Homeब्लॅक अँड व्हाईटभाजपाशी केलेल्या दगाफटक्याची...

भाजपाशी केलेल्या दगाफटक्याची फळे भोगताहेत उद्धवजी!

मराठी माणसाच्या न्यायहक्कासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६६ रोजी मुंबईत शिवसेना स्थापन केली. बाळासाहेबांच्या करारी आणि लढाऊ नेतृत्त्वाने शिवसेना नेहमीच धगधगत राहिली. मुंबईतील मराठी माणसाला ताठ मानेने उभे करण्यामागे ठाकरे व त्यांनी स्थापन केलेली शिवसेनाच होती. माझा नेता व माझा पक्ष अशी भावना बाळासाहेब ठाकरे व शिवसेना यांच्याविषयी मराठी माणसाच्या ह्रदयात निर्माण झाली. याच शिवसेनेने मुंबईतील कामगार क्षेत्रातील लाल बावटा चळवळ संपवली. याच शिवसेनेने दोन्ही समाजवादी पक्षांना संकुचित केले, हे त्यांनाही समजले नाही. तत्कालीन बलाढ्य काँग्रेस पक्षाला अंगावर घेण्याचे काम याच शिवसेनेने केले. भूमिपुत्रांना नोकऱ्यांमध्ये आणि घरांमध्ये ८० टक्के हक्काचा वाटा मिळाला पाहिजे यासाठी लढणारी हीच शिवसेना होती. भारतीय कामगार सेना, स्थानिय लोकाधिकार समिती, विद्यार्थी सेना अशा आघाड्यांवर शिवसेना नेहमी रस्त्यावर दिसायची. शिवसेना ही मुंबईतील मराठी माणासाची शक्ती होती, मराठी माणसाचे कवच होते.

शिवसेना, या चार अक्षरांचा मुंबईत जबरदस्त दरारा होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे या नावाचा सार्वजनिक जीवनात मोठा दबदबा होता. मातोश्रीवर रोज खुला जनता दरबार असायचा, आपले म्हणणे ऐकून घेणारा व न्याय मिळवून देणारा नेता अशी त्यांची जनतेत प्रतिमा होती. दत्ताजी साळवी, मनोहर जोशी, प्रमोद नवलकर, छगन भुजब‌‌ळ, नारायण राणे, सुधीर जोशी, वामनराव महाडिक, सतीश प्रधान, लीलाधर डाके, शरद आचार्य, दत्ताजी नलावडे, मधुकर सरपोतदार, सूर्यकांत महाडिक, सुभाष देसाई, अशा अफाट जनसंपर्क असलेल्या नेत्यांची मालिका हे शिवसेनेचे वैभव होते. राज ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे, एकनाथ शिंदे, गणेश नाईक ही पक्षाची श्रीमंती होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना राज्याचे मुख्यमंत्री होण्याचीही संधी मिळाली. जोपर्यंत राज्यात शिवसेना-भाजपा युती होती तोपर्यंत गाडी रूळावर होती. पण ज्यादिवशी सर्वाधिक आमदार असलेल्या भाजपाला दूर सारून आणि काँग्रेसशी आघाडी करून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हापासूनच भाजपाच्या रडारवर त्यांचे नाव नोंदवले गेले. पंचवीस वर्षांची युतीतील मैत्रीचे राजकीय दुष्मनीत रूपांतर झाले. त्याचे परिणाम उद्धव व त्यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेला सतत चार वर्षे भोगावे लागत आहेत. पक्षाच्या सहा खासदारांनी उद्धव यांच्या नेतृत्त्वाविरोधात केलेला उठाव व एकनाथ शिंदे यांच्या पक्षाशी केलेला घरोबा हे त्याचे ताजे उदाहरण आहे.

उद्धव

२०२४मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे यांच्या  शिवसेनेचे ९ खासदार निवडून आले. त्यातले संजय जाधव (परभणी), भाऊसाहेब वाघचौरे (शिर्डी), संजय देशमुख (यवतमाळ- वाशीम), नागेश पाटील आष्टीकर (हिंगोली), ओमराजे निंबाळकर (धाराशिव), संजय दिना पाटील (ईशान्य मुंबई) या सहा खासदारांनी ठाकरेंच्या शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केला. हे सर्व खासदार मशाल चिन्हावर निवडून आले होते. या सर्वांनी बाळासाहेब ठाकरे व उद्धव ठाकरे यांचे बोर्डावर फोटो लावून मते मागितली होती. ठाकरेंच्या शिवसैनिकांनी मेहनत करून त्यांचा प्रचार केला होता. भाजपा-शिवसेनेच्या विरोधात जनतेने त्यांना लोकसभेवर निवडून दिले होते. दोन वर्षांत नेमके असे काय घडले की, त्यांना ठाकरेंच्या पक्षात राहणे नकोसे झाले? आपण पक्षनेतृत्त्वावर नाराज असल्याचे त्यांनी कधी सांगितले नाही. पक्षाच्या नेमक्या कोणत्या निर्णयाबद्दल त्यांचे मतभेद झाले, हे कधी पुढे आले नाही. पक्ष सोडून जाण्याची खरी कारणे पुढे आलेली नाहीत. या फुटीर खासदारांनी दोन वर्षांत संसदेत महाराष्ट्राचे कोणते प्रश्न मांडले, मतदारसंघाला काय मिळवून दिले, पक्षाची कोणती भूमिका तडफेने मांडली? आता शिंदेंच्या शिवसेनेत गेले, त्याचा राजकीय व आर्थिक लाभ त्यांना झाला असेल वा होईल. पण जनतेच्या जीवनात काय फरक पडणार आहे? आता हे सर्व फुटीर शिवेसनेचे धनुष्यबाण, हे चिन्ह आपल्या हाती घेणार आहेत, म्हणून ते  एनडीएमध्ये येतील. लोकसभेत एनडीए सरकार विधयके किंवा ठराव सादर करील तेव्हा या खासदारांना सरकारच्या बाजूने मतदान करावे लागेल. महिला आरक्षण – मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला याच खासदारांनी दोन महिन्यांपूर्वी लोकसभेत विरोध केला होता. आता ते पुन्हा सादर झाले की त्यावर त्यांना बाजूने मतदान करावे लागेल.

शिवसेनेचा स्थापना दिवस १९ जून. एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा फडकावून शिवसेना, हे नाव व निवडणूकचिन्ह काबीज केले, तेव्हापासून मुंबईत ठाकरे व शिंदे हे दोघेही शिवसेना वर्धापनदिन वेगवेगळा साजरा करतात. ठाकरे यांच्याकडे सत्ता नाही. राज्य गेले, महापालिका गेली, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ठाकरे यांनी कधी रस घेतला नाही. मुंबई महापालिका हाच ठाकरेंच्या शिवसेनेचा प्राणवायू होता. तो ऑक्सिजन सिलिंडरच भाजपाने आपल्याकडे हिसकावून घेतला आहे. सहा खासदारांनी ठाकरेंच्या पक्षावर प्रहार करून पळ काढण्याची नेमकी हीच वेळ का निवडली? आता त्यांचे बॉस एकनाथ शिंदे आहेत. ते सर्व निर्णय मोदी-शाहांना विचारूनच घेत असतात. शिवसेना वर्धापनदिनाच्या तोंडावर दिल्लीतून या सहा खासदारांनी वेगळा गट स्थापन करण्यासाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र दिले. लोकसभा निवडणुकीत चारसौ पारची घोषणा देणाऱ्या भाजपाला बहुमताचा आकडाही गाठता आला नव्हता. मग चंद्राबाबू – नितीशकुमार यांना बरोबर घेऊन एनडीए सरकारची स्थापना झाली. विधेयके मंजूर करण्यासाठी लोकसभेत ३६२ खासदारांचे संख्याबळ गरजेचे आहे. म्हणूनच आयारामांना भाजपाकडून पायघड्या घातल्या जात आहेत. अगोदर पंजाबमधील आम आदमी पक्षाचे सात खासदार फुटले व भाजपामध्ये आले. नंतर तृणमूल काँग्रेसचे बावीस खासदार फुटले व त्यांना नॅशनॅलिस्ट सिटिझन्स पार्टीमध्ये विलिन झाले. आता ठाकरेंच्या शिवसेनेचे सहा खासदार फुटले व त्यांना शिंदेंच्या शिवसेनेने पायघड्या घातल्या. काँग्रेसशी संबंध तोडलेल्या द्रमुकच्या २२ खासदारांवर भाजपाची नजर आहेच. शिवाय सपाचे खासदार फुटणार अशी कुजबूज चालू आहे.

उद्धव

शिंदे यांच्या शिवसेनेचे लोकसभेवर सात खासदार निवडून आलेत. प्रतापराव जाधव केंद्रात मंत्री आहेत. ठाकरेंचे सहा खासदार मिळाल्याने शिंदे यांच्या खासदारांची संख्या तेरा झाली आहे. त्यामुळे केंद्रात आणखी एक मंत्रीपद मिळेल अशी चर्चा सुरू आहे. आयारामांची भाजपाकडे रांग लागल्याने एनडीएमधील चंद्राबाबू नायडू व नितीश कुमार यांचे महत्त्व कमी होईल, अशी चिन्हे आहेत. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचे राज्याच्या राजकारणात महत्त्व वाढेल. महाराष्ट्रात आपली राजकीय भूमिका अमलात आणण्यासाठी एकनाथ शिंदे अतिशय उपयुक्त नेता आहे, असे मोदी – शाहांना समजले आहे. एकनाथ शिंदे जेवढे लोकांना भेटतात, दौरे करतात तेवढे कोणी करीत नाहीत. भाजपा हायकमांडशी सर्वाधिक जवळचे संबंध राखणारा हा नेता आहे. उद्धव ठाकरे यांचे नेतृत्त्व व त्यांचा पक्ष कमकुवत करण्यात एकनाथ शिंदे यांचा सिंहाचा वाटा आहे. शिवसेनाप्रमुखांचे आपणच सच्चे वारस आहोत हा त्यांचा मंत्र आहे. ठाकरे पिता-पुत्र राज्यात कुठे फिरत नाहीत, फोन घेत नाहीत, जनसंपर्क नाही. पदाधिकारी-कार्यकर्ते यांच्याशी मुक्त संवाद नाही, पक्षाचे मुख्यालय असलेल्या शिवसेना भवनमध्ये नियमित जात नाहीत. मग जनमानस काय आहे, कार्यकर्त्यांची भावना काय आहे हे त्यांना कसे समजणार? ठाकरे भेटत नाहीत आणि शिंदे रात्री उशिरापर्यंत मुंबई-ठाण्यात भेटत असतात. त्याचा लाभ त्यांना मिळतोय…

(लेखक डॉ. सुकृत खांडेकर ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आहेत.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

दीर्घकाळ सत्तेत राहूनही काँग्रेसचे टिळक भवन लिफ्टविना!

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्यावतीने मुंबईत दादर येथील टिळक भवन या मुख्यालयात, भारतात येणारी आर्थिक सुत्नामी या विषयावर नुकतेच चर्चासत्र आयोजित केले होते. या कार्यक्रमास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, दिल्लीच्या जेएनयुमधील अर्थशास्त्राचे प्रा. अरूणकुमार, अर्थतज्ञ डॉ. भालचंद्र...

बंगालची वाघीण एकाकी…

भाजपाविरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची बैठक आठ जूनला नवी दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये झाली. या बैठकीला सुरूवात होण्यापूर्वीच तृणमूल काँग्रेसच्या वीस खासदारांचा भाजपाप्रणित एनडीएला पाठिंबा, असे वृत्त वृत्तवाहिन्यांवरून झळकू लागले. इंडियाच्या बैठकीला तो एकप्रकारचा अपशकूनच होता. इंडिया आघाडीच्या बैठकीपेक्षा तृणमूल काँग्रेसला...

सरकारी आशिर्वादाने ऑनलाइन ‘कॉक्रोच’ जंतरमंतरवर?

भारताचे सरन्यायाधीश न्या. सूर्य कांत यांनी बेरोजगार तरूणांवर केलेल्या टीका-टिपणीनंतर अमेरिकेत बोस्टनमध्ये शिक्षण घेणाऱ्या अभिजीत दिपके या ३५ वर्षांच्या तरूणाने सोशल मीडियावर कॉक्रोच जनता पार्टी स्थापन केल्याची संकल्पना मांडली आणि देशभरातून लक्षावधी तरूणांचा त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. न्या. सूर्य...
Skip to content