Homeब्लॅक अँड व्हाईटधनी.. थोडा किराणा...

धनी.. थोडा किराणा भरता का?

कारभारीण: धनी, थोडा किराणा भरायचा होता.

धनी: अगं, आता पाच तारीखला सामान आणलंतं ना…

कारभारीण: आणलंतं. पण संपलं.

धनी: एवढ्यात? संपलं पण?

कारभारीण: तरी पालेभाज्या, फळभाज्या घरच्या शेतातल्या हाय म्हणून बरं.. पण रवा, साखर, पोहे, तेल, तूप, डाळी, कणिक, तांदूळ सगळे डबे रिकामे झालंत..

धनी: अगं, पण..

कारभारीण: अवं असं काय करताय? दिवाळी न्हवती का? आणि सायब जेवाया आले न्हवते?

धनी: काईबी बोलतीस. साहेब काय महिन्याचं एकदा जेवून जाणार आहे?

कारभारीण: अवो. सायब काय एकटे होते का? त्यांच्याबरोबर तो पीए, सिकुरटी, टीव्हीवर नंतर दिसले ते आणखी बकाने भरणारे मंत्री.. पुन्हा इथले पार्टीवाले. ते चायनेलवाले..

धनी: पुरे पुरे.. समजलं.

कारभारीण: तरी मी म्हणत होते. खुर्ची टेबलवर जेव्हा म्हून. पण गरिबाचं घर वाटलं पाह्यजे ही आयडिया कुणाची?

धनी: साहेब बोलले. खाली पाटावर बसून जेवू..

कारभारीण: पण जेवायचं टेबल निदान दुसरीकडे बाहेर न्हाई नेऊन ठेवायचं?

धनी: का त्याने काय बिघडलं?

कारभारीण: सायब खाली बसून जेवतानाचे फोटो काढायला आलेल्या ते फोटोवाल्याने असा फोटो काढलाय की, त्यात खाली सायब जेवत्यात आणि मागे खाटेवर उलटा करून ठेवलेला टेबल दिसतोय.. गरीब शेतकऱ्याच्या घरात असा टेबल असतो व्हय?

धनी: (डोकं खाजवत) ते असा फोटो चुकून काढला का मुद्दाम, तेच समजना झालंय..

कारभारीण: तिकडं अंजनगाववरुन माझ्या बहिणीचा फोन आला होता. त्यांच्या घरीही पुढच्या आठवड्यात जाणार आहे कोणी तरी साहेब.. ती विचारत होती. तुम्ही काय केलं, कसं केलं?

धनी: मग काय सांगितलं तू?

कारभारीण: मी सांगितलं, त्यांना कळव. आम्ही गावाला जाणारे. नंतर या. आम्ही कळवू आल्यावर..

धनी: का?

कारभारीण: मग काय? एकटे सायब जेवायला आले तर काही जड नाही. पण त्यांच्याबरोबर पाच-पंचवीस आल्यावर कसं करायचं? बरं.. त्यांची व्यवस्था सर्किट हौसला केलती. तरी यांना सायबासमोर शायनिंग मारायची. मग ते इथंच खोळंबत्यात.. मग काय करावंच लागतं चा-पानी.. पुन्हा सायब गेले, त्यांच्या संग तुमीबी गेलं. आन किती ते चायनलवाले आले..

धनी: ते कशापायी?

कारभारीण: विचारत होते. शंभर प्रश्न. सायब हित्तच का आले? काय तयारी केली? काय देऊन गेले? काय सांगून गेले?

धनी: मग तू काय बोल्ली?

कारभारीण: मी काय बोल्ली ते जाऊ द्या. आधी जेवायचं टेबल नीट जागेवर लावून द्या. आणि शेजारून टीव्ही परत आणा. पोरं डोकं खाताहेत कार्टून बघायला.. आणि हे दुधाचं पातेलं ठेवता का फ्रीझमध्ये?

(लेखक आप्पा नाशिककर ज्येष्ठ पत्रकार आणि ललितलेखक आहेत.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

काय दिसतं गं आज मार्केटमध्ये?

श्री: आज मार्केटमध्ये पाहिले तर काय दिसते? सौ: काय दिसते? श्री: प्रचंड गर्दी झालेली आहे खरेदीसाठी.. चालायला जागा नाहीये.. सौ: पण, चालायला मार्केटमध्ये कशाला जायचं? गोल्फ क्लबवर जावं.. श्री: (उपहासाने) आपल्या कॉलनीत बागेला चकरा मारायलाही हरकत नाही. सौ: आपलं वय बघा.. सिनेमातल्या हीरोसारखे जाल...
Skip to content