जगदाळे व त्यांच्या सहकाऱ्यांना इमारतीच्या सुरक्षारक्षकांनी व लिफ्टमनने अडवले. ओळख सांगताच रक्षकाने इमारत सोसायटीच्या सेक्रेटरीला फोन लावला. गांभीर्य लक्षात घेऊन त्याने प्रवेश दिला. कितव्या मजल्यावर असे विचारायच्या आधीच जगदाळे यांच्या टीममधील एकाने मजल्याचे बटन दाबले. वहाँ तो कोई नहीं होता है.. असे सांगण्याच्या प्रयत्नात असतानाच लिफ्ट १० मजल्यावर येऊन थांबली. परवलीचा शब्द ऐकताच १०व्या मजल्यावरील ब्लॉकचा दरवाजा उघडला जातो आणि केवळ अर्ध्या-पाऊण तासात फॅक्टरीचा खेळ खल्लास झाला. याप्रकरणी शोहेब शौकत उर्फ मन्सूर, सुफियान मन्सूर आणि मौनी सरकार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मौनी सरकार ही महिला बांगलादेशी असल्याचे सांगण्यात आले. पोलीस आयुक्त देवेन भारती, उपायुक्त नवनाथ ढवळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदाळे तसेच कांदिवली पथकाने खरदारी घेऊन व गुप्तपणे ही कारवाई केल्याने पोलीस खात्यात सर्वत्र दबक्या स्वरात चर्चा सुरु असल्याचे कळते.

कारवाई उत्तमच. पण…

या कारवाईने मुंबई पोलीस खाचितच अभिनंदनास पात्र आहेत यात शंकाच नाही. गेल्या सुमारे दोन-अडीच वर्षांत अंमली पदार्थविरोधी पथक वा पोलिसांनी अनेक ठिकाणी धाडी घालून मोठा माल जप्त केला आहे व कोट्यवधी रुपयांचा माल जाळून टाकलेला आहे. त्यातच ड्रग व्यापारातील दाऊदचा साथीदार असलेल्या डोलालाही परदेशातून ताब्यात घेतलेले आहे. त्यापुढेही कारवाई हवी. ‘नुसते डोला रे डोला..’ नको. साकीनाका ड्रग प्रकरण, पुण्यातील ड्रग प्रकरण, कोल्हापुरातील मोठे ड्रग प्रकरण, मुंबई वा परिसरात दिवसाआड कुठेना कुठेतरी धाड पडतच असते. मोठा माल जप्त होतो. काही जण ताब्यात येतात. पण ठोस निर्णय होतच नाहीत. महत्त्वाचे म्हणजे केंद्रीय गृह मंत्रालयाने १९९५मध्ये देशातील वाढते अंमली पदार्थांचे सेवन लक्षात घेऊन याला प्रतिबंध कारणायासाठी उपाय सुचवणारी एक श्वेतपत्रिका जाहीर केली हॊती. जवळजवळ ३० वर्षे उलटूनही त्याची प्रभावीरित्या अंमलबजावणी होत नसल्याबाबत ज्येष्ठ पोलीस अधिकारी नाराज असल्याचे समजते. त्यामुळे साहजिकच एकप्रकारची नकारात्मकता निर्माण झाल्याचे चित्र नकळत निर्माण झाले आहे. “I have never had a problem with drugs, I have problem with police” असे बोलायची वेळ येऊ नये.. इतकेच!

छायाचित्र मांडणीः प्रवीण वराडकर

(लेखक विजयकुमार काळे ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

Continue reading

हेतूपुरस्सर धूळ खात पडलेल्या मिडी बसेस आणा आधी मुंबईच्या रस्त्यांवर!

मुंबई महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर नुकताच 'लोकसवांद'मध्ये प्रथमच विस्तृत संवाद साधत पालिका प्रशासनासमोरील काही आव्हाने व भविष्यातील मोठ्या प्रकल्पांबाबत चर्चा केली. एखाद्या मोठ्या महानगरीचे व्यवस्थापन करणे तसे जिकरीचेच आणि आव्हानत्मक असते यात शंकाच नाही....

टेकाड्यावर झोपडपट्ट्या उभारणारे भूमाफिया मोकाटच!

"ऐशा झोपडपट्ट्या माजवाव्या गहिवर काढोनी गाजवाव्या निवडणूक येता खाजवाव्या, धूर्त हस्ते सर्व पक्षांसी वाटे हवी, कैसी वर्णील दुबळा कवी, पामर वाचा" (मंगेश पाडगावकर) कविवर्यांची ही सुमारे 30 वर्षांपूर्वीची कविता आठवण्याचं कारण ठरली मुंबईतल्या घाटकोपरच्या नारायण नगरातील दरड कोसळून झालेली भीषण दुर्घटना! कवितेत झोपड्यांऐवजी दरडी...

भाईंदरमध्ये पोलिसांच्या कार्यक्रमात ताकाचा ग्लास आणि …

वाचक हो, तुम्हाला आठवत असेलच की जुन्या हिंदी चित्रपटात अर्ध्या नोटेचं चिटोरं दाखवलं की खलनायकाच्या गुहेत विनासायास प्रवेश मिळत असे. (हल्ली काही वेबसिरीजमध्येही हा खेळ दाखवत असतात) तसेच लाचलूचपत प्रतिबंधक खात्यातर्फे धाड पडली की काहीजण नोटा खातात. काहीजण संडासाच्या...
Skip to content