Homeन्यूज अँड व्ह्यूजकोणामुळे आली शिक्षण...

कोणामुळे आली शिक्षण क्षेत्राला ओवाळून टाकण्याची वेळ?

दरवर्षी १० वी आणि १२वीच्या परीक्षांचे निकाल लागले की, पुढच्या शिक्षणासाठी वेगवेगळ्या प्रवेशपरीक्षांचा मोसम सुरू होतो. लाखो विद्यार्थी, शिक्षक आणि पालक ह्या प्रवेशपरीक्षांच्या गडबडीत असतात. यंदा ह्या परीक्षा गाजल्या त्या नीट परीक्षेच्या पेपरफुटीमुळे. ही पेपरफुटी एव्हढ्या मोठ्या प्रमाणावर झाली की, झालेली परीक्षा रद्द करावी लागली. आता २१ जूनला फेरपरीक्षा होणार आहे. हे कमी होते की काय तर आता सीबीएसई परीक्षेत अनिमयितता आणि कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रेन्स टेस्ट (सीयुटी-युजी) परीक्षेत गोंधळ निर्माण झाल्यामुळे एकूणच ह्या परीक्षांच्या व्यवस्थापनाबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नीट प्रवेशपरीक्षेच्या विश्वासार्हतेबद्दल निर्माण झालेल्या वादळामुळे देशातील लाखो विद्यार्थी आणि पालकांना मुलांच्या भवितव्याबद्दल चिंता निर्माण झाली आहे. आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचले असून न्यायालयाच्या आदेशानेच फेरपरीक्षा होणार आहेत. ह्यामध्ये आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वत: लक्ष घातले असून प्रश्नपत्रिका पोहोचवण्यासाठी वायुदलाची मदत घेतली जाणार आहे. ह्यावरून विरोधी पक्षांनी मोदी आणि केन्द्र सरकारला लक्ष्य केले आहे.

सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे विद्येचे माहेरघर समजल्या जाणार्‍या पुणे हे ह्या पेपरफुटीचे केंद्र बनले आहे. ह्याप्रकरणी झालेल्या चौकशीत पुण्याचेच तीन प्राध्यापक, पी. व्ही. कुलकर्णी, मनीषा मांढरे आणि मनीषा हवालदार, जे ह्या नीट प्रश्नपत्रिका तयार करण्याच्या समितीवर होते, त्यांनाच अटक झाली आहे. ह्याशिवाय मनीषा ह्या ब्युटिशीयनही पुण्याच्याच आहेत. ह्या प्रध्यापकांनी केवळ पैशाच्या लोभापायी हे दुष्कृत्य केले, म्हणजे शिक्षकी पेशाला काळीमाच आहे. ह्यात भर पडली ती लातूरच्या शिवराज मोटेगावकर सरांची. लातूरसारख्या ठिकाणी कोचिंग क्लासेसचे साम्राज्य उभे करणारे मोटेगावकर आणि त्यांचे आरसीसी क्लासेस. हे ह्या पेपरफुटीचे मास्टरमाइंड ठरले आहेत. एकेकाळचे विद्यापीठातले टॉपर असलेले हे मोटेगावकर ह्यांनी नीट परीक्षेच्या आधी आपल्या विद्यार्थ्यांची सराव परीक्षा घेतली आणि त्यामध्ये नीटच्या प्रश्नपत्रिकेतील ४५ प्रश्नांपैकी ४३ प्रश्न आले होते. आता ह्या पेपरफुटीची सखोल चौकशी होत आहे आणि गुन्हेगाराना शिक्षा होईल. पण ह्यानिमित्ताने परीक्षांचे राजकारण आणि शिक्षण क्षेत्राला लागलेली कीडही समोर आली आहे.

शिक्षण

परीक्षांचा मोसम सुरू झाला की, ह्या मोटेगावकर सरांच्या जाहिराती विविध चॅनेल्स, बस, रिक्शा सगळीकडे लागतात. ह्या क्लासची फी ५० हजारांपासून काही लाखांत आहे. हजारो मुले रोज सकाळी, बस, रिक्शा, सायकल आणि कारने लातूरात पोहोचतात. ह्या क्लासमध्ये शिकवण्यासाठी काही प्रतिथयश डॉक्टर्स आणि आयआयटीचे इंजीनियर्स काही लाखांची बिदागी घेऊन येतात. काही शिक्षकांना तर वर्षाला १.५० कोटी रुपयांचे मानधन मिळते आणि  विद्यार्थ्यांच्याही त्यांच्या फीप्रमाणे तुकड्या असतात. काही पालक, विशेषत: जे स्वत: डॉक्टर्स आहेत, आपल्या पाल्यांनाही मेडिकलला प्रवेश मिळावा ह्यासाठी मोटेगावकरना १० लाख रुपयापर्यंतची फीही देतात. त्यांच्यासाठी विशेष शिकवणी असते. ह्यानिमित्ताने कोचिंग क्लासेसची अपरिहार्यताही समोर आली आहे. मग ते 10वी, 12वीचे वर्ग असोत किंवा अशा नीटसारख्या प्रवेशपरीक्षा, आज अगदी खेड्यापाड्यातही कोचिंग क्लासेसचे पेव फुटले आहे. म्हणजे महाविद्यालयात प्राध्यापक जणू काही शिकवतच नाही आणि मुले सगळे काय ते कोचिंग क्लासमध्येच शिकतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, हेच महाविद्यालयातले प्राध्यापक असे कोचिंग क्लासेस चालवतात. हजारो रुपयांची फी उकळतात. हेही शिक्षण क्षेत्राला लागलेले ग्रहणच म्हणावे लागेल. आता काही महाविद्यालयांनी आपल्या प्राध्यापकांना असे कोचिंग क्लास चालवण्यास मनाई केली आहे.

गंमत म्हणजे विद्यार्थ्यांना 12वीला किती गुण मिळाले ह्याचा पुढच्या प्रवेशासाठी सबंध नसतो, तर प्रवेशपरीक्षेत किती गुण मिळाले आहेत, हयावरच त्यांचे भवितव्य ठरते. गेल्या काही वर्षांत नीट, जेईई, एमपीएससी, बँक भरती, रेल्वे भरती आणि इतर असंख्य स्पर्धा परीक्षांमध्ये पेपर फुटणे, गैरव्यवहार, दलालांचे जाळे, राजकीय संरक्षण आणि प्रशासकीय संगनमत ह्या गोष्टी सातत्याने होत आहेत. २०२४मध्येही नीटचा पेपर फुटला होता. मात्र त्यावेळेस काहीच कारवाई झाली नाही आणि तेव्हा मोटेगावकरांनी जाहीर वक्तव्य केले होते की, ह्या पेपरफुटीमगे कोण आहे हे शोधून त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे. मात्र, ह्या सगळ्या प्रकारामुळे जे लाखो विद्यार्थी रात्रंदिवस परीक्षेसाठी मेहनत घेतात. त्यांचे, त्यांच्या पालकांचेही आर्थिक नुकसान तर होतेच, पण भावनिकदृष्ट्याही ते खचतात. लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित ही परीक्षा केवळ प्रशासकीय प्रक्रिया नसते तर ती  त्यांच्या आयुष्याची दिशा ठरवत असते. त्यामुळे परीक्षाप्रणाली अधिक सूक्ष्म, पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्यासाठी कठोर संस्थात्मक सुधारणा करण्याची गरज आहे.

(लेखक वैजयंती कुलकर्णी आपटे ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

राष्ट्रवादीत आग लावण्यात थोरले पवार यशस्वी!

अजित पवारांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अंतर्गत कलहाने ग्रासले आहे. नव्याने पक्षाची धुरा हाती घेतल्यानंतर पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, त्यांची दोन्ही मुले, पार्थ आणि जय पवार ह्यांच्यात आणि अजितदादा गटातील नेते राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि महाराष्ट्राचे...

महिलांची सुरक्षितता ही प्रत्येकाचीच जबाबदारी!

एकीकडे पाच राज्यांच्या निवडणुका, विधान परिषद निवडणुका, महाराष्ट्रदिनाचा उत्सव, आणि दुसरीकडे अल्पवयीन मुलींवर अत्याचार, एकामागोमाग एक अनेक प्रकरणे, गेल्या काही दिवसात उघडकीस येत आहेत. त्यामुळे वाटते की, ह्या महाराष्ट्रात चालले आहे तरी काय? मुली, महिला, अगदी वृद्धासुद्धा इथे सुरक्षित...

किती काळ टिकणार प्रताप सरनाईकांचा ‘मराठी’ बाणा?

अखेर महाराष्ट्र दिनापासून महाराष्ट्रातील रिक्शा-टॅक्सी चालकांना मराठी बोलण्याची सक्ती करण्याचा महाराष्ट्र शासनाचा निर्णय पुढे ढकलण्यात आला. आणि हे अपेक्षितच होते. १ मेपासून राज्यातील सर्व रिक्शा आणि टॅक्सीचालकाना मराठी बोलता येणे आवश्यक होते, अन्यथा त्यांचे परवाने रद्द करण्याचा आदेश राज्याचे परिवहनमंत्री...
Skip to content