Homeएनसर्कलफेसबुक, इन्स्टाग्रामला ५,४००...

फेसबुक, इन्स्टाग्रामला ५,४०० कोटींचा दंड

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा लहान मुलांवर आणि त्यांच्या मानसिक आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेता, अमेरिकन न्यायालयाने ‘मेटा’ (फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी) ला मोठा दणका दिला आहे. मुलांच्या सुरक्षेशी तडजोड केल्याप्रकरणी, त्यांच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचवल्याप्रकरणी आणि गोपनीयतेच्या उल्लंघनाबाबत मेटा कंपनीवर तब्बल ५,४०० कोटी रुपयांचा (सुमारे ६५० दशलक्ष डॉलर्सहून अधिक) प्रचंड मोठा दंड ठोठावण्यात आला आहे. न्यू मेक्सिकोमधील न्यायालयात आणि अलीकडील विविध खटल्यांमध्ये बालकांच्या सुरक्षेशी संबंधित कायद्यांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत कंपनीला हा मोठा आर्थिक दंड आकारण्यात आला आहे.

प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरचा कार अपघातात मृत्यू

‘बार्बी’, ‘वंडर वुमन १९८४’, यासारख्या हॉलीवूड चित्रपटांसाठी आणि ‘ब्रिजर्टन’, ‘द क्राऊन’ यासारख्या लोकप्रिय वेबसिरीजमध्ये काम केलेली प्रसिद्ध ब्रिटिश मेकअप आर्टिस्ट आणि इन्फ्लुएन्सर अवा गिलीस हिचा एका भीषण कार अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. २६ वर्षीय अवा नॉर्थ यॉर्कशायर (इंग्लंड) येथे तिच्या व्हाईट फोक्सवॅगन पोलो कारने प्रवास करत असताना, एका ब्लॅक ऑडी कारसोबत तिची जोरदार धडक झाली. त्यात घटनास्थळीच तिची प्राणज्योत मालवली. अवाच्या या अकाली जाण्याने आंतरराष्ट्रीय मनोरंजन विश्व आणि तिच्या चाहत्यांमध्ये तीव्र शोक व्यक्त केला जात आहे.

दिल्ली विद्यापीठात करस्पाँडन्स कोर्स करताना एक वर्ष वाचणार

करस्पाँडन्स म्हणजेच दूरस्थ पद्धती (डिस्टन्स लर्निग)ने चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना आता पदव्युत्तर (पीजी) शिक्षणासाठी दोन वर्षांऐवजी केवळ एका वर्षाचाच अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार आहे. शिवसेना (ठाकरे गट) खासदार अनिल देसाई यांनी यासंदर्भात विद्यापीठ अनुदान आयोग (युसीजी)कडे पत्र लिहून केलेल्या मागणीला यश आले असून, यूजीसीने या नव्या नियमाला मान्यता दिली आहे. दिल्ली विद्यापीठाच्या ‘स्कूल ऑफ ओपन लर्निंग’सह इतर विद्यापीठांतील हजारो विद्यार्थ्यांचे यामुळे शिक्षणाचे एक वर्ष आणि आर्थिक खर्च वाचणार असून, नियमित विद्यार्थ्यांप्रमाणेच दूरस्थ शिक्षण घेणाऱ्यांनाही आता एका वर्षाच्या पदव्युत्तर शिक्षणाचा पर्याय उपलब्ध झाला आहे.

दिल्ली ते मुंबईपर्यंत साखरेच्या दरात वाढ

आगामी सणासुदीच्या हंगामापूर्वीच सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसला असून, दिल्लीपासून मुंबईपर्यंत साखरेच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे. ताज्या आकडेवारीनुसार, घाऊक बाजारात साखरेचे दर ३,८५० ते ४,१०० रुपये प्रति क्विंटलवर पोहोचले असून, उच्च दर्जाच्या (एम ३०) साखरेसाठी अतिरिक्त १५० ते २५० रुपये मोजावे लागत आहेत. याचा थेट परिणाम किरकोळ बाजारावर झाला असून प्रमुख शहरांमध्ये साखरेचा भाव ४१.५० ते ४७ रुपये प्रति किलोपर्यंत गेला आहे. वाढता इंधन व वाहतूक खर्च, तसेच जागतिक स्तरावरील पुरवठा साखळीतील बदलांमुळे साखरेचे भाव वधारल्याचे दिसून येत आहे.

नंदुरबारमध्ये ५०हून अधिक बालकांचे शोषण

पैशांचे आमिष, भीती आणि ब्लॅकमेलिंगचा वापर करून अल्पवयीन मुलांचे व युवकांचे लैंगिक शोषण करणाऱ्या एका २२ वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. या धक्कादायक प्रकारात पोलिसांना आरोपीच्या मोबाईलमध्ये ५०हून अधिक पीडितांचे अत्यंत आक्षेपार्ह व्हिडिओ आणि छायाचित्रे आढळून आली आहेत. प्राथमिक तपासात ५१हून अधिक बालके व तरुण या रॅकेटचे शिकार ठरल्याचा अंदाज असून, त्यापैकी जवळपास ४० जण अल्पवयीन असल्याचे तपासात समोर आले आहे. या भयावह ‘चाईल्ड पोर्नोग्राफी’ आणि ब्लॅकमेलिंगच्या घटनेमुळे संपूर्ण जिल्हा हादरून गेला असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करत आहेत.

ग्राहकांसाठी युपीआय सेवा मिळतच राहणार

सध्या सोशल मीडियावर ‘युपीआय’ व्यवहारांवर शुल्क आकारले जाणार असल्याच्या अफावा पसरल्या होत्या. मात्र ‘पेमेंट्स कौन्सिल ऑफ इंडिया’ (पीसीआय)ने याबाबत अधिकृत स्पष्टीकरण देत करोडो युझर्सना मोठा दिलासा दिला आहे. पीसीआयने स्पष्ट केले आहे की, ग्राहकांसाठी युपीआय सेवा पूर्वीप्रमाणेच पूर्णपणे मोफत राहील. याशिवाय, किराणा दुकाने आणि लहान व्यापाऱ्यांना त्यांच्या ग्राहकांकडून डिजिटल पेमेंट्स स्वीकारण्यासाठी कोणताही मर्चंट डिस्काउंट रेट (एमडीआर) किंवा अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नाही. ‘पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टीम’ कायद्यातील अलीकडील दुरुस्तीनंतर या अफवांना उधाण आले होते. मात्र या अधिकृत खुलाशामुळे आता सर्व संभ्रम दूर झाला आहे.

रस्त्यांच्या कामावरून मंत्री तटकरेंनी सुनावले

राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी रस्त्यांच्या संथ आणि निकृष्ट कामांवरून प्रशासकीय अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या एका आढावा बैठकीत प्रलंबित रस्ते प्रकल्पांचा मुद्दा उपस्थित करत, विकासकामांमध्ये होणारी दिरंगाई आणि दर्जाहीन काम खपवून घेतले जाणार नाही, अशा शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. नागरिकांना होणारा त्रास टाळण्यासाठी विहित वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने रस्त्यांची कामे पूर्ण करण्याचे कडक निर्देश त्यांनी दिले असून, कर्तव्यात कसूर करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशाराही यावेळी तटकरे यांनी दिला आहे.

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content