Homeन्यूज अँड व्ह्यूजमहिलांची सुरक्षितता ही प्रत्येकाचीच...

महिलांची सुरक्षितता ही प्रत्येकाचीच जबाबदारी!

एकीकडे पाच राज्यांच्या निवडणुका, विधान परिषद निवडणुका, महाराष्ट्रदिनाचा उत्सव, आणि दुसरीकडे अल्पवयीन मुलींवर अत्याचार, एकामागोमाग एक अनेक प्रकरणे, गेल्या काही दिवसात उघडकीस येत आहेत. त्यामुळे वाटते की, ह्या महाराष्ट्रात चालले आहे तरी काय? मुली, महिला, अगदी वृद्धासुद्धा इथे सुरक्षित नाहीत असेच म्हणायला पाहिजे. आणि साठी बुद्धी नाठी, ह्या म्हणीप्रमाणे, ६०-६५ वयांचे, आजोबांच्या वयाचे पुरुष, अल्पवयीन, ३-४ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करत आहेत. नुसते अत्याचार करून थांबत नाहीत तर आपले कृत्य उघडकीस येऊ नये म्हणून, अशा मुलींची अत्यंत निर्घृणपणे हत्त्याही करत आहेत.

पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. उन्हाळ्याच्या सुट्टीत आजोळी राहयला आलेल्या लहानग्या ४ वर्षांच्या मुलीवर भीमराव कांबळे, ह्या ६५वर्षांच्या नराधमाने तिला गोठ्यात नेऊन अत्याचार केले, आणि दगडाने ठेचून तिची हत्त्या केली. महाळुंगे येथे एका अल्पवयीन मुलानेच एका लहानग्यावर अत्याचार केले आणि नंतर त्याला मारून टाकले. पुण्यातील पर्वती विभागात एका ९ वर्षांच्या मुलीवर असाच आजोबांनी लैंगिक अत्याचार केला. तर पालघर जिल्ह्यातील कासा येथे एका आदिवासी मुलीवर भोंदू बाबाने लैंगिक अत्याचार केले. अशाचप्रकारे बीड जिल्ह्यात अत्याचार, जालना येथे तरुणीचे जबरदस्तीने धर्मांतर करण्यासाठी अत्याचार, अहिल्यानगर येथे एका अंगणवाडीसेविकेवर गुंगीचे औषध देऊन अत्याचार, एका शिकवणी शिक्षकाने विद्यार्थिनीचा विनयभंग केला, तर एका विवाहितेला हुंड्याची रक्कम दिली नाही म्हणून कुटुंबियांनीच तिला आत्महत्त्या करण्यास भाग पाडले. पुणे जिल्ह्यातील ठेऊर येथे अल्पवयीन मुलीवर शेजार्‍याने लैंगिक अत्याचार केले. तर गणेशपेठ येथे आणखी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली. जळगाव येथेही अल्पवयीन मुलीला शिकार करण्यात आले. तर कोल्हापूर येथे शरमेने मान खाली जाईल अशी घटना घडली. मुलीचे वडील, मामा आणि अल्पवयीन मामेभाऊ गेली पाच वर्षे, त्या मुलीचा शारीरिक छळ करत होते. नवी मुंबईतील एका शाळेत सुरक्षारक्षकानेच तीन अल्पवयीन मुलींचा विनयभंग केला. त्यात भरीस भर म्हणून वडिलांनीच मुलीची हत्त्या केल्याची दोन प्रकरणे समोर आली आहेत. एकाने पत्नी सोडून गेली म्हणून चिडून दोन्ही मुलांना मारण्याचा प्रयत्न केला, त्यात मुलीचा मृत्यू झाला आणि मुलाची प्रकृती  गंभीर आहे. दुसर्‍या घटनेत मुलीला परीक्षेत कमी मार्क मिळाले म्हणून तिची हत्त्या करण्यात आली.

अशा असंख्य घटना सध्या महाराष्ट्रात घडत आहेत. एकूणच महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. म्हणजे मुलींना कुठे एकटे पाठवण्याची सोयच राहिलेली नाही. न खेळायला, न शाळेत, न शिकवणीला. नसरापूर येथील आरोपीला ह्याआधीही अशाचप्रकारच्या गुन्ह्यासाठी दोनदा अटक झाली होती. पण त्याला जामीनावर सोडण्यात आले. ह्या घटनांमुळे नागरिकांचा संताप होणे स्वाभाविक आहे आणि अशा नराधमाला कठोरात कठोर शिक्षा होणे, ह्या मागणीसाठी नागरिक रस्त्यावर उतरले हेही स्वाभाविकच आहे. मग राज्यात विविध ठिकाणी रास्ता रोको, निदर्शने, मोर्चे अशी आंदोलने सुरू झाली. पुण्यातील नवले पूल, सातारा हायवे तासनतास अडवण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की, नसरापूर हत्त्या प्रकरणातील

महिला

आरोपीला लवकरात लवकर मृत्त्युदंड व्हावा अशी मागणी करू, त्यासाठी जलद न्याय मिळण्यासाठी फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालविला जाईल. पण आतापर्यंतचा अनुभव असा आहे की, काही जलद न्याय वगैरे मिळत नाही. गेल्याच वर्षी बदलापूर येतील एका शाळेत असाच अल्पयीन मुलीवर बलात्कार झाला होता. आरोपी अक्षय शिंदे ह्याला पोलिसांनी एनकाऊंटर करून ठार मारले. तसाच न्याय ह्या केसेसमध्ये करावा, अशी मागणी होत आहे. देशभरात निर्भया केस गाजली. दिल्लीत एका चालत्या बसमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिला जखमी अवस्थेत रस्त्यावर फेकून दिले होते. अखेर ती जगली नाहीच. पण तिच्यावर बलात्कार करणार्‍या तीन नराधमांना २०१२मध्ये  फाशीची शिक्षा फास्ट ट्रॅक कोर्टाने सुनावली होती. मात्र प्रत्यक्षात फाशी दिली गेली २०२० मध्ये. आज देशात ५२२ कैदी फाशीच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र २०२०नंतर कुणालाही फाशी देण्यात आलेली नाही.

अशा घटनांचे लगेच राजकीय भांडवल करण्यात अनेक पक्षांचे नेते सरसावले आहेत. पीडित मुलीच्या कुटुंबाला भेटायचे, फोटो काढायचे, ते सोशल मीडियावर टाकायचे. लगेच सुप्रिया सुळे, रोहित पवार हे नेते पत्रकार परिषदा घेऊन सरकारवर टीका करायला पुढे आले. सुषमा अंधारे, राज ठाकरे हेही सरसावले. मात्र पीडितेच्या वडिलांनीच आमच्या कुटुंबीयांना कुणीही राजकीय पुढाऱ्यांनी येऊ नये असे सांगितल्याने, हे पुढारी तिथेच थांबले. शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत ह्यांनी ह्या सगळ्या प्रकरणांचे खापर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांच्यावर फोडले आहे आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. काँग्रेसच्या वर्षा गायकवाड ह्यांनीही फडणवीस ह्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मात्र महाविकास आघाडीचे सरकार असताना २०१९ ते २०२२ ह्या काळात महाराष्ट्रात नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोच्या नोंदीनुसार २०१९मध्ये २२९९, २०२०मध्ये २०६१, २०२१मध्ये २४९६ आणि २०२२मध्ये ३९७० केसेस महिलांवरील बलात्काराच्या होत्या, त्याचे काय? मग उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला का?

सध्या वयोवृद्ध व्यक्ती अल्पवयीन मुलींवर अत्याचार करत आहेत. वाढता एकटेपणा आणि इंटरनेटवर अश्लील व्हिडिओ पाहण्याचे व्यसन हे कारण दिले जात आहे. म्हणून त्यांची निर्घृण कृत्ये समर्थनीय होत नाहीत. ह्याकडे एक सामाजिक प्रश्न म्हणून बघितले गेले पाहिजे. अशा घटना घडल्यानंतर आपले मूल सुरक्षित आहे का, असा प्रश्न जनसामान्यांना पडणे स्वाभाविक आहे. पण अशा मानसिक विकृतीला पोलिस आणि कायदा तरी काय करणार? कारण, अशा घटना, त्या घडून गेल्यावरच उघडकीस येतात. मग पोलिस तपास, चौकशा सुरू होतात, गुन्हेगार पकडलाही जातो, पण ती घटना तर आधीच घडून गेलेली असते ना. त्यामुळे समाजात वावरताना सजगपणे, जागरूकपणे वावरण्याची गरज आहे. आपल्याला जर अशा एखाद्या घटनेचा संशय जरी आला तरी लगेच ते थांबवण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. नाहीतर मला काय त्याचे असे म्हणून, दुर्लक्ष केले तर मग सगळेच कठीण आहे.

(लेखक वैजयंती कुलकर्णी आपटे ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

किती काळ टिकणार प्रताप सरनाईकांचा ‘मराठी’ बाणा?

अखेर महाराष्ट्र दिनापासून महाराष्ट्रातील रिक्शा-टॅक्सी चालकांना मराठी बोलण्याची सक्ती करण्याचा महाराष्ट्र शासनाचा निर्णय पुढे ढकलण्यात आला. आणि हे अपेक्षितच होते. १ मेपासून राज्यातील सर्व रिक्शा आणि टॅक्सीचालकाना मराठी बोलता येणे आवश्यक होते, अन्यथा त्यांचे परवाने रद्द करण्याचा आदेश राज्याचे परिवहनमंत्री...

महाराष्ट्रातल्या महिला अत्याचारांची राष्ट्रीय पातळीवर दखल

मुंबईसह महाराष्ट्रात लव्ह जिहादची एव्हढी प्रकरणे बाहेर येत आहेत. भोंदू अशोक खरात आणि त्याच्या महिलांवरच्या अत्याचाराच्या, शोषणाच्या, फसवणुकीच्या कथा गेला महिनाभर बाहेर येत आहेत, त्याच्या व्हिडिओ क्लिपही व्हायरल झाल्या आहेत. नाशिकमधील टीसीएस, ह्या नामवंत कंपनीतील कॉर्पोरेट जिहादचे प्रकरण गाजते...

खरात ते कॉर्पोरेट जिहाद! पवित्र भूमीत चालले तरी काय?

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातल्या महिलांच्या लैंगिक शोषण आणि अत्याचाराच्या अनेक घटना समोर येत आहेत. नाशिकच्या पवित्र भूमीत गेल्या महिन्यापासून भोंदू बाबा अशोक खरातचे कारनामे, महिलांची फसवणूक आणि लैंगिक शोषणाच्या कथा समोर येत आहेत. त्याचे अनेक व्हिडिओ व्हायरलही झाले आहेत....
Skip to content