Homeब्लॅक अँड व्हाईटमंदिर ठरणार कोकणातले...

मंदिर ठरणार कोकणातले ‘गेमचेंजर’!

इथे जे छायाचित्र आहे ते कोकणातल्या लांजा तालुक्यातील वेरवली खुर्द गावात बांधकाम सुरु असलेल्या मंदिराचे आहे. या वर्षी बांधकाम पूर्ण होईल. हे खूप मोठे मंदिर किंवा प्रकल्प नाही. पण गावातील लोकांच्या भावना खूप मोठ्या आहेत. या मंदिरात लक्ष्मी नृसिंह, शांतादुर्गा आणि अर्थातच गणेश मूर्ती आहेत. त्या गावात वाजतगाजत आल्या आहेत. माझ्यासाठी या भावनात्मक गोष्टी आहेत. या मंदिराचा इतिहास आपल्या जागी आहे. पण गावात मंदिर असणे हा भारतीय संस्कृतीत महत्त्वाचा भाग आहे. गावाच्या भावनिक विकासात गावाची भूमिका महत्त्वाची आहे. मला सोलापूर जिल्ह्यातील मंदिरांचे उदाहरण द्यावे असे वाटते. या जिल्ह्यात अनेक मंदिरे आहेत आणि आर्थिक विकासात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. माझ्या गावातदेखील अनेक मंदिरे आहेत. तेथे दत्तजयंती, रामनवमी आदी उत्सव साजरे करण्यात येतात. आज गावात वीज आली आहे. पण जेव्हा कंदील, बत्ती, बॅटरी आदी साधने वापरली जात होती तेव्हादेखील उत्सव साजरा होत असे. अगदी अलिकडे मे महिन्यात गावात हे मंदिर आधीच्या रुपात होते तेव्हा अकाली पावसाने वीज गेली होती. पण काही अडले नाही. सगळे पुढे आले आणि नृसिंह जयंतीचा उत्सव थाटामाटात साजरा करण्यात आला.

मला माहिती आहे तसे सरदेसाई यांच्या घरात एका खोलीत हे मंदिर होते. या घराच्या समोर आमची वडिलार्जित जमीन आहे. तिथे आमचे घर होते. मला कळायला लागले तेव्हा हे घर ढासळले होते आणि आम्ही दुसरीकडे राहयला गेलो. नंतर आम्ही भावंडे पुण्यात आलो त्याला आता साठ वर्षे झाली. माझ्या बहिणी आणि सर्वात मोठा भाऊ आधीच पुण्यात आले होते.
हा इतिहास महत्त्वाचा नाही. स्थलांतर ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण गावची ओढ कमी होत नाही. तर सरदेसाई यांच्या घरात वर्षानुवर्षे नृसिंह जयंती उत्सव साजरा करण्यात येई. पुढे वर्षभर पूजाअर्चा सरदेसाई करीत. मग मंदिर उभे करण्याचा विचार सुरु झाला. स्वतंत्र जमीन घेऊन मंदिर बांधावे असे प्रयत्न करण्यात आले. अखेर सरदेसाई यांनी आपले घर नवे मंदिर बांधण्यासाठी ट्रस्टच्या नवे करुन दिले. आता मंदिर आकार घेत साकार होत आहे.

गावातील उंबरा आणि लोकसंख्या लक्षात घेता मंदिर आणि परिसर पुरेसा आहे. गावात जमीन चढउताराची आहे. त्याचठिकाणी घरे आणि मंदिरे आहेत. यानिमित्ताने भावनिक नाती महत्त्वाची असतात. आज संपर्काची साधने आहेत. गुराखीदेखील मोबाईल घेऊन शेतात जातात. गुरांनादेखील संगीत ऐकायला मिळत असेल. गोठ्यात सनईचे सूर ऐकू येत असतील तर गायी रमतात, असा अनुभव आहे. तर या गावात भावनिक नाती माझ्या लक्षात आहेत ती कधीतरी पुण्यातून गावी जाण्याचा योग येईल तेव्हा. ज्येष्ठ व्यक्तींचे भय मनात कायम असायचे. काकू मात्र जवळच्या. न सांगता कोठेही जाणे निषिद्ध नव्हते. घरे मोठी असल्याने कोणी पाहुणा येत असेल तर पायरव लागे. जनावर परसात चरत असेल तर तेही इशारा देत असे. मार्कुट्या जनावरांच्या नशिबी दोरी असे. गरीब बैलांनी कित्येक पोरांना अंगावर खेळवले आहे. गावात आल्यावर मंदिरात येणे होत असे. बाबूकाका भेटत. काकू आवर्जून स्वागत करीत. जास्वंदी, नादेटीची फुले वाहिलेली असत. पितळेच्या तांब्यात पाणी आणि गुळाचा खडा येणार हे पक्के. सगळे लोक श्रीमंत नव्हते, पण संपन्न होते. फणस फोडलेला असेल तर गरे मिळणार. आंब्याची आढी बहुतेक ठिकाणी असेच. तर कधी आलास, काय करतोस, भाऊंकडे गेला होतास का वगैरे चौकशी होत असे.

मी गावात गेलो की आमच्या जमिनीवर आवर्जून जातो. तिथून हे घर दिसत असे. आमची जमीन नदीच्या काठावर. पण बराच उतार असल्याने राहणे कठीण. तरीही आधीच्या काही पिढ्या इथे राहिल्या. इथे एक साकव होता, जो पलिकडे या घराच्या जवळ जात असे. तो आता नाही. जमिनीत जायचे तर एकट्याने जाणे अवघड वाटते. पण हे घर आणि मंदिर उंचावर असल्याने टिकून राहिले. आता आधीचे घर पाडून तिथे मंदिर उभे राहत आहे. सरदेसाई यांनी जमीन ट्रस्टला दिली आणि जवळच नवे टुमदार घर बांधले आहे. यंदा उत्सव त्यांच्या घरात साजरा झाला. आंगण भक्तांनी भरुन गेले होते. मंदिर वेळेच्या आधी तयार व्हावे म्हणून खटपट करण्यात आली. पण दैवी शक्ती आपल्या वेळापत्रकानुसार काम करते. सगळा प्रकल्प आता वेग घेतो आहे. त्याचे उद्घाटन होईल तेव्हा आपण तेथे असावे असे वाटणारच.

प्रकल्प उभा करण्याची प्रक्रिया दीर्घकाळ चालली. एक ट्रस्ट स्थापन करण्यात आला. पत्रव्यवहार, हिशेब याचे छान नियोजन करण्यात आले. आता बँकिंग सोपे झाले आहे. येणारी रक्कम आणि होणारा खर्च याचा ताळमेळ लगेच लागतो. whatsapp ग्रूप तयार करण्यात आला आहे. तिथे अनुभव शेअर केले जातात. त्यानिमित्ताने अनेक कुटुंबे एकमेकांना जोडली गेली आहेत. शाळेत एकत्र असलेले काही मित्र या निमित्ताने भेटले. मोबाईल नंबर आयते हाती आले आणि संपर्क सोपा झाला. गाव आणि मंदिर हे समीकरण वेगळे आहे. कोकणात भविष्यात लोक माघारी येतील असे बोलले जात आहे. कोरोना काळात काही लोक गावात परत आले. रत्नागिरी जिल्ह्यात विदेशातील मंडळी परत आली आहेत आणि अनेकांनी काही प्रकल्प उभारले आहेत. कामाला माणसे नाहीत आणि माणसांना काम नाही, अशी परिस्थिती भविष्यात नसेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही. अशा परिस्थितीत मंदिरांची भूमिका आगामी काळात महत्त्वाची ठरणार आहे.

(लेखक मनोहर सप्रे ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

पवारांनी वाजवले ढोल! दिसले नेहरुंचे आभासी मोठेपण!!

इतिहासाचा त्रयस्थ अभ्यास न करता एखाद्या व्यक्तीला मोठेपण देणे आणि तो बोजा कायम ठेवणे धोक्याचे असते. जवाहरलाल नेहरु हे भारतीय राजकारणात सर्वांत मोठे आणि बरेचसे वादग्रस्त व्यक्तिमत्व. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवाहरलाल नेहरु यांना त्यांच्या कारकिर्दीच्या संदर्भात नुकतेच मागे...

कर्नाटक आणि काँग्रेसचा तीनखांबी तंबू!

कर्नाटकात २०२४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला आठ जागांवर फटका बसला होता. काँग्रेस पक्षाला त्याआधी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळाले होते. २२४ जागा असलेल्या विधानसभेत काँग्रेस पक्षाला १३५ एवढ्या मजबूत जागा होत्या. त्या निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला. याचे कारण...

कॉक्रोच जनता पार्टीचा ताप आहे तरी कुणाला?

ज्या पक्षाला निवडणूक आयोगाची मान्यता मिळालेली नाही त्या पक्षाची दखल घेऊन त्याबाबतीत रकाने खरडणे किती योग्य आहे हे संबंधित व्यक्तींने ठरवणे योग्य ठरेल. पण गेले काही दिवस असे बरेच लिखाण झाले आहे ते विसरता येत नाही. कोरोना येऊन गेला...
Skip to content