भाजपाविरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची बैठक आठ जूनला नवी दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये झाली. या बैठकीला सुरूवात होण्यापूर्वीच तृणमूल काँग्रेसच्या वीस खासदारांचा भाजपाप्रणित एनडीएला पाठिंबा, असे वृत्त वृत्तवाहिन्यांवरून झळकू लागले. इंडियाच्या बैठकीला तो एकप्रकारचा अपशकूनच होता. इंडिया आघाडीच्या बैठकीपेक्षा तृणमूल काँग्रेसला संसदेत भगदाड, या वृत्ताला सकाळी सकाळीच ठळक प्रसिद्धी मिळू लागली. पश्चिम बंगालमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचा भाजपाने दारूण पराभव केला. तृणमूल काँग्रेसच्या सुप्रिमो ममता बॅनर्जी यांचाही त्यांच्या भवानीपूर मतदारसंघात भाजपाने पंधरा हजार मतांनी पराभव करून दाखवला. त्यांचा पराभव करणाऱ्या व त्यांचेच एकेकाळी निकटवर्तीय असलेल्या सुवेंधू अधिकारी यांना भाजपाने मुख्यमंत्री करून ममता यांच्या पराभवाच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले. एवढेच नव्हे तर तृणमूल काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेल्या ८०पैकी ५८ आमदारांनी निकालानंतर महिन्याच्या आत बंडाचा झेंडा फडकवला. पक्षातील सर्वाधिक आमदार आमच्याबरोबर आहेत असे सांगून, आम्हीच तृणमूल काँग्रेस, असा दावा बंडखोरांनी केला. विशेष म्हणजे महाराष्ट्राप्रमाणे पश्चिम बंगालमध्येही विधानसभा अध्यक्षांनी त्यांचा दावा मान्य केला व विरोधी पक्षनेतेपदही बंडखोरांचे नेतृत्त्व करणाऱ्या नेत्याला बहाल केले.
तृणमूल काँग्रेसमध्ये ही केवळ फूट नव्हती तर महाराष्ट्राप्रमाणेच भाजपाच्या मार्गदर्शनाखाली व संरक्षणाखाली ममता बॅनर्जी यांना राजकारणातून हद्दपार करण्याची रणनीती होती. तृणमूल काँग्रेसची तोडफोड प. बंगाल विधानसभेपुरतीच मर्यादित नव्हती तर लोकसभा व राज्यसभेतील तृणमूल काँग्रेसच्या बहुसंख्य खासदारांनीही भाजपाच्या छत्राखाली असलेल्या एनडीएला आठ जूनला पाठिंबा जाहीर केला. निवडणुकीत मतदारांनी ममता यांना नाकारले किंवा अद्दल घडवली हे समजू शकते. पण त्यांनी स्थापन केलेल्या तृणमूल काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आलेल्या आमदार-खासदारांनी त्यांच्या नेतृत्त्वाला आव्हान देणे हे केंद्रातील भाजपाच्या मदतीशिवाय व संरक्षणाशिवाय शक्य होते का? कोलकाताच्या रस्त्यावर आंदोलने करणारी, पोलिसांच्या अनेकदा लाठ्या खाऊन रक्तबंबाळ झालेली, पश्चिम बंगालमध्ये सलग तीस वर्षांची मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची सत्ता उलथवून टाकणारी, काँग्रेस पक्षात बंडाचा झेंडा फडकावून तृणमूल काँग्रेस हा राजकीय पक्ष स्थापन करणारी आणि पंधरा वर्षे सलग तृणमूल काँग्रेसचे सरकार मुख्यमंत्री म्हणून चालविणारी ममता, ही बंगालची वाघीण म्हणून देशभर ओळखली जात असे. पंचवीस ते तीस वर्षे ज्यांनी ममता यांना साथ दिली तेच त्यांच्या नेतृत्त्वाला आव्हान देत आहेत. ममता या वयाने ७४ वर्षांच्या आहेत. बंगालमध्ये डावे पक्ष, काँग्रेस आणि भाजपाला हादरे देणारी, केंद्राच्या बलाढ्य ताकदीपुढे कधीही मान न तुकविणारी आणि मुख्यमंत्री असतानाही कोलकात्यातील काली घाटमध्ये लहानशा जुन्या घरात राहणारी, बंगालमध्ये पाच दशके लढाऊ नेतृत्त्व गाजवणारी बंगालची वाघीण भाजपाच्या रणनीतीपुढे आज एकाकी पडली आहे. सर्वात कहर म्हणजे, बंडखोरी हा तृणमूल काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे. आमचा काय संबंध असा प्रश्न भाजपाचे नेते विचारत आहेत.

आठ जूनला सकाळी दिल्लीतील ९ मोतीलाल नेहरू मार्ग, या बंगल्यावर तृणमूल काँग्रेसच्या खासदारांची बैठक झाली. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांचे हे सरकारी निवासस्थान आहे. एका केंद्रीय मंत्र्यांच्या घरीच तृणमूल काँग्रसचे पंधरा खासदार जमतात व त्यानंतर पक्षाच्या वीस खासदारांचा पाठिंबा एनडीएला असल्याचे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र देतात. या सर्व तोडफोड नाट्यामागे कोण आहे, हे आता वेगळे सांगायला नको. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना भाजपाने शिवसेना फोडली तेव्हा देवेंद्र फडणवीस अंधाऱ्या रात्री वेश बदलून, हुडी घालून, गॉगल लावून एकनाथ शिंदे यांना भेटायला जात असत. मुंबई, सूरत, गुवाहटी, गोवा असा प्रवासाचा मार्ग, हा काय एकनाथ शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी आखला होता काय? पण त्याची बाहेर वाच्यता झाली नव्हती. मात्र आता तृणमूल काँग्रेस तोडफोडीच्या बैठका दिल्लीत केंद्रीय मंत्र्यांच्या घरी होत असतील तर बंडखोरांना कोणाचा आशीर्वाद आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. तृणमूल काँग्रेस हा संसदेतील मोठा विरोधी पक्ष आहे. केंद्रीय मंत्र्याच्या घरी तेरा खासदार गेले की वीस या संख्येला फारसे महत्त्व नाही. विधानसभेनंतर संसदेतही ममता यांच्या नेतृत्त्वाला त्यांच्याच पक्षाच्या आमदार-खासदारांनी आव्हान दिल्यामुळे ममता यांची चिंता वाढली आहे.
ममता यांचा पराभव झाल्यानंतर व त्यांच्या पक्षाने सत्ता गमावल्यानंतर त्यांचे घर फिरले व पाठोपाठ वासे फिरू लागले. ममता, या हाडाच्या रस्त्यावरच्या कार्यकर्त्या होत्या. पण राज्यात सत्ता मिळाल्यापासून त्या बदलल्या असे टीकाकार सांगत आहेत. त्या स्वत: अहंकारी बनल्या. त्यांच्या पक्षाचा व त्यांचा झालेला पराभव म्हणजे अहंकार, भ्रष्टाचार व दहशतवाद यांचा नायनाट करण्यासाठी मतदारांनी दिलेला कौल आहे, असे भाजपा सांगत आहे. राजकारणात ममता यांचे टार्गेट मोदी होते. त्या नेहमीच मोदी-शाहांना जाहीर आव्हान देत असत. आता मोदी-शाहांनी त्यांना राजकीय टार्गेट केले आहे. हा काळाने ममता यांच्यावर उगावलेला सूड आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की, जे बंडखोर आज ममता यांच्या विरोधात गेले आहेत व भाजपाच्या वळचणीला गेले आहेत, ते धुतल्या तांदळासारखे आहेत का? अनेक बंडखोर धनाढ्य आहेत. अनेकांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत. ममता यांच्या पुण्याईवर निवडून यायचे व नंतर सत्तेच्या संरक्षणाखाली हात धुऊन घ्यायचे असे अनेक आहेत. त्यांना आता भाजपाच वाचवू शकते. चौकशीच्या नोटीसांपासून सुटका हवी असेल तर भाजपाशिवाय पर्याय नाही, हे त्यांना कळून चुकले आहे. गेली पंधरा वर्षे याच बंडखोरांनी सत्तेचे लाभ घेतले. कमाई केली, दहशत-दादागिरीतून खूप काही साध्य केले. आता हेच लोक ममता यांच्यावर भ्रष्टाचारी म्हणून आरोप करीत आहेत. ममता यांच्या हुकूमशाही व एकाधिकारशाहीवर हल्लाबोल करीत आहेत.
आणीबाणीनंतर इंदिरा गांधी यांची राजवट देशातील जनतेने उलथवून टाकली होती, जनता पार्टी अंतर्गत कलहाने बदनाम झाली तेव्हा त्या पक्षालाही जनतेने सत्तेवरून हटवले, बंगालमधील डाव्या पक्षांची मक्तेदारी असो किंवा दिल्लीतील केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाचे सरकार, मतदारांनीच सत्तेवरून हटवले. भाजपाचे एकेकाळचे विरोधक नितीश कुमार व चंद्राबाबू नायडू यांनाही सत्तेसाठी भूमिका बदल्याव्या लागल्या. तामिळनाडूत द्रविड पक्षांच्या संघर्षात विजय यांच्या पक्षाने बाजी मारली. उत्तर प्रदेश, बिहारमधे मुलायम किंवा लालू यांची मक्तेदारी जनतेने संपवली. अशी अनेक उदाहरणे देता येतील. ममता यांनाही बंगालमध्ये मतदारांनी नाकारले. पण पराभवानंतर त्यांचे नेतृत्त्व झुगारून देण्याची पक्षाच्या आमदार-खासदारांमध्ये शर्यत सुरू झाली, हे मात्र भयावह आहे. यापूर्वी शरद पवार, उद्धव ठाकरे, अरविंद केजरीवाल यांना त्यांच्या पक्षात झालेल्या तोडफोडीचा फटका बसला. आता या मालिकेत ममता बॅनर्जी सापडल्या आहेत. एकेकाळी इंडिया आघाडीत असलेले नितीश कुमार, अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी हे राष्ट्रीय पातळीवरील नेते होण्याचे स्वप्न बघत होते. या सर्वांची अवस्था भाजपाने कमजोर नि दयनीय करून टाकली आहे. २०२९मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच विरोधी पक्षाला कमजोर करण्याची रणनीती भाजपाची आहे. प्रादेशिक पक्ष खच्ची करण्यात येत आहेत. एनडीएतील मित्रपक्षांना आपल्यावर अवलंबून राहवे लागेल, अशी व्यवस्था आहे. ममता राजकारणात आज एकाकी पडल्या आहेत, हा भाजपाने विरोधी पक्षांना दिलेला इशारा आहे.
(लेखक डॉ. सुकृत खांडेकर ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आहेत.)

