Homeहेल्थ इज वेल्थमोबाइलवर रील्स पाहण्यात...

मोबाइलवर रील्स पाहण्यात का गुंतून जातो आपण? डोळ्यांचे काय??

आज मोबाइल फोन आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण सतत मोबाइलच्या संपर्कात असतो. संवाद साधणे, शिक्षण, बँकिंग, मनोरंजन, आरोग्यसेवा, ऑनलाइन खरेदी, माहिती मिळवणे आणि सामाजिक संबंध टिकवणे, अशा सर्वच क्षेत्रांत मोबाइलने जीवन अधिक सोपे केले आहे. विशेषतः कोविड-१९नंतर डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. परंतु त्याचबरोबर काही प्रश्नही निर्माण झाले आहेत. मोबाइलचा डोळ्यांवर परिणाम होतो का? आपण रील्स पाहण्यात इतके गुंतून का जातो? डिजिटल डिटॉक्स म्हणजे काय? लहान मुलांवर मोबाइलचा काय परिणाम होतो? या सर्व प्रश्नांची शास्त्रीय आणि संतुलित पद्धतीने उत्तरे जाणून घेणे, आज अत्यंत आवश्यक आहे.

मोबाइलमुळे डोळे खराब होतात का?

आजपर्यंत झालेल्या वैज्ञानिक संशोधनांमध्ये मोबाइल फोनच्या सामान्य वापरामुळे डोळ्यांना कायमस्वरूपी इजा होते किंवा अंधत्व येते, असे कोणतेही ठोस पुरावे आढळलेले नाहीत. मोबाइल वापरामुळे मोतीबिंदू, काचबिंदू (ग्लॉकोमा) किंवा रेटिनाचे गंभीर विकार थेट होत नाहीत. तथापि, दीर्घकाळ स्क्रीनकडे एकटक पाहिल्याने काही तात्पुरत्या समस्या निर्माण होऊ शकतात. या समस्यांना एकत्रितपणे डिजिटल आय स्ट्रेन (Digital Eye Strain) किंवा कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम (Computer Vision Syndrome) असे म्हणतात.

मोबाइल वापरामुळे होणाऱ्या सामान्य समस्या

१. डोळ्यांचा थकवाः सतत स्क्रीनकडे पाहत राहिल्याने डोळ्यांच्या स्नायूंवर ताण येतो. त्यामुळे डोळे जड वाटणे, थकवा येणे किंवा अस्वस्थता जाणवू शकते.

२. डोळे कोरडे पडणेः सामान्यतः आपण एका मिनिटात सुमारे १५ ते २० वेळा पापण्या मिटतो. मात्र मोबाइल वापरताना ही संख्या जवळपास निम्म्यावर येते. त्यामुळे डोळ्यांतील अश्रू लवकर आटतात आणि जळजळ, खुपणे, लालसरपणा यांसारख्या तक्रारी निर्माण होतात.

३. तात्पुरती धूसर दृष्टीः काही तास सलग मोबाइल वापरल्यानंतर दूरच्या वस्तू थोड्या धूसर दिसू शकतात. ही समस्या सहसा तात्पुरती असते.

४. डोकेदुखी आणि मानदुखीः चुकीच्या पद्धतीने बसून मोबाइल पाहणे किंवा अतिशय लहान अक्षरे वाचणे, यामुळे डोके, मान आणि खांद्यांमध्ये वेदना होऊ शकतात.

५. झोपेवर परिणामः रात्री उशिरापर्यंत मोबाइल वापरल्यास शरीराचे जैविक घड्याळ विस्कळीत होऊ शकते. त्यामुळे झोप उशिरा लागणे, झोपेची गुणवत्ता कमी होणे आणि दुसऱ्या दिवशी थकवा जाणवणे अशा समस्या निर्माण होतात.

मोबाइल

रील्स पाहण्यात आपण इतके गुंतून का जातो?

अनेकजण “फक्त पाच मिनिटे” म्हणून रील्स पाहयला सुरुवात करतात आणि नकळत तासन्‌तास त्यात रमून जातात. यामागे मानसशास्त्रीय आणि जैविक कारणे आहेत. रील्स लहान, वेगवान आणि सतत बदलणाऱ्या असतात. प्रत्येक नवीन व्हिडिओ मेंदूला काहीतरी नवीन अनुभव देतो. त्यामुळे मेंदूमध्ये डोपामिन या रसायनाचे स्रवण होते. डोपामिन आनंद आणि समाधानाची भावना निर्माण करते. पुढील व्हिडिओमध्ये काय दिसेल याची उत्सुकता मेंदूला सतत स्क्रीनकडे खेचून ठेवते. त्यामुळे रील्स पाहण्याची सवय काही वेळा व्यसनासारखी बनू शकते.

रील्सच्या अतिवापराचे दुष्परिणामः

● वेळेचा अपव्यय

● अभ्यास आणि कामातील लक्ष कमी होणे

● एकाग्रता कमी होणे

● झोपेच्या समस्या

● ताण, चिंता आणि चिडचिड वाढणे

● शारीरिक हालचाल कमी होणे

● डोळे व मान यांच्यावर ताण येणे

● लहान व किशोरवयीन मुलांमध्ये वर्तनातील बदल

रील्सचे व्यसन टाळण्यासाठी

● मोबाइल वापरण्यासाठी निश्चित वेळ ठरवा.

● सोशल मीडिया अॅप्सवर स्क्रीनटाइम मर्यादा ठेवा.

● अनावश्यक नोटिफिकेशन्स बंद करा.

● रिकाम्या वेळेत वाचन, व्यायाम किंवा छंद जोपासा.

● जेवताना आणि झोपण्यापूर्वी मोबाइल वापर टाळा.

● सकाळी उठल्याबरोबर मोबाइल पाहण्याची सवय सोडा.

● आठवड्यातून किमान एक दिवस सोशल मीडियापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. (उरलेला मजकूर पुढच्या भागात)

(लेखक पद्मश्री प्रा. डॉ. तात्याराव तथा टी. पी. लहाने सुप्रसिद्ध ज्येष्ठ नेत्रशल्यविशारद आहेत. ते मुंबईतल्या जे. जे. रूग्णालयाचे माजी अधिष्ठाता तसेच महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाचे निवृत्त संचालक आहेत.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

Skip to content