Homeमाय व्हॉईसमटक्याचा आकडा कधी...

मटक्याचा आकडा कधी वेळेआधी फुटला नाही, पण..

यापूर्वीही नीट परीक्षेचे पेपर फुटले, मागील चुकीतून तुम्ही कोणताही धडा घेतला नाही, हे अतिशय दु:खद आहे, अशा परखड शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने देश पातळीवर परीक्षा घेणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीला (एनटीए) सुनावले आहे. यंदाच्या वर्षी नीटचे पेपर फुटल्याने परीक्षाच रद्द झाली. अहोरात्र कष्ट करून परीक्षेची तयारी केलेल्या देशातील तेवीस लाख विद्यार्थ्यांवर, त्यांच्या पालकांवर व मुलांच्या शिक्षकांवर पेपरफुटीमुळे मोठा मानसिक आघात झाला. डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या या विद्यार्थ्यांची काहीच चूक नसताना पुन्हा एकदा त्यांना परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. नीट परीक्षेशी संबंधित काही अध्यापक आणि व्यावसायिक कोंचिंग क्लासेसचे चालक यांच्या संगनमतातून परीक्षेतील अपेक्षित प्रश्न बाहेर आले. आपल्या लेकरा- बाळांचे भले व्हावे म्हणून श्रीमंत पालकांनी लाखो रूपये मोजून ते खरेदी केले. नीट पेपरफुटीची सीबीआय चौकशी करीत आहे. पेपरफुटीशी संबंधित अध्यापक व नामवंत कोचिंग क्लासेसचे चालक मिळून किमान तेरा जण तरी सीबीआयच्या ताब्यात आहेत. दर दोन-चार दिवसांनी पेपरफुटीत गुंतलेल्या पालकांची, शिक्षकांची नवनवीन नावे सीबीआयच्या रडावर येत आहेत. नीट, या अत्यंत प्रतिष्ठेच्या परीक्षेत पेपफुटीमध्ये पैशाच्या लोभाने लातूर आणि पुण्यातील शिक्षण क्षेत्रातील कोचिंग सम्राट व अध्यापक गुंतले आहेत, हे अतिशय दुर्दैवी आहेच, पण त्यातून देशभर महाराष्ट्राची बदनामी झाली आहे.

परीक्षा घेणाऱ्या एनटीएच्या यंत्रणेतील सर्वांचेच हात स्वच्छ आहेत का? केंद्र सरकारच्या शिक्षण व मनुष्यबळ मंत्रालयाची काहीच जबाबदारी नाही काय? पेपरफुटीचे प्रकरण सन २०२४मध्येही सर्वोच्च न्यायालयात आले होते. तेव्हा एक समिती स्थापन केली होती. या समितीने दिलेल्या शिफारसी एनटीएने स्वीकारल्या होत्या. तरीही यंदा पेपर कसे फुटले? यंदा नीटची परीक्षा ३ मे रोजी देशातील ५५१ शहरांत व परदेशातील १४ केंद्रांवर आयोजित केली होती. तेवीस लाख विद्यार्थी बसले होते. ७ मे रोजी परीक्षेत काही गडबड झाल्याचे समजले. नंतर हे प्रकरण केंद्रीय तपासयंत्रणेकडे सोपवले. १२ मे रोजी परीक्षा रद्द करण्यात आली. शिक्षण मंत्रालय व एनटीएने नीटची पुन्हा परीक्षा २१ जून रोजी होणार असल्याचे जाहीर केले. नीट म्हणजे नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट. ही भारतीय वैद्यकीय व दंत अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी राष्ट्रीय प्रवेश परीक्षा आहे. अशा परीक्षेची सुरूवात २०१३मध्ये झाली. या परीक्षेच्या गुणवत्तेवरून एमबीबीएस, बीडीएस, आयुष ( बीएएमएस, बीएचएमएस), नर्सिंगच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळतो. देशात एक लाखाहून अधिक एमबीबीएस व २७ हजारांहून अधिक बीडीएसच्या जागा उपलब्ध आहेत. पेपरफुटी प्रकरणात आजवर तेरा जणांना अटक झाली आहे. पेपरफुटीने तेवीस लाख विद्यार्थ्यांचे भविष्य व करिअर धोक्यात टाकले आहे. नीट परीक्षेची सर्व देशात बेअब्रू झाली असताना केंद्रातील एकही मंत्री याविषयी ब्रसुद्धा काढत नाही.

सीबीआयचे पथक अनेक दिवस लातूरमधे ठाण मांडून बसले होते. शिवराज मोटेगावकरच्या रेणुका केमिस्ट्री कोचिंग क्लासवर छापे घालून अनेक कागदपत्रे, दस्तऐवज जप्त केले. या वर्षीची नीट परीक्षा संपल्यानंतरचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. क्लासच्या सरांनी प्रश्न विचारल्यानंतर विद्यार्थ्यी उत्तर देतात, सर तुम्ही जे १०१ प्रश्न दिले होते, त्याच प्रश्नांमधून परीक्षेला प्रश्न आले होते. या व्हिडिओमुळे संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. लातूर हे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या कोचिंग क्लासेसचे मोठे आगर आहे. येथे क्लासेसमध्ये उत्तर प्रदेश व बिहारमधून आलेले शिक्षक शिकवत असतात. त्यात मोटेगावकर हा कोचिंग किंग म्हणून ओळखला जाणारा मराठी चेहरा आहे.

गेल्या दहा वर्षांत विविध राज्यात विविध परीक्षांच्या ९० वेळा पेपरफुटीच्या घटना घडल्या आहेत. ४८ वेळा परीक्षा रद्द झाल्या आहेत. सार्वजनिक परीक्षा कायदा २०२४मध्ये पेपरफुटीला १ कोटी दंड व १० वर्षे तुरूंगवास अशी शिक्षा असतानाही २०२६मध्ये पेपर कसे फुटले? कठोर कायदा असूनही अशा शिक्षेची भीती कोणालाच वाटत नाही का? पेपर फोडणारे, पेपर विकणारे व पेपर विकत घेणारे सर्व सारखेच दोषी आहेत. आपल्या मुलाबाळांना डॉक्टर करण्यासाठी वाट्टेल ती किमत मोजण्याची तयारी असलेले धनवान पालक भरपूर आहेत. एनटीए यंत्रणेतील

फुट

काही घटक सामील असल्याशिवाय व केंद्रीय शिक्षण मंत्रालयातील उच्चपदस्थांचे संरक्षण असल्याशिवाय पेपर बाहेर येणे कसे शक्य आहे? परीक्षा निकोप व पारदर्शक नसेल तर निकाल तरी विश्वासार्ह कसे असतील? म्हणून नीट परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. जे पेपर विकत घेऊन डॉक्टर होतील ते दवाखान्यात किवा इस्पितळात रूग्णाला कशी सेवा देतील? केवळ पैसे कमविण्यासाठी व प्रतिष्ठा मिळविण्यासाठी ते डॉक्टर म्हणून वावरत राहतील व रूग्णांच्या जीवाशी खेळ खेळतील.

एनटीएचे जिथे कार्यालय आहे, जिथे पेपर सेट केला जातो, तिथे पेनसुद्धा बरोबर घेऊन जाता येत नाही. कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू नेण्यास मनाई आहे. मग तेथून पेपर बाहेर कसा येऊ शकतो? फुटलेला पेपर हा मूळ पेपरची फोटो कॉपी आहे काय? बरोबर कॅमेरा घेऊन जाता येत नाही, मग फोटो किंवा फोटो कॉपी काढणे तरी कसे शक्य आहे? म्हणूनच नीट यंत्रणेतील काहींचा सहभाग असल्याशिवाय पेपर फुटू शकत नाही. अटक केलेल्या तेरा आरोपींनी आपल्या मोबाईलवरील चॅटींग व फोटो सर्व काही डिलीट करून टाकले आहे. पण फॉरेन्सिक तपासणीनंतर सर्व पुरावे मिळू लागले आहेत. पेपर सेट करणाऱ्या बायोलॉजी लेक्चरर मनीषा मांढरे, पेपर सेटर केमिस्ट्री प्रोफेसर पी. व्ही. कुलकर्णी, विद्यार्थी व कोचिंग क्लासशी संपर्क ठेवणारी ब्युटिशिअन मनीषा वाघमारे, पेपरच्या नेटवर्कमध्ये सौदा करण्यात सहभाग असलेला धनंजय लोखंडे, विद्यार्थी व प्रश्नांची पीडीएफ बनवणारा शुभम खैरनार, पीडीएफवरून हार्ड कॉपी बनवणारा हरियाणाचा यश यादव, नीट पेपर डिल केली म्हणून मांगीलाल बिंवाल, मांगीलालचा भाऊ दिनेश बिंवाल (राजस्थान), फुटलेले पेपर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणारा कोचिंग क्लासचा संचालक शिवराज मोटेगावकर हे सारे सीबीआयच्या जाळ्यात सापडले आहेत. लातूरचे डॉ. मनोज शिरूरे व पुण्याचे प्रा. तेजस हर्षदकुमार शाह यांनाही सीबीआयने ताब्यात घेतले आहे.

पेपरफुटीची साखळी व कटाचा शोध घेण्यासाठी सीबीआयने किमान ५० ठिकाणी शोधमोहीम हाती घेतली. त्यात दस्तावेज, लॅपटॉप, मोबाईल जप्त केले आहेत. नीट पेपरची पाच राज्यांत विक्री झाली व सर्वाधिक विक्री महाराष्ट्रात झाली, असे तपासात आढळून आले आहे. एनटीएचे चेअरमन प्रदीपकुमार जोशी यांचे नाव चर्चेत येत असते. पण आपला काही संबंध नाही असे एनटीएने जाहीर करून टाकले आहे. २०२४मध्ये पेपर फुटले तेव्हा जोशी हेच एनटीएचे चेअरमन होते. ते पूर्वी मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाचे चेअरमन असतानाही वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. गेल्या दहा वर्षांत नीटचे पेपर चार वेळा फुटले. २०१७मध्ये पाटणा व जयपूर येथे, २०२१मध्ये जयपूर, उत्तर प्रदेश, २०२४मध्ये झारखंड व बिहार, २०२६मध्ये सीकर, जयपूर व महाराष्ट्रात. नीट परीक्षा एनटीएकडून काढून घेऊन युपीएससीकडे सोपवावी आणि पेपरफुटीच्या प्रकरणी जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. वर्षानुवर्षे बेकायदेशीर सुरू असलेल्या मटक्याचा आकडा वेळेपूर्वी कधीच फुटत नाही. मग नीटचा पेपर अनेक स्तरावर कडक सुरक्षा व दक्षता असूनही फुटतोच कसा?, अशा पोस्टने सोशल मीडियावर धमाल उडवली आहे. हे जळजळीत वास्तव्य आतातरी सरकारचे डोळे उघडणार का?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

पंतप्रधान मोदींची तपपूर्तीः ‘सबका साथ’ ते ‘झालमुडी-मेलोडी’!

देशातील सर्वोच्च लोकप्रिय नेते नरेंद्र मोदींनी २६ मे २०१४ रोजी पहिल्यांदा पंतप्रधानपदाची सूत्रे होती घेतली. २०१९ व २०२४ अशी पंतप्रधानपदाची त्यांनी हॅट्ट्रीक संपादन केली. सबका साथ- सबका विकास, अशी घोषणा देऊन मोदींनी कारकिर्दीला प्रारंभ केला. गेल्या बारा वर्षांत त्यांच्या कामगिरीचा...

काटकसर की नौटंकी?

दहा मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जागतिक संकटाला सामोरे जाण्यासाठी देशातील जनतेने काटकसर करावी, असे आवाहन केले. तेल आणि सोने आयातीमुळे देशाच्या परकीय चलनावर मोठा भार पडत असल्याचे सांगितले. खाजगी वाहनांचा वापर कमी करून सार्वजनिक वाहनांतून प्रवास करा असे...

पंतप्रधान, राष्ट्रपतींनाही उडवून लावणाऱ्या ममतापर्वाचा अस्त!

सर्व देशाचे लक्ष पश्चिम बंगालमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे होते. स्ट्रीट फायटर म्हणून ओ‌‌ळखल्या जाणाऱ्या ममता बॅनर्जींच्या सत्तेला भाजपाने सुरूंग लावला. सलग पंधरा वर्षे मुख्यमंत्री असलेल्या ममता यांचा दारूण पराभव त्यांच्याच पूर्वीच्या निकटवर्तीय सहकारी असलेल्या सुवेंधू अधिकारी या भाजपाच्या...
Skip to content