Homeमाय व्हॉईसउरलेल्या उबाठा सेनेपुढे...

उरलेल्या उबाठा सेनेपुढे फुटीचे आव्हान कायम!

अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यांचे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी  झाले. शिवसेना उबाठा गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर ह्यांनी जाहीरपणे ते शिंदे ह्यांच्याबरोबर आहेत, असे कालच सांगितले. त्यामुळे ऑपरेशन टायगरची अनिश्चितता संपुष्टात आली. राज्य विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला बोलताना शिंदे म्हणाले की, आम्ही कुठलेही ऑपरेशन अर्धवट सोडत नाही तर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांनी बॉडी चांगली सुदृढ आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. आश्चर्य म्हणजे, ह्या संपूर्ण ऑपरेशन टायगरच्या काळात भाजपचे नेते किंवा मुख्यमंत्री फडणवीस ह्यांनी काहीही वक्तव्य केले नाही. दुसरीकडे उद्धव ठाकरे ह्यांनी जे सहा खासदार उबाठा गट सोडून गेले त्यांच्या मतदारसंघाचा दौरा सुरू केला. काल पहिली सभा बंडखोर खासदार संजय पाटील ह्यांच्या मतदारसंघातून झाली. आपल्या भाषणात त्यांनी ह्या पक्षफुटीचा सूड घेण्याची भाषा केली. त्यांचेच प्रवक्ते संजय राऊत, ह्या वाचाळवीराने आधी भर पत्रकार परिषदेत ह्या सहा खासदारांवर शिवीगाळ केली आणि त्यांना मतदारसंघात आले की तुडवा, असा आदेश दिला.

खरेतर शिवसेना ही संघटना १९६६मध्ये स्थापन झाली. तेव्हापासून बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेना खूप आक्रमकच होती. पक्ष सोडून जायची कुणाची हिम्मत नव्हती. पण तेव्हाचे आक्रमक शिवसेना नेते छ्गन भुजबळ ह्यांनी पक्षात पहिली मोठी फुट पाडली. त्यानंतर नारायण राणे, राज ठाकरे, गणेश नाईक असे अनेक नेते पक्ष सोडून गेले. बाळासाहेबांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे ह्यांनी पक्षनेतृत्त्वाची धुरा सांभाळली. पण त्यानंतर गेल्या काही वर्षांत, शिवसेना संघटना आणि पक्ष ह्या दोन्ही आघाड्यांवर इतकी विकलांग झाली आहे की, कुणाचाच धाक राहिलेला नाही. उद्धव ठाकरे भेटत नाहीत, संपर्क ठेवत नाहीत, मतदारसंघात येत नाहीत, अशा तक्रारी सगळेच खासदार करतात. दुसरे म्हणजे आता पक्षाचे निर्णय आदित्य ठाकरे घेतात, हे अनेक ज्येष्ठ नेत्यांना पटत नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि पक्षातील नेते, कार्यकर्ते, ह्यांच्यामध्ये दरी निर्माण झाली आहे. आता केवळ बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात दौरा  करायचा, हेदेखील उद्धव ठाकरे ह्यांना उशिरा सुचलेले शहाणपण आहे. ज्यांना सोडून जायचे आहे त्यांनी खुशाल जावे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. त्याचा परिणाम होत आहे.

उबाठा

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ठाकरेंनी फडणवीसांना दिलेले आव्हान. एक तो तू रहेगा नही तो मै…, असे जाहीर आव्हान ठाकरेंनी फडणवीसांना दिले होते.. त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. एकीकडे ठाकरेंनी हिंदुत्व सोडले, मुसलमानांची मतासाठी याचना करत आहेत, काँग्रेस, राष्ट्रवादी अशा हिंदुत्वविरोधी पक्षांशी युती केली, ह्या गोष्टी शिवसेनेतही अनेकांना पटल्या नाहीत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ईशान्य मुंबईतील जाहीर सभेमध्ये उद्धवजींनी २०१९ साली निवडणुकीनंतर भाजपने पाठीत खंजीर खुपसला, म्हणून नाइलाजाने मला मुख्यमंत्री व्हावे लागले असे विधान केले. सगळ्यांना माहीत आहे की, उद्धव ठाकरे ह्यांनी २०१९च्या निवडणुकीनंतर भाजपला पाठिंबा द्यायला नकार दिला आणि महाविकास आघाडीची स्थापना करून स्वत: मुख्यमंत्री झाले हे सर्वश्रूत आहे. तरीही उद्धव ठाकरेंनी असे विधान केले. त्यातच भाजपचे नेते अमित शाह ह्यांनी कोल्हापूर येथे सभेत बोलताना, शिंदे ह्यांचा आता गट नसून त्यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेना कार्यरत असल्याचे सांगून शिवसेना (उबाठा)ला खिजवले.

शिवसेनेच्या साठाव्या वर्धापनदिनानिमित्त दोन्ही शिवसेनेचे मेळावे झाले. उद्धव ठाकरे ह्यांच्या मेळाव्यावर नव्या पाक्ष्फुटीचे सावट होते, तर शिंदेंच्या मेळाव्यात विजयी जल्लोष होता. उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना भावनिक साद घालून स्वत: पक्षप्रमुख पदावरून पायउतार होण्याची तयारी दर्शविली. तर, शिंदे ह्यांनी यह तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है… म्हणत उद्धव ह्यांच्यावर टीका केली. मुळात शिवसैनिक भावनिक आहे. पण आता उद्धव ठाकरेंच्या ह्या भावनिक सादेला कसा प्रतिसाद देईल हे माहीत नाही. ह्याचे कारण बाळासाहेबांच्या पुण्याईवर किती दिवस टिकणार? पक्षासाठी स्वत: झटले पाहिजे, हा विचार उद्धव ह्यांच्या मनात येत नाही. कारण, पक्षवाढीसाठी, संघटना बांधण्यासाठी त्यांनी ना कधी मोर्चे, आंदोलने केली, ना पोलिसांच्या लाठ्या खाल्ल्या. ना तुरुंगवास भोगला. कित्येक सामान्य शिवसैनिकांनी, बाळासाहेबांच्या केवळ शब्दावर अनेक केसेस अंगावर घेतल्या. त्यामुळे सलग दोन पक्षफुटीनंतर उद्धव ह्यांच्यासमोर उरलेल्या खासदार, आमदार, नगरसेवकांना सांभाळण्याचे आव्हान आहे. कारण, जर उद्धव ह्यांनी स्वत:त काही बदल केले, महाराष्ट्रभर फिरले, शिवसैनिकांशी संपर्क वाढवला तरच पक्ष वाचू शकतो. नाहीतर आणखी फूट पडण्याचा धोका आहेच.

(लेखक वैजयंती कुलकर्णी आपटे ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आहेत.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

मुंढेंनी केला दूधसंकलनाच्या फुगवलेल्या आकड्यांचा पर्दाफाश!

तुकाराम मुंढे हे प्रशासकीय अधिकारी, प्रत्येक नेमणुकीनंतर कामाचा धडाका सुरू करतात. नुकतीच त्यांची अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून नेमणूक झाली. १९ मे २०२६ला त्यांची ही नेमणूक झाली आणि अजून महिनाही नाही झाला तर त्यांनी सगळीकडे धाडसत्र सुरू केले...

मुंबईकरांनो चला.. तुंबलेल्या पाण्यातून वाट काढायची वेळ येतेय!

येतोय-येतोय म्हणत अखेर मोसमी पाऊस तळकोकणात दाखल झाला आणि महाराष्ट्रात आनंदाचे वारे वाहू लागले. केरळमध्ये ह्या मान्सूनचे येणे लांबल्यामुळे महाराष्ट्रातही विलंब होतो की काय अशी भीती होती. पण अखेर पाऊस महाराष्ट्रात दाखल झाला. सगळ्या धरणातील पाण्याने तळ गाठला, मुंबईसारख्या शहरात...

कोणामुळे आली शिक्षण क्षेत्राला ओवाळून टाकण्याची वेळ?

दरवर्षी १० वी आणि १२वीच्या परीक्षांचे निकाल लागले की, पुढच्या शिक्षणासाठी वेगवेगळ्या प्रवेशपरीक्षांचा मोसम सुरू होतो. लाखो विद्यार्थी, शिक्षक आणि पालक ह्या प्रवेशपरीक्षांच्या गडबडीत असतात. यंदा ह्या परीक्षा गाजल्या त्या नीट परीक्षेच्या पेपरफुटीमुळे. ही पेपरफुटी एव्हढ्या मोठ्या प्रमाणावर झाली की, झालेली परीक्षा रद्द...
Skip to content