Homeपब्लिक फिगरहुडकेश्वरमध्ये मुलीवर झालेल्या...

हुडकेश्वरमध्ये मुलीवर झालेल्या अत्याचाराची व्याप्ती वाढवा!

नागपूरमधील हुडकेश्वर पोलीसठाण्याच्या हद्दीत मुलीवर झालेल्या गंभीर अत्याचाराच्या प्रकरणाचा तपास केवळ एका आरोपीपुरता मर्यादित न ठेवता त्याची व्याप्ती वाढविण्यात यावी. आरोपीला प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष मदत करणारे, पीडितेवर दबाव किंवा दहशत निर्माण करणारे तसेच या प्रकरणामागे आणखी व्यक्ती अथवा एखादी साखळी कार्यरत आहे का, याचा मुळापर्यंत जाऊन शोध घेण्यात यावा, अशी मागणी शिवसेना नेत्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली.

डॉ. गोऱ्हे यांनी आज नागपूर येथील हुडकेश्वर पोलीसठाण्याला भेट देऊन या गंभीर प्रकरणाच्या तपासाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी नागपूर शहराचे सह पोलीस आयुक्त नवीन रेड्डी, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, सहाय्यक पोलीस आयुक्त नरेंद्र हिवरे, तसेच हुडकेश्वर पोलीसठाण्याचे पोलीस निरीक्षक अनामिका मिर्झापुरे यांच्यासह संबंधित पोलीस अधिकारी उपस्थित होते. डॉ. गोऱ्हे यांनी गुन्ह्याचा तपास, आरोपीची पार्श्वभूमी, मोबाईल व अन्य डिजिटल पुरावे, सायबर तपास आणि संभाव्य लागेबांधे याबाबत अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली. आरोपीने यापूर्वी नागपूरबाहेर अन्य जिल्ह्यांत किंवा राज्यांत अशाच प्रकारचे गुन्हे केले आहेत का, त्याला आणखी कोणाची मदत मिळाली आहे का, याचीही चौकशी करण्याची आवश्यकता डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी व्यक्त केली. आरोपीचा मोबाईल, कॉल रेकॉर्ड, सोशल मीडिया व अन्य डिजिटल पुराव्यांचे तांत्रिक विश्लेषण करावे. त्याच्या संपर्कातील संशयित व्यक्तींची सायबर तपासाच्या माध्यमातून पडताळणी करावी. तसेच परिसरातील नागरिकांकडूनही आवश्यक माहिती घेऊन तपासाची व्याप्ती वाढवावी, अशी सूचना त्यांनी केली.

पीडितेला धमकावणे, तिच्यावर दहशत निर्माण करणे, ब्लॅकमेल करणे किंवा तिच्या असहायतेचा गैरफायदा घेणे अशी कार्यपद्धती समोर येत असेल, तर हा केवळ एका आरोपीपुरता विषय आहे, असे गृहीत धरता येणार नाही. त्यामागे आणखी व्यक्ती अथवा एखादी साखळी आहे का, याचा शोध घेत आरोपीला कोणत्याही स्वरूपात मदत करणाऱ्यांपर्यंत तपास पोहोचला पाहिजे. पीडित मुलीच्या कुटुंबियांनी तातडीने पोलीसठाणे गाठल्याने आणि पोलिसांनीही प्रकरणाची तत्परतेने दखल घेतल्याने पुढील गंभीर अनर्थ टाळण्यास मदत झाली. तपास सुरू असताना पोलिसांचे मनोबल कमी होईल किंवा पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबावर अतिरिक्त दबाव निर्माण होईल, अशी विधाने अथवा कृती कोणीही करू नये, असे आवाहनही डॉ. गोऱ्हे यांनी केले.

दोन दिवसांची पोलीस कोठडी तपासासाठी अपुरी

या प्रकरणातील आरोपीला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी दिल्याच्या पार्श्वभूमीवर डॉ. गोऱ्हे यांनी तपासाच्या व्यापकतेकडे लक्ष वेधले. या प्रकरणाची व्याप्ती, आरोपीची पार्श्वभूमी, त्याचे अन्य जिल्हे किंवा राज्यांतील संभाव्य संबंध, मोबाईल व डिजिटल पुरावे, सायबर तपास तसेच त्याला मदत करणाऱ्या अन्य व्यक्तींचा शोध या सर्व बाबी लक्षात घेतल्या तर तपासासाठी केवळ दोन दिवसांचा कालावधी अपुरा वाटतो. अशा गंभीर प्रकरणात पीडित मुलीला सहन करावा लागलेला शारीरिक आणि मानसिक त्रास, तिच्यावर निर्माण झालेली दहशत तसेच संपूर्ण घटनेचे गांभीर्य याची संवेदनशीलतेने दखल घेणे आवश्यक आहे. न्यायप्रक्रियेचा पूर्ण आदर राखून, न्यायालयाने पीडित मुलीच्या परिस्थितीचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि प्रकरणाच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी तपासयंत्रणेला आवश्यक संधी मिळेल, या दृष्टीनेही विचार व्हावा, अशी अपेक्षा डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केली. पीडित मुलगी अत्यंत कठीण मानसिक परिस्थितीतून जात असल्याने तिची ओळख आणि गोपनीयता पूर्णपणे सुरक्षित ठेवावी. तिच्यावर कोणताही सामाजिक अथवा मानसिक दबाव येणार नाही याची काळजी घेऊन तिला आवश्यक समुपदेशन, संरक्षण आणि कायदेशीर मदत उपलब्ध करून द्यावी, असेही त्या म्हणाल्या.

ऑनलाइन गेम खेळताना किंवा प्रायव्हेट चॅटिंग करताना समोरची व्यक्ती नेमकी कोण आहे, याची खात्री नसते. त्यामुळे मुला-मुलींनी आपली वैयक्तिक माहिती, मोबाईल क्रमांक, पत्ता, खासगी छायाचित्रे किंवा व्हिडिओ अनोळखी व्यक्तींसोबत शेअर करू नयेत. कोणाकडून दबाव, धमकी किंवा ब्लॅकमेलिंग होत असल्यास घाबरून न जाता तातडीने पालक, विश्वासू व्यक्ती किंवा पोलिसांना माहिती द्यावी. शाळा-महाविद्यालयांमध्येही सायबरसुरक्षा आणि सुरक्षित ऑनलाइन वर्तनाबाबत सातत्याने जनजागृती होणे आवश्यक आहे. महिला दक्षता समित्यांची भूमिका अधिक परिणामकारक करण्याची आवश्यकता व्यक्त करताना डॉ. गोऱ्हे यांनी या समित्यांचे काम केवळ बैठकांपुरते मर्यादित राहू नये. प्रतिबंधात्मक कारवाई, महिला व मुलींमध्ये कायद्यांविषयी जनजागृती तसेच पोलीस आणि नागरिकांमधील संवाद वाढविण्यावर भर द्यावा. पोलीस बीटमधील कर्मचारी, महिला दक्षता समित्या आणि स्थानिक नागरिक यांच्यात नियमित संवाद निर्माण झाल्यास अशा अनेक घटनांना सुरुवातीच्या टप्प्यातच प्रतिबंध करता येऊ शकतो, असे डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले.

यावेळी डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासमवेत शिवसेनेच्या संपर्कप्रमुख वर्षा मोरे, जिल्हाप्रमुख ग्रामीण महिला आघाडी नेहा भोकरे, शहरप्रमुख बंडू तळवेकर, नगरसेवक सूरज गोजे, नगरसेवक गणेश चारलेवार, जिल्हाप्रमुख महिला आघाडी मनीषा पापाळकर, अलका दलाल, निशांत चारडे, नितीन तिवारी, समीर शिंदे, सुषमा कांबळे यांच्यासह शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content