Homeमाय व्हॉईसमहाराष्ट्रातली तरुणाई नशेत...

महाराष्ट्रातली तरुणाई नशेत धुंद!

मुंबईतील गोरेगाव येथे नेस्को सेंटरमध्ये परवा गाण्याच्या एका लाईव्ह कार्यक्रमात अवघी तरुणाई बेधुंद नाचत नशेत धुंद झाली होती. इतकी की, त्या ड्रग्जसेवनाने एमबीए झालेल्या दोन तरुणांचा, एक मुलगा आणि एक मुलगी ह्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तिथे ८० टक्के मुलांनी ड्रग्जचे (अंमली पदार्थ) सेवन केले होते. ह्या दोन तरुणांनी ड्रग्जचे अतिसेवन केले होते. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे समजते. त्याचदिवशी, गुजरात पोलिसांच्या तावडीतून निसटलेल्या महमद आरिफ ह्याला खार पोलिसांनी अटक केली आहे. अंधेरी पूर्वेला एका 13 हजार रुपये भाड्याच्या खोलीत तो 30 कोटींचे ड्रग्जचे रॅकेट चालवत होता. तर त्याचदिवशी राजधानी एक्सप्रेसमधून प्रवास करणार्‍या महिलेकडून नागपूर पोलिसांनी ४ कोटी रूपयांचे ड्रग्ज हस्तगत केले आहेत. पुण्याजवळील पिंपरी-चिंचवड येथे ड्रग्जचे आणखी एक रॅकेट उद्ध्वस्त करून २  कोटी ६० लाख रुपयांचे ड्रग्ज हस्तगत केले आहेत. ह्या सगळ्या प्रकरणावरून मुंबई किंवा महाराष्ट्र ड्रग्जच्या नशेत धुंद झाला आहे की काय, अशी शंका येते. इतक्या उघडपणे, राजरोसपणे ड्रग्जचा धंदा करणारे वावरत आहेत, की त्यांना कसलीच भीती उरली नाही, असे वाटते. ह्या काही केसेस टीप मिळाल्यावर पोलिसांनी पकडल्याच्या झाल्या. पण इतका राजरोसपणे ड्रग्जचा धंदा तेजीत चालतोय की, महाराष्ट्रचे गृहखाते आणि पोलीस झोपले आहेत की काय, अशी शंका येते.

गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये म्यूजिक कॉन्सर्टसाठी 11 एप्रिलला सुमारे 4 हजार तरुण मुले-मुली जमली होती. तिथे एमडीएमए हे ड्रग अक्षरशः वाटण्यात आले. ह्या ड्रगच्या सेवनामुळे तात्पुरता उत्साह, आनंद वाटतो, पण ह्याचे अनेक दुष्परिणामही होतात. अतिसेवनाने श्वास घ्यायला त्रास होणे, शरीराला प्राणवायूचा पुरवठा न होणे, त्याचा शरीरातील इतर अवयवांवर परिणाम होतो आणि प्रसंगी मृत्यूही ओढवतो. ह्या दोन मुलांच्या मृत्यूमुळे हे प्रकरण उघडकीस आले. आणखी एका तरुणीची प्रकृती गंभीर आहे. विशेष म्हणजे हे ड्रग्ज कृत्रिमरित्या, रसायनापासून बनवलेले आहे. ह्याप्रकरणी आता ६ जणांना अटक झाली आहे. त्यात नेस्कोच्या सुरक्षारक्षकाचा आणि मालकाचाही समावेश आहे. विशेष म्हणजे, गाण्यांचा हा कार्यक्रम संपल्यानंतरही ही मुले बाहेर पार्किंगमध्ये धुंदीत अर्धनग्न अवस्थेत नाचत होती. आणखी कहर म्हणजे पुन्हा दुसर्‍या दिवशीही असा कार्यक्रम ९९९ ह्या आयोजकांनी ठेवला होता. ह्यावेळी कुठलाही पोलीस बंदोबस्त किंवा सुरक्षायंत्रणा नव्हती.

महाराष्ट्र

आता ह्याचा तपास होईल. पण आजची तरुण पिढी ह्या ड्रग्जच्या नशेत ओढली जात आहे, हे नक्की. ह्याचे कारण म्हणजे महाविद्यालयात, शाळेजवळही ड्रग्ज सहज उपलब्ध होणे आणि व्यसन लागायला काही वेळ लागत नाही. काही वर्षांपूर्वी पुण्याजवळ एका रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापा घातला होता आणि मुंबई-पुण्यातली अनेक उच्चभ्रू कुटुंबातील सुशिक्षित मुले त्यात सापडली होती. आजही तीच अवस्था आहे. अनेक सुशिक्षित, उच्चशिक्षित मुले ह्या ड्रग्जच्या जाळ्यात ओढली जात आहेत. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्त्येनंतर बॉलीवूडमधील असे ड्रग्जचे व्यसन असलेले चेहरे पुढे आले होते. त्यात अनेक प्रथितयश कलाकारांचा समावेश होता. त्यानंतर अभिनेता शाहरुख खान ह्याचा मुलगाही एका क्रुझवरील पार्टीत सापडला होता. त्याला पोलीस कोठडीतही ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्याची निर्दोष मुक्तता झाली हे खरे असले तरी असा आरोप असणेही योग्य नव्हे.

तर असा हा नशेचा फैलाव वाढतोच आहे. ह्यात आता अनेक मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातील मुलांचाही समावेश आहे. आपल्या तरुण मुलांना अशा व्यसनापासून वाचवणे हे पालकांसमोर मोठेच आव्हान आहे. ह्यासाठी कुटुंबातील तरुण मुलांवर लक्ष ठेवण्याची गरज आहे, त्यांच्याशी संवाद ठेवणं आवश्यक आहे. ते कुठे जातात, रात्री-अपरात्री घराबाहेर असतात का, त्यांचे मित्रमंडळ कोण आहे, ते जास्त पैसे खर्च करतात का, अशा अनेक गोष्टी पालकांनी लक्षात घ्यायला पाहिजेत. कधीकधी महागडे ड्रग्ज घेण्यासाठी पैसे नसतात, तर मुले घरात काहीवेळा चोरीही करतात. म्हणूनच पालकांनी अशा गोष्टी संयमाने हाताळण्याची गरज आहे. ह्यासाठी अनेक व्यसनमुक्ती केंद्रेही आहेत आणि मुलांना समजून घेऊन समुपदेशनही करता येते. मात्र हा झाला नंतरचा भाग. मुळात आपली मुले अशा ड्रग्जच्या व्यसनात अडकूच नये ह्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. सरकार, गृहखाते आणि पोलीस, ह्यांनीही असे ड्रग्जचे पुरवठादार ह्यांना वेळीच अटक करून कारवाई करण्याची गरज आहे. नाहीतर विरोधी पक्ष म्हणतात त्याप्रमाणे महाराष्ट्राचाही उडता महाराष्ट्र.. व्हायला वेळ लागणार नाही!

(लेखक वैजयंती कुलकर्णी आपटे ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

Continue reading

पावसापाण्यात मुंबईकरांना आशा फक्त देवाभाऊंकडून!

गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घातला आहे. संपूर्ण राज्यात अनेक भागात कुठे रेड अलर्ट, कुठे ऑरेंज तर कुठे यल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या महिन्यापासून पावसाची प्रतीक्षा होती. एल निनोमुळे यंदा पाऊस कमी बरसणार असे सगळे सांगत होते. मात्र...

बाळासाहेबांप्रमाणेच उद्धव ठाकरेंची धरसोड वृत्ती आली अंगलट!

ऑपरेशन टायगर शिवसेनेच्या सहा फुटीर खासदारांच्या मतदारसंघाचा दौरा करून शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुंबईत परत आले, तर आल्याआल्याच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यानी त्यांना आणखी एक धक्का दिला. उबाठाचे नेते आणि आदित्य ठाकरे ह्यांचे विश्वासू सचिन अहिर ह्यानी पक्षाला...

उरलेल्या उबाठा सेनेपुढे फुटीचे आव्हान कायम!

अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यांचे 'ऑपरेशन टायगर' यशस्वी  झाले. शिवसेना उबाठा गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर ह्यांनी जाहीरपणे ते शिंदे ह्यांच्याबरोबर आहेत, असे कालच सांगितले. त्यामुळे ऑपरेशन टायगरची अनिश्चितता संपुष्टात आली. राज्य विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला बोलताना शिंदे म्हणाले की, आम्ही कुठलेही...
Skip to content