गेली चार वर्षे शिवसैनिकांचा, शिवसेनेच्या सर्व नेत्यांचा, उद्धव ठाकरेंसह एकनाथ शिंदेंचाही जीव खरोखरीच टांगणीला लागलेला आहे. 20 जून 2022, या तारखेपासून सुरु झालेल्या राजकीय घडामोडींचा अखेर आता जवळ येत आहे. पुढच्या सप्ताहात सर्वोच्च न्यायालयात शिवसेना आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण तसेच शिवसेना नाव, पक्षाचे धनुष्यबाण हे निवडणूकचिन्ह याबाबतच्या विविध याचिकांची सुनावणी संपेल आणि नंतर पुढच्या काही काळात या प्रकरणाचा निर्णय लागेल. देशाचे सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या नेतृत्त्वातील न्या. जॉयमाल्या बागची आणि न्या. व्ही मोहना यांचे खंडपीठ सुनावणी पूर्ण करण्याच्या टप्प्यावर आले आहे. एकदा का सुनावणी संपली की, त्यानंतर पुढच्या एखाददोन सप्ताहात या त्रिसदस्यीय पीठाचा निर्णय येईल. देशात सर्वच राजकीय पक्ष या खटल्यांकडे उत्सुकतेने पाहत आहेत. पक्षफुटीचा निराळाचा मार्ग शिंदेंनी तयार केलेला आहे. तो वैध आहे की नाही, यावरचा हा निकाल असेल.
“आम्ही पक्ष फोडलेला वा सोडलेलाच नाही, तर आम्ही म्हणजेच मूळ व खरा पक्ष आहोत”, हीच एकनाथ शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांची भूमिका आहे व ती त्यांनी ठामपणाने मांडलेली आहे. देशाच्या निवडणूक आयोगाने मे 2023मध्येच शिंदेंकडे पक्षाचे नाव व चिन्ह सोपवले आणि त्याला सर्वोच्च न्यायालयाने तेव्हा स्थगिती दिलेली नव्हती. खरेतर सर्वोच्च न्यायालयाने आजवर निवडणूक आयोगाचे निर्णय थेट फिरवलेलेच नाहीत. पक्ष खरा कोणाचा आहे, पक्षाचे नाव व चिन्ह काय असावे, वगैरे बाबी ठरवणारी, घटनेने निर्माण केलेली निवडणूक आयोग हीच स्वायत्त व स्वतंत्र यंत्रणा आहे, हेच मत सर्वोच्च न्यायालयाने आजवर विविध प्रकरणात दिलेले आहे. सध्याच्या ठाकरे व शिंदेंच्या न्यायालयीन भांडणातही आधीच्या टप्प्यांवर असेच मत न्यायालयाने व्यक्त केले आहे. सहाजिकच ते आयोगाचे निर्णय थेट उलटापालटा करतील, अशी शक्यता दिसत नाही, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. फारतर न्यायालय आयोगाला असा आदेश देऊ शकेल की, शिवसेना नाव व पक्षचिन्ह गोठवण्याचा विचार करा. तसे झाले तर तो शिंदेंचा तोटा असेलच, पण ठाकरेंचाही काही तो लाभ असणार नाही.

2024च्या विधानसभा निवडणुकीचे निकाल ध्यानी घेतले तर जनतेच्या न्यायालयात शिंदे म्हणजेच शिवसेना यावर शिक्कामोर्तब झालेही आहे. आता सर्वोच्च न्यायालय त्यावर मोहोर उठवते की शिंदेंकडून नाव व पक्षचिन्ह काढून घेण्याची प्रक्रिया सुरू करते हाच निकालातील कळीचा मुद्दा ठरणार आहे. शिवसेना पक्षफुटीबाबत 2022पासून विविध याचिका झाल्या. पहिल्या डझनभर याचिका ठाकरेंच्या सरकारचे विश्वासमत आणि शिंदे सरकारची स्थापना, विधानसभेचे अधिवेशन, नव्या विधानसभा अध्यक्षांची निवड अशा बाबतीत झाल्या होत्या. तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी या घटनाक्रमात जे जे निर्णय दिले त्या साऱ्यांना ठाकरेंनी थेट सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. 2022पासून विविध टप्प्यांवर अशा डझन – दीड डझन याचिकांच्या सुनावण्या सुरू होत्या. त्यात अनेकवेळा टिप्पण्या झाल्या. पण अंतिम निर्णय आले नाहीत. या कालावधीत देशाने तीन सरन्यायाधीश आलेले पहिले. न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. संजीव खन्ना व आताचे न्या. सूर्य कांत या सर्व सरन्यायाधीशांच्या कालावधीत विविध प्रकरणे सर्वोच्च न्यायालयाच्या विविध पीठांपुढे आली. चालली. चर्चा झडल्या. पण निकाल लांबतच गेला. तारीख पे तारीख, हा खेळ सुरू होता.
गेल्या सहा महिन्यांत यात गती आली. विद्यमान सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी तर सप्टेंबरपासून हे प्रकरण दैनंदिन सुनावणीसाठी हाती घेतले आहे. सर्वोच्च न्यायालयात सातत्यपूर्ण सुनावणीही प्रत्येक सप्ताहात मंगळवार ते गुरुवार, अशी तीन दिवसच होऊ शकते. त्यात दिवाळी, गणपती, दूर्गापूजा वगैरे सुट्ट्या आल्या. आता मात्र गेल्या सप्ताहात सरन्यायाधीशांनी शिंदेंच्या वकिलांना सांगितले की, आता तुमचे मुद्दे संपवा, आम्हाला सुनावणी संपवायची आहे. तरीही पुढचे कामकाजाचे पाच-सहा दिवस ही सुनावणी सुरु राहण्याची शक्यता आहे. मंगळवार, दि. 24पासून पुढे काही काळ सुनावणी होईल व संपेल असे दिसते. या खटल्याचे वैशिष्ट्य असे की, सर्वोच्च न्यायालयातील सर्वच मोठे नामवंत दादा वकील या दोन्ही, तिन्ही बाजूंनी भांडत आहेत. उद्धव ठाकरेंची बाजू मांडण्यासाठी कपिल सिब्बल, देवदास कामत, अभिषेक मनु संघवी उभे आहेत. एकनाथ शिंदेंकडून धृव मेहता, नीरज कुमार कौल, मनिंदर सिंग असे तगडे वकील भांडत आहेत. यात तिसरी बाजू आहे ती राज्याच्या विधानसभा अध्यक्षांची. 2024च्या आधीचे व नंतरचेही अध्यक्ष एकच आहेत राहुल नार्वेकर. त्यांच्यावतीने या खटल्यात अर्थातच भारताचे सॉलिसीटर जनरल तुषार मेहता बाजू मांडत आहेत.

महेश जेठमलानी व निरज किशन कौल यांनीही प्रकरणातील सुरूवातीच्या काही तारखांना अध्यक्षांच्यावतीने युक्तीवाद केला आहे. यातील प्रत्येक वकिलाची फी प्रत्येक तारखेला किमान पाच लाख रुपयांपासून ते पंधरा वा पंचवीस लाख रुपयांपर्यंत सहजच आहे. म्हणजेच ठाकरेंची सेना, शिंदेंची सेना व विधानसभा यांनी वकिलांवर केलेला खर्च आजवर चाळीस-पन्नास कोटी रुपयांच्या घरात सहजच गेला असेल. हे खटले विविध याचिकांवरील अल्प सुनावण्या तसेच अलिकडच्या काळातली सलग सुनावण्या यातून तीस-चाळीस दिवस सहजच चालेल. शिवाय विधानसभेचे अध्यक्ष नार्वेकर यंनी 2023 अखेरकडे तसेच 2024मध्ये सलग वीस दिवस घेतलेल्या सुनावण्यातही हेच सारे ज्येष्ठ वकील भांडले आहेत. या खटल्यांतील आजवर काही महत्त्वाच्या टिप्पण्या न्यायाधीशांनी केलेल्या आहेत. सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या पाच सदस्य घटनापीठापुढे 2023मध्ये सुभाष देसाई विरुद्ध विधानसभा प्रधान सचिव, या केसमध्ये नऊ दिवस सुनावण्या झाल्या व 11 मे 2023ला सरन्यायाधीशांच्या घटनापीठाने निकाल दिला. उद्धव ठाकरेंना राज्यपाल कोश्यारींनी विधानसभेत विश्वासमत घेण्याच्या आदेशाविरुद्ध हा खटला होता. त्यातील सरन्यायधीशांची टिप्पणी महत्त्वाची ठरली. चंद्रचूड साहेब म्हणाले की, जरी राज्यपालांचा विश्वासमत घेण्याचा निर्णय कायद्याला धरून नाही, असे म्हटले तरी ठाकरेंनी स्वतःहून विश्वासमत आजमावण्यापूर्वीच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलेला असल्यामुळे त्यांचे सरकार आम्हाला पुनः स्थापितच करता येणार नाही. अलिकडेही सरन्यायाधीश सूर्य कांत व न्या. बागची यांनी सुनावणीदरम्यान टिप्पणी केली होती की, खरेतर निवडणूक आयोगाने ठाकरे व शिंदे दोन्ही गटांना बाळासाहेबांचे नाव व चिन्ह न घेता निवडणूक लढवा असे सांगायला हवे होते. पुढच्या काही दिवसांतच या सर्व प्रकरणांचा निकाल लागणे अपेक्षित आहे. मात्र तसा तो लागला नाही तर प्रकरण पुन्हा मूळपदावर जाईल, कारण पुढच्या वर्षाच्या सुरूवातीच्या दुसऱ्या महिन्यात सरन्यायाधीश निवृत्त होतील. मुळात जिथे पक्षावर बंदी वगैरे झाली ती 2022ची विधानसभा आता निवडणुकीनंतर संपून गेलेली आहे. 2024मध्ये निवडणुका पार पडल्यानंतर शिंदे वगैरे सेनेचे सारे आमदार नव्याने निवडून आलेले आहेत. त्यांच्या आधीच्या टर्ममधील आमदारक्या रद्द होणे हे व्यवहार्यतः अशक्य आहे. म्हणजेच सर्वोच्च न्यायालयातील सध्याचे प्रकरण केवळ अकॅडेमिक पातळीवरचे मंथन ठरेल. पण, अर्थातच भविष्यासाठी त्यातून काही पायंडे, मार्गदर्शक तत्त्वे मात्र नक्कीच ठरवली जातील.
(लेखक अनिकेत जोशी ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आहेत.)

