Homeमाय व्हॉईसप्रेमी युगुलाला मारहाण...

प्रेमी युगुलाला मारहाण करणारी मुले गर्दुल्ली! प्रत्यक्ष भेटीतला कानोसा!!

दोन दिवसांपूर्वी मुंबईत कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलजवळील प्रमोद महाजन उद्यानात एका प्रेमी युगुलाला अमानुष मारहाण करणारी सर्व मुले (चार-पाच) गर्दुल्ली व चरसी असून ही सर्व मुले घाटकोपरच्या नारायणवाडीत राहत असल्याची माहिती हाती आली आहे. वास्तविक हे उद्यान मॉलजवळ वगैरे असले तरी मॉलच्या परिसरातच असल्याने झालेल्या प्रकाराला महापालिका जितकी जबाबदार आहे त्यापेक्षा कांकणभर जास्त जबाबदार परिसर सांभाळणारी सुरक्षारक्षक एजन्सीही आहे, असे त्या परिसरात जवळजवळ तासभर घालवल्यानंतर जाणवले.

फिनिक्स मॉलचा परिसर बराच मोठा असून हा भाग विकसित केल्यानंतर उद्यानही मॉलनेच विकसित करून महापालिकेकडे सुपूर्द केले होते, असे समजले. या उद्यानाची देखभाल केवळ पालिका करत असे. खरंतर या परिसरात पाऊल ठेवल्यापासून सुरक्षातपासणी केली जाते. मॉलमध्ये प्रवेश करताना जितकी कडक तपासणी केली जाते तितकी कडक तपासणी परिसरात प्रवेश करताना मात्र नसते. (तसे ते शक्यही नाही.) मात्र, सर्व परिसर सीसीटीव्ही यंत्रणेने सज्ज आहे आणि जागोजागी रक्षकही असतात, असे निदर्शनास आले. या सीसीटीव्हीच्या क्लिपमुळेच अल्पवयीन मुलांपर्यंत पोहोचता आले, असे पोलिसांनी सांगितले.

मारहाणीची दुर्घटना झाल्यानंतर आता गेले दोन दिवस व कालही हे उद्यान बंद ठेवण्यात आलेले दिसले. संतापाची गोष्ट म्हणजे तेथे तैनात केलेल्या रक्षकांना काही सांगताही येत नव्हते. एकाचे तर तोंडच उचकटत नव्हते. इतका तो बकवास होता. दुसरा त्यामानाने ठीक होता. परंतु हिंदीभाषिक होता. संतापाची आणखी गोष्ट म्हणजे एका चिटोऱ्यावर ‘उद्यान बंद राहील – आदेशावरून’ असे लिहून ते दरवाजावर अडकवलेले दिसले.

दोन दिवसांपूर्वी झालेली मारहाण अमानुषच होती. पण याआधीही या परिसरातील टपोरी पोरे येऊन चिडवाचीडवी, टर उडवणे, घाणेरड्या कॉमेंट पास करणे आदी थर्डक्लास प्रकार सर्रास करतात, असे नागरिकांनी सांगितले. कोहिनूर सिटी परिसर, डॉन बॉस्को शाळेच्या समोरील बाजूस असलेल्या चाळीतून तसेच कुर्ला, विद्याविहार, घाटकोपर आदी परिसरातून तरूण-तरुणी या उद्यानात येतात. परंतु इतकी मोठी मारहाण यापूर्वी झालेली नव्हती.

पोलिसांनी पकडलेली ही सर्व मुले घाटकोपरच्या कुविख्यात नारायण वाडीतील असल्याचे समजते. घरातील मंडळींही या मुलांच्या अतरंगी कारवायांना कंटाळलेले असून ही सर्व मुले अंमली पदार्थांच्या आहारी गेल्याचे समजते. घरातून तर कुणीही पैसे देत नाही म्हणून या परिसरातील सार्वजनिक उद्यानात जाऊन धाक दाखवून, वेळप्रसंगी चाकू-सुरी दाखवून बसलेल्या लोकांकडून पैसे उकळणे हाच यांचा उद्योग बनल्याचे एका ज्येष्ठ नागरिकांने सांगितले.

प्रमोद महाजन उद्यानात नको तो प्रकार झाल्याने पालिकेत सत्ताधारी असलेला भाजप एकदम काम करण्याच्या मूडमध्ये आलेला दिसतो. (एका अर्थाने हे बरंच आहे.) पण मूडमध्येच त्यांनी व प्रशासनाने म्हातारे, लुळेपांगळे रक्षक ठेवू नयेत. दोंद सुटलेले व दहा पावलेही झपझप चालू न शकणाऱ्यांना सरळ बाहेरचा रस्ता दाखवण्यास कचरू नये. तूर्त इतकेच!

छायाचित्र मांडणीः प्रवीण वराडकर

(लेखक विजयकुमार काळे ज्येष्ठ पत्रकार असून घटनास्थळी जाऊन वृत्तसंकलन करण्यात त्यांचा हातखंडा आहे.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

तुम्हीच सांगा, दादर मोकळं झालं.. असं म्हणू तरी कसं?

मुंबईच्या दादर (प.) रेल्वेस्थानकाबाहेरील काही पदपथ महापालिका आणि पोलिसांनी काही प्रमाणात साफ केल्याचे कालच संध्याकाळी दिसून आले. पण काहीच पदपथ हे लक्षात घेतले पाहिजे. तेथे रात्री उशिरापर्यंत एक मोठी गाडीही उभी असते. पण त्याचा इच्छित परिणाम मात्र काहीच दिसून...

बिष्णोईच्या वकिलांनाही आता लागणार चाप! माध्यमेही रडारवर!!

ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस येथूनच लिहिताना केंद्रीय गृह मंत्रालय व गुप्तचरयंत्रणा गुंड लॉरेन्स बिष्णोई याच्या वाढत्या गुंड कारवायांना वैतागल्याचे विषद केले होते. अगदी त्याचप्रमाणे गेल्या पंधरा दिवसापासून गुजरातच्या साबरमती तुरुंगात असलेल्या बिष्णोईच्या भेटी घेणाऱ्या व्यक्तींना चाळण लावायला सुरुवात केली असून...

पूर्णेकर हत्त्येमागे भलताच अँगल?

ठाणे शहरातील उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे विभाग प्रमुख प्रदीप तथा बाळू पूर्णेकर यांच्या निर्घृण हत्त्येस एक महिना उलटून गेल्यानंतरही सूत्रधार मिळत नसल्याने ठाण्यात गेल्या काही दिवसांपासून राजकीय नाटक रंगत आहे, असे म्हटले तर वावगे होणार नाही. राजकीय नाटक, या...
Skip to content