सोशल मीडियावर सर्वाधिक लक्षवेधक चर्चा आहे ती, एसआरकेने अर्थात शाहरुख खानने देऊळ बंद-२ची. त्याच्या रेड चिली या कंपनीने डिजिटल काॅपीच्या पैशासाठी अडवणूक न करता चित्रपटप्रदर्शनाचा मार्ग मोकळा केला याची. देऊळ बंदचा सर्वेसर्वा प्रवीण तरडे यानेच ही गोष्ट सांगितली आणि ती पूर्ण होईपर्यंत सोशल मीडियातून सगळीकडे पसरली. पैशाची काही अडचण आहे, असे एसआरकेला समजताच त्याने आपल्या खास शैलीत म्हटलं, बिल माफ करो, पिक्चर अच्छी बनी है ना, डीसीपी दे दो, पैसा बाद मे देखा जायेगा…

हिंदी फिल्मवाले मराठी चित्रपटाच्या मदतीसाठी पुढे येणं नवीन नाही. अनेक गोष्टी आहेत, त्यातून हे लक्षात येईल. हिंदीवाले फार व्यावसायिक असतात. आपला फायदा असेल तरच मदतीचा हात पुढे करतात, असेच काही नाही. तसं ते कुठेकुठे वागत असतीलही. अन्यथा चांगुलपणाचा गैरफायदा घेतला जाण्याची शक्यता असते आणि त्या सहकार्यवृत्तीला गृहीत धरलं जाण्याची भीतीही असते. पण नक्की कोणाला मदत करावी याचं भान आणि ज्ञान सगळ्यांनाच असते अथवा असावे. प्रभाकर निकळऺकर हे अतिशय ख्यातनाम छायाचित्रणकार. त्यांनी त्या जबाबदारीसह चित्रपट निर्मिती आणि दिग्दर्शन करायचे ठरवले. विद्याधर गोखले यांनी कथा, पटकथा, संवाद आणि गीते अशी जबाबदारी सांभाळली आणि चित्रपटाचे नाव ठरले, सुंदरा सातारकर. या चित्रपटात अशोक सराफ, उषा नाईक, रमेश भाटकर, बाळ कर्वे, विजय गोखले इत्यादींच्या प्रमुख भूमिका. एका दृश्यात राजेश खन्ना हवा होता. तो कायमच बिझी आणि लहरी म्हणून ओळखला जाणारा. पण आपण मूळ गिरगावकर आहोत. ठाकूरद्वार नाक्यावरील सरस्वती निवासचे रहिवासी होतो. महाराष्ट्रीय संस्कृतीशी आपला संबंध आला. आपण मराठी चित्रपटात छोटीशी का असेना पण भूमिका साकारायची संधी मिळतेय हे लक्षात येताच वांद्रे येथील मेहबूब स्टुडिओत त्याने चित्रिकरणासाठी वेळ दिला आणि राजेश खन्ना मराठी चित्रपटाच्या पडद्यावर दिसला.

हिंदी चित्रपटसृष्टीतील अशा अनेकांनी मराठी चित्रपटासाठी सहकार्य केले आहे. किशोरकुमारच्या विक्षिप्तपणाचे आणि मानधनाचे पाकिट आपल्या सेक्रेटरीच्या हाती आल्याशिवाय तो गात नाही, असे त्यांच्याबद्दल कितीतरी किस्से, गोष्टी, कथा, दंतकथा आहेत. ‘गंमत जंमत’ या चित्रपटातील अश्विनी तू ये ना… या गाण्यासाठी तो असा अजिबात वागला नाही, असे या चित्रपटाचे निर्माते सतिश कुलकर्णी यांनी एकदा मला सांगितले. हे गाणे आपण किशोरकुमारकडून गाऊन घेऊयात ही कल्पना संगीतकार अरुण पौडवाल यांची. ही संधी चांगली आहे असे दिग्दर्शक सचिन पिळगावकर आणि गीतकार शांताराम नांदगावकर यांनाही वाटणं स्वाभाविक आहेच. किशोरकुमारला या गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी मेहबूब स्टुडिओत आणण्याची जबाबदारी अरुण पौडवाल यांनी स्वीकारली. ते बप्पी लाहिरी यांच्याकडे संगीत संयोजक असल्याने किशोरकुमारशी त्यांचा उत्तम परिचय. तरीदेखील गाण्याचा ध्वनिमुद्रणाच्या दिवशी किशोरकुमार ताडदेवच्या फेमस रेकार्डिग स्टुडिओत एक हिंदी चित्रपटाचे गाणे गाऊन मग मेहबूब स्टुडिओत येणार होता. समजा जर तो आलाच नाही तर? भीती तर होती. पण जुहू येथील आपल्या गौरी कुंज या बंगल्यावरुन तो थेट मेहबूब स्टुडिओत आला आणि अनुराधा पौडवाल यांच्यासह अश्विनी तू ये ना… गायला. निर्माते सतिश कुलकर्णी यांच्या आमंत्रणावरुन मी हा अनुभव प्रत्यक्षात घेतला आणि या गाण्यामागची ही रंगतदार गोष्ट त्यांनीच सांगितली.

हिंदी चित्रपटसृष्टीने मराठी सिनेमावाल्याला सहकार्य करणं अनेक प्रकारचे. मला आठवतंय अंधेरीतील कमालिस्तान स्टुडिओत दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या तेरा मेरा साथ रहे… या चित्रपटासाठी गिरगावातील चाळीचा भलामोठा सेट लागला होता. कलादिग्दर्शक आर. वर्मन यांनी असा काही सेट उभारला की, आपण प्रत्यक्ष चाळीत आहोत असे वाटावे, असे कमालिस्तान स्टुडिओत पाऊल टाकताच वाटले. एक मोठे चित्रिकरण सत्र पार पडल्यानंतर एक-दीड महिना सेट तसाच उभा राहणार होता. पण चित्रपट माध्यम आणि व्यवसाय यांची उत्तम जाणीव असलेल्या महेश मांजरेकर यांनी या चित्रपटाचा निर्माता एन. आर. पचिसिया यांना सांगितले, सेट असाच उभा राहण्यापेक्षा याच चाळीच्या सेटवर घडेल असा एक चित्रपट मी निर्माण करतो. पचिसिया यांना ही कल्पना आवडली आणि संजय पवार यांची पटकथा असलेल्या संजय झा दिग्दर्शित ‘प्राण जाए पर शान न जाये’ या चित्रपटाची महेश मांजरेकर यांनी निर्मिती केली. या चित्रपटात अनेक मराठी कलाकारांच्या भूमिका आहेत. चित्रपटसृष्टीत अनेक गोष्टी घडत (बिघडतही) असतात. पडद्यावर चित्रपट पोहोचेपर्यंत काही वेगळ्या गोष्टीही घडतात, त्या या अशा…
(लेखक दिलीप ठाकूर ज्येष्ठ सिने पत्रकार आणि समीक्षक आहेत.)

