Homeचिट चॅटदेवाभाऊंच्या वाढदिवसानिमित्त झाला...

देवाभाऊंच्या वाढदिवसानिमित्त झाला ‘पैलवान दत्तक योजने’चा शुभारंभ

महाराष्ट्राच्या मातीने देशाला असंख्य मल्ल दिले; मात्र गरिबीमुळे अनेक गुणी पैलवानांची स्वप्ने आखाड्याबाहेरच थांबली. हीच परंपरा मोडून काढण्याचा निर्धार करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त युनायटेड रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (युडब्ल्यूएफआय) आणि देवाभाऊ केसरी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या ‘पैलवान दत्तक योजना २०२६-२७’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा राज्याचे आपत्ती व्यवस्थापन व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते मंगळवारी मलबार हिल येथील सेवा सदन बंगल्यावर शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील ११ होतकरू पैलवानांना दत्तक घेत त्यांना शिष्यवृत्ती, मानधन आणि क्रीडा साहित्याचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे आर्थिक अडचणींमुळे मागे पडणाऱ्या प्रतिभावान मल्लांच्या स्वप्नांना आता भक्कम आधार मिळणार आहे.

या ११ मल्लांवर विश्वासाची मोहोर

या योजनेत सोहम कुंभार, ज्ञानवी पाटील, संग्राम खुर्द, रणवीर जाधव, श्रीकर नायकवडी, वैष्णवी पाटील, वीरेन पाटील, हर्षल घाटके, विश्वजीत सावंत, पियुष शेवाळे आणि व्यंकटेश चोरगे या ११ होतकरू पैलवानांची निवड करण्यात आली. आर्थिक आधारासह दर्जेदार प्रशिक्षणासाठी हा उपक्रम त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

५० पैलवान दत्तक घेण्याचा निर्धार

मार्गदर्शन करताना गिरीश महाजन म्हणाले की, महाराष्ट्राला कुस्तीची समृद्ध परंपरा लाभली आहे. मात्र ग्रामीण भागातील अनेक गुणवंत खेळाडू आर्थिक अडचणींमुळे मोठ्या संधींपासून दूर राहतात. ही केवळ आर्थिक मदतीची योजना नसून युवा पैलवानांच्या स्वप्नांना बळ देणारी सामाजिक चळवळ आहे. उद्योग क्षेत्र, सामाजिक संस्था आणि दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने भविष्यात ५० पैलवान दत्तक घेण्याचा आमचा मानस आहे. निवड झालेल्या पैलवानांनी शिस्त, कठोर परिश्रम आणि सातत्याच्या जोरावर महाराष्ट्रासह देशाचे नाव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल करावे.

गरीबीमुळे स्वप्ने थांबता कामा नयेत

युनायटेड रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष काझी अब्दुल मतीन यांनी सांगितले की, या योजनेत निवड झालेली बहुतांश मुले शेतकरी आणि सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही गुणवंत खेळाडूची स्वप्ने अपूर्ण राहू नयेत, हा या योजनेमागील मुख्य उद्देश आहे. नव्या पिढीतील होतकरू पैलवान घडविणे हे आमच्या फेडरेशनचे ध्येय असून ही योजना संपूर्ण महाराष्ट्रात विस्तारण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

ग्रामीण कुस्तीला मिळणार नवे बळ

देवाभाऊ केसरी फाउंडेशनचे अध्यक्ष रोहित पटेल म्हणाले की, ही फक्त शिष्यवृत्ती योजना नाही. ग्रामीण भागातील कुस्ती संस्कृतीला नवसंजीवनी देणारा हा उपक्रम आहे. समाजातील विविध घटकांनी पुढाकार घेतल्यास महाराष्ट्रातून अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे पैलवान घडू शकतात. भविष्यात या योजनेचा विस्तार अधिक व्यापक स्वरूपात केला जाईल.

शाहू महाराजांच्या विचारांना आधुनिक सलाम

युनायटेड रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे सचिव दत्तात्रय जाधव यांनी प्रास्ताविकात सांगितले की, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या काळात तसेच त्यानंतर अनेक साखर कारखान्यांनी पैलवानांना दत्तक घेऊन त्यांना आर्थिक आधार दिला. त्याच प्रेरणेतून आधुनिक काळात ही संकल्पना नव्याने सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. ग्रामीण भागातील होतकरू मुलांना दर्जेदार प्रशिक्षण, पोषण आणि आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना महत्त्वाची ठरेल.

दिग्गज मल्लांची उपस्थिती

या सोहळ्याला ट्रिपल महाराष्ट्र केसरी नरसिंग यादव (पोलीस उपायुक्त, मुंबई), ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी (सहाय्यक पोलीस आयुक्त, नवी मुंबई) तसेच डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्यासह कुस्ती क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

निवड समितीची महत्त्वपूर्ण भूमिका

या योजनेसाठी भिमराव पाटील, समिंदर जाधव, रामदास देसाई, ज्ञानेश्वर आस्वले, जालिंदर देशमुख, संजय जाधव, राहुल जाधव, आनंदा पाटील आणि अभिजित पाटील यांनी निवड समिती सदस्य म्हणून जबाबदारी पार पाडली.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content