इतिहासाचा त्रयस्थ अभ्यास न करता एखाद्या व्यक्तीला मोठेपण देणे आणि तो बोजा कायम ठेवणे धोक्याचे असते. जवाहरलाल नेहरु हे भारतीय राजकारणात सर्वांत मोठे आणि बरेचसे वादग्रस्त व्यक्तिमत्व. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवाहरलाल नेहरु यांना त्यांच्या कारकिर्दीच्या संदर्भात नुकतेच मागे टाकले. ही तांत्रिक बाब आहे. सरकारी पातळीवर नोंद म्हणून हे ठीक आहे. नेहरु आणि मोदी यांची तुलना करणे हा हेतू कोणी ठेवला असेल, असे वाटत नाही. पण भारतीय राजकारणात हल्ली भावना लगेच दुखावतात. भाजपने मोदी यांचा सत्कार केला. मित्रपक्ष हजर राहिले. इथे स्पर्धा हा हेतू नाही. पण आपले राष्ट्रीय नेते शरद पवार यांनी लगेच नेहरुंच्या मोठेपणाचे ढोल वाजवले. मुलगा मोठा झाला तरी त्याची तुलना वडिलांशी करायची नाही, ही भारतीय संस्कृती आहे. नवे नेते आधीच्या पिढीने काही केले नाही, असे म्हणत नाहीत. शरद पवार यांनी मोदी यांना कमी लेखण्यासाठी विधान केले आणि ते अनावश्यक होते. वय वाढले म्हणून कोणी मोठे होत नाही, हे विधानदेखील असेच मनातील तिरस्काराची भावना प्रकट करणारे.

नेहरु आणि मोदी यांची तुलना करायची गरज नाही. फारतर त्यावर निबंध स्पर्धा आयोजित करता येईल. पण अभ्यास म्हणून संदर्भ पाहता येतील. नेहरु आणि मोदी यांच्यात मोठा फरक म्हणजे नेहरु यांच्या पाठीशी मातापिता आणि महात्मा होते. स्वातंत्र्यलढा सुरु होता. त्यात फक्त महात्मा गांधी नव्हते. मोतीलाल नेहरु हे श्रीमंत नेते होते. काँग्रेस पक्षात त्यांची मोठी उठबस होती. नेहरु यांचे समकालीन नेते त्यांच्या भूमिका बजावीत होते. स्वातंत्र्य हे लक्ष्य होते. भारताचे प्रतिनिधित्व काँग्रेस पक्ष करीत असल्याचे भारत सोडून जाताना सूत्रे काँग्रेस पक्षाकडे जाणार हे अपेक्षित होते. इथे मोतीलाल यांनी आपल्या पुत्राला नेतृत्त्व मिळावे यासाठी प्रयत्न केले, काही वेळा दबाव आणला हे इतिसाहात नमूद आहे. अभ्यासक मंडळीनी यावर चर्चा करायला हरकत नाही. दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिश सरकारने मार खाल्ला तेव्हा त्यांना भारत सोडून जाणे अपरिहार्य झाले होते. फाळणी टळली असती वगैरे चर्चा आता करण्यात अर्थ नाही. हिंदू आणि मुस्लिम यांचे ऐक्य हे महात्मा गांधी यांना अपेक्षित होते. फाळणी टळावी म्हणून गांधी यांनी माऊंटबॅटन यांच्याशी संवाद साधला आणि जिना यांना पंतप्रधान करा आणि त्यांच्या मंत्रिमंडळात सगळे मंत्री मुस्लिम करा, अशी तयारी दाखवली होती. हा प्रस्ताव नव्हता तर प्रामाणिक प्रयत्न होता असे फारतर म्हणता येईल. माऊंटबॅटन यांनी याकडे दुर्लक्ष केले. व्यवहारात ते शक्य नव्हते.

जवाहरलाल नेहरु यांची भूमिका नेमकी काय होती याचा विचार आता करता येईल. त्यांच्या संदर्भात काही विधाने करणे हा हेतू नाही. पण आपल्याला आता देशाचे नेतृत्त्व करायचे आहे यांची मानसिक तयारी नेहरु यांनी सुरु केली होती. जिना यांना कसाही असला तरी वेगळा देश हवा होता. जनमानसाला भडकावून ते त्यांचा हेतू साध्य करण्यासाठी प्रयत्न करीत होते. आपले आयुष्य फारसे शिल्लक नाही, पण त्या काळात जितक्या लवकर आपल्याला हवे ते मिळेल याची धडपड ते करीत होते. वास्तविक ब्रिटिश १९४८च्या जून महिन्यात जाणार हे अपेक्षित होते. पण इतका वेळ आपण भारतात राहिलो तर परत जाऊ का, ही भीती माउंटबॅटन आणि कंपनीला होती. आणि अशा काळात जवाहरलाल नेहरु यांच्या रुपात माऊंटबॅटन यांना आपला प्रतिनिधी सापडला. आपण एखाद्या गावात कामासाठी गेलो आणि एक सहकारी मिळाला तर बरे वाटते. कदाचित माउंटबॅटन यांना तसे वाटत असेल. म्हणून त्यांचे काम सोपे झाले. आणि पुढे नेहरु पंतप्रधान झाले वगैरे इतिहास आहे.

मुद्दा असा आहे की, फाळणी करायची होती तर ती इतक्या वेगाने का झाली? ती होऊ नये आणि इथला सामाजिक सलोखा दीर्घकाळ राहावा यासाठी नेहरु यांनी काही प्रयत्न केले होते का? भारत आणि पाकिस्तान यांच्यात सीमारेषा तयार करण्याची जबाबदारी रेडक्लिफ यांच्याकडे होती. त्यांनी कागदावर नकाशे काढले आणि रेषा काढून सरकारला दिले. त्यांना एव्हढी घाई झाली होती की आपले मानधन तीन हजार पौंड न घेता ते इंग्लंडला रवाना झाले. या सर्व घडामोडी नेहरुंच्या समोर घडत होत्या. पण फाळणी प्रत्यक्षात कधी होणार आणि अखंड भारतीय प्रजेचे भविष्य काय या संदर्भात नेहरु यांची भूमिका नेमकी काय होती, यावर चर्चा झाली पाहिजे. लाखो लोक दंगलीत ठार झाले. अब्रू गेली. लोक भिकारी झाले. नेहरु यांना सत्ता मिळाली आणि त्यांनी ती आपली पदसिद्ध मालमत्ता मानली आणि आपल्या कुटुंबात राहावी ही धडपडही केली, हा इतिहास आहे. याबाबतीत तपशीलवार लिखाण होणे अपेक्षित आहे. पाहूया केव्हा होते ते…
(लेखक मनोहर सप्रे ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

