ऑपरेशन टायगर शिवसेनेच्या सहा फुटीर खासदारांच्या मतदारसंघाचा दौरा करून शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुंबईत परत आले, तर आल्याआल्याच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यानी त्यांना आणखी एक धक्का दिला. उबाठाचे नेते आणि आदित्य ठाकरे ह्यांचे विश्वासू सचिन अहिर ह्यानी पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ करत नुसता शिंदेंच्या सेनेत प्रवेश केला नाही तर थेट विधान परिषद उपसभापती निवडणुकीचा अर्ज महायुतीतर्फे भरला. ह्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. सचिन अहिर हे मुंबईच्या वरळी मतदारसंघातून तीन वेळा निवडून आले आहेत. मात्र नंतर आदित्य ठाकरे यांच्यासाठी त्यांनी निवडणूक लढवली नाही आणि आदित्य ह्यांना निवडून आणण्यासाठी खूप मेहनत घेतली. मात्र आता तेही शिंदेंच्या गळाला लागले आहेत. ह्यामुळे विधान परिषदेत उबाठा गटाचे फक्त 5 आमदार उरले आहेत. पक्षांतरबंदी कायद्याचा अहिर ह्याना त्रास होणार नाही, ह्याचीही काळजी शिंदे ह्यानी घेतली आहे. ह्या घडामोडीमुळे आदित्य ह्यांचा मतदारसंघ धोक्यात येणार की काय असे वाटू लागले आहे. कारण, 2019 मध्ये आदित्य ह्यांना तिकीट देताना तेथील आमदार सुनील शिंदे ह्यांचे तिकीट कापले होते. नंतर 2022मध्ये त्यांना विधान परिषदची उमेदवारी देण्यात आली. मात्र आता अहिर ह्यांच्या जाण्यानंतर आतातरी उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण करावे असा घरचा अहेर शिंदे ह्यांनी दिला आहे.
शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कालच बंडखोर खासदारांच्या मतदार संघाच्या दौर्यावरून मुंबईत परतले आहेत. प्रत्येक मतदारसंघात जाऊन फुटलेल्या खासदारांना बोल लावायचे, टीका करायची, कार्यकर्त्यांना त्यांच्याविरूद्ध उचकवायचे असा हा दौरा होता. खरेतर ह्या सहा खासदारांची हीच तर तक्रार होती, की उद्धव ठाकरे आम्हाला वेळ देत नाहीत, आमच्या मतदारसंघात येत नाहीत. मात्र आता खासदार फुटल्यानंतर ठाकरे ह्यांना हे उशिरा सुचलेले शहाणपणच म्हणावे लागेल. विशेष म्हणजे त्या-त्या मतदारसंघातील शिवसैनिकांशी संवाद साधण्यासाठीच हा दौरा आहे, असे त्यांनी जाहीर केले होते. प्रत्यक्षात मात्र तिथे जाऊन खासदार गेले तर गेले, ज्यांना जायचे आहे त्यांना जाऊ द्या, अशीही विधाने ठाकरे ह्यांनी केली. हीच पडत्या फळाची आज्ञा मानून, यवतमाळ येथे ठाकरे यांची सभा झाल्याबरोबर तेथील १५ पदाधिकार्यांनी आपापल्या पदाचे राजीनामे दिले. आता ते बहुधा शिंदेंच्या शिवसेनेचा मार्गावर आहेत.

शिर्डी येथील फुटीर खासदार भाऊसाहेब वाघचौरे ह्यांच्या मतदारसंघातल्या सभेत ठाकरे ह्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यांच्या पक्षाला बिन बापाचा पक्ष म्हणून हिणवले आणि शिंदेंच्या मदतीने भाजपा पक्षश्रेष्ठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांचे पंख कापत आहेत, असेही विधान ठाकरे ह्यांनी केले. मी आणि फडणवीस ह्यांच्यात तिसराच कुणीतरी मध्ये येऊन गोंधळ घालतोय, असेही ते म्हणाले. ह्याचा अर्थ काय? म्हणजे उद्धव ठाकरे यांना फडणवीस ह्यांच्याजवळ जायचे आहे? परवाच एकाच विमानात प्रवास करून ठाकरे आणि फडणवीस नागपूरला गेले, तेव्हा तर बोलायची चांगली संधी होती. मात्र, तेव्हा दोघात फक्त औपचारिक चर्चा झाली, अशी माहिती आहे. आधी स्वत:चा पक्ष वाचवण्याचा प्रयत्न ठाकरे ह्यांनी केला पाहिजे. पक्षाची, संघटनेची पुनर्बांधणी करायला पाहिजे. ते सोडून ठाकरे भाजपलाच अनाहूत सल्ला देत आहेत की, भाजपने पक्षाची पुनर्बांधणी करायला पाहिजे. आता ह्याला काय म्हणावे?
शिर्डी येथे बोलताना ठाकरे म्हणाले की, फडणवीस ह्यांनी पंतप्रधान व्हायला पाहिजे. एक मराठी माणूस पंतप्रधान व्हायला हवा. ते पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आहेत, म्हणून त्यांचे पंख भाजप पक्षश्रेष्ठी कापत आहेत. एक मराठी माणूस जर पंतप्रधान होणार असेल तर शिवसेनेचा त्यांना पूर्ण पाठिंबा असेल, अशी घोषणाच ठाकरे ह्यांनी केली. खरेतर ठाकरे ह्यांनी स्वत:च्या पक्षाकडे अधिक लक्ष द्यायला पाहिजे. इतर पक्षात काय चालले आहे ह्याची उठाठेव ते का करत आहेत? एक तर तू राहशील किंवा मी राहीन, असे फडणविसांना खुले आव्हान देणार्या उद्धव ठाकरेंना अचानक फडणविसांबद्दल एव्हढे प्रेम का उफाळून येते? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यांनी ठाकरे यांच्या ह्या वक्तव्याला पुतना मावशीचे प्रेम म्हटले आहे, तर भाजपाच्या चन्द्रशेखर बावनकुळे, प्रवीण दरेकर, शिवसेनेचे नरेश म्हस्के ह्यांनीही उद्धव ठाकरेंवर ह्यानिमित्ताने टीका केली आहे. आधी स्वत:चा पक्ष सांभाळा अशी ताकीदही दिली आहे.

खरेतर आता झालेल्या सहा खासदारांच्या पक्षफुटीनंतर, शिवसेनेचे (उबाठा) पक्षाचे आमदार आणि नगरसेवकही पक्ष सोडण्याच्या मनःस्थितीत आहेत, असे बोलले जात आहे. उद्धवजींनी आता त्यांच्याशी संवाद साधण्याची गरज आहे. त्यांच्या तक्रारी, मागण्या ह्याचा विचार करण्याची गरज आहे. मात्र ते आता फुटीर खासदारांच्या मतदारसंघात टोमणे मारत फिरत आहेत. शिवसेनेच्या साठाव्या वर्षी पक्षाची काय हालत झाली आहे, ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. एकीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शताब्दी चालू आहे. त्यांचे काम किती नियोजनबद्ध रीतीने चालू आहे, आणि आता साठीच्या उंबरठ्यावर शिवसेनेची तीन वेळा मोठ्या फुटीनंतर अक्षरश: शकले झाली आहेत. बाळासाहेब ठाकरे असल्यापासून सतत धरसोड वृत्ती… त्याचे हे फलित आहे. बाळासाहेबांनी तर महापौरपदाच्या निवडणुकीत अगदी मुस्लिम लीगशीही युती केली होती. आणीबाणीत इंदिरा गांधींना पाठिंबा दिला होता. भाजपशी युती बराच काळ टिकली. मात्र त्यांच्यानंतर उद्धव ठाकरेंनी भाजपची साथ सोडून मुख्यमंत्री होण्यासाठी काँग्रेसशी युती केली हा इतिहास आहे. म्हणूनच आताची त्यांची वक्तव्ये पुन्हा भाजपाच्या जवळ जाण्याचा प्रयत्नासाठी आहेत की त्यामागे इतर काही हेतू आहे, हे येणारा काळच दाखवेल.
(लेखक वैजयंती कुलकर्णी आपटे ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आहेत.)

