आठ दिवसांपूर्वी रविवारी रात्री मुंबईत जुहूच्या पुष्पा पार्कजवळ प्रसिद्ध अभिनेता टायगर श्रॉफवर बिष्णोई गँगच्या गुंडांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबाराने मुंबई पोलीस सोडा, खुद्द केंद्रीय गृह मंत्रालयातील काही बडे अधिकारी संतापाने लालबुंद झाल्याची माहिती हाती आली आहे. खरंतर बिष्णोई गँगच्या कारवायांमुळे मुंबई व महाराष्ट्र पोलीस मेटाकुटीला आल्याचे समजू शकते, परंतु देशांतर्गत सुरक्षेवर लक्ष ठेवून असलेले बडे पोलीस अधिकारी तसेच रोज केंद्रीय गृह मंत्रालयाकडे माहितीचे आदानप्रदान करणारे अधिकारीही दर सहा-सात महिन्यांनी होणाऱ्या बिष्णोई गँगच्या गुंड कारवायांना जाम वैतागले असून एका ज्येष्ठ अधिकाऱ्याकडे त्यांनी आपला संताप व्यक्त केला असल्याचे कळते. आम्हाला विजयचौक वा कॅनॉट प्लेस येथील कार्यालयातून प्रतीहल्ल्याचे आदेश मिळवून द्या, असे साकडे या अधिकाऱ्यांनी घातले असल्याचे समजते.
गेल्या पाच वर्षांपासून दर सहा-सात महिन्यांनी देशातील कुठल्यानकुठल्या मोठ्या शहरात बिष्णोई गुंडांच्या कारवाया असतातच. त्यामुळे इतर महत्त्वाच्या कामांकडे दुर्लक्ष होते व इतर कामे रखडतात. शिवाय पोलीस अधिकारी व जवानांची धावपळ होते ती निराळीच! एका आंतरराष्ट्रीय करारानुसार गुंड लारेन्स बिष्णोईला गुजरातच्या साबरमती तुरुंगातून हलवता येत नसल्याचा हवाला देत आतापर्यंत त्याला इतर पोलिसांच्या हवाली, ताब्यात देता येत नसल्याचा तो पुरेपूर फायदा उठवत असल्याचे पोलीस दलात बोलले जात आहे. आंतरराष्ट्रीय कोर्टात दाद मागून संबंधित अट मागे घेता येते, असेही एका ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी माझ्याशी बोलताना सांगितले. त्याच्या नावावरील गुन्हे वाढत असल्याची बाब आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निदर्शनास आणल्यास तशी परवानगी नक्की मिळेल, असा आशावादही या अधिकाऱ्याने व्यक्त केला.

बिष्णोईला पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांचा छुपा पाठिंबा असल्यानेच त्याला काहीही होत नसल्याचे दिल्लीच्या राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. मात्र आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार सरकारचे हात बांधलेले आहेत, असे सरकारचे म्हणणे आहे. आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांचे रॅकेट उद्ध्वस्त करण्यासाठी बिष्णोईचा वापर करत असल्याचे सूचित केले जात असले तरी बिष्णोईच्या नावावर जी कोट्यवधी रुपयांची ‘उगराणी’ केली जात आहे व त्यासाठी खूनखराबा होत असल्याकडे किती काळ काणाडोळा करायचा यालाही काही मर्यादा आहे की नाही, अशी विचारणाही काही पोलीस अधिकारी करत आहेत. दिल्लीतील सरकार चालवणाऱ्या व्यक्तींना माझे फक्त इतकेच सांगणे आहे की “Courage is well it take to stand up and speak. Courage is also well it take to sit down and listen!!”
थोडक्यात बिष्णोईला साबरमती नदीत तरी बुडवा किंवा त्याच्या डाव्या-उजव्या हाताला ढगात पाठवा. त्याशिवाय शहरे वा फिल्म जगतात शांतता नांदणार नाही. टायगरवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर मुंबई पोलिसांनी त्वरेने हालचाल करून काही जणांना ताब्यात घेतले आहे. अजूनही काहीजण सापडतील. पण, इतिहास पाहिला तर अशा अटकांना काही अर्थ नसतो. अजून एक-दीड महिन्यात ही मंडळी बाहेरही येतील. या घटनेनंतर समाजमाध्यमावर संदेश प्रसारित करणाऱ्या त्या पंडिताला आत घेऊन कुटला पाहिजे, असे जनतेचे मत आहे. तसेच बिष्णोईच्या नातेवाईकांनाही दम देण्याची गरज आहे. प्रत्येक विषयावर त्याच्या भावाने बोललेच पाहिजे, असे काही नाही. राजस्थानचे काही वाचाळ नेतेही गप्पगुमान बसले तर हरकत नाही. बघूया, पुढे काय होते ते!
(लेखक विजयकुमार काळे ज्येष्ठ पत्रकार आणि गुन्हेविषयक घडामोडींचे अभ्यासक आहेत.)

