Homeब्लॅक अँड व्हाईटयंग भारत सेवा...

यंग भारत सेवा मंडळाची अमृतमहोत्सवी वाटचाल

मुंबईतल्या प्रभादेवी येथील यंग भारत सेवा मंडळाने नुकतेच ७५व्या वर्षात पदार्पण केले आहे. त्यानिमित्ताने या मंडळाने प्रभादेवी येथील राजाभाऊ साळवी क्रीडा नगरीत भिकाजी भारती मैदानात आजपासून २७ नोव्हेंबर, या काळात कुमार गटाच्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले आहे. आपला अमृत महोत्सव साजरा करणाऱ्या या मंडळाच्या वाटचालीचा थोडक्यात आढावा.

गेल्या दशकात प्रभादेवी येथील स्वामी समर्थ, यंग भारत सेवा मंडळ, सूर्योदय, सिद्धेश्वर, प्रताप क्रीडा मंडळ यांनी आपल्या दमदार कामगिरीचा ठसा उमटवला. पण यामध्ये सुरूवातीला हुतूतू आणि नंतर कबड्डी खेळात मात्र‌ यंग भारत सेवा मंडळाने आपला जबरदस्त दरारा निर्माण करुन‌ या खेळातील एक अव्वल संघ म्हणून मोठा नावलौकिक मिळवला. गल्लीपासून दिल्लीपर्यंत विविध स्पर्धांत खेळणाऱ्या मंडळाने मग तब्बल ७०पेक्षा जास्त कबड्डी स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला. त्यावेळी मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे वेगळे जिल्हे नव्हते. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी खेळण्याची संधी त्यांना मिळायची. वरळी, नायगाव, घाटकोपर येथे झालेल्या कबड्डी स्पर्धांत एकाच दिवशी तीन ठिकाणी अंतिम फेरीत प्रवेश करुन या तीनही स्पर्धांत जेतेपद मिळवण्याचा आगळा विक्रम यंग भारतच्या नावावर आहे. काही वर्षे तर यंग भारत सेवा मंडळ आणि विजेतेपद असे समीकरणच होऊन गेले होते. मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या “अ” श्रेणीत बरीच वर्षे असलेल्या या मंडळाने सातत्याने अनेक वर्षं सलग तीन स्पर्धा जिंकून “हॅटट्रिक” साधण्याचादेखील पराक्रम बऱ्याचवेळा करुन‌ दाखवला. पुढेपुढे तर असे झाले की, जिंकलेले चषक ठेवायचे कुठे असा पेच मंडळासमोर निर्माण झाला.

मुंबई सेंट्रल येथील महात्मा स्पोर्टसने आयोजित केलेल्या कबड्डी स्पर्धेत या मंडळाचा संघ उपांत्य फेरीपर्यंत अवघ्या पाच खेळाडूंनीशी खेळला. नंतर उपांत्य आणि अंतिम फेरीत त्यांचा पूर्ण संघ मैदानात उतरला आणि विशेष म्हणजे या स्पर्धेत या मंडळाने चक्क विजेतेपदाचा मान मिळवला. तेव्हा बोनस रेषा नव्हती. त्यामुळे कसेही करुन सामन्याच्या सुरूवातीलाच दोन-तीन गुणांची आघाडी घ्यायची. मग भक्कम बचाव करायचा. नंतर प्रतिस्पर्धी संघ गुण मिळवण्यासाठी झटापट करणार तेव्हा त्यांच्या खेळाडूंच्या पकडी करुन आपली गुणसंख्या वाढवत ठेवायची ही रणनीती या मंडळाने अनेक वर्षं अंमलात आणून प्रतिस्पर्धी संघावर आपले वर्चस्व गाजवले. सांगलीच्या तरुण भारत मंडळाच्या अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेत या मंडळाला सुरूवातीला प्रवेश दिला नाही. प्रवेश दिल्यानंतर पहिल्याच वर्षी ही स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम त्यांनी करुन दाखवला. विशेष म्हणजे तेव्हा या मंडळाने अंतिम फेरीत पुण्याच्या बलाढ्य महाराणा प्रताप संघाला नमवून त्यांचे “हॅटट्रिक”चे स्वप्न धुळीस मिळवले.

१९५२ साली यंग भारत सेवा मंडळाची स्थापना करण्यात आली. खेळ, सामाजिक सुधारणा, वाचनालय या माध्यमातून या मंडळाने आपल्या वाटचालीला सुरूवात केली. पण खऱ्या अर्थाने ते नावारुपाला आले ते हुतूतू, कबड्डी या खेळातील मोठ्या योगदानामुळे. भिकाजी भारती, सखाराम कांबळी, सूर्यकांत बिडू हे मंडळाचे सर्व संस्थापक मैदानी खेळाचे प्रेमी तसेच खेळाडूदेखील होते. त्यामुळे मंडळाची हुतूतूपासून‌ सुरू झालेली क्रीडा चळवळ कबड्डी, खोखो, शरीरसौष्ठव अशी पुढे फोफावली. या खेळाबरोबरच गोविंदा पथक, लेझीम पथक, दानपट्टा, व्यायाम यामध्येदेखील‌ मंडळाची जोमाने वाटचाल सुरु झाली. पुढे मग सामाजिक क्षेत्रात मंडळाने आपले कामकाज सुरु केले. बालवाडी, व्यायामशाळा, वाचनालय हे उपक्रमदेखील मंडळाने हाती घेतले. त्यानंतर रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरे, तरुणांसाठी करिअर, व्यवसाय मार्गदर्शन शिबिरे घेण्यास सुरुवात केली. शिवसेनेचे पहिले नगरसेवक राजाभाऊ साळवी यांच्या पुढाकाराने बोटावाला चाळीत, नागू सयाजी चाळीचे मालक बोटवाला यांच्याकडून मंडळाला स्वतःची हक्काची जागा मिळाली. मग याच जागेत मंडळाचा संसार सुरु झाला. येथेच मंडळाला व्यायामशाळा, वाचनालय सुरु करता आले.

१९७० ते १९९० दरम्यान दोन दशके कबड्डी खेळात मंडळाने आपला दरारा निर्माण केला तो भिकाजी भारती, सूर्यकांत बिडू, सखाराम कांबळी, विनायक लाड, चंद्रकांत भारती, ज्ञानेश्वर खैरे, अशोक वालावलकर, सूर्यकांत भारती, बाळ ‌ राणे, शशिकांत खताते, राजेंद्र कवळे, सतीश नलावडे, सुरेश देसाई, रणजीत भाटकर, रवींद्र करमळकर या दिग्गज खेळाडूंच्या जबरदस्त खेळाच्या जोरावर. भिकाजी, चंद्रकांत, सूर्यकांत हे तिघे भारती बंधू मंडळाच्या कबड्डी संघाचे भक्कम आधारस्तंभ होते. मंडळाच्या विनायक लाड, चंद्रकांत भारती, रवींद्र करमळकर, सुरेंद्र येरुळकर यांनी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. रवींद्र करमळकरला या खेळात दिलेल्या योगदानाबदल महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कारदेखील मिळाला. कबड्डी खेळातील शानदार कामगिरीमुळे तेव्हा मंडळाच्या बऱ्याच खेळाडूंना बँक,पोलीस, एअर इंडिया, महिंद्र, आरसीएफ, इंशुरन्स कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळाल्या आणि त्यांचे संसार चांगल्या पद्धतीने उभे राहिले. मंडळाच्या सुसज्ज व्यायामशाळेत सध्या दोनशेपेक्षा जास्त तरुण सराव करतात. १९६८ साली व्यायामशाळा सुरु झाली तेव्हा दोन रुपये फी होती. आज हीच फी दोनशे रुपये आहे.

१९७१पासून‌ युवा शरीरसौष्ठवपटूंसाठी नियमित अंतर्गत शरीरसौष्ठव स्पर्धा दरवर्षी घेण्यात येते. मिलींद राणे, प्रशांत माळकर, सतीश काटकर, अशोक कासार, निखिल चाळके हे मंडळाचे शरीरसौष्ठवपटू पुढे विविध स्पर्धांत चमकले. मंडळाच्या सांस्कृतिक विभागाने देशाच्या विविध भागात कार्यक्रमाचे सादरीकरण करुन आपल्या अष्टपैलूत्वाचीदेखील चमक दाखवली. गोविंदा, कबड्डी स्पर्धा, व्यायामशाळा, सांस्कृतिक कार्यक्रम यातून मिळणाऱ्या रक्कमेतून मंडळ आपला आर्थिक खर्च भागवते. वेळप्रसंगी मंडळाचे पदाधिकारी आपल्या खिशातून खर्च करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. मंडळाची व्यायामशाळा सुरु झाली तेव्हा सुरूवातीला जो खर्च झाला तो पदाधिकारीवर्गाने आपल्या खिशातुन केला. मग मंडळाची आर्थिक स्थिती सुधारल्यावर त्यांचे पैसे परत करण्यात आले. शिवसेनेचे पहिले नगरसेवक राजाभाऊ साळवी, माजी आमदार भाऊराव पाटील, माजी आमदार सदा सरवणकर, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, विद्यमान आमदार सुनील शिंदे, महेश सावंत, नगरसेवक निशिकांत शिंदे, समाधान सरवणकर यांचेही मोलाचे सहकार्य मंडळाला मिळाले.

२०२२मध्ये‌ मंडळाचे बुजूर्ग कबड्डीपटू विनायक लाड यांचा महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनने ज्येष्ठ खेळाडू म्हणुन सन्मान केला होता. त्याचवेळी मंडळाचे कबड्डी संघटक सुधीर खानोलकर यांनादेखील कृतज्ञता पुरस्काराने गौरविले होते. २०२३ च्या मंडळाच्या एका कौटुंबिक सोहळ्यात माजी अध्यक्ष सध्या विश्वस्त असलेल्या रघुनाथ नाईक यांना पहिल्या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले. २००९मध्ये मंडळाने भव्य क्रीडा महोत्सव घेतला होता. त्यामध्ये १० खेळांचा समावेश होता. त्याअगोदर मंडळाने पहिल्यांदा पुरुष गटाची राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा आयोजित केली होती. प्रभादेवी सार्वजनिक गणेशोत्सवात मंडळाच्या कार्यकत्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असायचा. सध्या मंडळाचा संघ “ब” गटात खेळतो. भावी काळात अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा आयोजित करण्याचा मंडळाचा मानस आहे. विविध उपक्रम राबवून आजच्या युवा पिढीला मैदानाकडे आणण्यासाठी मंडळ प्रयत्नशील आहे. त्यादृष्टीने मंडळाने युवा कार्यकर्त्यांना कार्यकारिणीत स्थान दिले आहे. मंडळाची वाटचाल यापुढेदेखील अशीच जोमाने सुरू राहील अशी आशा आहे.

यंग भारत सेवा मंडळाची विद्यमान कार्यकारिणी- अध्यक्ष: राजेंद्र कदम, उपाध्यक्ष: दिनेश रेडकर, मिलिंद राणे, गंगाधर मुणनकर, कार्याध्यक्ष: अजित राणे, उपकार्याध्यक्ष: मिलिंद भारती, प्रमुख कार्यवाह: शंकर (संदीप) पाटकर, सहचिटणीसः किरण बिडू, रविंद्र पाष्टे, विनोद तावडे, कोषाध्यक्ष: नितेश राऊत, उपकोषाध्यक्षः समीर सावंत, सदस्य: सतीश काटकर, प्रशांत माळकर, दिनेश चौगुले, प्रभात भारती, विजय पोलेकर, अनिल तावडे, गणेश रहाटे, प्रमिला सावंत, ममता राणे, विश्वस्त: रघुनाथ नाईक, विनायक लाड, प्रभाकर पोलेकर, प्रकाश बिडू, चंद्रकांत भारती, सुधीर खानोलकर, अशोक कवळे.

(लेखक सुहास जोशी ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आणि समीक्षक आहेत.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

भारतीय हॉकीच्या सध्याच्या दशेला जबाबदार कोण?

विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघाची पदकाची पाटी पुन्हा एकदा कोरीच राहिली. १९७५ साली अजितपाल सिंग यांच्या नेतृत्त्वाखाली भारताने मलेशियात झालेली ही स्पर्धा जिंकली होती. तेव्हा निर्णायक सामन्यात भारताने पाकिस्तानवर २-१ गोलांनी निसटता विजय मिळवला होता. त्यानंतर आता‌पर्यंत...

त्रिसा-गायत्रीनेच केली त्यातल्यात्यात चांगली कामगिरी‌!

नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये नुकत्याच संपन्न झालेल्या विश्व बॅडमिंटन स्पर्धेत यजमान भारतीय खेळाडूंची कामगिरी काहीशी निराशाजनक झाल्यामुळे लाखो भारतीय चाहत्यांची मात्र‌ निराशा झाली. भारताचे दिग्गज खेळाडू या स्पर्धेत फारशी चमकदार कामगिरी‌ करु शकले नाहीत. महिला दुहेरीत...

मॅटमुळे रया गेली कबड्डीची! कांदळगावकरांची खंत!!

महाराष्ट राज्य कबड्डी असोसिएशनने नुकताच सन‌ २०२५-२६चा श्रमजीवी स्व. रमेश देवाडीकर कबड्डी कार्यकर्ता हा मानाचा पुरस्कार ६७ वर्षीय दीपक कांदळगावकर यांना देऊन कबड्डी खेळातील एका सच्च्या सेवकाचा उचित गौरव केला आहे. जवळजवळ ‌५ दशके दीपक सरांनी या खेळाची निस्पृहपणे...
Skip to content