Homeकल्चर +कोईम्बतूरला रंगला ट्रेलर...

कोईम्बतूरला रंगला ट्रेलर लाँच आणि मग …

जग जवळ आले आहे हे आता बोलायची, सांगायची, ऐकायची गरज नाही. ते घडताना दिसतेय. आता तुम्हीच बघा ना, तमिळनाडूच्या कोईम्बतूरला दिग्दर्शक कृष्णकुमार रामकुमार यांच्या ‘जी डी एन’ (नायडू) या मल्याळम चरित्रपटाचा रंगतदार ट्रेलर लाँच सोहळा पार पडतोय न पडतोय तोच समाजमाध्यमावर रसिका सुनीलने या प्रीमियरला अतिशय स्टाईलमध्ये आणि लाल रंगाच्या व्ही नेक डिझाइनच्या ब्लाऊजमध्ये लक्षवेधक एन्ट्री केल्याचे रिल दिसू लागले. तरी बरं या चित्रपटात आर. माधवन नायक आहे. त्याने शीर्षक भूमिका साकारलीय. पण त्याची चर्चा होत नाही. साऊथला होत असेल. पण इकडे हवा वेगळी आहे. रसिका सुनीलच्या रिलकडे लक्ष वेधून घेतले गेले. (जमाना रिलचा आहे म्हटल्यावर काय हो) बघता बघता त्या एकाच स्पाॅटवरील तीनचार कलरफुल्ल रिलचे लाईक्स केवढेतरी वाढत वाढत गेले आणि तुम्हालाही माहित्येय, हातोहाती मोबाईल असल्याने आणि अनेकांना कशावर ना कशावर व्यक्त व्हायची हौसमौज असल्याने अनेक काॅमेन्टसही वाढत वाढत गेल्या. अनेकांनी रसिका सुनीलला नॅशनल क्रश म्हटलं. कोणी म्हटलं साऊथच्या रक्ष्मिका मन्दाना, सामंथा रुथ प्रभू यांच्यापेक्षा सरस आणि आकर्षक असे हे सौंदर्य आहे. अर्थात हे अतिशय प्रेमाने आलं आहे आणि एका लोकप्रिय मराठी अभिनेत्रीचा तिकडे साऊथच्या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचच्या वेळी डंका वाजला, याचं विशेष कौतुक आहे.

केवढेतरी सुखावणारं आहे ना? बाहुबली (पहिला आणि दुसरा), पुष्पा (पहिला आणि दुसरा) अशा धुँवाधार यशस्वी ठरलेल्या साऊथच्या चित्रपटांनी आजच्या जेन झी पिढीचे लक्ष मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीच्या खूपच पलिकडे म्हणजे साऊथचा चित्रपट, विदेशातील चित्रपट, त्यातील सेलिब्रिटी यावरही आहे. आणि त्यात कुठेही महाराष्ट्रीय चेहरा दिसला रे दिसला की लाईक्स वाढत वाढत जातात. बरं, एकीकडे हे तर तिकडे हैदराबादला अभिषेक नामा दिग्दर्शित ‘नागबंधम’ या तेलगू भाषेतील चित्रपटाच्या प्रीमियरला नभा नतेश या तारकेवर मोठ्या प्रमाणावर फोकस पडला. नभा नतेशच्या रुपाने दक्षिण भारतातील प्रादेशिक भाषेतील चित्रपटात अलिकडेच आलेला चेहरा सोशल मीडियातून आपल्यासमोर आला. हे दोन्ही चित्रपट एकाच वेळेस हिंदीसह दक्षिणेकडील तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम या भाषेत आहेत. इन्फ्लुअन्सरच्या फ्लॅशने दोघींना समाजमाध्यमातून उजळवून टाकले. माझ्या नवऱ्याची बायको, या मालिकेने रसिका सुनीलला ओळख दिली. तिच्या प्रगती पुस्तकात मराठी चित्रपट, मालिका, नाटक असं बरंच काही आहे. ती काही काळ अमेरिकेत होती आणि त्यात काही गोष्टी शिकली हेदेखील आहे. पण यावेळचा ग्लॅमरचा तडका वेगळा आहे. आपण साऊथच्या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचच्या वेळी नुसतं गेलो, चाललो, पाहिलं तर त्याचा असा रिझल्ट येईल, अशी तिची अजिबात अपेक्षा नसावी. नभा नतेशने मात्र ‘नागबंधम’ च्या पूर्वप्रसिद्धीसाठी मुंबई, हैदराबाद येथील मल्टीप्लेक्समध्ये तसेच हैदराबादला गर्दीच्या ठिकाणी काही मिनिटांचे नृत्यही केले. मुंबईत अंधेरीतील एका मल्टीप्लेक्समध्ये मीदेखील ते पाहिले. पण त्या मेहनतीपेक्षा तिचं नाॅर्मल तरी आकर्षक रुपातले वावरणे तिला भरभरुन कव्हरेज आणि लाईक्स देणारं ठरले.

साऊथच्या चित्रपटाच्या मोठं बजेट (नागबंधम ११० कोटी म्हणे), मोठे स्टार्स (अल्लू अर्जून, प्रभास वगैरे), भलेमोठे सेट्स, भलंमोठं प्रमोशन, केवढेतरी मार्केटिंग या गोष्टी एव्हाना आपल्याला माहीत आहेत. साऊथची मोठी बॅनर्स (चित्रपट निर्मिती संस्था) साठच्या दशकांपासून हिंदी चित्रपट निर्मितीत आहेत. प्रसाद प्राॅडक्शन, एव्हीएम, जेमिनी, वासन, सुरेश प्राॅडक्शन अशी बरीच नावे आहेत. काळानुसार ती मागे पडली आणि पुढची पिढी आली. पॅन इंडिया चित्रपट निर्मिती आली. सबटायटल्सने इकडचा तिकडचा चित्रपट कुठेही पाहिला जाऊ लागला. आणि याच वाटचालीत आता तिकडच्या ट्रेलर लाँचच्या सोहळ्यातील मराठी अभिनेत्रीचे नुसतं छान छान हसत हसत चालणं आणि त्याचवेळेस साऊथच्या चित्रपटाच्या प्रमोशन आणि प्रिमियरच्या वेळचे तिकडच्या अभिनेत्रीचे येणे हे एकाचवेळेस सोशल मीडियात रिलच्या रुपात लक्षवेधक ठरल्या, हेच तर विशेष.

(लेखक दिलीप ठाकूर ज्येष्ठ सिने पत्रकार आणि समीक्षक आहेत.)

Continue reading

रिमेक बनवताय? सावधान! जेन झी बघतोय!!

तुम्बाडची मंजुळा पाहणाऱ्या काही जणांनी लगोलग समाजमाध्यमावर म्हटलं, हा मराठी चित्रपट 'सु फ्राॅम सो' या लोकप्रिय कन्नड चित्रपटाची रिमेक आहे. कोणी म्हणालं, अगदी असाच हा चित्रपट आहे (खरंच का), तर कोणी म्हणालं, मूळ गोष्टीला कोकणच्या पार्श्वभूमीवर अगदी छान मांडलंय....

सलमानचं ‘ते’ रुपडं आहे तरी कसलं द्योतक?

दादा कोंडके द्वैअर्थी संवादासाठी ओळखले जात होते तरी कधीकधी ते एखादं सत्य सहज बोलून जात असत. दादा कोंडके यांच्या कामाची एक पद्धत होती. आपला चित्रपट पूर्ण झाल्यावर ते मुंबईतील आम्हा काही सिनेपत्रकारांना गोव्याला फिरायला नेत. या प्रवासात ते जे...

शाहरुख खानच नव्हे तर अनेक ‘हिंदी’वाल्यांनी दिली ‘मराठी’ला साथ!

सोशल मीडियावर सर्वाधिक लक्षवेधक चर्चा आहे ती, एसआरकेने अर्थात शाहरुख खानने दे‌ऊळ बंद-२ची. त्याच्या रेड चिली या कंपनीने डिजिटल काॅपीच्या पैशासाठी अडवणूक न करता चित्रपटप्रदर्शनाचा मार्ग मोकळा केला याची.‌ देऊळ बंदचा सर्वेसर्वा प्रवीण तरडे यानेच ही गोष्ट सांगितली आणि...
Skip to content