ठाणे शहरातील उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे विभाग प्रमुख प्रदीप तथा बाळू पूर्णेकर यांच्या निर्घृण हत्त्येस एक महिना उलटून गेल्यानंतरही सूत्रधार मिळत नसल्याने ठाण्यात गेल्या काही दिवसांपासून राजकीय नाटक रंगत आहे, असे म्हटले तर वावगे होणार नाही. राजकीय नाटक, या शब्दाने हत्त्येचे गांभीर्य कमी करण्याचा आमचा अजिबात हेतू नाही. परंतु सर्व संबंधितांनी डोकं शांत ठेवून विचार केल्यास आम्ही म्हणतो ते पटण्याची शक्यता आहे. आंदोलनकर्त्या दोन्ही बाजूस आठवण करून द्यावीशी वाटते की, बाळू यांच्या हत्त्येच्या आदल्याच दिवशी चितळसर पोलीसठाण्याचे उपनिरीक्षक देशमुख यांची एका दाखलेबाज गुंडाने सुभाष नगरपरिसरात भररस्त्यात डोक्यात दगड घालून हत्त्या केली. या घटनेशी राजकीय नेत्यांचे जणू सोयरसूतकच नव्हते, असे वाटण्याजोगी परिस्थिती राजकीय पक्षांनी स्वतःच निर्माण केली, असे खेदाने म्हणावे लागत आहे.
बाळू पूर्णेकर यांच्या हत्त्येचा निषेध करावा तितका कमीच आहे. पण आठवड्यात नंतर विशेषतः गेल्या सुमारे दहा दिवसांत जी राजकीय चिखलफेक सुरु आहे याचे ठाणेकरांना दुःख आहे. बाळू यांच्या हत्त्येच्या पहिल्या दिवसापासूनच माजी महापौर मीनाक्षी शिंदे व त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्या सांगण्यावरूनच ही हत्त्या घडवून आणली असल्याचा आरोप बाळू यांच्या मुलानेच केला होता. ठाणे पोलिसांनी त्वरेने हालचाल करून हल्लेखोरांना अगदी उत्तर प्रदेशात जाऊन जेरबंद केले. हे मुद्दामहून सांगण्याचे कारण हे की, माजी खासदार राजन विचारे यांनी या प्रकरणाची तुलना टायगर श्रॉफ यांच्यावरच्या गुंड हल्ल्याशी करून मुंबई पोलिसांचे कौतुक करण्याचा जो केविलवाणा प्रयत्न केला तो उघड करण्यासाठीच! येथेही ठाणे पोलिसांनी हालचाल करून हल्लेखोरांना पकडले होते वा आहे. परंतु राजकीय चष्मा दुसरा लावल्याने विचारे यांना ते सुचलेले नसावे. टायगरवरील हल्ल्याचा सूत्रधार गुजरातच्या साबरमती तुरुंगात आहे हेही कदाचित ते विसरलेले असावेत.

असो. थोडे विषयानंतर झाले. हल्लेखोरांना पकडल्यानंतर वेळ न दवडता सत्ताधाऱ्यांनी राजेंद्र शिंदे यांना पोलिसांच्या स्वाधीन केले असते तर इतके रान उठले नसते. तसेच मीनाक्षी शिंदे यांनाही पक्षसंगठनेच्या पदावरून पायऊतार होण्याच्या सूचना करायला हव्या होत्या. मीनाक्षी शिंदे फटकळ तोंडाच्या आहेत असा आरोप (ते खरे असलेतरी) उद्धव गटाच्या काही महिला नेत्यांनी केल्या. हा आरोप करताना त्यांच्या तोंडातून काही गंगाजलाचे पवित्र शिंतोडे उडत नव्हते हेही काही व्हिडीओतून समोर आलेले आहे. अगदी पूर्णेकर वहिनी यांनीही उपमुख्यमंत्र्यांना उद्देशून अपशब्द वापरलेले आहेत. म्हणजे अपशब्दांची फिट्टमफाट झाली असे समजायचे का? केवळ हल्लेखोरांना पकडले म्हणजे सर्व होत नाही. हल्लेखोरांचे जाबजबाब न्यायालयात टिकावे लागतात. वादाकरता मान्य करूया की, सूत्रधार म्हणून राजेंद्र शिंदे यांचे नाव हल्लेखोरांनी सांगितले. पण उद्या हल्लेखोर पलटले तर? म्हणून मागणी करताना विचार करून केली पाहिजे. इतकेही सामान्यज्ञान नसावे..
ढोल बडवूनदेखील केस ‘फुस्स’ होते हे ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना कळते. परंतु कुटुंबियांच्या गावी ते नसते. पोलिसांची बाजू घेण्याचा प्रश्न नाही (त्यांची बाजू मांडण्यासाठी अनेक थोर मंडळी आहेत.) कुटुंबीय सांगतात म्हणून काही शिंदे दामत्य सूत्रधार असू शकत नाही. उलट पूर्णेकर व शिंदे दामत्य यांच्या हाडवैराचा (गैर)फायदा घेऊन सुपारी फिरवल्याची चर्चा गुन्हेगारी जगतात जोरात सुरु आहे. पूर्वी बाळू यांचे संबंध किसननगर, धोबीआळी, कळव्यातील कुंभारआळी, खारेगाव येथील हिरादेवी मंदिर परिसर तसेच विटावा व भिवंडीतीलही काही भागाशी होते. तेव्हाची दुष्मनी कुणीतरी मीनाक्षी यांच्या नावावर खपवली असावी, असेही सूत्रांनी सूचित केले. आधीच्या लेखात या परिसरातील पुनर्वसन योजनांमुळे व त्यातील मतभेदामुळे ही हत्त्या झाली असावी असा अंदाजही व्यक्त केला जात आहे. पण यात दम दिसत नाही. कारण हल्ली पुनर्वसनात ‘देवाणघेवाण’ होऊन खूनखराबा टाळण्यावरच सर्वांचा विश्वास आहे.
“Truth is central to justice, and the disvovery of truth requires a searching inquiry. In criminal justice, thus is the investigation, which is not only the path to truth but also the way to accountability (exoneration), हे आरोपी व फिर्यादी या दोघांनीही लक्षात घेतले पाहिजे. उठसूट आम्हाला नवीन व्हिडीओ मिळालाय, अजूनही येणार आहेत, या आवयांना तपासात शून्य किंमत असते. व्हिडीओ कितीही आणा, त्यांची न्यायवैद्यक तपासणी झाल्यावरच त्यांचे परिवर्तन कोर्टासमोरील कागदात होते. अन्यथा रिजेक्ट म्हणून कचऱ्याची टोपली त्यांना आपलेसे करते. शिवाय महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला काही पुरावे मिळाले, काही सापडलंय तर ते लगेच आधाशासारखे कॅमेऱ्यासमोर सांगू नका. शांतपणे पोलिसांच्या स्वाधीन करा. सध्या इतकेच. जाता जाता इतकेच सांगतो की, येत्या आठवड्यापासून दिवाळीसारखा आनंदाचा मोठा सण सुरु होत आहे. त्याला हे बंद, ते बंदचे गालबोट लागू नये.
(लेखक विजयकुमार काळे ज्येष्ठ पत्रकार आणि गुन्हेगारीविषयक घडामोडींचे अभ्यासक आहेत.)

