गेल्या काही महिन्यांत खऱ्या अर्थाने मुंबई महानगर क्षेत्रातील कायदासुव्यवस्था ढासळली आहे का? की पोलिसांचे नियंत्रण सुटले आहे, असा प्रश्न वारंवार पडत आहे. गेल्या महिन्यात ठाणे शहरात दोन गंभीर घटना घडल्या. या घटनांना गृहमंत्री असलेल्या मुख्यमंत्र्यांनी कितपत गंभीर घेतले त्याचे उत्तर काळच देईल. 24 सप्टेंबर रोजी ठाणे शहरातील चितळसर पोलीसठाण्याच्या हद्दीत या पोलीसठाण्याचे उपनिरीक्षक किसन भोईर यांची डोक्यात वीट घालून हत्त्या करण्यात आली. उपनिरीक्षक भोईर रात्री सव्वाअकरा वाजता पोखरण रोड क्रमांक दोन येथील सुभाष नगर परिसरात गस्त घालत होते. यावेळी पान स्टॉलमालक राजू वाल्मिकी यांना पान स्टॉल बंद करण्यास सांगितले. परंतु बंद न करता राजू याने गोंधळ केला आणि उपनिरीक्षक भोईर यांच्या डोक्यावर सिमेंटच्या विटेने हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या भोईर यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. याचा अर्थ ठाणे शहरात पोलिसांची भीतीही गुंड प्रवृत्तीच्या मंडळींना वाटेनाशी झाली आहे.
त्यानंतर लगेचच 29 सप्टेंबर रोजी ठाण्यातील ठाकरे गटाचे शिवसेना विभागप्रमुख प्रदीप उर्फ बाळा पूर्णेकर यांची त्यांच्या कार्यालयात गोळ्या झाडून हत्त्या करण्यात आली. या हत्त्याप्रकरणी पप्या शिंदे, निखिल यादव, नितेश पवार यांना मुंबईतून अटक झाली तर संतोष कनोजिया उर्फ टल्ली आणि अमित सिंह उर्फ पपलू यांना उत्तर प्रदेश एसटीएफने प्रयागराजमधून अटक केली. बाळा पूर्णेकर हत्त्या प्रकरणी माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती यांच्यावर आरोप झाला आहे. बाळा पूर्णेकर यांचे पुत्र राम पूर्णेकर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन न्यायाची मागणी केली आहे.

या दोन घटनांना महिना पूर्ण होत नाही तोपर्यंत 18 ऑक्टोबर रोजी ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ यांचे पुत्र अभिनेते टायगर श्रॉफ यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न झाला. परंतु या हल्ल्यातून टायगर बचावले. मात्र त्यांच्या ड्रायव्हर आणि घटनास्थळी असलेल्या एक रिक्षा ड्रायव्हर जखमी झाला. या हल्ल्याची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई या टोळीने घेतली आहे. मुंबई क्राईम ब्रँचने मुंबईतील संघटित गुन्हेगारी संपवल्यानंतर सर्व गुंड टोळ्या थंडावल्या आहेत. परंतु फिल्म इंडस्ट्रीमधून खंडणी गोळा करण्यासाठी लॉरेन्स बिश्नोई याची टोळी मुंबईत आपला दबावगट निर्माण करत आहे. गेल्या वर्षी माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची हत्त्या लॉरेन्स बिश्नोई टोळीने केली होती. एसआरए बांधकाम व्यवसायातील स्पर्धेतून ही हत्त्या झाली होती. ही हत्त्या कोणी केली आणि या हत्त्येमागे कोण, याची कल्पना पोलिसांना आहे. परंतु शूटर्स वगळता या हत्त्यामागील मुख्य सूत्रधार मोकाट फिरत आहेत.
मध्यंतरी ठाण्यात आणि मीरा-भाईंदरमध्ये मिसरुड फुटलेले शूटर्स येत आणि गोळीबार करत. ही लहान मुले उत्तर प्रदेश आणि बिहारमधून पाच ते दहा हजार रुपये भाड्याने घेऊन त्यांचा शूटर म्हणून वापर केला जातो. आपले काम आटोपून ही मुले उत्तर प्रदेश, बिहारमध्ये परततात. पुढेही पोलिसांना सापडत नाहीत. लॉरेन्स बिश्नोई सध्या गुजरातमधील साबरमती जेलमध्ये आहे. तेथून तो आपली सूत्रे हलवतो. सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करून सुरुवातीला या टोळीने दहशत माजवण्यास सुरुवात केली. आता हळूहळू मुंबईतील बांधकाम क्षेत्रात या टोळीचा शिरकाव वाढेल. मुंबईतील फिल्म इंडस्ट्री या टोळीचे दुसरे टार्गेट आहे. विशेष म्हणजे ठाण्यातील कायदासुव्यवस्था बिघडण्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कारणीभूत आहेत, अशी कुजबूज भाजपच्या गोटात सुरू आहे. मात्र थेट त्यांच्यावर आरोप करण्याची भाजपची हिंमत नाही. बाळा पूर्णेकर यांच्या हत्त्येनंतर एकनाथ शिंदे ठाणे क्राईम ब्रँचमध्ये गेले होते. ठाण्यातील कायदासुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी गेलेल्या शिंदे यांच्यासंबंधी कुजबूज भाजपने सुरू केली. शिंदे पूर्णेकर यांच्या हत्त्येतील आरोपींना भेटण्यासाठी गेले होते, अशी चर्चा भाजपच्या कुजबूज ब्रिगेडने सुरू केली होती. मुंबईतील असो किंवा ठाण्यातील क्राइम ब्रांच असो, हे संघटित गुन्हेगारांच्या टोळ्या सहज उद्ध्वस्त करू शकतात. परंतु त्यासाठी त्यांना राजकीय पाठबळाची आवश्यकता असते. आज याच पाठबळाची गरज आहे.
(लेखक नितीन सावंत ज्येष्ठ पत्रकार आहेत. संपर्क- 9892514124)

