Homeन्यूज अँड व्ह्यूजमदिरा व मदिराक्षी!...

मदिरा व मदिराक्षी! पोलीस अधिकाऱ्यांचे डोंबिवलीच्या वेशीवर ‘मै टल्ली हो गयी..’

डोंबिवलीनजिकच्या शीळ फाट्यावरून डोंबिवलीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पडले नावाचे सुंदर गाव आहे. गावात अजून बऱ्यापैकी निसर्ग शाबूत आहे. उंच इमारती आहेत. पण उंची गगनाला वेसण घालण्याइतपत नाही, ही जमेची बाजू! हे पडले गाव सुरु होताच मुक्ता नामक विकासकाची ओळख व्हायला सुरुवात होते, कारण हीही आलिशान इमारत आहे. तेथे विचारणा केली तर त्यांनी सांगितले की मुक्ता रेसिडेन्सी पुढे आहे. महानगर गॅस पंपाच्या जवळपास आहे. अखेर मुक्ता रेसिडेन्सी सापडली. आटोपशीर संकुल दिसले. एका बाजूला रुग्णालय आहे, तळमजल्यावर शॉपिंग लाईन आहे. मागील बाजूस निवासी इमारती आहेत- दोन-तीन! आणि टोकाला या इमारतीपासून अगदी वेगळी ‘देशमुखांच्या गढी’सारखी एक टुमदार गढीच म्हणा अशी दोन अडीच मजल्याची आटोपशीर इमारत आहे. या गढीपासून अवघ्या दहा पावलांवर ‘कोकण किंग’ नावाचे बऱ्यापैकी सर्व सुविधांनी युक्त असे हॉटेल आहे. आता नमनाला घडीभर (थोडे जास्तच) तेल घातल्यानंतर आपली खरी कथा (हरिकथा नव्हे) सुरु करण्यास हरकत नसावी…

तर अशा या एवंगुणविशिष्ट गढीत कालच्या मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ‘गढी’च्या मालकाने एक ‘सेलिब्रेशन’ पार्टी ठेवली हॊती. आता हल्ली सेलिब्रेशन म्हटले की, मदिराही आपसूकच येते. कारण, त्याशिवाय सेलिब्रेशनमधला ‘से’ नीट उच्चारताच येत नाही म्हणे! असा सर्व इंतजाम असल्यावर पाहुणे मंडळींही उंचीच असणार हे ओघाने आलेच. उगाचच सस्पेन्स वाढवत नाही. पाहुणे दुसरेतिसरे कुणी नसून मुंबई व नवी मुंबई पोलीस दलातील उपायुक्त दर्जाचे अधिकारीगण होते. एकाच्या हातात तर म्हणे मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाची धुरा आहे. आता आर्थिक व्यवहार व उपायुक्त व निरीक्षक दर्जाचे अधिकारी असतील तर ‘मदिरे’बरोबर ‘मदिराक्षी’ही हवीच. त्याशिवाय रात्री दहा-साडेदहा वाजण्याच्या सुमारास सुरु झालेल्या या ‘वैयक्तिक’ पार्टीतील ‘राते रंगीन’ कशी बरे होणार? (वैयक्तिक हा शब्द मुद्दामहून लिहिला आहे, कारण तो ऑफिशियल समजला गेला आहे.) ढगाला लागली कळ… तर अशा या रंगीन पार्टीला म्हणावा तसा रंग चढत नव्हता असं म्हणा किंवा ‘घेण्याचे’ प्रमाण काहीसे कमी असावे. पण कसेही पार्टी ‘डल’ होते आहे हे लक्षात येताच मालकाने ‘ढगाला लागली कळ… पाणी थेंब थेंब गळं…’ हा ट्रॅक लावताच सर्व अधिकाऱ्यांचे पाय थिरकू लागले. अधिकारी असले म्हणून काय झाले त्यांना भाव-भावना आहेत की नाही? त्यानंतर ‘झिगान्ट’ही लावले गेले! पण म्हणावा तसा टेम्पो काही येत नव्हता. त्यावरही उपाय काढण्यात आला- मै टल्ली हो गयी…

हा उपाय मात्र लगेचच लागू पडला. कुणीतरी ‘मै टल्ली हो गयी’ हा ट्रॅक गाण्यासह सुरु करून पार्टीचा माहोल जमवून टाकला. मग जणू ‘मी.. तू..’ भानच हरपले.. सर्वजण दणक्यात नाचू लागले. मग मात्र ‘आजकी रात मजा आँखोसे लिजिए..’ सुरु झाल्यानंतर मात्र काहींनी हातांनी व पायांनीही नाचायला सुरुवात केली. मात्र यापैकी काहींनी ‘मौकेकी नजाकत न समजता’ काही गैरप्रकार केल्याने मदिराक्षी बालिकांनी रौद्र स्वरूप धारण केल्याचे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले. दरम्यान मुक्ता संकुलात राहणाऱ्या रहिवाशांनी चुळबुळ सुरु केली होती. पण मालकाच्या गढीत हे होत असल्याने कुणी काही बोलत नव्हते. कारण, त्या बिचाऱ्यांना असल्या पार्टीजची सवय झालेली असल्याने सर्वजण चिडीचूप होते. पार्टीत गेलेल्या एका अधिकाऱ्याला उचलून गाडीत बसवावे लागले, असेही काही रहिवाशांनी सूचित केले. पण तसा तो परिसर रात्री दहा वाजल्यानंतर शांतच असतो. किमान अर्धा, पाऊण किलोमीटरच्या अंतरात पार्टीचा आवाज नक्कीच जात असणार! मजेशीर गोष्ट म्हणजे रेसिडेन्सीपासून अवघ्या पाच मिनिटांवर डायघर पोलीसचौकी आहे. तेथे दिवसरात्र अधिकारी व हवालदार तैनात असतात.

झाले. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ही पार्टी झाली व ही माहिती कुठूनतरी आमचे मित्र माजी पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार त्रिवेदी यांना समजली. त्यांनी माहितीची खातरजमा करून घेतली व थेट पोलीस महासंचालक दाते यांच्यकडे संबंधित प्रकाराच्या चौकशीची मागणी केली. महासंचालक दाते यांनी याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश ठाणे पोलीस आयुक्तालयाला दिले. ठाणे पोलिसांच्या उपायुक्तपदी असलेल्या अधिकाऱ्यांनी याप्रकरणी चौकशी केल्याचे समजले. या पार्टीला त्या पोलीस अधिकाऱ्यांनी वैयक्तिक पातळीवर हजेरी लावली होती तसेच ही पार्टी खासगी असल्याने चौकशीच्या कक्षेत येत नसल्याचे नमूद करून फाईल बंद केल्याची माहितीही आली आहे. ही पार्टी खासगी असेलही. पण मग या खासगी पार्टीला पोलिसांची अधिकृत वाहने घेऊन जाता येते का? तसेच कार्यालयाचे कर्मचारी वापरता येतात का? तसेच या पार्टीत हजर असलेला एक अधिकारी, मी पार्टीला हजर होतो व पाय घसरून मी पडलो व जखमी झालो असे खासगीत कबूलही करत आहे. या सर्व बाबी सरकारी कर्मचारी-कामगारांच्या वर्तणुकीत बसतात काय? याचीही शहानिशा केली जावी. महासंचालकांनी पुन्हा चौकशी करून याप्रकरणी निर्णय करायला हवा!

(लेखक विजयकुमार काळे ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

1 COMMENT

  1. कठिण आहे. पुन्हा चौकशी होणे दुरापास्तच! आपल्या यंत्रणेला राजकीय किड लागली आहे

Comments are closed.

Continue reading

परदेशाप्रमाणे भांडुपमध्ये लवकरच दिसणार ‘कलते’ मनोरे?

मुंबईतला लालबहाद्दूर शास्त्री मार्ग, मेट्रो लाईनचे काम आणि भांडुप-मुलुंड परिसर यांचे काय नाते आहे हे एका परमेश्वरालाच माहित! कारण मेट्रोचे अपघात येथेच सुरू झाले आहेत. काही महिन्यांपूर्वी झालेल्या अपघातात मेट्रोची एक स्लॅब कोसळून रिक्षा चक्काचूर झाली होती व माणसे...

मुंबई महापालिकेचा ‘दिव्याखालीच अंधार’!

गेल्या दोन दिवसांपासून मुंबईला वरूणराजा झोडपून काढत आहे. मुसळधार पावसामुळे मुंबई महापालिकेच्या कारभाराची लत्करे वेशीवर टांगली जात आहे. मी-मी म्हणणारे कित्येक आले. गेले. राजकारणातून संपले. पण, मुंबई काही तुंबायची राहिली नाही. यंदा तब्बल महिन्याभराच्या प्रतीक्षेनंतर मुंबईत पावसाचे आगमन झाले....

माध्यमांना ठाकरेंच्या शिवसेनेचे का बरे वावडे?

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सहा खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आज दाकल झाले. या प्रक्रियेत गेल्या चार दिवसांपासून विविध मराठी वृत्तवाहिन्यांवरील चर्चेत एक सवाल विचारला गेला- उबाठाचे प्रवक्ते पत्रकारांना वा वृत्तवाहिन्यांना उपलब्ध का नसतात? त्याबाबत निरीक्षणातून हाती आलेली...
Skip to content