Homeमाय व्हॉईसपक्षाचा अजेंडा राबविला...

पक्षाचा अजेंडा राबविला गेला विधान परिषद निवडणुकीतून!

विधान परिषद निवडणूक अपेक्षेप्रमाणे बिनविरोध झाली. आमदारांच्या संख्याबळानुसार भाजपला सर्वाधिक जागा या निवडणुकीत मिळाल्या. भाजपचे प्रदेश संघटन सचिव सुनील कर्जतकर, ठाण्याच्या पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख माधवी नाईक, संजय भेंडे आणि माजी सहकार मंत्री शंकरराव कोल्हे यांचे नातू विवेक कोल्हे आणि प्रमोद जठार यांना यावेळी भाजपने विधान परिषदेत संधी दिली. शिवसेनेने विधान परिषदेच्या उपसभापती असलेल्या 71 वर्षीय डॉ. नीलम गोऱ्हे आणि प्रहारचे बच्चू कडू यांना संधी दिली. अजितदादा यांच्या राष्ट्रवादीने अजितदादा यांचे विश्वासू अमोल मिटकरी यांना डावलून आपले मुस्लिम कार्ड बाहेर काढले. विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले बाबा सिद्दिकी यांचे पुत्र झीशान सिद्दीकी यांना विधान परिषदेत संधी देण्यात आली. विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने पुन्हा संधी दिली आहे. राहुल गांधी यांचे निकटवर्तीय राजीव सातव यांच्या निधनानंतर काँग्रेसने त्यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेवर संधी दिली होती. त्यांनी विधान परिषदेचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे या विधान परिषद पोटनिवडणुकीत भाजपने प्रज्ञा सातव यांना पुन्हा संधी दिली.

उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी पुन्हा एकदा काँग्रेसला टोपी घातली. शिवसेनेने राज्यसभा निवडणुकीत शरद पवार यांचे नाव सुचवून काँग्रेसला त्यांना पाठिंबा देण्यास भाग पाडले. त्याचवेळी विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसला संधी मिळणार नाही हे स्पष्ट झाले होते. विधान परिषद निवडणुकीत विजयासाठी आवश्यक असलेली मते शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडे असल्याने त्यांनी काँग्रेसला विश्वासात न घेताच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आपला उमेदवार जाहीर केला. हा उमेदवार जाहीर केल्यानंतर मग काँग्रेस नेते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या मागे फरफटत गेले. आता पुढील राज्यसभा आणि विधान परिषद काँग्रेसला मिळणार या आशेवर काँग्रेस नेते आहेत.
मुख्यमंत्र्यांचे माजी पीए सुमित वानखेडे यांच्यासाठी वर्ध्यातून दादाराव केचे यांचे तिकीट कापले होते. त्यानंतर त्यांना फक्त वर्षभरासाठी विधान परिषदेवर संधी देऊन त्यांची बोळवण केली आहे. ठाण्यातून माधवी नाईक यांना संधी देऊन तेथील संघटन मजबूत करण्याचे भाजपने ठरवले आहे.

विधान

नगरमधील प्रस्थ असलेले कोल्हे कुटूंब भाजपने आपल्याकडे घेतले आहे. त्यांनी माजी आमदार बिपिन कोल्हे यांचे पुत्र विवेक यांना संधी दिली आहे. सिंधुदुर्गातून एकदा चुकून आमदार झालेले प्रमोद जठार यांना संधी देऊन भाजपने पुन्हा एकदा खासदार नारायण राणे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपमध्ये विशेषतः कोकणात त्यांच्याविषयी नाराजी आहे. संघटन सचिव सुनील कर्जतकर यांना संधी देऊन त्यांच्या पेन्शनची सोय भाजपने केली आहे. शिवसेनेने 71 वर्षीय डॉ. नीलम गोऱ्हे यांना संधी देऊन पक्षात नाराजी ओढवून घेतली आहे. पक्षात विरोध असताना केवळ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शब्दाखातर त्यांना विधान परिषदेत संधी मिळाली आहे. मात्र त्याचवेळी माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांना संधी देऊन शिवसेनेने चांगला निर्णय घेतला आहे. पश्चिम विदर्भात एकसंघ शिवसेनेचा चांगला जोर होता. परंतु एकसंघ शिवसेनेच्या संपर्क नेत्यांनी या भागाची वाट लावल्याने भाजपचा येथे जोर वाढला. आता बच्चू कडूंसारख्या संघटक असलेल्या कार्यकर्त्याला संधी देऊन या भागात शिंदे यांची शिवसेना आपले चांगले बस्तान बसवू शकते.

अजितदादा यांच्या राष्ट्रवादीतून अमोल मिटकरी आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे यांचे नाव आघाडीवर होते. परंतु दोन्ही नावांना विरोध झाल्याने यावेळी या पक्षाने आपले मुस्लिम कार्ड बाहेर काढले. भाजपसोबत गेल्याने मुस्लिम मतदारांनी पाठ फिरवू नये यासाठी झीशान सिद्दिकी यांना संधी दिली आहे. त्यांचे वडील बाबा सिद्दिकी काँग्रेसचे आमदार होते. परंतु इडीच्या कारवाईपासून वाचण्यासाठी त्यांनी अजितदादा यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. वांद्रे पश्चिम येथून पराभव झाल्यानंतर त्यांचे पुत्र झीशन सिद्दिकी यांना काँग्रेसने वांद्रे पूर्वमधून संधी दिली. तेथून ते गेल्या विधानसभा निवडणुकीत निवडून आले. या विधानसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेचे वरुण देसाई यांनी त्यांचा पराभव केला. त्यामुळे त्यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली आहे. थोडक्यात काय, विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने प्रत्येक राजकीय पक्षाने आपले राजकीय इस्पित जोपासण्याचा पुरेपूर प्रयत्न केला.

(लेखक नितीन सावंत ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आहेत. संपर्क- 9892514124)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

मुंबईतला ‘अल्पसंख्य’ मराठी माणसाला साथ तरी देणार कोण?

राज्यात पुन्हा एकदा मराठी सक्तीवरून राजकारण सुरू झाले आहे. रिक्षा-टॅक्सी वाहनचालकांना एक मेपासून मराठी सक्ती करण्याचा निर्णय राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी जाहीर केल्यानंतर यावरून पुन्हा एकदा महायुतीतील पक्षांमध्येच संघर्ष होण्याची शक्यता आहे. मुळात परिवहनमंत्र्यांचा हा निर्णय महायुतीतील पक्षांनाच...

पोटनिवडणुका ठरवतील भवितव्य सहानुभूतीच्या लाटेचे

राज्यात एप्रिलअखेर बारामती आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघात निवडणुका होत आहेत. या पोटनिवडणुका जाहीर झाल्यापासून राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे बारामतीची पोटनिवडणूक होत आहे तर शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे राहुरीची निवडणूक होत...

ठेवी शाबूत राखण्याचे आव्हान मुंबईच्या आयुक्त पेलतील का?

महाराष्ट्रात आयएएस पोस्टिंग झाली की प्रत्येक अधिकाऱ्याची मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आणि राज्याचे मुख्य सचिव हे स्वप्न असते. त्याचबरोबर आयपीएस अधिकाऱ्याची पोस्टिंग महाराष्ट्रात झाली की त्यांचे स्वप्न मुंबई शहराचे पोलीस आयुक्तपद हे असते. महाराष्ट्राचे पोलीस महासंचालकपद नाही. मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी...
Skip to content