“कॉक्रोच जनता पार्टी”चे संस्थापक अभिजीत दिपके यांना तरुणाईचा प्रचंड पाठिंबा असल्याचे त्यांच्या पहिल्याच भारत भेटीत दिल्लीतीत जंतरमंतर येथे झालेल्या जाहीर सभेत उपस्थित विशाल जनसमुदायामुळे सिद्ध झाले. दिल्ली पोलिसांनी आपल ताफा बारा तुकड्यांत तैनात केला होता. मात्र पोलिसांनी प्रकरण चिघळू न देता ते अत्यंत समजूतदारपणे हाताळले. पोलीस परवानगीसाठी शनिवारी सकाळी (06 जून 2026) दिपके, दिल्लीत विमानतळावर उतरल्यानंतर पार्लेमेंट स्ट्रीट पोलीसठाण्यात जायच्या तयारीत होते. मात्र ती परवानगी त्यांना विमानतळावरच पोलीस उपायुक्तानी दिली. “नीट” पेपरफुटी प्रकरणाबाबत केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीचा पुनरुच्चार करतानाच जंतरमंतर येथील सभा एक झलक असल्याचे दिपके म्हणाले. त्यांच्या साथीला पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक हेदेखील होते. यावेळी कांही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी जय श्रीरामच्या घोषणा देऊन वातावरण तापविण्याचा प्रयत्न केला. याचबरोबर कांही कार्यकर्ते झुरळनाशक ‘हिट’ घेऊन आले होते. त्यांना पोलिसांनी वेळीच ताब्यात घेतले.
“कॉक्रोच जनता पार्टी”ची स्थापना
सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी बनावट पदव्यांसंबंधीच्या एका सुनावणीदरम्यान, बेरोजगारांना “कॉक्रोच” असे संबोधित केल्यानंतर अमेरिकेतील बोस्टनमध्ये राहणारे दिपके यांनी सोशल मीडियावर “कॉक्रोच जनता पार्टी”, या काल्पनिक पक्षाची स्थापना केली. त्याची केंद्र सरकारने धास्ती घेऊन, या पक्षाचे ‘एक्स’ खाते, इन्स्टाग्राम आणि वेबसाईटवर त्वरीत निर्बंध लादले. केंद्र सरकारच्या म्हणण्याप्रमाणे हा काल्पनिक पक्ष देशविरोधी कारवायांत गुंतला असून, त्यापासून देशाला धोका आहे, म्हणून गुप्तचर विभागाच्या माहितीनुसार निर्बंध लादले गेले.
शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
सध्या गाजत असलेल्या “नीट” पेपरफुटी प्रकरणाबाबत केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्याबरोबर देशातील बेरोजगारी, भ्रष्टाचार अशा मुद्द्यांबाबत “कॉक्रोच जनता पार्टी”ची प्रखर भूमिका आहे. 16 मे रोजी X वर गंमतीने “जर सर्व झुरळे (कॉक्रोच) एकत्र आली तर काय होईल?” असे लिहून “कॉक्रोच जनता पार्टी” नावाची एक वेबसाइट आणि गुगल फॉर्म सुरू केल्या नंतर आतापर्यंत दीड कोटींहून अधिक फॉलोअर्स इंस्टाग्रामवर अभिजीतनी मिळवले आहेत. वेबसाईटवर एक अर्जही आहे, जो भरून लोक या पक्षात सामील होऊ शकतात. त्यांनी पक्षाचा लोगोही प्रसिद्ध केला आहे. “धर्मनिरपेक्ष, समाजवादी, लोकशाहीवादी, आळशी” हे त्यांचे घोषवाक्य आहे.

पक्षाच्या सदस्यत्वासाठी चार पात्रता:
पहिली: बेरोजगारी
दुसरी: आळशी असणे म्हणजे निष्क्रिय राहणे
तिसरी: ऑनलाइन राहण्याचे व्यसन
आणि
चौथी: व्यावसायिक राग व्यक्त करण्याची क्षमता
जाहीरनामा
जर कॉक्रोच जनता पार्टी (सीजेपी) सत्तेवर आली, तर कोणत्याही सरन्यायाधीशांना निवृत्तीनंतर राज्यसभेची जागा बक्षीस म्हणून दिली जाणार नाही. जर कोणतेही वैध मत रद्द केले गेले, तर मुख्य निवडणूक आयुक्तांना “युएपीए” (UAPA) अंतर्गत अटक केली जाईल, कारण कोणाचा मतदानाचा हक्क काढून घेणे हे दहशतवादापेक्षा कमी नाही. महिलांसाठी 33 नव्हे, तर 50 टक्के आरक्षण असेल. यासाठी खासदारांची संख्या वाढवली जाणार नाही. मंत्रिमंडळातही महिलांसाठी 50 टक्के आरक्षण असेल. स्वतंत्र माध्यमांना भरभराटीस येण्याची संधी देण्यासाठी अंबानी आणि अदानी यांच्या मालकीच्या सर्व माध्यम संस्थांचे परवाने रद्द केले जातील. लाळघोटू मीडिया अँकर्सच्या बँक खात्यांची चौकशी केली जाईल. जर कोणताही आमदार किंवा खासदार दुसऱ्या पक्षात गेला, तर त्याला निवडणूक लढवण्यास बंदी घातली जाईल. अशा फुटीराना पुढील 20 वर्षांसाठी कोणतेही सार्वजनिक पद धारण करण्यास बंदी घालण्यात येईल. अभिजीतनी पक्षात सामील होण्यासाठी ठेवलेले निकष आजच्या “जनरेशन-झेड”च्या तरुणाईला पटणारे आहेत.
निवडणूक आयोगाकडे पक्षनोंदणी कठीण
कॉक्रोच जनता पार्टीने निवडणूक आयोगाकडे पक्षनोंदणीसाठी अर्ज केल्यास पक्षाची नोंदणी सुखासुखी होईल की नाही याबाबत शंका आहे. शिवाय Representation of Peoples’ Act 1951(ROPA)च्या कलम (29(A)नुसार पक्षी आणि प्राणी यांचा निवडणूक चिन्हासाठी वापर करता येत नसल्यामुळे पक्षाला झुरळ निवडणूक चिन्ह मिळणे कठीण आहे. मोबाईल फोनचा अधिकृत चिन्हांत समावेश नसल्यामुळे मोबाईल फोन हे निवडणूक चिन्ह म्हणून मिळणार नाही. दरम्यान, अझिम आदमभाई जाम आणि अखंड स्वरुप यांनी झुरळ ट्रेडमार्कसाठी ट्रेडमार्क रजिस्ट्रीकडे अर्ज केला आहे.

“जनरेशन झेड”ची भीती
व्यंगात्मक असली तरीही कॉक्रोच जनता पार्टी आणि जनरेशन झेड यांच्या कार्यप्रणालीत बरेच साम्य आहे. जनरेशन झेड (Generation Z) म्हणजे 1997 ते 2012 या कालावधीत जन्मलेली पिढी. या पिढीला “जेन झी” (Gen Z) किंवा “झूमर” (Zoomer) असेही म्हणतात. ही अशी पहिली पिढी आहे जी जन्मापासूनच डिजिटल युगात, म्हणजेच इंटरनेट, स्मार्टफोन आणि सोशल मीडियाच्या संपर्कात मोठी झाली आहे. आजच्या डिजिटल जगात ही पिढी डिजिटल तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), राजकीय व सामाजिक जागृती आणि कार्यसंस्कृती या क्षेत्रांत मोठी क्रांती घडवून आणत आहे. ही पिढी केवळ तंत्रज्ञान वापरत नाही, तर AI, कोडिंग आणि नवकल्पनांच्या माध्यमातून कार्यपद्धती बदलत आहे. जागतिक स्तरावर ही पिढी अन्यायाविरुद्ध एकत्र येऊन राजकीय आणि सामाजिक बदल घडवून आणत आहे. शिवाय कॉर्पोरेट जगतातही, ही पिढी फ्रीलान्सिंग, क्रिएटर इकॉनॉमी आणि स्टार्टअप्सना प्राधान्य देत आहे.
“जनरेशन झेड”ने नेपाळ, बांगलादेश, मादागास्कर, इंडोनेशिया, केनया, मोरोक्को, फिलिपाईन्स, तिमोर-लेस्ते आणि मालदिव या देशांत प्रस्थापितांना नुकतेच दिलेले हादरे ही आपल्या भाजपाप्रणित केंद्र सरकारची खरी भीती आहे. नेपाळमध्ये सप्टेंबर 2025मध्ये झालेल्या आंदोलनानंतर 05 मार्च 2026 रोजी सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान झाले आणि नेपाळमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली. या मतदान प्रक्रियेत 18.9 दशलक्षाहून अधिक मतदारांपैकी सुमारे 60 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यात सुमारे दहा लाख “जेन झी” (Gen Z) मतदार होते. नेपाळचा हा निकाल परिवर्तनकारी ठरला आणि आधी रॅपर असलेले बालेंद्र शाह राजकारणात आले. त्यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाने (RSP) 165पैकी 120 जागा जिंकल्या आणि 49.14 टक्के एवढा मतांचा वाटा मिळवला. त्यामुळे पक्षाला निर्णायक बहुमत मिळाले.
“कॉक्रोच जनता पार्टी”ला पाठिंबा
काँग्रेसचे खासदार शशि थरुर, तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा,अनेक तरुण आणि काही राजकीय नेत्यांनी या डिजिटल आणि उपरोधिक चळवळीवर केंद्र सरकारने लादलेल्या निर्बंधावर कडाडून टीका केली असून त्यांनी या चळवळीला पाठिंबा दिला आहे. थरुर यांनी प्रेशर कुकरचे उदाहरण देत पोस्ट केले आहे की, “अशा हालचाली प्रेशर कुकरमधील व्हॉल्व्हप्रमाणे काम करतात, ज्यामुळे वाफ बाहेर पडते. जर व्हॉल्व्ह बंद असेल, तर दाबामुळे कुकरचा स्फोट होईल. मला गोंधळ, अराजकता किंवा क्रांतीपेक्षा उपहास अधिक आवडतो. मला असेही वाटते की, तरुण भारताच्या समस्या ओळखणे आणि त्यावर उपाययोजना करणे हे आपले काम आहे. चला, बंदी उठवूया आणि लक्ष देऊया!”
अभिजीतचा आम आदमी पार्टीत सहभाग
अभिजीत अमेरिकेतील बोस्टन युनिव्हर्सिटीमध्ये पब्लिक रिलेशन्समध्ये पदव्युत्तर पदवी घेत आहेत. त्यांनी 2020 ते 2023पर्यंत आम आदमी पार्टीच्या (आप) सोशल मीडिया टीममध्ये स्वयंसेवक म्हणूनही काम केले होते. त्यांच्या या राजकीय पक्षाचा पाठींबा वाढत आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारतर्फे या पक्षावर दबाव टाकण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जाईल हे नक्की.
(लेखक राजू वेर्णेकर ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आहेत.)

