भारताचे बुजूर्ग आंतरराष्ट्रीय नेमबाज आणि विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय क्रीडा समित्यांमध्ये आपल्या कामाचा शानदार ठसा उमटवणाऱ्या रणधीर सिंग यांच्या निधनामुळे भारताने एक नामवंत नेमबाज तसेच एक उत्तम क्रीडा प्रशासक गमावला आहे. “राजा” या टोपण नावाने क्रीडाविश्वात प्रसिद्ध असलेल्या रणधीर सिंग यांचा जन्म पतियाळाचे राजघराणे असलेल्या महाराज भूपिंदर सिंह यांच्या वशांत झाला. रणधीर सिंग यांचे वडिल भलिंद्र सिंग प्रथम श्रेणी क्रिकेटमधील चांगले खेळाडू होते. तसेच ते आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे १९४७ ते १९९२दरम्यान सदस्य होते. सुरूवातीला रणधीर सिंग क्रिकेट आणि नेमबाजी या दोन्ही खेळाच्या प्रेमात पडले. पण नेमबाजी स्पर्धेत त्यांना पदके मिळू लागल्यामुळे त्यांनी मग क्रिकेटला विराम दिला आणि पूर्ण लक्ष नेमबाजीकडे वळवले. नियमित सराव, चांगले मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि जास्तीतजास्त नेमबाजी स्पर्धांमधील सहभाग, यामुळे या खेळात ते पुढे चांगले प्रकाशात आले. तब्बल ६ ऑलिंपिक स्पर्धेत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. आशियाई क्रीडा स्पर्धेत नेमबाजीत भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. मग त्याची पुनरावृत्ती त्यांनी पुढे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतदेखील करुन दाखवली. आशिया ऑलिंपिक परिषदेचे सरचिटणीस असतानादेखील रणधीर सिंग यांनी आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत चांगली कामगिरी करुन दाखवली होती.

खेळातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी आपला मोर्चा संघटक, प्रशासक याकडे वळवला. तब्बल ४ दशके प्रशासक म्हणून मग विविध संघटनामध्ये काम पाहिले. खेळाडू, प्रशासक, संघटक अशा विविध भूमिकांमधुन त्यांनी खूप मोठे योगदान दिले. १९८७ ते २०१०दरम्यान ते भारतीय ऑलिंपिक संघटनेचे सरचिटणीस होते. त्याचबरोबर २००१ ते २०१४दरम्यान त्यानी आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीत विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे संभाळल्या. जागतिक उतेजक प्रतिबंध संस्था, वाडा यामध्ये ते दोन वर्षे आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे प्रतिनिधी होतै. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने त्यांच्या योगदानाची दखल घेऊन त्यांना मानद सदस्यत्व दिले. २०२१मध्ये ऑलिंपिक कौन्सिल ऑफ आशियाचे ते हंगामी अध्यक्ष झाले. २०२४मध्ये त्यांनी रितसर अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. काही महिन्यांपूर्वी प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. २०१०च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे यजमानपद भारताला मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा होता. आयोजन समितीचे ते उपाध्यक्ष होते. भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या सरकारी समितीचे रणधीर सिंग बरीच वर्षे सदस्य होते. भारतीय ऑलिंपिक चळवळीचे ते खरे शिल्पकार होते. आपले सारे आयुष्य त्यांनी खेळासाठी दिले. जागतिक पातळीवर त्यांनी धोरणात्मक नेतृत्त्व केले.
त्यांचा प्रामाणिकपणा, करारी भूमिका यामुळे नेहमीच रणधीर सिंग यांचा एक वेगळा दरारा राहिला. त्यांच्यावर एखादी जबाबदारी टाकली की ती यशस्वीपणे पार पडणारच हा विश्वास त्यांनी निमार्ण केला होता. त्यांचा जगभरचा मोठा प्रवास, प्रशासकीय कौशल्य, प्रचंड अनुभव ही त्यांचामधील उत्तम प्रशासकाची साक्ष देते. राजघराण्यातील असूनदेखील खेळाडूंच्या हितासाठी ते नेहमीच तत्पर असायचे. सर्वांना नेहमी एकत्र घेऊन चालणारे असे रणधीर सिंग यांचे व्यक्तिमत्व होते. आपल्या प्रशासकीय कौशल्यामुळे त्यांनी भारतीय क्रीडाविश्वाला एक वेगळी ओळख दिली. अत्यंत विनम्र आणि खेळाडूंशी थेट सवांद साधण्यात त्यांचा हातखंडा होता. स्वतः चांगले खेळाडू असल्याने खेळाडूंच्या सुखदुःखाची रणधीर सिंग यांना चांगली जाण होती. त्यांनी अनेक वाद, समस्या शांतपणे, मुत्सदिगीरीने सोडवल्या. त्यामुळेच जागतिक क्रीडाविश्वात त्यांची एक वेगळीच ओळख निर्माण झाली. आशियाई क्रीडा स्पर्धेत कबड्डीचा अधिकृत खेळ म्हणून समावेश करण्यात रणधीर सिंग यांचे योगदान अखिल भारतीय कबड्डी संघटना विसरू शकणार नाही.

भारतीय ऑलिंपिक समितीचे सरचिटणीस असताना त्यांनी खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सोयीसुविधा मिळण्यासाठी तसेच विदेशी प्रशिक्षकांच्या नियुक्तीसाठी क्रीडा धोरणात बरेच बदल करण्यात आले. खेळाडूंच्या पाठिशी ते नेहमीच ठामपणे उभे राहिले. त्यांच्या सुखदुःखात रणधीर सिंग सहभागी झाले. जमेल तेवढ्या मदतीचा हात त्यांनी नेहमीच पुढे केला. प्रशासक या शब्दाला त्यांनी एक नवीन व्याख्या मिळवून दिली. भारतीय दिग्गज क्रीडा प्रशासकांमध्ये त्यांच्या नावाचा सहज समावेश केला जाऊ शकतो. त्यांची एक कन्या राजेश्वरी आंतरराष्ट्रीय नेमबाज झाली, तर दुसरी सुनैना आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीची उपाध्यक्ष होती. तसेच त्यांच्या आंतरराष्ट्रीय संबध, शिक्षण समितीची सदस्य होती. थोडक्यात, वडिलांचा वसा त्यांच्या दोन्ही कन्या पुढे चालवत आहेत. केंद्र सरकारने त्यांना अर्जुन पुरस्काराने गाैरवले होते. त्यांच्या निधनामुळे भारतीय क्रीडाविश्वातील एक अष्टपैलू व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले. आता दुसरे रणधीर सिंग होणे नाही.
(लेखक सुहास जोशी ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आणि समीक्षक आहेत.)

