गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घातला आहे. संपूर्ण राज्यात अनेक भागात कुठे रेड अलर्ट, कुठे ऑरेंज तर कुठे यल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या महिन्यापासून पावसाची प्रतीक्षा होती. एल निनोमुळे यंदा पाऊस कमी बरसणार असे सगळे सांगत होते. मात्र आता उशिरा का होईना पावसाचे आगमन झाले. ते इतके रौद्र रूपात आहे की, पावसात भिजण्याचा आनंद, तो ओल्या मातीचा सुगंध, हिरवीगार झाडे, डोंगर, असे काहीच नाही. ह्या प्रचंड कोसळणार्या पावसामुळे झाडे उन्मळून पडणे, त्यामुळे अनेकजण मृत्यू पावणे, वाहनांचे नुकसान, रस्ते बंद, रेल्वे बंद, एकीकडे पूर येत आहेत, एकीकडे दरडी कोसळत आहेत, पाटण येथे तर डोंगर खचला आहे. कुठे घरे पडत आहेत, कुठे जमीन खचली आहे, कुठे शाळेच्या बसवर झाड पडते आहे, एक न अनेक घटना समोर येत आहेत. मुंबई – गोवा महामार्ग बंद आहे. सगळ्यात गंभीर घटना म्हणजे दोनच महिन्यांपूवी गाजावाजा करून उद्घाटन झालेला मुंबई-पुणे मार्गावरील मिसिंग लिंक रस्त्याच्या प्रवेशद्वारावरच दरड कोसळली. रायगड, पालघर जिल्ह्यात पावसाचे थैमान चालू आहे. वसई-विरार येथेही पावसाची बरसात चालू आहे. कोकणात अनेक नद्यांना पूर आले. अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा असे खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत आहेत. निसर्गाचे हे रौद्र रूप पाहता, प्रशासन असो, महापालिका असो, अनेक ठिकणाची जिल्हा मुख्यालये असोत, किती आणि कुठे पुरे पडणार. जरी त्यांचे कर्मचारी भर पावसात काम करत आहेत, एनडीआरएफची टीम कार्यरत आहे, तरीही पावसाच्या ह्या उधाणापुढे बचावकार्यात अडथळे येत आहेत.

अशा या परिस्थितही विरोधक राजकारण करत आहेत. महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, उबाठा सेनेचे प्रवक्ते संजय राऊत आणि राष्ट्रवादी (शप)च्या खासदार सुप्रिया सुळे ह्या त्यात आघाडीवर आहेत. सुळे ह्यांच्या मते फक्त मुंबई-पुणे प्रवासात अडथळे निर्माण झाले म्हणून त्या चिडल्या आहेत. कारण, रस्ता बंद, एक्स्प्रेस वे बंद, जुना मुंबई-पुणे रस्ता बंद, आणि राज्यात आणिबाणी लागू करण्याची मागणी त्यांनी केली आहे. अर्थात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांना लक्ष्य केले आहे. मात्र फडणवीस ह्यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला आहे. विशेषत: मिसिंग लिंकवरुन होणारे अनेक आरोप, ज्यामध्ये संजय राऊत ह्यांनी तोफ डागली होती. काम निकृष्ट दर्जाचे झाले, राज्याचे सात हजार कोटी वाया गेले. घाईघाईत उद्घाटन केले, वगैरे वगैरे. मात्र फडणवीस ह्यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. माझ्यावर टीका करा, पण महाराष्ट्राला बदनाम करु नका, असे त्यांनी विरोधकांना सुनावले. जगातला सगळ्यात मोठा बोगदा, कनेक्टिंग लिंक, हा एक अभियांत्रिकी चमत्कार आहे. वरुन दरड कोसळल्यामुळे बोगद्याच्या प्रवेशद्वाराजवळच पाण्याचा धबधबा सुरू झाला. १० टन मलबा बाहेर काढण्यासाठी ४०० कामगार भर पावसात अहोरात्र खपत होते आणि १८ तासानंतर ही कनेक्टिंग लिंक पुन्हा सुरू झाली. मात्र विरोधक, बिनबुडाचे आरोप करत आहेत, असे फडणवीस म्हणाले.

मिठी नदीचा गाळ ८० टक्के काढला होता. तसेच इतर नाले आणि नद्यांचाही गाळ काढला होता. मात्र दोन-तीन दिवसांत पूर्ण महिन्याभरचा पाऊस पडला. त्यामुळे मुंबईत सगळीकडे पायी तुंबले, असेही मुख्यमंत्री म्हणाले. खरेतर मुंबई महानगरचे मंत्री आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. ही सगळी रस्त्यांची बांधकामे त्यांच्याच खात्यातर्फे केली जातात. पावसाच्या आधीच जर रस्त्याचे खड्डे बुजवणे, दुरूस्ती करणे आवश्यक होते. रस्त्याचे काँक्रिटीकरण झाल्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही. मुंबई-ठाण्यासारख्या शहरात मोठ्या प्रमाणात बांधकामे चालू आहेत, त्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही. २६ जुलै २००५ रोजी असाच धुवाँधार पाऊस पडला होता आणि मुंबईचे जनजीवन विस्कळीत झाले होते. आता २० वर्षांनंतरही तीच परिस्थिती आहे. हे अतिशय संतापजनक आहे. मुंबई महापालिकेत गेली २५ वर्षे शिवसेनेचे राज्य होते. मात्र एव्हढ्या वर्षांत ह्या समस्येवर काहीही उपाययोजना झाली नाही. मिठी नदीचा गाळ काढण्याचे काम इतक्या वर्षांतही पूर्ण झाले नाही. दरवर्षी थोड्या पावसानेच मुंबई ठप्प होते. परळ, हिंदमाता, सायन, किंग्ज सर्कल, अंधेरी सब वे , मिलन सब वे, इथे पाणी तुंबतेच. इतक्या वर्षांत ह्या भागात काहीच उपाय करता येऊ नये? मे महिन्यात नालेसफाईची पाहणी करण्यासाठी महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी ह्यांनी स्वतंत्र दौरे केले. त्यात भाजपचे मुंबईचे अध्यक्ष अमित साटम, पालकमंत्री लोढा, अशीष शेलार ह्यांनीही दौरे केले. सगळ्यात गंभीर घटना म्हणजे भर पावसात रितू तावडे पाहणीवर असताना उघड्या मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. ह्या सगळ्या समस्येवर केवळ राजकारण्यांना वेठीशी धरण्यात अर्थ नाही. ह्या सगळ्या प्रकराला, अधिकारीही तितकेच जवाबदार आहेत. मुबई महापालिका गेली अनेक वर्षे भ्रष्टाचारामुळे बदनाम झाली आहे. तिथे पैसे घेतल्याशिवाय एकही काम होत नाही, अशी सामान्य माणसाची खंत आहे. इतके वर्षे शिवसेनेचे राज्य होते. पण आता जर मुंबईकरानी महायुतीला निवडून दिले आहे, तर मुंबईकरांना त्रास होणार नाही, त्यांचे जगणे सुरक्षित असेल, ही जवाबदारी आता महायुतीची, विशेषतः भाजपची आहे आणि मुंबईकर म्हणूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांच्याकडे आशेने बघतो आहे.
(लेखक वैजयंती कुलकर्णी आपटे ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

