Homeन्यूज अँड व्ह्यूजराज्यसभेची सातवी जागा...

राज्यसभेची सातवी जागा आणि महाविकास आघाडीतली बेकी!

राज्यसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. 16 मार्चला या निवडणुका होत असून राज्यातून सात खासदार नव्याने राज्यसभेवर जाणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार, केंद्रीय समाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, रायगडमधील पेणचे धैर्यशील पाटील, शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी, रजनी पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फौजिया खान हे सात सदस्य दोन एप्रिल 2026 रोजी राज्यसभेतून निवृत्त होत आहेत. राज्य विधानसभेतील 288 आमदार नवे राज्यसभा सदस्य निवडून देणार आहेत. त्यामुळे एका जागेसाठी पहिल्या फेरीत निवडून येण्यासाठी 37 मतांची गरज आहे. महायुतीकडे म्हणजेच भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, या पक्षांकडे 220पेक्षा जास्त आमदार असल्याने या सर्वांचे सहा सदस्य राज्यसभेत जाऊ शकतात तर महाविकास आघाडीकडे फक्त एक सदस्य जाऊ शकेल एवढी मते आहेत.

महाविकास

भाजपकडून गेली दोन टर्म संधी हुकलेले राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांचे नाव चर्चेत आहे. पण भाजपमध्ये नाव चर्चेत असून संधी मिळेल याची शक्यता नसते. पहिल्यावेळी विनोद तावडे यांचे नाव चर्चेत होते. परंतु अचानक विधानसभेतील पराभूत उमेदवार आणि राज्यातील माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांना राज्यसभेवर भाजपने संधी दिली होती. दोन वर्षांपूर्वी अचानक माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना भाजपने राज्यसभेवर संधी दिली. दोनदा संधी हुकलेले विनोद तावडे यांना यावेळीतरी भाजपचे पक्षश्रेष्ठी संधी देणार का याविषयी चर्चा सुरू आहे. एका राज्यसभा निवडणुकीत डमी उमेदवार म्हणून अर्ज भरणाऱ्या विजया रहाटकर यांचे नाव राज्यसभा निवडणूक आली की नेहमी चर्चेत असते. सध्या त्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत. त्यामुळे पक्ष त्यांना संधी देईल का याविषयी साशंकता आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल लोकसभेवर निवडून गेल्यानंतर त्यांच्या जागी पेणचे शेकापचे माजी आमदार धैर्यशील पाटील यांना राज्यसभेत संधी मिळाली होती. फर्डा वक्ता आणि मेहनती कार्यकर्ता असलेल्या पाटील यांना भाजपने आपल्याकडे प्रवेश देऊन त्यांना थेट राज्यसभेत पाठवले. परंतु ही संधी केवळ दोनच वर्षे मिळाल्याने त्यांना पुन्हा संधी देण्याचा भाजप विचार करत आहे. रामदास आठवले यांनाही भाजप पुन्हा संधी देईल.

महाविकास

महाविकास आघाडीत राज्यसभेच्या उमेदवारीवरून सुंदोपसुंदी सुरू आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाकडे वीस आमदार आहेत तर काँग्रेसचे 16 आमदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे फक्त दहाच आमदार आहेत. अशा परिस्थितीत शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत यांनी शरद पवार यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू केली आहे. काँग्रेसने या उमेदवारीला कोणताही दुजोरा दिलेला नाही. शिवसेनेनेही शरद पवार यांच्या नावाला पक्ष म्हणून अद्याप पाठिंबा दिलेला नाही. महाविकास आघाडीतील समाजवादी पार्टीकडे दोन जागा आहेत तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडे एक आमदार आहे. भाजपचा साथीदार असलेल्या जनसुराज्य शक्ती या पक्षाकडे दोन आमदार आहेत तर एम आय एम, या पक्षाकडे एक आमदार आहे.
शिवसेनेकडे चाळीस आमदार असून त्यांचा एक सदस्य राज्यसभेत जाऊ शकतो. लोकसभा पराभूत झालेले राहुल शेवाळे यांच्या नावावर जवळजवळ शिक्कामोर्तब झाले आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेने मुंबई काँग्रेसचे सर्वेसर्वा दिवंगत मुरली देवरा यांचे सुपुत्र, माजी खासदार मिलिंद देवरा यांना राज्यसभेत पाठवले होते. मात्र यावेळी राहुल शेवाळे यांना संधी मिळणार याविषयी पक्षात कुणाचेही दुमत नाही.

महाविकास

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अजितदादांचे सुपुत्र पार्थ पवार यांना संधी मिळणार आहे. पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी तशी रीतसर घोषणा केली. सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यानंतर त्यांची राज्यसभेची जागा रिक्त झाली आहे. त्यामुळे पार्थ पवार त्या जागी जाणार आहेत. महायुतीचे सहा सदस्य राज्यसभेवर जाणार याविषयी कोणालाही शंका नाही. त्यापैकी चार सदस्य भाजपचे असतील आणि दोन सदस्य प्रत्येकी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे असतील. फक्त महाविकास आघाडीतच अद्याप उमेदवारीवरून वाद सुरू आहेत. राज्यसभेवर शरद पवार यांना संधी द्यायची आणि विधान परिषद निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना संधी द्यायची असे अंडरस्टँडिंग राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत झाल्याची चर्चा आहे. उद्धव ठाकरेंचा विधान परिषद सदस्यत्वचा कार्यकाळ येत्या 13 मे रोजी संपत आहे. मात्र काँग्रेसने आता राज्यसभा इतर पक्षांना सोडल्यास विधान परिषदेत काँग्रेसला संधी हवी अशी अट घातली आहे. महाविकास आघाडीतल्या या सुंदोपसुंदीत सत्ताधारी महायुतीचा आणखी एक उमेदवार निवडून आला नाही म्हणजे मिळवले.

(लेखक नितीन सावंत ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आहेत. संपर्क- 9892514124)

Continue reading

मुंबईतला ‘अल्पसंख्य’ मराठी माणसाला साथ तरी देणार कोण?

राज्यात पुन्हा एकदा मराठी सक्तीवरून राजकारण सुरू झाले आहे. रिक्षा-टॅक्सी वाहनचालकांना एक मेपासून मराठी सक्ती करण्याचा निर्णय राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी जाहीर केल्यानंतर यावरून पुन्हा एकदा महायुतीतील पक्षांमध्येच संघर्ष होण्याची शक्यता आहे. मुळात परिवहनमंत्र्यांचा हा निर्णय महायुतीतील पक्षांनाच...

पोटनिवडणुका ठरवतील भवितव्य सहानुभूतीच्या लाटेचे

राज्यात एप्रिलअखेर बारामती आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघात निवडणुका होत आहेत. या पोटनिवडणुका जाहीर झाल्यापासून राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे बारामतीची पोटनिवडणूक होत आहे तर शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे राहुरीची निवडणूक होत...

ठेवी शाबूत राखण्याचे आव्हान मुंबईच्या आयुक्त पेलतील का?

महाराष्ट्रात आयएएस पोस्टिंग झाली की प्रत्येक अधिकाऱ्याची मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आणि राज्याचे मुख्य सचिव हे स्वप्न असते. त्याचबरोबर आयपीएस अधिकाऱ्याची पोस्टिंग महाराष्ट्रात झाली की त्यांचे स्वप्न मुंबई शहराचे पोलीस आयुक्तपद हे असते. महाराष्ट्राचे पोलीस महासंचालकपद नाही. मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी...
Skip to content