आता काय तर म्हणे शाहरुख खान…

शाहरुख खानला आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘स्वदेस’ (२००४)मधील मोहन भार्गव ही व्यक्तीरेखा उत्तम साकारली म्हणून म्हणा अथवा शिमित अमिन दिग्दर्शित ‘चक दे इंडिया’ (२००७)मधील हॉकी संघ प्रशिक्षक कबीर खान, या भूमिकेसाठी अभिनयाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले असते तर तो त्याचा खरा गौरव ठरला असता. त्या भूमिका ‌नक्कीच ताकदीच्या होत्या. पण अॅटली दिग्दर्शित ‘जवान’ (२०२३)मधील विक्रम राठोडच्या अभिनयासाठी त्याला अभिनयाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, हे पचणे फारच अवघड आहे. त्यात त्याच्या अभिनयापेक्षा व्हीएफ‌एक्स दिसतोय, असं चित्रपटसृष्टीतील काही मान्यवरांपासून सोशल मीडियात मतस्वातंत्र्य घेत असलेल्यापर्यंत अनेकांचे एकमत झाले. त्यात आता आणखी एका गोष्टीची भर पडली. काय तर म्हणे, शाहरुख खान अर्थात एसआरके हा टॉम क्रूझ, टेलर स्विफ्ट यांना मागे टाकून जगभरातील चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक श्रीमंत सेलिब्रिटी ठरला आहे.

बहुतेक तो स्वतः पैसे मोजण्यात वेळ घालवत नसावा जितके हे चर्चेत घालवतात. या सगळ्या उलटसुलट चर्चेला उधाण येत असतानाच तो आता ११ अॉक्टोबर रोजी अहमदाबाद येथे अतिशय ग्लॅमरसपणे साजरा होत असलेल्या फिल्म फेअर सोहळ्याचे सूत्रसंचालन करतोय. त्याच्या सूत्रसंचालनात आत्मविश्वास व अतिआत्मविश्वास यांच्यातील रेषा अगदीच पुसट असते. म्हणूनच तर एकदा‌ अशाच चकाचक‌ महाखर्चिक जंगी सोहळ्यात विद्या बालनला त्याने तिच्या, आतापर्यंत किती पुरस्कार तू पटकावलेस असे विचारले असता, त्याने आपला केवढातरी मोठा आकडा सांगताच तिने क्षणात विचारले, उसमे से खरीदे कितने है… और एक्सचेंज ऑफर कितने है? पुरस्कार सोहळ्यात नृत्य करीत त्या बदल्यात पुरस्कार वगैरे… शाहरुख अतिशय मुरलेला आणि मुरब्बी. तो अशा अनपेक्षित प्रश्नाने अजिबात डगमगला नाही. विद्या बालन त्याला म्हणाली, अवॉर्ड की भूख तो मुझे है…‌ शाहरुखवर याचा काही परिणाम झाल्याचे त्याचा चेहरा तरी दाखवत नव्हता. कदाचित हा त्याचा अभिनय असेल. पण तो ‘जवान’ चित्रपटापेक्षा जास्त चांगला आहे.

चित्रपटाची संख्या वाढवण्यापेक्षा एखाद्याच चित्रपटावर सगळे लक्ष केंद्रित करताना त्याचे घसघशीत मानधन घेणे, आपल्या याच एकमेव चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख सतत बदलत ठेवत आपले चाहते (ते कायम त्याचे फॉलोअर्स असतात हे विशेष) व‌ चित्रपटरसिकांची उत्कंठा वाढवत ठेवणे, आपल्या याच चित्रपटाच्या आगमनाची दीड-दोन तास चालणारी प्रचंड मोठी पत्रकार परिषद, मोठ्या उत्पादनाचा ब्रॅण्ड अम्बेसेडर, जाहिरातपट, देश विदेशातील इव्हेंटस, रिबीन कापण्याचा साईड बिझनेस, आयपीएल क्रिकेट स्पर्धेत कोलकत्ता नाईट रायडर्स संघाचा मालक अशा अनेक उद्योगात विलक्षण बिझी असलेल्या एसआरकेची आर्थिक सुबत्ता प्रचंड असल्यास आश्चर्य ते काय म्हणायचे? पस्तीस वर्षांपूर्वी दिल्लीवरुन‌ मुंबईतील मनोरंजन उद्योगात आलेल्या या युवकाने फौजी, सर्कस, वागले की दुनिया अशा मालिकांमधून काम करतानाच लक्ष वेधून घेतले आणि हेमा मालिनी दिग्दर्शित ‘दिल आशना है’, राज कंवर दिग्दर्शित ‘दीवाना’ असे चित्रपट स्वीकारत पुढचं पाऊल टाकले ते सतत पुढेच.

मला जुहू चौपाटीलगतच्या एका पंचतारांकित हॉटेलमधील ‘दीवाना’चा मुहूर्त आठवतोय. शाहरुख खानच्या देहबोलीतून त्याने मिळालेल्या संधीचे सोने करायचं ठरवलंय हे जाणवले. दिव्या भारतीची आई महाराष्ट्रीय असल्याने तिला मराठी चांगले येत‌‌ होते आणि आम्हा सिनेपत्रकाराशी संवाद करण्यात तिला कायमच रस असे. या दोन्ही चित्रपटात हीच जोडी. सर्वप्रथम ‘दीवाना’ (सप्टेंबर १९९२) पडद्यावर आला तोच शाहरुख खानच्या रुपाने एक नवीन वादळ आले आहे याचा प्रत्यय आला. दादरच्या ब्रॉडवे मिनी थिएटरमधील आम्हा सिनेपत्रकारासाठीच्या खेळास शाहरुख खान आवर्जून हजर होता आणि त्याने आम्हा समीक्षकांचा प्रतिसाद जाणून घेतला. त्याची ही जिज्ञासू वृत्ती विशेष उल्लेखनीय आहे.

शाहरुख

१९९५च्या दिवाळीत २० आक्टोबर रोजी यशराज फिल्म्स निर्मित व आदित्य चोप्रा दिग्दर्शित ‘दिलवाले दुल्हनियाँ ले जायेगे’ प्रदर्शित झाला आणि‌ त्याचा राज मल्होत्रा असा काही लोकप्रिय झाला की‌ तो एक नवीन पिढीतील कार्पोरेट‌ युगाचा सुपर स्टार‌ ठरला. दक्षिण मुंबईतील न्यू एक्सलसियर चित्रपटगृहात दिवसा तीन‌ हाऊसफुल्ल गर्दीतील खेळ असा पन्नास आठवड्यांचा खणखणीत मुक्काम केल्यावर हा डीडीएलजे दक्षिणमध्य मुंबईतील मराठा मंदिर चित्रपटगृहात शिफ्ट केला आणि आजही तेथे तो दाखवला जात आहे. आता तर त्याचे तीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दल काही डिजिटल चॅनल सेलिब्रेशन साजरा करणार आहेत…

एकूण काय, शाहरुख खान सतत न्यूजमध्ये आहे, फोकसमध्ये आहे. काहीच नाही तर त्याचा मुलगा आर्यन व‌ मुलगी सुहाना यांच्याबद्दल काही बातमी असतेच… मुलींच्या नावे असलेले अलिबागमधील प्रशस्त घरापासून तेथे जाण्यासाठी शाहरुख गेटवे ऑफ इंडियाला स्पीड बोटीने मांडवा बीचला येजा करतो, यापर्यंत शाहरुख खानच्या कशाचीही बातमी होतेय…

Continue reading

सतना कारागृह! गोष्ट येथे संपतच नाही!!

ही बातमी तुम्हालाही माहित्येय. कदाचित तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेल अथवा लग्नाच्या गाठी देव स्वर्गात बांधत असतो, असे पारंपरिक समजूतदारपणाचे वाक्य बोलून तुम्ही दुसऱ्या बातमीकडे वळला असाल... मध्य प्रदेशमधील सतना कारागृहातील ज्येष्ठ जेलर अधीक्षक फिरोजा खान हिची त्याच कारागृहातील...

रणवीरने चित्रपट सोडला म्हणून इतका गहजब?

'डाॅन ३'च्या चित्रिकरणास सुरुवात होण्याच्या अवघ्या दहा दिवस अगोदर रणवीर सिंगने चित्रपट सोडल्याने दिग्दर्शक फरहान अख्तरचे चिडणे आणि फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्लाॅईज या चित्रपटसृष्टीतील संघटनेने रणवीर सिंगवर तीन वर्षांची बंदी घालण्याचे आवाहन करताच त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटणे...

साठीतल्या सलमानमध्ये अजूनही रागवण्याचे ‘स्पिरीट’!

राग आला रे आला की सोशल मीडियात, विशेषतः इंस्टाग्रामवर पोस्ट करणे हे आजच्या सेलिब्रिटीजचे वैशिष्ट्य. त्यांना एखाद्या इव्हेंटसमध्ये जरा कुठे कशाचा तरी राग आला अथवा कोणाकडे रागाने पाहिले न पाहिले तरी तमाम इन्फ्लूअन्सर्स त्याचं काही सेकंदाचे रिल सोशल मीडियात...
Skip to content