Homeन्यूज अँड व्ह्यूजबिष्णोईच्या वकिलांनाही आता...

बिष्णोईच्या वकिलांनाही आता लागणार चाप! माध्यमेही रडारवर!!

ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस येथूनच लिहिताना केंद्रीय गृह मंत्रालय व गुप्तचरयंत्रणा गुंड लॉरेन्स बिष्णोई याच्या वाढत्या गुंड कारवायांना वैतागल्याचे विषद केले होते. अगदी त्याचप्रमाणे गेल्या पंधरा दिवसापासून गुजरातच्या साबरमती तुरुंगात असलेल्या बिष्णोईच्या भेटी घेणाऱ्या व्यक्तींना चाळण लावायला सुरुवात केली असून त्याच्या वकिलांनाही आता चाप लागणार आहे. कायदेशीर सल्लागारांची भली मोठी फौज त्याला साबरमती तुरुंगात केव्हाही भेटायला जाऊ शकत होती. तेच दोर आता यंत्रणानी कापले आहेत. (खरंतर हे आधीच व्हायला हवे होते.)

संतापजनक गोष्ट म्हणजे बिष्णोईचा वकिलच ‘खंडणी’च्या गुन्ह्यात आत झाला आहे. दीपक खत्री असे या वकिलाचे नाव असून हा मुंबईत राहणारा आहे. पूर्वी हा वकील एका मोठ्या गँगचे काम बघायचा. दुसरी माहिती अशी मिळाली आहे की, मुंबईत हल्ली गुंडाना तसें पूर्वीसारखे काम मिळत नाही तर बिष्णोईने हे जाणून काही जुन्या गुंडाना कामनिहाय वापरण्याचे ठरवले असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, अभिनेता टायगर श्रॉफ हल्ल्याप्रकरणी कोणी ‘पंडिता’ला ताब्यात घेतल्याचे पोलीस सांगत असले तरी त्याला तसे महत्त्व नाही, असे गुन्हेगारी सूत्राचे म्हणणे आहे. उत्तरेत पंडित म्हणजे महाराज तर काही भागात आचारी म्हणून संबोधले जाते. तसेच टायगर श्रॉफप्रकरणी एका परदेशी गुंडासह सुमारे एक डझन गुंडाना पोलिसांनी पकडले आहे. परदेशी गुंडाला अजून येथे आणण्यात आलेले नाही. हा परदेशात राहून बिष्णोई गँग ऑपरेट करत होता हे पोलिसांना आता समजले. पोलीसयंत्रणा कशी काम करते याचा हा नमुना आहे.

कराराविरुद्ध दाद हवी

बिष्णोईला आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार व काही अटी घालून अटक करण्यात आलेली असून त्यानुसार त्याला तेथे जाऊनच (तुरुंगात) त्याचे जाबजबाब घेतले जातात. आता ज्येष्ठ अधिकारीच या अटीला आक्षेप घेत असून तत्कालीन वातावरणात ही अट योग्य ठरली असेलही, पण आता परिस्थिती बदलली आहे व बिष्णोईच्या गुंड कारवायाही वाढल्या असल्याने या अटीविरुद्ध दाद मागता येईल, असा विश्वास अधिकारीवर्ग व्यक्त करत आहे. या व पूर्वीच्या गुन्ह्यात पिस्तूल पुरविणारा लोणकर जमिनावर असताना फरार कसा झाला, याचीही चौकशी गुन्हे शाखा करत आहे. या चौकशीत काही पोलिसांची नावे उघड होण्याची शक्यता आहे. दरम्यान, काही माध्यमे बिष्णोईची ‘प्रतिमा’ उजळ करण्यासाठी सहाणेवर त्याचे पूर्वकर्तृत्त्व घासत आहेत. त्यातून निघालेले भस्म राजकीय तिलक म्हणून लावण्याचाही बकवास प्रयत्न करत आहेत. यात त्याला कॉपी करत असताना कसा पकडला व तो कसा उडी मारून कल्टी झाला, याची रसभरीत वर्णने काही पत्रकार अगदी तनमनाने व धनानेही करत असल्याचे वृत्त आहे. आता अशी माध्यमे व पत्रकारही तपासयंत्रणांच्या रडारवर असल्याचे कळते.

मुंबई पोलीस अव्वलच, पण…

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री व गृहमंत्री देवाभाऊ म्हणाले की, ‘गुन्हे शोधमोहिमेत मुंबई पोलीस अव्वल आहेत!’ देवाभाऊ, आपले पोलीस अव्वलच आहेत यात शंका नाही. परंतु त्यांची काही बाबतीत झाडाझडती गरजेची झालेली आहे. काही गरज नसलेल्या शाखा गुन्हे विभाग बंद करण्याच्या वाटेवर असल्याच्या वार्ता आहेत. हे खरे असल्यास काळानुसार बदल झालेच पाहिजेत. पण, गुन्हे शाखेची गुप्तवार्ता शाखा अधिक सशक्त होणे गरजेचे आहे. तसेच जुन्या गुंड टोळ्यांची माहितीही अपडेट करणे आवश्यक आहे. या टोळ्यांची किती नवीन पोरं बिष्णोई वा ड्रगलॉर्ड वापरतात याची माहिती घेतल्यास आयुक्तसाहेब आपणही हादरूनच जाल याची खात्री आहे. कारण टोळीप्रमुखांकडे पूर्वीसारखा पैसा खुळखुळत नाही आणि पोरं सांभाळायला आणि त्यांचे ‘शौक’ पुरे करायला दहा-दहा हजारांची ‘चवड’ लागते. हल्ली पोरं चिल्लर, चवली, पावली, रुपया आणि बाटलीने भापत नाहीत. रात्र झाली की ‘आज की रात हाथोंको फुरसत’ और सोने को मऊमऊ गद्दी मंगती है आणि या सर्वासाठी ‘लक्ष्मीदर्शन’ही तसेच तगडे लागते. माझी खात्री आहे की, मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पनवेल परिसरातील ऑर्केस्ट्रा बार्सवर इमानेइतबारे धाडी टाकल्या तर किमान 300 ते 500 नामचिन गुंड नक्की मिळतील! सुमारे 40 वर्षांपूर्वी वरळीच्या एका नामचीन आलिशान बारवर धाड टाकली गेली होती. धाड पोरींसाठी नव्हती तर एक फरार दाखवला गेलेला ड्रगलॉर्ड तेथे हजर होता, ऐश करत होता, ढोसतही होता. अतिवरिष्ठ अधिकाऱ्याला ‘टीप’ मिळाली. लगेच खास टीम रवाना झाली. पोरीवगेरे मिळाल्या. मात्र, सुमारे 20 लाखांची तोड होऊन ड्रगलॉर्ड फरार झाला. आणि ती सत्य घटना संपली. त्याची पुनुरावृत्ती होता कामा नये, इतकेच!!

छायाचित्र मांडणी– सुजाता कुलकर्णी

(लेखक विजयकुमार काळे ज्येष्ठ पत्रकार आणि गुन्हेगारी जगतातल्या घडामोडींचे अभ्यासक आहेत.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

पूर्णेकर हत्त्येमागे भलताच अँगल?

ठाणे शहरातील उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे विभाग प्रमुख प्रदीप तथा बाळू पूर्णेकर यांच्या निर्घृण हत्त्येस एक महिना उलटून गेल्यानंतरही सूत्रधार मिळत नसल्याने ठाण्यात गेल्या काही दिवसांपासून राजकीय नाटक रंगत आहे, असे म्हटले तर वावगे होणार नाही. राजकीय नाटक, या...

बिष्णोई गँगच्या कारवायांमुळे दिल्लीतले अधिकारीही वैतागले!

आठ दिवसांपूर्वी रविवारी रात्री मुंबईत जुहूच्या पुष्पा पार्कजवळ प्रसिद्ध अभिनेता टायगर श्रॉफवर बिष्णोई गँगच्या गुंडांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबाराने मुंबई पोलीस सोडा, खुद्द केंद्रीय गृह मंत्रालयातील काही बडे अधिकारी संतापाने लालबुंद झाल्याची माहिती हाती आली आहे. खरंतर बिष्णोई गँगच्या कारवायांमुळे...

तळहाताला खाज सुटली आणि टायगरजवळ फुटले फटाके!

वर्षभरापूर्वी जुहूच्या मेहमूद चौकातील रोहित शेट्टी यांच्या बंगल्यावर लॉरेन्स बिष्णोईच्या गुंडानी अंदाधुंद गोळीबार केला होता व अवघ्या पाच मिनिटात तो समाजमाध्यमावर प्रसारितही केला गेला होता. अगदी तीच पद्धत काल रात्रीही पुष्पा पार्क येथे ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ यांचा मुलगा,...
Skip to content