Homeन्यूज अँड व्ह्यूजमोदींसोबत जाण्यास शरद...

मोदींसोबत जाण्यास शरद पवार उतावीळ?

सत्तेत जावे असा आग्रह शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आणि आमदार यांनी धरल्यामुळे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची पंचाईत झाली आहे. खरे म्हणजे राजकारणातील चाणक्य समजल्या जाणाऱ्या शरद पवारांची वाट सध्या बिकट आहे. त्यामुळे ते कधी पंतप्रधान मोदींची भेट घेत आहेत तर कधी भाजपच्या केंद्रीय नेत्यांशी पडद्याआड चर्चा करत आहेत. मात्र या भेटीनंतर दस्तुरखुद्द शरद पवार आणि त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे माध्यमांसमोर वारंवार खुलासे करत आहेत- आम्ही एनडीएसोबत जाणार नाही तर आम्ही महाविकास आघाडीसोबतच आहोत. महायुतीशी उभा दावा मांडल्यानंतर महाविकास आघाडीतील कोणत्याही पक्षाचे नेते पंतप्रधान केंद्रीय मंत्री किंवा राज्यातील मुख्यमंत्र्यांना भेटत नाहीत. मात्र कधी शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे निमित्त करून तर कधी राज्यातील इतर मागासवर्गाच्या समस्यांचे निमित्त करून शरद पवार पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्र्यांना भेटत असतात. मुळात शरद पवार कशासाठी भेटतात हे सुज्ञ जनतेला चांगलेच ठाऊक आहे.

पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर या पक्षावर ताबा मिळवण्यासाठी विलिनीकरणाचा प्रस्ताव पुन्हा एकदा शरद पवार यांच्या पक्षाकडूनच देण्यात आला होता. विशेष म्हणजे यासाठी खासदार प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे अनुकूल होते. शरद पवारांनी पुन्हा पक्ष ताब्यात घेतल्यास आपले महत्त्व अधिक वाढेल, असे या दोन्ही नेत्यांना वाटत आहे. कारण, पार्थ पवार या दोन्ही नेत्यांना फारशी किंमत देत नाहीत. मात्र या विलिनीकरणाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी कडाडून विरोध केला आहे. अजितदादा हयात असताना विलिनीकरणाबाबत चर्चा झाली होती, अशा बातम्याही शरद पवार गटाकडून पेरण्यात आल्या होत्या. परंतु सुनेत्राताईंनी काहीही न बोलता या विलिनीकरणाला विरोध केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही हे विलिनीकरण नको आहे. त्यासाठी ते ठामपणे सुनेत्राताईंच्या पाठीशी उभे आहेत. उद्या विलिनीकरण झाल्यास शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या ताब्यात पक्ष जाईल, याची सुनेत्राताईंना पूर्ण खात्री आहे.

पवार

लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबियांना शरद पवारांनी अडगळीत टाकले होते. परंतु विधानसभेतील यशानंतर अजित पवार आणि त्यांच्या पक्षाला पुन्हा उर्जितावस्था प्राप्त झाली. लोकसभेतील अपयशानंतर विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांचे आमदारही बऱ्यापैकी निवडून आल्यामुळे आणि राज्यात महायुतीची सत्ता आल्याने अर्थातच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्त्व वाढले. अन्यथा अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबियांची अवस्था बिकट झाली असती. अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे सुनेत्राताईंवर उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी आली. राज्यातील दोन नंबरचे पद त्यांच्याकडे आल्याने त्यांचे महत्त्वही वाढले आहे. सुप्रिया सुळे, किमान राज्याच्या मुख्यमंत्री व्हाव्यात ही शरद पवारांची शेवटची इच्छा आहे. परंतु ज्या सुप्रिया सुळे यांनी आपल्या वहिनी सुनेत्राताईंचा लोकसभा निवडणुकीत पराभव केला, त्याच आपल्या वहिनी आता राज्यात उपमुख्यमंत्री आहेत, हे त्यांना पाहवे लागत आहे.

पवार

सध्या शरद पवार यांच्या पक्षाची अवस्था पाहता भविष्यात सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होतील अशी परिस्थिती नाही. त्यामुळे अजितदादांचा पक्ष ताब्यात घेऊन हळूहळू पुन्हा एकदा आपले वर्चस्व निर्माण करण्याचा शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचा स्पष्ट हेतू आहे. पण सध्यातरी या दोघांना हे शक्य होत नाही. त्यामुळे कधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन तर कधी भाजपच्या केंद्रीय नेत्यांची भेट घेऊन दबावतंत्र निर्माण करण्याचा प्रयत्न शरद पवार करत आहेत. परंतु उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठाम उभे असल्याने त्यांची डाळ शिजत नाही. दुसऱ्या बाजूला आमदार, खासदार यांना सत्तेत जाण्याची घाई झाली आहे. त्यामुळे शरद पवार आणि सुप्रिया सुळे दुहेरी संकटात सापडले आहेत. 1985 साली पुलोदचा प्रयोग फसल्यानंतर शरद पवार संभाजीनगर येथे राजीव गांधी यांच्या उपस्थितीत पुन्हा काँग्रेसमध्ये सामील झाले होते. त्यावेळी समाजवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेले आमदार पवार यांच्यासोबत राहण्यास तयार नव्हते. त्यामुळे पवार यांना पुन्हा काँग्रेसची वाट धरावी लागली. 1999 साली केवळ सत्तेसाठी शरद पवार पुन्हा काँग्रेससोबत आले. परंतु आता पुढच्या लोकसभा निवडणुकीपर्यंत खासदार आमदार थांबतील का, याविषयी शरद पवार यांनाच साशंकता आहे. शिवसेनेचे खासदार फुटल्यानंतर शरद पवार यांनी अधिक धास्ती घेतली आहे.

(लेखक नितीन सावंत ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आहेत. संपर्क- 9892514124)

Continue reading

निवडणूक आयोगाचे पितळ कोणाला उघडे पाडणार?

'इंडियन एक्स्प्रेस'च्या एका रिपोर्टने भारत निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांना उघडे पाडले आहे. हाच मुद्दा घेऊन आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) ॲक्शन मोडवर आले आहेत. मराठवाड्यात भीषण दुष्काळ आहे. दुष्काळ दौऱ्याचा कार्यक्रम...

‘गुंगी गुडिया’ ते ‘दुर्गा’- सुनेत्राताई गिरवणार का इंदिराजींचा कित्ता?

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची कमान सांभाळणाऱ्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना 'गुंगी गुडिया' संबोधून काँग्रेसने नव्या वादाला तोंड फोडले आहे. अजितदादांच्या आकस्मिक निधनानंतर सुनेत्राताईंकडे अचानक राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्त्व आले. हे नेतृत्त्व स्वीकारताना त्यांनी कोणतीही बडबड...

देवाभाऊ को गुस्सा क्यों आया?

मुंबई महानगर क्षेत्र आणि पुण्यात पहिल्याच पावसाने बोजवारा उडवून दिला. या पावसाने मुंबईतील यंत्रणा कोसळल्या. त्याचबरोबर सहा हजार सातशे कोटी रुपये खर्च करून उभारलेला मुंबई-पुणे मिसिंग लिंक रोड रोडवर दरडी कोसळल्याने सरकारची लक्तरे वेशीवर टांगली गली. वसई, नालासोपारा, विरार...
Skip to content