Homeमाय व्हॉईसरणवीरने चित्रपट सोडला...

रणवीरने चित्रपट सोडला म्हणून इतका गहजब?

‘डाॅन ३’च्या चित्रिकरणास सुरुवात होण्याच्या अवघ्या दहा दिवस अगोदर रणवीर सिंगने चित्रपट सोडल्याने दिग्दर्शक फरहान अख्तरचे चिडणे आणि फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्लाॅईज या चित्रपटसृष्टीतील संघटनेने रणवीर सिंगवर तीन वर्षांची बंदी घालण्याचे आवाहन करताच त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविकच होते. हे सगळेच प्रकरण नवीन वळण घेत घेत चाललंय. खरंतर रणवीर सिंग नाही म्हणतोय तर मीच ही व्यक्तीरेखा साकारतो असं म्हणतच फरहान अख्तर मेकअपसाठी बसायला हवा होता. हे अगदी चोख उत्तर झाले असते. तसं केल्यास दिग्दर्शनाकडे दुर्लक्ष होईल, अशी बहुदा फरहान अख्तरला भीती वाटत असावी. कलाकाराने काही ना काही कारणास्तव चित्रपट सोडणे नवीन नाही. अनेक संदर्भासह एखादे असे माहिती आणि मनोरंजनाने खचाखच भरलेले पुस्तक, टी. व्ही. शो, वेबसिरीज, निदान सोशल मीडियात रिल शो नक्कीच बनेल. कधी ही आवकजावक शांतपणे झाली, कधी एखादा वाद झाला, कधी अनेक वर्षे त्याचे किस्से, कथा, दंतकथा प्रसिद्ध होत राहिल्या.

राज कपूरच्या ‘संगम’मधील गोपाल ही व्यक्तीरेखा दिलीपकुमारने नाकारली म्हणून राजेंद्रकुमारला मिळाली, यापासून ते रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शोले’मधील गब्बरसिंगच्या भूमिकेसाठी डॅनी डेन्झोपाने होकार दिला, चित्रिकरणाअगोदरच्या पहिल्या बैठकीतही हजर होता (सोशल मीडियात तसा फोटोही पाहयला मिळत असल्याने त्याचा एक्सलुझिव्ह टचही गेला), पण फिरोज खानने त्याला ‘तीन नायकांच्या चित्रपटात तुला काम ते किती, काबूलला चल, धर्मात्मा चित्रपटात हेमा मालिनीसोबत एका गाण्यात तुला सहभागीही करतो’ असे पटवताच डॅनीने ‘शोले’ सोडला, हा सर्वकालीन सुपरहिट किस्सा. तेव्हा रमेश सिप्पीने डॅनीच्या नावाने शंख केला नाही. अमजद खानचा गब्बरसिंग भारी डेंजरस ठरला.

करिश्मा कपूरनेही (खरंतर तिची चाणाक्ष आई बबिताने) राजकुमार संतोषी दिग्दर्शित ‘बरसात’चा जंगी मुहूर्त होऊनही (मुहूर्ताच्या वेळी या चित्रपटाचा दिग्दर्शक शेखर कपूर होता ही आणखी एक ‘सोडचिठ्ठी’) करिश्माने हा चित्रपट सोडून हरिश या साऊथच्या हिरोसोबतचा ‘प्रेम कैदी’ स्वीकारला. तिने जे केले तेच तिची बहीण करिनानेही केले. (पुन्हा तेच, आई बबितानेच आपल्या महत्त्वाकांक्षी स्वभावानुसार केले.) तिने राकेश रोशन दिग्दर्शित ‘कहो ना.. प्यार है’चे पहिले चित्रिकरण सत्र होऊनही जे. पी. दत्ता दिग्दर्शित ‘रिफ्जूजी’ स्वीकारत राजस्थानात चित्रिकरणासाठी गेलीदेखील. ऋतिक रोशनपेक्षा अभिषेक बच्चन मोठा स्टारपुत्र होता ना? हे दोन्ही चित्रपट प्रदर्शित झाल्यावर वेगळीच उत्तरे मिळाली.

मधुर भांडारकरने ‘हिराॅईन’ या चित्रपटासाठी ऐश्वर्या राय निश्चित केली. प्रत्यक्षात त्याने करिना कपूरसोबत चित्रिकरण सुरू केले. किती किती उदाहरणे सांगावीत? कुमार गौरवने विस्कळीत केस आणि अर्धवट दाढी, अशा रुपाला नकार दिला म्हणून सुभाष घईने ‘हीरो’साठी जॅकी श्रॉफचा विचार केला. असं एक तपशीलवार कोष्टक तयार होईल.‌ कधी यात धक्कादायक गोष्टीही घडल्या. कधी त्यावरही कोणी खमकेपणाने मार्ग काढते. ‘राम बलराम’च्या सेटवर रेखाचे सतत दिग्दर्शक विजय आनंदसोबत कशा ना कशावरुन खटके उडू लागले. विजय आनंद शांत बसला नाही. शांतपणे त्याने पटकथेत काही फेरफार करत रेखाची गरज शक्य तो लागणार नाही, अशी तजवीज केली. रेखाही काही कधीच कमी नव्हती. त्याचवेळी ती रामसे ब्रदर्स दिग्दर्शित ‘घुंगरु की आवाज’ या चित्रपटात विजय आनंदची नायिका म्हणून काम करत होती. तिने या चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी तारखा देण्यास टाळाटाळ सुरू केली. हा पेचही सोडवला गेला. रेखाला पाठमोरी दाखवून काही दृश्ये चित्रित करण्यात आली. अर्थात रेखाच्या डमीचा वापर करण्यात आला. आणि रेखाची अगोदर चित्रित करण्यात आलेली दृश्ये हुशारीने वापरण्यात आली.

कलाकाराचा नकार असेल, नखरा असेल, तर हे सगळे घडत-बिघडतच चित्रपट निर्मिती होत असते. रणवीर सिंगच्या प्रकरणात लक्षात आले की, काहीशी बेभरवशी म्हणून ओळखली जात असलेल्या चित्रपटसृष्टीत खरंच काही नियम आहेत आणि त्याची अंमलबजावणीदेखील होत असते. चित्रपटसृष्टीची ही बाजूदेखील चित्रपटरसिकांपर्यंत पोहोचायला हवी. चित्रपट अभ्यासात हेदेखील अधोरेखित व्हायला हवे. बरोबर आहे ना? तरीदेखील एका गोष्टीचा फार फार आनंद आहे, देव आनंदने प्रकाश मेहरा दिग्दर्शित ‘जंजीर’ला नकार दिला. तसा तो जानी राजकुमारनेही दिला. पुढचा इतिहास सांगायला नकोच!

(लेखक दिलीप ठाकूर ज्येष्ठ सिने पत्रकार आणि समीक्षक आहेत.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

साठीतल्या सलमानमध्ये अजूनही रागवण्याचे ‘स्पिरीट’!

राग आला रे आला की सोशल मीडियात, विशेषतः इंस्टाग्रामवर पोस्ट करणे हे आजच्या सेलिब्रिटीजचे वैशिष्ट्य. त्यांना एखाद्या इव्हेंटसमध्ये जरा कुठे कशाचा तरी राग आला अथवा कोणाकडे रागाने पाहिले न पाहिले तरी तमाम इन्फ्लूअन्सर्स त्याचं काही सेकंदाचे रिल सोशल मीडियात...

‘आलिया’ भोगासी…

जे तुम्हाला दिसत होते, जे सर्वांच्या समोर होते, ते कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील रेड कार्पेटवरील जगभरातील अनेक देशांतील अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त कॅमेरा हाती असलेल्या मीडियातील फोटोग्राफर्स, पाप्पाराझी, इन्फ्लुअन्सर यांना दिसलं नाही? आणि त्या गर्दीला जे दिसले नाही, त्याचीच बातमी झाली....

राजेश खन्नाच्या मर्जीमुळे डब्यात गेली ‘नौकरी’!

काळ बदलला.. अनेक गोष्टी बदलल्या... संदर्भ, तपशील बदलले. एकेकाळी एखादा चित्रपट काहीना काही कारणास्तव रखडला रे रखडला की, पब्लिकचा त्या चित्रपटातील रस उतरत, घसरत, संपत जात असे आणि असा एखादा चित्रपट पडद्यावर येई तो उतरण्यासाठीच! अशी उदाहरणे अनेक आहेत....
Skip to content