Homeमाय व्हॉईसतामीळनाडूत अण्णामलाई यांनी...

तामीळनाडूत अण्णामलाई यांनी जमवलेला किराणा, शिजवून खाल्ला विजय यांनी!

पेरियार यांच्या पक्षापासून फारकत घेऊन १९४९मध्ये अण्णादुराई यांनी स्थापन केलेल्या द्रमुकची सूत्रे नंतर करुणानिधी यांच्याकडे गेली. १९७२मध्ये अभिनेते एम. जी. रामचंद्रन यांनी द्रमुकमधून बाहेर पडून पक्षाच्या नावामागे अण्णा शब्द जोडला आणि अण्णाद्रमुक हा पक्ष अस्तित्त्वात आला. काँग्रेस पक्षाचा प्रभाव काही काळ तामीळनाडूत होता. पण पुढे आलटून पालटून या दोन द्रमुक पक्षांनी आजवर तामीळनाडूचे राजकारण केले आहे. आपण १९९०नंतरच्या राजकारणाकडे बघायला हरकत नाही. जयललिता आणि करुणानिधी यांच्यात असलेला टोकाचा राजकीय संघर्ष. कित्येकदा तो नको त्या मार्गावर गेला. जयललिता यांचा विधानसभेत अवमान करण्यात आल्यानंतर त्यांनी आता सभागृहात येईन ती मुख्यमंत्री म्हणून अशी शपथ घेतली आणि ती पूर्ण झाली. एम. जी. रामचंद्रन यांचा राजकीय वारसा जयललिता यांच्याकडे आला. त्या मूळच्या तामीळनाडूतील नव्हेत. तरीही तेथील जनसमूह त्यांच्या पाठीशी उभा राहिला. करुणानिधी हयात असेपर्यंत पक्षावर त्यांचा प्रभाव राहिला. त्यांचे पुत्र स्टालीन यांना कायम दुय्यम भूमिका घ्यावी लागली. करुणानिधी यांच्या निधनानंतर सूत्रे स्टालीन यांच्याकडे आली खरी, पण तोपर्यंत ते स्वतः सत्तरीच्या उंबरठ्यावर होते. राजकीयदृष्ट्या प्रभाव पाडण्याचा काळ उरला नव्हता.

जयललिता यांची २०१६ची निवडणूक आठवावी. या निवडणुकीत एक्झिट पोल जयललिता यांचा पराभव दाखवत होते. मात्र जयललिता यांनी अत्यंत शांतपणे सांगितले की, दोन दिवस वाट बघा. आणि खरोखरच जयललिता यांच्या अद्रमुक पक्षाला विधानसभेत दणदणीत १३४ जागा मिळाल्या. मात्र दुर्दैवाने आणि तब्येतीची काळजी न घेण्याची खोड असल्यामुळे जयललिता यांचे एका अर्थाने अकाली आणि अवेळी निधन झाले. जयललिता रुग्णालयात होत्या तेव्हा त्यांनी पनीरसेल्वम यांना मुख्यमंत्री केले होते. मात्र त्यांना हे पद झेपले नाही. नंतर केंद्रात असलेल्या भाजप सरकारने पद्दतशीर मध्यस्थी करुन पलानीस्वामी यांना मुख्यमंत्रीपदी आणण्याची व्यवस्था केली. दरम्यानच्या काळात जयललिता यांचा वारसा त्यांची जिवलग मैत्रीण शशिकला यांच्याकडे येतायेता राहिला आणि त्यांच्या नशिबी तुरुंगवास आला. केन्द्रात असलेल्या भाजप सरकारने पलानीस्वामी यांना सांभाळले खरे, पण त्यांची पक्षावर आणि जनसमूहावर पकड नसल्यामुळे २०२१च्या विधानसभा निवडणुकीत अद्रमुक पक्षाचा पराभव झाला. पण त्यातही एक सकारात्मक बाब म्हणजे पक्षाला ७७ जागा मिळाल्या आणि मतदान जवळपास ३३% एवढे मिळाले. द्रमुकचे मतदान यापेक्षा तीन टक्के अधिक होते, पण मित्रपक्षांना मिळालेले मतदान जोडून बघितले तर ते चाळीस टक्के किंवा अधिक होते.

तामीळनाडू

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत द्रमुकचा पराभव होणार नाही, असा एकंदरीत कल दिसत होता. पण मुख्य लढत द्रमुक आणि अद्रमुक यांच्या आघाडीत होईल आणि दोन वर्षांपूर्वी मैदानात उतरलेला अभिनेता विजय, हा कमल हसन यांच्या पक्षाने केलेल्या शून्य जागा मिळविण्याएवढी किंवा कदाचित दोन आकडी पण मर्यादित जागा मिळवील, अशी अपेक्षा होती. पण मतदानाचा कौल आणि आकडेवारी बघितली तर स्टालीन आणि पलानीस्वामी या दोघांनाही जनतेने नाकारले आहे हे स्पष्ट दिसते. एका अर्थाने प्रादेशिक पक्षांची पंच्याहत्तर वर्षांची मक्तेदारी संपली आणि एक नवा पक्ष आणि काही अपेक्षा ठेवाव्या, असा नेता दिसला म्हणून मतदारांनी उमेदवार न बघता नव्या पक्षाला भरभरुन मतदान केले. भाजपमध्ये दाखल झालेले माजी सनदी अधिकारी आणि सिंघम म्हणून ओळखले जाणारे अण्णामलाई यांची गेल्या काही वर्षांतील राजकीय वाटचाल लक्षात घेतली तर तामीळनाडूच्या सध्याच्या आणि भावी राजकारणात काय होऊ शकते याचा अंदाज घेता येईल. जयललिता यांच्या पक्षाचे सरळसरळ विभाजन झाले असून एका मोठ्या गटाने मुख्यमंत्री विजय यांना पाठिंबा दिला आहे. आता पलानीस्वामी यांना नेता म्हणून पुन्हा उभे राहणे अवघड दिसते. पक्षावर आणि कार्यालय वगैरे यावर ताबा मिळवण्यासाठी मोठा संघर्ष होईल.

मुख्यमंत्री असताना केन्द्रात असलेल्या भाजप सरकारने पलानीस्वामी यांना बरेच सांभाळून घेतले हे खरे, पण त्यांनी भावी राजकारणात भाजपला बरोबर घेण्यात जोखीम आहे असे समजून फारसे महत्त्व दिले नाही. भाजपच्या नेत्यांची नेमकी काय भूमिका होती हे कळत नाही, पण पलानीस्वामी यांच्यावर नको तेवढा भरवसा ठेवून भाजपने आपला नेता अण्णामलाई यांच्या पायात अकारण बेड्या बांधल्या. वास्तविक केरळ आणि तामीळनाडू या दोनही राज्यांमध्ये अण्णामलाई यांच्या जाहीर सभांना मोठा प्रतिसाद मिळत होता. तामीळनाडूत गेल्या निवडणुकीत भाजपने कोणाशी युती केली नव्हती. पक्षाचे चार उमेदवार निवडून आले होते. ही कामगिरी तशी मोठी होती. आधी चंचूप्रवेश करुन नंतर ताकद वाढवणे हा भाजपचा कार्यक्रम असतो. अण्णामलाई त्या मार्गाने जात होते. त्यांच्या सभांना मोठा प्रतिसाद मिळत होता. मुख्यतः स्टालीन यांच्या विरोधात वातावरण तयार होण्यासाठी अण्णामलाई यांच्या प्रचाराचा मोठा उपयोग झाला. पण विधानसभा निवडणुकीत अण्णाद्रमुक पक्षाबरोबर युती करताना भाजपने दुय्यम भूमिका घेऊन फक्त २७ जागा लढवल्या. भाजपला मानणाऱ्या लोकांची मते अद्रमुक पक्षाच्या उमेदवारांना मिळाली असावीत, पण ती मते भाजपकडे आली नाहीत. त्यामुळे एक उमेदवार कसाबसा निवडून आला.

तामीळनाडू

स्टालीन यांच्या कारकिर्दीत आर्थिक आघाडीवर तामीळनाडूची कामगिरी चांगली आहे असे दिसते. पण त्यांचा लोकांशी असलेला संपर्क मर्यादित राहिला. सत्तेमुळे आलेली श्रीमंती आणि काही प्रमाणात मस्ती अंगलट आली. कोणताही अभ्यास नसलेला स्टालीन यांचा मुलगा उदयनिधी यांच्याकडे कधी सत्ता गेली तर काय होईल ही भीती लोकांच्या मनात होती. शिवाय करुणानिधी हयात असताना स्टालीन जसे दुय्यम मानले जात तीच परिस्थिती उदयनिधी याच्या संदर्भात निर्माण झाली. घराणेशाही काही मर्यादेत सहन होते. ती डोक्यावर बसायला लागली की लोक झुगारून देतात. थोडक्यातj, दोन द्रमुक पक्षांची सद्दी संपवण्यात बरीच मोठी भूमिका अण्णामलाई यांनी बजावली. एक लक्षात घ्यायला हवे की चाळीशीत असलेले अण्णामलाई हे हंगामी राजकारण करण्यासाठी सनदी नोकरी सोडून आलेले नाहीत. नोकरीत राहून मोठी कामगिरी करण्याची त्यांना संधी होती. पण जे काही करु ते राज्यात अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. बराच संयम असल्याने त्यांना पक्षाच्या भूमिकेमुळे बाजूला पडावे लागले तरी निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून अण्णामलाई यांनी बराच संयम पाळला आहे.

या निवडणुकीचा विचार केला तर असा निष्कर्ष काढता येईल की, अण्णामलाई यांनी शिधा व्यवस्थित जमा केला, पण त्याचा स्वयंपाक अभिनेता विजय यांनी केला आणि जेवणावळी झाल्या.
आता पुढे काय? द्रमुकचा वारस म्हणजे उदयनिधी. त्यांची वादग्रस्त विधाने आणि घराणेशाहीचा बोजा लक्षात घेतला तर पक्ष पुन्हा उभा करणे ही महाकठीण कामगिरी आहे. मोठे आव्हान आहे. आमदार असल्याने सत्ता एका अर्थाने आहेच. आता स्टालीन नेमके काय करणार हा प्रश्न आहे. कदाचित चौकशी वगैरे मागे लागायला नको म्हणून मुख्यमंत्री विजय यांच्याशी जमवून घेण्याची भूमिका त्यांना घ्यावी लागेल. मुख्यमंत्री विजय यांनी भरभरुन आश्वासने दिलेली असल्यामुळे ती पूर्ण करण्यासाठी पैसे आणायचे कोठून हा मोठा प्रश्न आहे. ते आव्हान आहेच. मोठी आश्वासने दिल्यामुळे मतदान मिळाले आहे हे वास्तव आहे. त्यामुळे त्यासंदर्भात काही मत व्यक्त न करता प्रतीक्षा करणे बरे. यावेळी अण्णामलाई यांनी जमवलेला शिधा विजय यांना उपयोगी पडला. पण पुढील पाच वर्षे महत्त्वाची आहेत, आणि अण्णामलाईही तयारी करीत आहेत. बघू पुढे काय होते ते…

(लेखक मनोहर सप्रे ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आहेत.)

Continue reading

कर्नाटक आणि काँग्रेसचा तीनखांबी तंबू!

कर्नाटकात २०२४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला आठ जागांवर फटका बसला होता. काँग्रेस पक्षाला त्याआधी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळाले होते. २२४ जागा असलेल्या विधानसभेत काँग्रेस पक्षाला १३५ एवढ्या मजबूत जागा होत्या. त्या निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला. याचे कारण...

कॉक्रोच जनता पार्टीचा ताप आहे तरी कुणाला?

ज्या पक्षाला निवडणूक आयोगाची मान्यता मिळालेली नाही त्या पक्षाची दखल घेऊन त्याबाबतीत रकाने खरडणे किती योग्य आहे हे संबंधित व्यक्तींने ठरवणे योग्य ठरेल. पण गेले काही दिवस असे बरेच लिखाण झाले आहे ते विसरता येत नाही. कोरोना येऊन गेला...

काटकसर नावाची मिळवती जोडीदारीण!

वसुधैव कुटुंबकम, ही संकल्पना छान आहे. हे विश्वची माझे घर असेही आपण म्हणतो. महाराष्ट्रात एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात एसटी बसने जायला बारा तास लागत असतील तर तेवढ्या वेळात माणूस दिल्लीतून पॅरीससुद्धा जाऊ शकतो. मुद्दा आहे तो खर्च करण्यासाठी हाती...
Skip to content