Homeन्यूज अँड व्ह्यूजमुंबईकरांनो चला.. तुंबलेल्या...

मुंबईकरांनो चला.. तुंबलेल्या पाण्यातून वाट काढायची वेळ येतेय!

येतोय-येतोय म्हणत अखेर मोसमी पाऊस तळकोकणात दाखल झाला आणि महाराष्ट्रात आनंदाचे वारे वाहू लागले. केरळमध्ये ह्या मान्सूनचे येणे लांबल्यामुळे महाराष्ट्रातही विलंब होतो की काय अशी भीती होती. पण अखेर पाऊस महाराष्ट्रात दाखल झाला. सगळ्या धरणातील पाण्याने तळ गाठला, मुंबईसारख्या शहरात पाणीकपात, ग्रामीण भागत विहिरींनी तळ गाठला, टँकरांचा अपुरा पाणीपुरवठा, पाण्यासाठी वणवण, अशा बातम्या वाचून आणि वृत्तवाहिन्यांवर पाहून लोक हैराण झाले होते. त्यातच अल निनोच्या प्रभावामुळे कमी पाऊस पडणार असे भाकीत हवामान खात्याने वर्तवले आहे. त्यातच गेल्या आठवड्यात मान्सूनपूर्व पावसाने पिकांचे अतोनात नुकसान केले आहे. वळवाच्या पावसामुळे शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे आणि मुंबई-पुण्यासारख्या शहरात पाणी साचल्याने वाहतूककोंडी, झाडे पडणे, अशासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. एकतर ह्या वर्षी भयंकर उन्हाळा होता. राज्यात अनेक ठिकाणी ४० ते ४५ डिग्री तापमान होते. मुंबईतही साधारण ३५ ते ४० डिग्री तापमान होते. उन्हाच्या काहिलीतून सुटका होणार म्हणून मुंबईकर आनंदले असतील. पण एकदा का पावसाळा सुरू झाला की, त्यांना बऱ्याच समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे.

पावसाळ्यात एक-दोनदा तरी मुंबईची तुंबई होतेच. कितीही काहीही करा. पण सलग दोन-तीन दिवस पाऊस पडला तर मात्र रस्त्यावर पाणी, गटारे, नाले तुंबतात. त्यामुळे वाहतूककोंडी, रेल्वेगाड्या बंद पडतात. रुळांवर पाणी आल्याने पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे चाकरमान्यांची पंचाईत होते. शाळा, महाविद्यालयांत जाणार्‍या विद्यार्थ्यांची अडचण होते. पण लक्षात कोण घेतो? दरवर्षी नालेसफाईचे दाखले दिले जातात. पण कधीही १०० टक्के नालेसफाई होत नाही. रस्त्यांची अर्धवट पडलेली कामे, खोदलेले रस्ते, ह्यामुळे ह्या वाहतूककोंडीत आणखी भर पडते. महापालिकेत सत्ता कुणाचीही असो, पाणी साठण्याचे प्रकार होतातच. महाविकास आघाडीच्या काळात आणि शिवसेनेच्या २५ वर्षांच्या सत्ताकाळात दरवर्षी असे दावे केले जायचे, पण

मुंबई

ते फोल ठरले. भाजपा- शिवसेनेच्या युतीच्या राज्यातही गेल्या २-३ महिन्यांपासून नालेसफाईचे दावे केले जात आहेत. आपापसातल्या मतभेदांमुळे, एकदा महापौर रितू तावडे ह्यांनी नालेसफाईच्या कामाची पाहणी करण्यासाठी स्वतंत्र दौरा केला, तर लगेच उपमहापौर संजय घाडी ह्यांनी त्यांचा स्वतंत्र दौरा नालेसफाईची कामे बघण्यासाठी केला. हे कमी की काय म्हणून एकदा मंत्री आशीष शेलार ह्यांनी दौरा केला तर नंतर मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम ह्यांनीही पाहणीदौरा केला. पण उपयोग काय? गेल्याच आठवड्यात मुंबईत-उपनगरात फक्त अर्धा तास पाऊस पडला. लगेच अंधेरी सबवे पाणी साठल्यामुळे बंद करण्यात आला आणि सकाळी गर्दीच्या वेळी वाहतूककोंडी झाली. नंतर महापालिकेच्या कर्मचार्‍यांनी येऊन सफाई केली तेव्हा दोन ट्रक भरून कचरा, मलबा निघाला. तिथे अगदी तुटलेले फर्निचरही मिळाले. ही झाली पश्चातबुद्धी.

तीच गोष्ट मिठी नदीची. २६ जुलै २००५ला जेव्हा संपूर्ण मुंबई पाण्याखाली गेली होती, त्याचे मुख्य कारण मिठी नदीला आलेला पूर हे होते. आताही मिठी नदीचा गाळ उपासण्याचे आणि साफ करण्याचे काम झाले आहे, असा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. पण नुकतेच मनसेच्या कार्यकर्त्यांनी मिठी नदीत उतरून, बोटीत फिरून आंदोलन केले आणि गाळ उपसला नाही हे निदर्शनास आणून दिले. गेल्या वर्षी तर दक्षिण मुंबईतही पाणी साचून वाहतूककोंडी झाली होती. मंत्रालय, नरीमन पॉइंट ह्याठिकाणी पाणी साठल्याने अगदी शरद पवार ह्यांनीही आश्चर्य व्यक्त केले होते. एकूण काय तर दोन-तीन दिवस सलग पाऊस झाला तर मुंबईची तुंबई होणार हे नक्की. विशेषत: मुंबईतील सखल भाग, म्हणजेच, सायन, किंग्स सर्कल, परळ, हिंदमाता चित्रपटगृह येथे पाणी साठणार, वाहतूककोंडी होणार आणि जनजीवन विस्कळीत होणार. नव्या प्रशासनाने काही उपाय केल्याने मुंबईची तुंबई झाली नाही, म्हणजे मिळवले!

(लेखक वैजयंती कुलकर्णी आपटे ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

Continue reading

पावसापाण्यात मुंबईकरांना आशा फक्त देवाभाऊंकडून!

गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घातला आहे. संपूर्ण राज्यात अनेक भागात कुठे रेड अलर्ट, कुठे ऑरेंज तर कुठे यल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या महिन्यापासून पावसाची प्रतीक्षा होती. एल निनोमुळे यंदा पाऊस कमी बरसणार असे सगळे सांगत होते. मात्र...

बाळासाहेबांप्रमाणेच उद्धव ठाकरेंची धरसोड वृत्ती आली अंगलट!

ऑपरेशन टायगर शिवसेनेच्या सहा फुटीर खासदारांच्या मतदारसंघाचा दौरा करून शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुंबईत परत आले, तर आल्याआल्याच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यानी त्यांना आणखी एक धक्का दिला. उबाठाचे नेते आणि आदित्य ठाकरे ह्यांचे विश्वासू सचिन अहिर ह्यानी पक्षाला...

उरलेल्या उबाठा सेनेपुढे फुटीचे आव्हान कायम!

अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यांचे 'ऑपरेशन टायगर' यशस्वी  झाले. शिवसेना उबाठा गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर ह्यांनी जाहीरपणे ते शिंदे ह्यांच्याबरोबर आहेत, असे कालच सांगितले. त्यामुळे ऑपरेशन टायगरची अनिश्चितता संपुष्टात आली. राज्य विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला बोलताना शिंदे म्हणाले की, आम्ही कुठलेही...
Skip to content