Homeब्लॅक अँड व्हाईट'आलिया' भोगासी...

‘आलिया’ भोगासी…

जे तुम्हाला दिसत होते, जे सर्वांच्या समोर होते, ते कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील रेड कार्पेटवरील जगभरातील अनेक देशांतील अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त कॅमेरा हाती असलेल्या मीडियातील फोटोग्राफर्स, पाप्पाराझी, इन्फ्लुअन्सर यांना दिसलं नाही? आणि त्या गर्दीला जे दिसले नाही, त्याचीच बातमी झाली. त्याचीच उलटसुलट चर्चा रंगली. सोशल मीडियाच्या युगाचे तेच तर मोठे देणे आहे. काहीही घडू देत, बिघडू देत, ते वाया जात नाही… आलिया भट्ट कपूर (बरोबर आहे ना) बुटकी असल्याने त्या कॅमेरामनच्या गर्दीला दिसले नसतील असा निष्कर्ष काढणं चूक आहे. रेड कार्पेटवर स्टाॅलवर्ड्स अथवा सुपरस्टार‌ असो, वा नवखा असो. चित्रपटातला असो, वेबसिरीजचा असो, अगदीच दुर्लक्ष तर अजिबात होत नाही. फारतर एखाद्या अभिनेत्रीचे नाव माहीत नसेल वा आठवणार नाही. काही अभिनेत्री रेड कार्पेटवर दिसण्यासाठी अधिक ग्लॅमरस लूक अंमलात आणतात आणि त्यात आपली मूळ ओळख विसरतात.
आलिया भट्ट कपूर अजूनही हिंदी चित्रपटातच रमलीय. तिला त्यापलिकडे अद्याप ओळख निर्माण करता न आल्याने तसं झालं असावं असं म्हटलं जातं.

अरे पण, आजचा मराठी चित्रपट अनेक देशांमध्ये प्रदर्शित होत असतो ना? विदेशी मीडिया हिंदी चित्रपट कशाला पाहिल हा प्रश्न बरोबरच आहे. आलिया भट्टने विदेशी चित्रपटात, खास करुन अमेरिकन चित्रपटात भूमिका साकारली तर तिच्याकडे विदेशी मीडिया निदान एकदा फ्लॅश उडवेल हे साधंसोपं सुटसुटीत गणित तिच्या पीआर टीमला, मॅनेजमेंटच्या लक्षात येऊ नये? रेड कार्पेटवर अवतरलेल्या प्रत्येक कलाकारावर फ्लॅश उडायला तो काय, ‘जो येईल त्याला पुरस्कार’ असा देवघेव करणारा सोहळा आहे का? अथवा, हजार लाईक्स तर नक्कीच मिळतील

असा माफक अपेक्षा असलेल्या पाप्पाराझीचा त्या गर्दीत समावेश आहे का? तर अजिबात नाही. कान्स चित्रपट महोत्सवाची उंची वेगळी. क्लास भारी. ऐश्वर्या ‌राॅयवर कान्स चित्रपट महोत्सवात रेड कार्पेटवर खचाखच, भरभरून फ्लॅश उडाले आणि आजही त्या फोटो, रिळ, व्हिडिओज यांना लाईक्स मिळताहेत. याची अनेक कारणे आहेत. तिचं सौंदर्य, तिचा अफलातून ड्रेस सेन्स, तिचा ग्लॅमरस लूक हे तर आहेच, ते दिसतेय. ती विश्वसुंदरी आहे, आंतरराष्ट्रीय पातळीवरील उत्पादनाची ती माॅडेल होती, तिने ब्राईड ॲण्ड प्रेज्युअस, द मिस्ट्री ऑफ स्पाईजेस, प्रोवोक्ड वगैरे वगैरे विदेशी चित्रपटांत भूमिका साकारल्या. आपण ग्लोबल युगातील स्टार आहोत याचे भान तिने ठेवले.

प्रियांका चोप्राने आपण ग्लोबल युगातील स्टार आहोत यांवर जास्तच फोकस ठेवला. वी आर ओन्ली फॅमिली, वी कॅन बी हिरोज, द मॅट्रिक्स रिसरेक्शन वगैरे वगैरे विदेशी चित्रपटांंत विशेषतः हाॅलिवूडपटात भूमिका साकारत असतानाच आपल्या प्रमोशन आणि इमेजबांधणी यावर तिने सकारात्मक भर दिला. ग्लाॅसी पेपरवरील हायफाय इंग्लिशमधील विदेशी ग्लॅमर मॅगझिनमधून आपलं भरपूर भरपूर दर्शन घडवले. त्यासाठी आकर्षक, मोहक, मादक, मधाळ अशी भरपूर फोटोसेशन केली. तिचा फोकस व्यापक आहे. तिने अशी झेप घेतल्याने दीपिका पदुकोण मागे कशी आणि का राहिल? तिने ‘रिटर्न ऑफ जेऺडर केज’ (Return of xander cage) या हाॅलिवूडपटात काम करतानाच आपल्या पब्लिसिटीवर जास्तीतजास्त फोकस ठेवला. तिनेही आंतरराष्ट्रीय पातळीवरील मासिकात आपण दिसावे/असावे अशी व्यावसायिक रणनीती आखली. आपण ग्लोबल युगातील डिजिटल पिढीला आपलंसं करु इच्छिणाऱ्या अभिनेत्री आहोत, याचं भान कधीच सोडलं नाही. आपोआपच कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील रेड कार्पेटवर सहज वावरताना जगभरातील मीडियाचे फ्लॅश उडाले.‌ अर्थात, आकर्षक व्यक्तिमत्त्वही यात महत्त्वाचा फंडा आहे. विद्या बालनने विदेशी चित्रपटांत भूमिका साकारली नाही, पण आपल्या आकर्षक प्रेझेन्सने तीही रेड कार्पेटवर स्टार ठरली. आलिया भट्ट कपूरकडे आंतरराष्ट्रीय पातळीवरील मीडियाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसले तरी ती ब्रेकिंग न्यूज झाली. आलिया भोगासी… हेही नसे थोडके. आणखी काय बोलणार?

Continue reading

सतना कारागृह! गोष्ट येथे संपतच नाही!!

ही बातमी तुम्हालाही माहित्येय. कदाचित तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेल अथवा लग्नाच्या गाठी देव स्वर्गात बांधत असतो, असे पारंपरिक समजूतदारपणाचे वाक्य बोलून तुम्ही दुसऱ्या बातमीकडे वळला असाल... मध्य प्रदेशमधील सतना कारागृहातील ज्येष्ठ जेलर अधीक्षक फिरोजा खान हिची त्याच कारागृहातील...

रणवीरने चित्रपट सोडला म्हणून इतका गहजब?

'डाॅन ३'च्या चित्रिकरणास सुरुवात होण्याच्या अवघ्या दहा दिवस अगोदर रणवीर सिंगने चित्रपट सोडल्याने दिग्दर्शक फरहान अख्तरचे चिडणे आणि फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्लाॅईज या चित्रपटसृष्टीतील संघटनेने रणवीर सिंगवर तीन वर्षांची बंदी घालण्याचे आवाहन करताच त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटणे...

साठीतल्या सलमानमध्ये अजूनही रागवण्याचे ‘स्पिरीट’!

राग आला रे आला की सोशल मीडियात, विशेषतः इंस्टाग्रामवर पोस्ट करणे हे आजच्या सेलिब्रिटीजचे वैशिष्ट्य. त्यांना एखाद्या इव्हेंटसमध्ये जरा कुठे कशाचा तरी राग आला अथवा कोणाकडे रागाने पाहिले न पाहिले तरी तमाम इन्फ्लूअन्सर्स त्याचं काही सेकंदाचे रिल सोशल मीडियात...
Skip to content