राज्याचे मत्स्योद्योग मंत्री नितेश राणे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगल्या काचपिचक्या दिल्या आहेत. त्यामुळे त्यांचे वडील खासदार नारायण राणे यांना, नितेश राणे यांना आपण समज दिल्याचे टीव्हीवाहिन्यांना सांगावे लागले. नितेश राणे हे, आपण आता राज्याच्या मंत्रिमंडळातील एक जबाबदार मंत्री आहोत हे विसरतात. नेहमीच ते धमक्या आणि असंसदीय भाषेत बोलत असतात. मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नितेश राणे सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर गेले होते. आपल्या मतदारसंघात जाऊन त्यांनी आपल्याविरोधात असलेल्या किंवा आपल्याविरोधात मतदान केलेल्या गावातील नागरिकांना धमकी दिली की, जर तुम्ही आमच्यासोबत येणार नसाल तर तुम्हाला विकासनिधी अजिबात मिळणार नाही. एखादा मंत्री मंत्रीपदाची शपथ घेताना पद आणि गोपनीयतेची शपथ घेतो. त्याचबरोबर कुणालाही फेवर करणार नाही किंवा कुणावर अन्याय करणार नाही असे नमूद करतो. परंतु नितेश राणे हे मानत नाहीत.
त्यांनी आपल्या मतदारसंघात जाऊन दिलेल्या धमक्यांना कोणीही आक्षेप घेतला नाही. विशेष म्हणजे त्यावेळी नितेश राणे यांचे हे वक्तव्य वारंवार टीव्हीवाहिन्यांनी दाखवल्यानंतर महाराष्ट्राचे सुसंस्कृत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांना साधी समज दिली नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात एवढा असंस्कृत मंत्री असू शकतो यावर विश्वास बसत नाही. यापूर्वीही त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा दाखला देत ‘आमचा बाप बसलाय’ असा उल्लेख केला होता. परंतु त्यावेळी कुणीही आक्षेप घेतला नाही. बाटगा नेहमी कडवा असतो, अशा आशयाची एक म्हण आहे.
नारायण राणे शिवसेनेत असताना त्यांना सर्व वैभव मिळाले. राज्याचे मुख्यमंत्रीपद, नंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद आदी महत्त्वाची पदे केवळ शिवसेनेमुळेच त्यांना उपभोगता आली. नंतर उद्धव ठाकरे यांच्याशी मतभेद झाल्याने ते काँग्रेसमध्ये गेले. काँग्रेसमध्ये त्यांना महसूल मंत्रीपद मिळाले. पुढे मुख्यमंत्रीपद मिळेल या आशेने ते काँग्रेसमध्ये राहिले. त्यानंतर विलासराव देशमुख यांचे मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर काँग्रेसने अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्री केले. त्यावेळी मुख्यमंत्रीपद हुकल्याने काँग्रेस आणि सोनिया गांधी यांच्यावर टीका करत ते काँग्रेसबाहेर पडण्याच्या तयारीत होते. परंतु पुन्हा शिवसेनेत घेणार नाहीत हे लक्षात आल्याने ते शांत बसले. अशोक चव्हाण यांनी नारायण राणे यांना राजकीय जीवदान दिले. आपल्या मंत्रिमंडळात त्यांनी राणे यांना घेतले आणि उद्योग मंत्रीपद दिले. विशेष म्हणजे राणे हे कसे उपयुक्त आहेत हे अशोक चव्हाण यांनी पक्षश्रेष्ठींना पटवून दिले. अखेर अशोक चव्हाण यांनाही राणे यांचा प्रसाद मिळाला. ज्या अशोक चव्हाण यांनी नारायण राणे यांना राजकीय जीवदान दिले त्याच अशोक चव्हाण यांच्याविरोधात त्यांनी वारंवार भूमिका घेतल्या.

पुढे सिंधुदूर्गच्या जनतेने त्यांना घरी बसवले. त्यानंतर मुंबईच्या वांद्रे पूर्व मतदारसंघात नारायण राणे यांनी पोटनवडणूक लढवली. तेथेही शिवसेनेच्या उमेदवार तृप्ती सावंत यांनी राणे यांचा पराभव केला. काँग्रेसने नारायण राणे यांना विधान परिषद दिली. विधान परिषदेत नारायण राणे यांची कामगिरी निश्चितच उजवी होती. परंतु महाबळेश्वर येथील वनजमिनीचे प्रकरण आणि ईडीच्या भीतीने नारायण राणे आणि त्यांचे कुटुंबीय हे भाजपवासीय झाले. भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांना राज्यसभा मिळाली. केंद्रात कॅबिनेट मंत्रीपद मिळाले. परंतु या मंत्रीपदाचा फारसा प्रभाव ते पाडू शकले नाहीत. त्यामुळे पुढे त्यांना दुसऱ्यांदा राज्यसभा मिळाली नाही. अखेर सिंधुदूर्ग मतदारसंघातून ते लोकसभेवर गेले. परंतु त्यांना केंद्रीय मंत्रीपद मिळाले नाही. फक्त खासदारपदावर समाधान मानावे लागले.
विधानसभा निवडणुकीत सिंधुदुर्गातील दोन्ही विधानसभा मतदारसंघात त्यांचे पुत्र डॉ. निलेश आणि नितेश हे विजयी झाले. डॉ. निलेश हे शिवसेनेचे आमदार आहेत तर नितेश भाजपचे आमदार आहेत. नारायण राणे यांना केंद्रात मंत्रीपद न मिळाल्याने भाजपने नितेश राणे यांना राज्यात कॅबिनेट मंत्रीपद दिले. परंतु मत्स्योद्योग खाते देऊन त्यांची बोळवण केली.
भाजपच्या कोणत्याही मंत्र्यांना सध्या स्वातंत्र्य नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या परवानगीशिवाय कोणताही महत्त्वाचा निर्णय घेता येत नाही, अशी परिस्थिती सध्या राज्यात आहे. त्यामुळे फडणवीस यांचे लांगुलचालन करण्याशिवाय भाजपच्या मंत्र्यांना पर्याय नाही. फक्त एकमेव आशिष शेलार त्याला अपवाद आहेत. त्याचा फटका त्यांना वेळोवेळी बसतो. परंतु ते सहन करतात. नितेश राणे यांना वेळोवेळी देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतीसुमनांचा वर्षाव करावा लागतो. त्याचमुळे देवेंद्र फडणवीस हे ‘सर्वांचा बाप’ असा उल्लेख ते वारंवार करत असतात. मराठवाड्यात शिवसेनेचा बऱ्यापैकी जोर आहे. परभणीमधील नितेश राणे यांच्या या वक्तव्याला सेनेच्या मंत्र्यांनी आक्षेप घेतला. मंत्रिमंडळ बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला. त्यामुळे नितेश राणे यांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी चांगल्या काचपिचक्या दिल्या. खासदार नारायण राणे यांनाही नितेश राणे यांना समज देण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यामुळेच नारायण राणे यांना नितेश यांना समज द्यावी लागली. आणखी किती वेळा अशी समज त्यांना द्यावी लागणार हे पाहायचे.
संपर्कः 9820355612