सिंधुदुर्गात देशातले पहिले अंडरवॉटर म्युझियम साकार झाले आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी)मार्फत सिंधुदूर्ग जिल्ह्यातल्या निवती रॉक परिसरात भारतीय नौदलाची सेवानिवृत्त युद्धनौका “एक्स-आयएनएस गुलदार” समुद्रतळावर नुकतीच यशस्वीरित्या स्थापित करण्यात आली आहे. देशातल्या अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि वैशिष्ट्यपूर्ण पाणबुडी पर्यटनप्रकल्पाचा हा एक भाग आहे. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि.च्या समन्वयाने हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.
भारतातल्या पहिल्या एकात्मिक सबमरीनव्दारे अनुभवात्मक पर्यटनाची यामुळे सुरूवात होत असून या पर्यटनस्थळात मार्गदर्शित व्रेक डायव्हिंग व सबमरीन अनुभव, डिस्कव्हर स्कुबा डायव्हिंग (12 मीटरपर्यंत), प्रमाणित डायव्हर मोहिमा (18 मीटरपर्यंत), अॅडव्हान्स डायव्हिंग अनुभव (30 मीटरपर्यंत), अंडरवॉटर फोटोग्राफी पर्यटन, सागरी शिक्षण व संशोधन करता येणार आहे. डायव्हिंग स्लॉट्स, सबमरीन बुकिंग आणि पर्यटक सुविधांबाबतची माहिती लवकरच एमटीडीसीच्या माध्यमांतून अधिकृतपणे जाहीर करण्यात येईल, असे राज्याचे पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.
हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या जागतिक दर्जावर आयकॉनिक पर्यटन केंद्रांचा विकास भांडवली गुंतवणुकीसाठी राज्यांना विशेष सहाय्य, या योजनेतंर्गत एमटीडीसीमार्फत विकसित करण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारने रु. 46.91 कोटी तर महाराष्ट्र शासनाने ₹ 112.46 कोटी, इतक्या रक्कमेला मंजुरी दिली आहे. एक्स-आयएनएस गुलदार, ही भारतीय नौदलातील “मगर” वर्गातील लँडिंग शिप टँक प्रकारातील युद्धनौका असून तिने तब्बल 39 वर्षे राष्ट्रसेवा बजावली आहे. 12 जानेवारी 2024 रोजी ती भारतीय नौदलामधून निवृत्त झाली. पोलंडमधील ग्डिनिया शिपयार्ड येथे 30 डिसेंबर 1985 रोजी या नौकेचे जलावतरण झाले होते. 83.9 मीटर लांबीची ही नौका उभयचर युद्धकारवाई, सैनिक व रसद वाहतूक, किनारी सुरक्षा तसेच विविध नौदल सराव मोहिमांमध्ये कार्यरत होती. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड यांच्या माध्यमातून 19 मे 2026 रोजी सिंधुदूर्ग किनाऱ्यावर निवती रॉक परिसरात सुमारे 22 मीटर खोलीवर नौका समुद्रतळावर स्थापित करण्यात आला आहे. या स्थळाची निवड महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड आणि राष्ट्रीय सागर विज्ञान संस्था यांच्या सविस्तर वैज्ञानिक अभ्यासानंतर करण्यात आली आहे.
या प्रकल्पामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यासह संपूर्ण कोकण किनारपट्टीतील पर्यटन अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे. देश-विदेशातील पर्यटकांच्या वाढत्या आगमनामुळे स्थानिक व्यवसाय, निवास व्यवस्था, वाहतूक, खाद्यव्यवसाय आणि पर्यटन सेवांमध्ये आर्थिक उलाढाल वाढण्यास मदत होणार आहे. या प्रकल्पामुळे महाराष्ट्रात प्रथमच जागतिक दर्जाचा पाणबुडी पर्यटन अनुभव विकसित होत आहे. साहसी पर्यटन, स्कुबा डायव्हिंग, अंडरवॉटर एक्सप्लोरेशन आणि सागरी पर्यटन क्षेत्राला नवे परिमाण प्राप्त होणार असून महाराष्ट्राची ओळख देशातील अग्रगण्य साहसी पर्यटन स्थळ म्हणून निर्माण होण्यास मदत होणार आहे. समुद्रतळावर स्थापित करण्यात आलेली युद्धनौका कालांतराने कृत्रिम प्रवाळभित्ती (Artificial Reef) म्हणून विकसित होणार असून त्यामुळे सागरी जैवविविधतेला पोषक वातावरण निर्माण होईल. विविध प्रकारचे मासे, सागरी वनस्पती आणि सूक्ष्म जीवांसाठी हे संरक्षित अधिवास (Habitat) ठरणार आहे.
या माध्यमातून नौदलाचा गौरवशाली इतिहास आणि सागरी वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यात मदत होणार आहे. त्यामुळे भारताच्या सागरी पर्यटन क्षमतेची आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रभावी ओळख निर्माण करण्यास मदत होणार आहे. फ्लोरिडा (अमेरिका) येथील युएसएस ऑरिस्कनी आणि ऑस्ट्रेलियातील एचएमएएस स्वॅन यांसारख्या जागतिक दर्जाच्या व्रेक डायव्हिंग स्थळांपासून प्रेरणा घेत हा प्रकल्प विकसित करण्यात आलेला आहे. हा प्रकल्प भारतातील पहिला जागतिक स्तरावरील अंडरवॉटर म्युझियम आणि कृत्रिम प्रवाळभित्ती पर्यटन उपक्रम ठरणार आहे.

