Homeमाय व्हॉईसअमित ठाकरेंची नौटंकी...

अमित ठाकरेंची नौटंकी आणि ‘सामान्यज्ञाना’चे प्रदर्शन!

रामदास फुटाणेंची एक व्यंग कविता चांगलीच बोलकी आहे. त्याचा संदर्भ आहे तो प्रोटोकॉल म्हणजे राजशिष्टाचाराचे सारे नियम धुडकावणारे, नव्हे थेट धाब्यावर बसवण्याची हडेलहप्पी करणारे अमित राज ठाकरे यांच्याशी…

भिंत म्हणाली:

“तरुणांचे आंदोलन,

कळता कळेना

कोण कुणाजवळ ठेवावे

मलाही कळेना”

शेजारची भिंत वदली:

“दोन इकडे पाठव,

पाच वर्षे स्थिर राहतील,

सगळेच एकमेकांकडे

प्रोटोकॉल समजून पाहतील!” (रामदास फुटाणे)

मध्यंतरी पुण्यामध्ये अमित ठाकरे धडकले होते. त्यांचे पिताजी राज ठाकरेंचे मोठे आलीशान निवासस्थान पुण्य नगरीत (पुण्यात) आहे. त्यांना इथली हवा पाणी मानवते. ते अधुनमधून पुण्यात मुक्काम करतच असतात. वडिलांसोबत अमितभय्यांचाही पुणे दौरा होतच असणार. राहुल गांधीही अलीकडे पुण्यात आले होते. त्यांनी ‘छात्रों की गुंज’ या नावाचा जोरदार कार्यक्रम केला. तरूण विद्यार्थ्यांची विशेषतः विद्यार्थिनींची मोठी गर्दी या कार्यक्रमाला झाली होती. छत्रपती शिवाजी महाराज शिक्षण संस्थेच्या भव्य पटांगणात एक मोठा मांडव उभा केला होता. दिवस पावसाचे असल्याने तितके संरक्षण मुलींसाठी नव्हे तर बहुधा राहुल गांधींना हवेच असणार. मुलींना समजा पावसात भिजण्याचा निराळा आनंद घेता येतो. पण राहुलजी काही तितके तरूण राहिलेले नाहीत! आता ते सत्तावन्न वर्षांचे झालेच आहेत. सरकारी नोकरीत असते तर दोनतीन वर्षांत पेन्शनीत निघाले असते. पण राजकारणात साठी ही तर फक्त सुरुवात असते. निवृत्ती नक्कीच नसते. ऐंशी वर्षांपर्यंत राजकीय कारकीर्द बहरत ठेवता येते. नरसिंह राव वा डॉ. मनमोहन सिंग यांना देशाचे नेतृत्त्व करण्याची संधी लाभली तेव्हा त्यांनी सत्तरी पार केलेलीच होती. त्यामुळे राहुल गांधी तर राजकारणासाठी अभि तो मै जवान हूँ, असे म्हणू शकतात. आता यापुढे २०२९च्या निवडणुकीत मोदी-शाहांच्या भाजपाला परास्त करून आपल्याला संधी लाभेल, असे राहुल यांना वाटत असणार. तेच वाटणे त्यांना जाणवत असल्यास नवल नाही. राहुल गांधींनी तरुणाईला साद घालून रॉक स्टारच्या थाटात दणक्यात कार्यक्रम केल्यामुळे महाराष्ट्रातील अमितसारख्या काही युवा नेतृत्त्वाच्याही आशाही थोड्याफार पल्लवीत झाल्यास नवल नाही.

अमित

मुंबईत आदित्य ठाकरे सरकारविरोधात मैदान गाजवत असताना अमित ठाकरेंना वाटले की, आपण पुण्यात जाऊ आणि तिथे तरुणाईचे प्रश्न सोडवू. पण त्यांचा हा पुणे दौरा वादग्रस्त ठरला. कारण त्यांनी मनसेच्या खळ्ळखट्याक पद्धतीचा कार्यक्रम करण्याचा प्रयत्न केला. अमित ठाकरेंना सरकारी पॉलिटेक्निक म्हणजेच तंत्रनिकेतन विद्यार्थ्यांचे कथित प्रश्न खुणावत होते. मन युवा सैनिकांनी त्यांच्याकडे तक्ररी केल्या होत्या की, तंत्रनिकेतनात कँटीन व मेस हा मोठा प्रश्न आहे. तिथे ठाकरे दाखल झाले. कुठेही पूर्वपरवानगी वगैरे घेण्याची त्यांची पद्धतच नसावी. कँटीनची हॉस्टेलची झाडाझडती घेताना तिथे जे कथित सडके कांदे सापडले. हे तिकडचेच होते की, मनसैनिकांच्या घरातून तिकडे नेले होते, हा संशोधनाचा भाग आहे. त्याची चाचणी, पाहणी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या नेतृत्त्वातील खाकी मंडळी सावकाशीने करतीलच. त्यानंतर अमित ठाकरे थेट प्राचार्य राजेंद्र पाटलांच्या केबिनमध्ये घुसले. त्यांच्यासमवेत विद्यार्थी थोडेच दिसत होते. बाकी सारे थोराड मनसैनिक होते. (तसे अमित ठाकरेही आता पस्तीशीच्या पुढे सरकलेच आहेत!) पण तरी ते युवा म्हणण्याच्या वयात आहेत. या युवा नेत्याने सडके कांदे प्राचार्यांच्या पुढ्यात सरकवले आणि हे तुम्ही खाल का, अशी विचारणाही केली. त्यांची नजर चौकस आहे व बुद्धी तेजतर्रार आहे, हे तर महाराष्ट्राला माहितीच आहे. ठाकरे चिरंजीवांनी तिकडे भिंतीवर रांगेने लटकलेल्या तसबिरी पाहिल्या. त्यातील फक्त शिवाजी महाराजांकडे त्यांचे लक्ष गेले. महाराजांच्या शेजारी म्हणे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे तैलचित्र लटकलेले होते. तसबिरीच्या रूपाने तिथे मोदींना बघताच राज चिरंजीवांचे पित्त उसळले. ते कडाडले, “महाराजांच्या शेजारी मोदी का?” त्यांच्या पिताजींचे, “लाव रे तो व्हीडिओ” हे वाक्य महाराष्ट्रात गाजले होते. त्याच चालीवर त्यांनी एका जाड्याजुड्या युवाला फर्मावले, “काढ रे ती तसबीर!” आणि बघताबघता पंतप्रधानांचे छायाचित्र प्राचार्यांच्या समोरच्या भिंतीवरून खाली खेचले गेले.

त्या साऱ्या गोष्टींचे व्हिडिओचित्रण उपलब्ध आहे. कारण अमितभय्यांच्या मागेपुढे टीव्ही पत्रकारांच्या फौजा नाचतच होत्या. शिवाय कार्यकर्त्यांचे मोबाईलही सारे शूटिंग करतच होते. ते त्याच सायंकाळी महाराष्ट्राने पहिले. पुणे पोलिसांनीही अर्थातच पाहिलेच असेल. प्राचार्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याच दिवशी काही वेळाने पोलिसांकडे तक्रार केली. चतुःशृंगी पोलीसठाण्याने त्या तक्रारीची दखल घेऊन अमितभय्या व त्यांच्या पंचवीस साथीदारांविरोधात गुन्हा नोंदवला. दुसऱ्या दिवशी ठाकरेंना नाही, पण त्यांच्या तीन साथीदारांना पोलिसांनी अटक केली. अर्थातच त्यांची लगेचच जामिनावर सुटकाही झाली असणार. ते आता अमितभय्यांच्या गळ्यातील ताईत बनतील यातही शंका नाही. सरकारी तंत्रनिकेतनचे प्राचार्य राजेंद्र पाटील यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, दुपारी साडेबाराच्या सुमरास अमित व त्यांचे वीस-पंचवीस साथीदार बिनदिक्कत आमच्या कार्यालयात घुसले. गोंधळ घातला. घोषणाबाजी केली. हॉस्टेलमध्ये स्वच्छता नाही, टॉयलेट चांगली नाहीत, कँटीनचे जेवण घाण आहे, अशा तक्रारी ते मोठमोठ्यांदा करत होते. हुकूम सोडत होते. त्यांनी सांगितल्यावरून एकदोन पोरांनी तसबिरींकडे मोर्चा वळवला. नंतर अमित ठाकरेंना पत्रकारांनी विचारले तेव्हा ते म्हणाले की,  माझ्यावर झालेला हा दुसरा गुन्हाही महाराजांसंदर्भातील कृतीसाठी झाला आहे याचा मला अभिमान आहे. नव्या मुंबईतील छत्रपतींच्या पुतळ्याचे जबरदस्तीने उद्घाटन करण्याप्रकरणी ठाकरेंवर पहिला गुन्हा झाला आहे. आता महाराजांच्या शेजारी मोदी कशाला यासाठी…

ठाकरेंच्या हे गावीही नाही की, सर्वच शासकीय कार्यलयात राष्ट्रपुरुषांसोबतच संविधानिक पदाधिकाऱ्यांचे म्हणजेच पंतप्रधान व राष्ट्रपतींचे फोटो लावणे हे बंधनकारक असते. तुम्हाला आवडत नाहीत वा पसंत नाहीत म्हणून पंतप्रधानांचा फोटो काढता येत नाही. खरेतर तुम्ही मोदींना निवडणुकीत पराभूत करून टाका म्हणजे मोदींऐवजी राज वा उद्धव ठाकरेंचा अथवा राहुल गांधींचा फोटो, जर यापैकी कुणी चुकूनमाकून पंतप्रधान बनलेच तर लागू शकेल. गंमत म्हणजे याच अमितभय्यांचे पिताश्री एकेकाळी मोदींचे गुणगान गात फिरत होते. सभांमध्ये मोदींच्या शेजारी बसून भाषणेही त्यांनी दिली आहेत. मोदींनी गुजरातेत जबरदस्त कामगिरी केली, तेच पंतप्रधान व्हायला हवेत, हे राज ठाकरेंचे मत २०१३-१४मध्ये होते. २०१९लाही त्यांनी मोदींच्या भाजपाविरोधात उमेदवार दिलेच नव्हते. राज ठाकरेंचे राजकारण कधी मोदी, कधी शरद पवारांसोबत रमले आहे. मागच्या २०२४च्या विधानसभा निवडणुकीआधी बंधु उद्धव ठाकरेंबरोबर राज यांची दिलजमाई झालीच नव्हती. उलट तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेबरोबर मनसेची चुंबाचुंबी सुरु होती. त्यातूनही फारसे काही निष्पन्न झालेच नव्हते. म्हणून तर अमित ठाकरेंचा माहीमध्ये पराभव झाला. मनसेला मुंबईत वा राज्यात एकही आमदारकी जिंकता आली नाही. खरेतर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेबरोबर राज ठाकरेंची युती झाली असती तर काय सांगावे आज अमित ठाकरे कदाचित तंत्रशिक्षण राज्यमंत्री बनले असते. पण ते राजकारण जमलेच नाही आणि नागरिकशास्त्राशी संबंधित राजशिष्टाचाराचे साधे नियमही माहित नसणारे अमितभय्या तंत्रनिकेतनाच्या तक्रारीत आरोपी ठरले आहेत!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

शिवसेनेची ‘मालकी’ आणि पतंगबाजीला ऊत!

महाराष्ट्राच्या व देशाच्या राजकारणावर दीर्घकाल परिणाम करू शकेल अशा, शिवसेना पक्ष तसेच पक्षचिन्ह प्रकरणाची अंतिम सुनावणी दिल्लीत सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या तीन सदस्यांच्या पीठापुढे सुरु असून सरत्या सप्ताहात तेथील सुनावणीच्या ज्या बातम्या येत होत्या त्यावरून बरीच राजकीय पतंगबाजी...

देवेंद्र फडणवीस मुंबईतच!

महाराष्ट्रातील एक श्रेष्ठ परंपरा असलेली पंढरीची वारी आता संपली आहे. आषाढीला लाखो वारकरी विठुरायाचे दर्शन घेऊन आपापल्या गावी परतले आहेत. शेतीभातीची व उद्योगधंद्यांची कामे वारकऱ्यांनी सुरु केली आहेत. संतांच्या दिंड्याही आता पौर्णिमेचे दर्शन घेऊन परतीच्या मार्गाला लागल्या आहेत. गावोगावी...

… तर एकनाथरावांच्या जागी दादा असते मुख्यमंत्री!

महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जयंती नुकतीच साजरी झाली. राजीव गांधींच्या अखेरच्या निवडणुकीच्या स्फोटक धामधुमीच्या काळात अजित पवार महाराष्ट्राच्या राजकारणात अवतरले. दुर्दैवाने दादांच्या राजकारणाची आणि आयुष्याची अखेरही भयंकर स्फोटक स्थितीत झाली. 1991 ते 2026 हा कालावधी मात्र, कायम...
Skip to content