Homeबॅक पेजसाठीतल्या सलमानमध्ये अजूनही...

साठीतल्या सलमानमध्ये अजूनही रागवण्याचे ‘स्पिरीट’!

राग आला रे आला की सोशल मीडियात, विशेषतः इंस्टाग्रामवर पोस्ट करणे हे आजच्या सेलिब्रिटीजचे वैशिष्ट्य. त्यांना एखाद्या इव्हेंटसमध्ये जरा कुठे कशाचा तरी राग आला अथवा कोणाकडे रागाने पाहिले न पाहिले तरी तमाम इन्फ्लूअन्सर्स त्याचं काही सेकंदाचे रिल सोशल मीडियात पोस्ट शेअर करताहेत तोच ते भरभर व्हायरल होतेय. अशा दोन्ही प्रकारच्या बातम्या होतात. तशा त्या कशाच्याही होतात. त्याचा आपल्याला राग येऊन उपयोग नाही. सेलिब्रिटीजना यायला हवा. एकूणच काय,’राग हे चलनी नाणे आहे.’ सलमान खानला राग आला आणि त्याने एक दोन नव्हे तर एकूण चार पोस्ट केल्या. पाप्पाराझींना काही बरंवाईट सुनावलं. आपण कसं मीडियाला सहकार्य करतो, फोटोग्राफर्सना पैसे मिळावेत यासाठी फोटो पोझ देतो वगैरे वगैरे… तो हिन्दुजा इस्पितळात कोणाला तरी पाहायला जाताना अगदी त्याच्या घरापासून तमाम इन्फ्लूअन्सर्स, फोटोग्राफर्स त्याच्या मागावर होते आणि ते अगदी हिंदुजा हॉस्पिटलपर्यंत होते हे त्याला खटकले. म्हटलं तर त्याचंही बरोबरच आहे. मध्यरात्री तीन वाजता तरी खाजगी आयुष्य जगू द्यात हो. इतका त्याच्यावर “डोळा” ठेवायचा? असं काय मोठं कव्हरेज मिळणार होते? ब्रेकिंग न्यूज मिळणार होती?

एखाद्या फिल्मी इव्हेंटस, प्रीमियर अथवा पार्टीला जात असताना मीडियाच्या फ्लॅशने अखंड न्हाऊन निघालो तर ते प्रचंड सुखावणारं असतं. तरीदेखील सलमान खानला मीडियाचा राग येणं नवीन नाही. मला आठवतंय, अंधेरीतील नटराज स्टुडिओत राजश्री प्राॅडक्शनच्या सूरजकुमार बडजात्या दिग्दर्शित ‘मैने प्यार किया’च्या सेटवर आम्हा सिनेपत्रकारांना शूटींग रिपोर्टींगसाठी आमंत्रित करण्यात आले असता दोन्ही दिवस भाग्यश्री पटवर्धनने मनमोकळ्या गप्पा केल्या. सलमान खान पहिल्या दिवशी काहीसा दूरच राहिला आणि दुसऱ्या दिवशी सेटवर आलाच नाही. अशातच तेव्हाच्या एका प्रतिष्ठित अशा चित्रपटविषयक साप्ताहिकाच्या फोटोग्राफर्सशी त्याने विनाकारण वाद घातला म्हणून त्या साप्ताहिकाने त्याचा फोटोच प्रसिद्ध करणे थांबवले. तरीदेखील सलमान नरमला नाही. अंधेरीतीलच सेठ स्टुडिओत सावनकुमार निर्मित आणि दिग्दर्शित ‘सनम बेवफा’च्या मुहूर्ताला रोखठोक वृत्तीच्या इंद्रजीत औरंगाबादकर याचा सलमान खानशी असाच त्याचे फोटो काढण्यावरुन वाद झाला तेव्हा इंद्रजीत औरंगाबादकरने कॅमेरा बंद करून आपल्या बॅगमध्ये भरला आणि आपल्याला तुझा फोटो काढण्यात फारसा रस नाही, असेच दाखवून दिले.

सलमान खानचे मीडियात फारच कमी जणांशी जमलं अथवा पटलं. सूरजकुमार बडजात्या दिग्दर्शित ‘हम साथ साथ है’च्या जयपूर येथील चित्रिकरणाच्या वेळी त्याने केलेली काळवीटाची शिकार आणि ऐश्वर्या रायसोबतचे त्याचे प्रेमप्रकरण यावर तो बोलायला कायमच नाखुश. वांद्रे येथील हिट ॲन्ड रन प्रकरणही त्याला अडचणीचे. पण कधीतरी आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मीडियाशी बोलायला हवेच ना? ‘रेडी’ या चित्रपटापासून त्याने ते सुरू केले. तरी त्याच्या बोलण्यात, ऐकण्यात, बघण्यात, सांगण्यात एकप्रकारचा अहंभाव असतोच असतो. ‘दबंग’च्या वेळी मी अनुभवलंय. तो मराठीतही बोलतो म्हणून त्याला चांगल्या वर्तणुकीचे बरेच गुण देणं आवश्यक नाही. त्याची आई महाराष्ट्रीय असल्याने त्याला आणि त्याच्या भावांनाही मराठी यायलाच हवे. मीडियावर रागवायची त्याची जणू यशस्वी परंपरा मुद्रित माध्यमे ते डिजिटल, बोरुबहाद्दर ते इन्फ्लुअन्सर अशी सुरुच आहे. असते एकेकाची सवय. मग तो सलमान खान असला म्हणून काय झाले? साठी ओलांडलेल्या सलमान खानकडे अजूनही रागवण्याचे ‘स्पिरीट’ कायम आहे. याचं हवं तर कौतुक करुयात…

(लेखक दिलीप ठाकूर ज्येष्ठ सिने पत्रकार आणि समीक्षक आहेत.)

1 COMMENT

  1. सिने पत्रकारही चुकतात.. वेळ , प्रसंग काहीही न बघता केवळ सनसनाटी बातम्यांसाठी मागे लागतात आणि स्वतः चा अपमान करून घेतात.

Comments are closed.

Continue reading

सतना कारागृह! गोष्ट येथे संपतच नाही!!

ही बातमी तुम्हालाही माहित्येय. कदाचित तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेल अथवा लग्नाच्या गाठी देव स्वर्गात बांधत असतो, असे पारंपरिक समजूतदारपणाचे वाक्य बोलून तुम्ही दुसऱ्या बातमीकडे वळला असाल... मध्य प्रदेशमधील सतना कारागृहातील ज्येष्ठ जेलर अधीक्षक फिरोजा खान हिची त्याच कारागृहातील...

रणवीरने चित्रपट सोडला म्हणून इतका गहजब?

'डाॅन ३'च्या चित्रिकरणास सुरुवात होण्याच्या अवघ्या दहा दिवस अगोदर रणवीर सिंगने चित्रपट सोडल्याने दिग्दर्शक फरहान अख्तरचे चिडणे आणि फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्लाॅईज या चित्रपटसृष्टीतील संघटनेने रणवीर सिंगवर तीन वर्षांची बंदी घालण्याचे आवाहन करताच त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटणे...

‘आलिया’ भोगासी…

जे तुम्हाला दिसत होते, जे सर्वांच्या समोर होते, ते कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील रेड कार्पेटवरील जगभरातील अनेक देशांतील अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त कॅमेरा हाती असलेल्या मीडियातील फोटोग्राफर्स, पाप्पाराझी, इन्फ्लुअन्सर यांना दिसलं नाही? आणि त्या गर्दीला जे दिसले नाही, त्याचीच बातमी झाली....
Skip to content