कुस्तीचा कोणताही प्रकार ‘प्रेक्षक’ या भूमिकेत आपण असतो तेव्हा प्रेक्षणीय असतो. शालेय जीवनात संघशाखेत जात असताना रविवारी वगैरे कुस्तीच्या तालमीत जाण्याचा योग येत असे. पण माझी अंगकाठी आणि खुराकाच्या मर्यादा यामुळे कधी कुस्ती या खेळात जाण्याचा योग नव्हता. पण पत्रकार म्हणून काम करताना काही पहिलवान मंडळींशी भेटीगाठीचे योग आले.
पुण्यात मामासाहेब मोहोळ वस्ताद होते. म्हणजे पहिलवानांचे गुरु. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ हेही पहिलवान आहेत. आता ते राजकीय डाव टाकत असतात. गणपतराव आंदळकर, मारुती माने ही नावे तरुणपणात ऐकलेली. तेव्हा लढतीची बातमी असायची त्यात पहिलवानांचे वजन, दंडाचा आकार, रोजचा खुराक आणि किती जोरबैठका मारतात याचा तपशीलदेखील असे. तो वाचण्यात मजा येत असे. त्या काळात प्रत्यक्ष कुस्ती बघण्याचे योगदेखील आले. हरियाणा येथून महाराष्ट्रात कुस्ती करण्यासाठी आलेला सत्पाल खूप गाजला होता. त्याआधी सादिक पंजाबी आणि मारुती माने यांच्या कुस्तीची वर्णने ऐकलेली. सत्पालने भल्याभल्या पहिलवानांना अस्मान दाखवले होते. बलदंड युवराज पाटील आणि सत्पाल यांच्या लढती गाजल्या. पुण्याचे हिरामण बनकरदेखील सत्पालबरोबर लढले. पण सत्पालला अस्मान दाखवले ते हरिश्चंद्र बिराजदार यांनी. ती कुस्ती गाजली होती. बेळगाव येथील मैदानात इतिहास घडला होता. दिलदार सत्पालने पराभव मान्य केला.
आता घरात बसून मोबाईल उघडला की कुस्तीचा आनंद घेता येतो. कुस्तीचे अनेक प्रकार आहेत. जागतिक कुस्तीत मराठमोळ्या खाशाबा जाधव यांनी केलेली कामगिरी इतिहासात नोंदली गेलेली नाही. महाराष्ट्र केसरी, हिंदकेसरी आणि अन्य स्पर्धा सुरु असतातच. खेड्यापाड्यात सतत मैदाने सुरु असतात. पश्चिम महाराष्ट्रात तालमी सुरु असतात. तीनचार दशकांपूर्वी होणाऱ्या कुस्तीत बराच वेळ खडाखडीत जात असे. पहिलवान घामाघूम होत असत. पंच इशारा देत. पुढे कुस्ती क्षेत्रात राजकारणदेखील शिरले. पण त्यात नवे काही नाही. आता मी दंगल बघतो ती कुस्तीची. अर्थात घरात बसून. काही नावे आहेत. देवा थापा, पारस थापा हे नेपाळी पहिलवान. जावेद गनी हा जम्मू काश्मीरमधील पहिलवान भारतीय लष्करात आहे. यातील देवा थापा महाराष्ट्रात येऊन गेला आहे. तालुका पातळीवर त्याच्या कुस्त्या झाल्या आहेत.
मराठमोळ्या कुस्तीत एकमेकांना मारहाण करणे किंवा जखमी करणे अपेक्षित नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या फ्री स्टाईल कुस्तीत ते चालते. आपले भारतीय मल्ल खली सर्वांना माहित आहेत. त्यांच्या कुस्त्या मी आवर्जून बघतो. आता ते त्यांची मोठी अकादमी चालवतात. भरपूर पैसे मिळवून आहेत. प्रचंड वजन, मोठा आहार असलेला हा माणूस अत्यंत विनम्र आणि हसतमुख आहे. मैदानात प्रतिस्पर्धी पहिलवानास एकाच थपडीत खली आडवा करतो तेव्हा मला भलताच आनंद होतो. प्रचंड उंचीमुळे खली यांना चालताना त्रास होतो. ही या क्षेत्राची दुसरी

बाजू असते. व्यायाम करुन कमावलेले शरीर पुढील आयुष्यात फारसे चांगले राहत नाही. आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होतात. पण तो नशीबाचा भाग असतो. मी नेपाळमध्ये आणि अन्यत्र होणाऱ्या मैदानांचा उल्लेख केला तो अशासाठी की, या कुस्त्या आता क्रिकेटमध्ये जसे वीस षटकांचे सामने आले आहेत आणि धुपाटणे फिरवावे तशी बॅट फिरवून चौकार आणि षटकार ठोकायचे आणि प्रेक्षकांनी ते बघायचे असा एकंदर प्रकार आहे. एकापाठोपाठ एक सामने बघून प्रेक्षकांच्या हाती फारसे काही लागते असे नाही. खेळाडू आणि कंपन्या श्रीमंत होतात एवढेच.
कुस्ती या प्रकारचा ग्रामीण भागात सकारात्मक परिणाम होतो हे लक्षात घ्यायला हवे. कुस्ती बघून नव्या पिढीला तालमीत जाण्याची गोडी लागली तर त्यांना फायदा होणार आहेच. क्रिकेटच्या मैदानात जाणारे प्रेक्षक आनंद मिळवत नाहीत असे नाही, पण त्यात आरोग्यासाठी लाभदायक काही असेल तर बघावे. देवा थापा, जावेद गनी यांच्या कुस्तीत जे डाव वापरण्यात येतात ते मराठमोळ्या कुस्तीत वापरले जात नाहीत असे नाही. त्यातील एक डाव म्हणजे धोबीपछाड. पण संधी मिळेल तेव्हा हा डाव वापरला जातो. अन्यथा प्रतिस्पर्धी पहिलवानाच्या पटात घुसणे आणि त्याला आडवा करणे हा एक डाव असे. सत्पाल कुस्ती सुरु झाली की खडाखडी करीत न बसता आधी पटात घुसून प्रतिस्पर्धी पहिलवानास उचलत असे. एका पहिलवानास त्याने असा उलटा उचलून चितपट मारला होता. सध्या ज्या कुस्त्या बघायला मिळतात त्यात मुख्यतः धोबीपछाड हाच डाव वापरण्यात येतो असे दिसते. पहिलवानाचा हात हातात सापडला की, गरागरा फिरवत आठदहा वेळा धोबीपछाड मारल्या की पहिलवान बहुधा अर्धमेला झालेला दिसतो. हावी झालेला पहिलवान मग त्याला उचलून उलटा आपटतो. हरलेला पहिलवान निराश होऊन डोक्याला हात लावतो. काही पहिलवान या डावामुळे मैदान सोडून पळतात.
आता आणखी एक खेळ सुरु झाला आहे. तो म्हणजे प्रतिस्पर्धी पहिलवानास मारहाण करणे. आधी डोक्यावर चापट, नंतर कानाखाली मारणे इत्यादी. या मैदानांमध्ये कुस्ती सुरु असताना अन्य पहिलवान घुसतात. मग ताकदीचा पहिलवान एकापाठोपाठ एक या पद्धतीने चारपाच जणांना धोबीपछाड मारतो. समोरच्या पहिलवानाने हात उचलला की, आक्रमक पहिलवान त्याच्या डोक्यात जबरदस्त फटका मारतो आणि तो पहिलवान बेशुद्ध पडतो. अशी अपेक्षा आहे की, मराठमोळ्या कुस्तीत भविष्यात असे प्रकार येऊ नयेत. एकमेकांना मारहाण करण्यासाठी फ्री स्टाईल कुस्त्या आहेत. महाराष्ट्रातील पहिलवान अशा ठिकाणी गेले तर हरकत नाही. तो त्यांचा निर्णय असेल. पण इथल्या कुस्तीचे पावित्र्य भविष्यात टिकून राहयला हवे. यासाठी वस्ताद मंडळी सतर्क असतीलच. फक्त कुस्तीत नको ते येऊ नये. कुस्तीला सरकारने आणखी ताकद द्यावी. गाव पातळीवर कुस्ती असतेच. जत्रेत कुस्तीचे फड रंगतातच, पण शहरी भागातदेखील कुस्ती लोकप्रिय आहे. त्याचा समाजाच्या हितासाठी वापर व्हावा, यासाठी सरकार प्रयत्नात असेलच. आधुनिक प्रकारच्या उपकरणांचा वापर करुन बेटकुळ्या फुगवून, त्या टी शर्ट घालून दाखवण्यात मर्दुमकी नाही, तर पहिलवान मंडळींनी आपली ताकद समाजात शांतता राहील यासाठी आणि भगिनींचे संरक्षण करण्यासाठी वापरली तर कुस्ती क्षेत्राचे पावित्र्य वाढेल. उगाचच नवे फंडे कुस्तीत येणार नाहीत, याची काळजी घ्यायला हवी.
(लेखक मनोहर सप्रे ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

