Homeमाय व्हॉईसमुंढेंनी केला दूधसंकलनाच्या...

मुंढेंनी केला दूधसंकलनाच्या फुगवलेल्या आकड्यांचा पर्दाफाश!

तुकाराम मुंढे हे प्रशासकीय अधिकारी, प्रत्येक नेमणुकीनंतर कामाचा धडाका सुरू करतात. नुकतीच त्यांची अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून नेमणूक झाली. १९ मे २०२६ला त्यांची ही नेमणूक झाली आणि अजून महिनाही नाही झाला तर त्यांनी सगळीकडे धाडसत्र सुरू केले आहे. कधी विषारी दारू, कधी दूध आणि तुपातली भेसळ तर कधी गुटका अशा सगळ्या अवैध धंद्यांविरोधात आणि भेसळीविरोधात आता त्यांनी शस्त्र उगारले आहे आणि त्यामुळे हे उत्पादक भयभित झाले आहेत. तुकाराम मुंढे ह्यांचा दराराच तसा आहे. दूध उत्पादक शेतकर्‍यांनी नुकताच मुंढे ह्यांच्या फोटोला दुधाचा अभिषेक केला, कारण दूधसंकलन केंद्रात त्यांच्या दुधात भेसळ केली जात होती, ती मुंढे ह्यांनी उघडकीस आणली. सध्याच्या उन्हाळयात नागरिक, विशेषत: लहान मुले आईसक्रीम आणि कुल्फीवर तुटून पडतात. पण ह्यामध्ये दुधाचा पत्ताच नसतो, युरिया असते. आणि फ्रोजन डेझर्ट म्हणून ते विकले जाते, हे त्यांनी शोधून काढले. त्यामुळे अशी भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

गेल्या १५ दिवसांत दूधसंकलानाचे  फुगलेले आकडे, जे वर्षानुवर्षे फुगवले जात होते, त्यातली हवा निघाली. आता दूधसंकलन २० ते ३० टक्क्यांनी कमी झाले आहे. म्हणजे आपण इतकी वर्षे असेच भेसळयुक्त दूध पित होतो. मुंढे फक्त दूध आणि तुपावरच थांबले नाहीत तर त्यांनी शिर्डी येथील प्रसादाच्या दुकानांवरही धाडी टाकल्या. शिर्डीचे साईबाबा लाखो भक्तांचे श्रद्धास्थान. तिथे सगळेजण प्रसादाच्या दुकानांतून पेढे आणि तत्सम मिठाई प्रसाद म्हणून खरेदी करतात. साईबाबांना नैवेद्य दाखवून तो प्रसाद घरी घेऊन येतात, कुटुंबियांना देतात. सगळेजण साईंचा प्रसाद अतिशय श्रद्धेने खातात. पण ह्या पेढ्यात काय असते? खवा नसतो तर युरिया, मैदा, स्टार्च असतो. दुधाचा तर पत्ताच नसतो. आणि हेच मुंढे ह्यांनी सिद्ध करून दाखवले आहे. फक्त शिर्डी नाही तर शनिशिंगणापूर, खंडोबा, सिद्धटेक आणि इतर देवस्थानेही मुंडे ह्यांच्या टार्गेटवर आहेत. ही भक्तांची शुद्ध फसवणूक आहे.

खरेतर तेथील अन्न आणि औषध प्रशासनाला ही गोष्ट माहित असणार. पण आजपर्यंत कोणतीही कारवाई केली गेली नाही. कारण, अधिकारी आणि दुकानदार ह्यांची मैत्री. मुंढे ह्यांनी अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाचा पदभार घेतल्यानंतर पुणे येथे विषारी दारू प्यायल्याने २३ जणांचा मृत्यू झाला. त्यांनी त्यामुळे अनेक अवैध दारूअड्ड्यांवर धाडी टाकल्या आणि कारवाई केली. तीच गोष्ट गुटका, पानमसल्याची. नुकतीच त्यांनी नालासोपारा येथील पानाच्या टपरीवर धाडी टाकून मोठ्या प्रमाणात गुटका आणि पानमसाला जप्त केला. आतापर्यंत त्यांनी भेसळप्रकरणी ३३ जणांना अटक केली आहे. २७ आस्थापनांना टाळे ठोकले तर आणखी २५ आस्थापनांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. आता त्यांच्या रडारवर मुंबईचा वडापाव आहे. त्यांना घाबरून वडापाव विक्रेत्यांनी आधीच कागदात वडापाव गुंडाळून देणे बंद केले आहे. ह्या सगळ्या कारवाया पाहिल्यानंतर अन्न आणि औषध प्रशासन इतकी वर्षे झोपले होते की काय अशी शंका येते, की अधिकार्‍यांचे साटेलोटे, असा प्रश्न पडतो. आता मात्र ह्या खात्याची झोप उडाली आहे, सगळे खडबडून जागे झाले आहेत.

२००५मध्ये आयएएस झाल्यावर गेल्या २१ वर्षांतली ही त्यांची २५वी बदली आहे. प्रत्येक वेळेस त्यांना जे पद दिले जाते, तिथे ते धडक कारवाई करतात असा अनुभव आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी राजकारण्यांना ते नकोसे होतात आणि सरकारवर दबाव आणून त्यांची बदली केली जाते. काही वेळा तर त्यांना बिन पदाचे, बिन कामाचे अधिकारी म्हणून नुसते बसवूनही ठेवले गेले आहे. आतापर्यंत झालेल्या २५ बदल्यांच्या काळात, कुठल्याही पदावर त्यांना १ ते दीड वर्षांच्या वर ठेवले गेले नाही. कारण पद कुठलेही असो, भ्रष्टाचाराविरुद्ध त्यांनी उचललेला लढा ते चालूच ठेवतात. ह्या नेमणुकीआधी त्यांना दिव्यांग विभागाचे सचिव म्हणून नेमले होते. तेथे त्यांनी हजारो बोगस दिव्यांग प्रमाणपत्रे घेऊन सवलतींचा लाभ घेणार्‍या व्यक्तींवर कारवाई केली. अगदी आयएएस परीक्षेसाठीही खोटी व्यंग प्रमाणपत्रे दिली जात होती. नवी मुंबईचे आयुक्त असताना त्यांनी, भू माफिया, बिल्डर आणि इतर लँड माफियांविरुद्ध धडक कारवाई केली होती. मात्र तिथे सर्व पक्षांनी एकत्र येऊन मुंढे ह्यांच्याविरूद्ध ठराव केला आणि त्यांना ते पद सोडावे लागले.

मुंढे ह्यांच्या अशा कार्यशैलीमुळे ते अनेकांना, विशेषत: राजकारण्यांना अडचणीत आणतात. पण सामान्य माणसांचे मात्र ते हीरो ठरतात. कारण तुकाराम मुंढे हे नाव घेतले की, डोळ्यासमोर उभी राहते एक शिस्तप्रिय व्यक्ती, कायद्याला धरूनच कारवाई करणारा अधिकारी. अगदी कार्यालयात उशिरा येणार्‍या कर्मचार्‍यांवरही कारवाईचा बडगा उचलणारा बॉस. ह्यामुळे जनतेचे ते जारी लाडके असले तरी राजकीय नेत्यांचे दोडके आहेत. आता त्यांचे हे पद किती दिवस राहते, की त्यांची लगेच बदली केली जाते, हे येत्या काळात कळेल.

(लेखक वैजयंती कुलकर्णी आपटे ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

1 COMMENT

  1. अगदी खरं आहे! नेहमी प्रमाणेच त्यांची कधीही उचल बांगडी होऊ शकते. प्रतिकूल परिस्थितीत जनतेच्या हितासाठी जीवावर उदार होऊन काम करणाऱ्या मुंढे साहेबांना त्रिवार सलाम!

Comments are closed.

Continue reading

बाळासाहेबांप्रमाणेच उद्धव ठाकरेंची धरसोड वृत्ती आली अंगलट!

ऑपरेशन टायगर शिवसेनेच्या सहा फुटीर खासदारांच्या मतदारसंघाचा दौरा करून शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुंबईत परत आले, तर आल्याआल्याच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यानी त्यांना आणखी एक धक्का दिला. उबाठाचे नेते आणि आदित्य ठाकरे ह्यांचे विश्वासू सचिन अहिर ह्यानी पक्षाला...

उरलेल्या उबाठा सेनेपुढे फुटीचे आव्हान कायम!

अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यांचे 'ऑपरेशन टायगर' यशस्वी  झाले. शिवसेना उबाठा गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर ह्यांनी जाहीरपणे ते शिंदे ह्यांच्याबरोबर आहेत, असे कालच सांगितले. त्यामुळे ऑपरेशन टायगरची अनिश्चितता संपुष्टात आली. राज्य विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला बोलताना शिंदे म्हणाले की, आम्ही कुठलेही...

मुंबईकरांनो चला.. तुंबलेल्या पाण्यातून वाट काढायची वेळ येतेय!

येतोय-येतोय म्हणत अखेर मोसमी पाऊस तळकोकणात दाखल झाला आणि महाराष्ट्रात आनंदाचे वारे वाहू लागले. केरळमध्ये ह्या मान्सूनचे येणे लांबल्यामुळे महाराष्ट्रातही विलंब होतो की काय अशी भीती होती. पण अखेर पाऊस महाराष्ट्रात दाखल झाला. सगळ्या धरणातील पाण्याने तळ गाठला, मुंबईसारख्या शहरात...
Skip to content